Bluepad | Bluepad
Bluepad
भारताने आता आक्रमक व्हावे!
S
Siddharth Deshmukh
19th Jun, 2020

Shareभारताने आता आक्रमक व्हावे!

'न हि वेरेन वेरानि, सम्मन्तीध कुदाचनं।
अवेरेन च सम्मन्ति, एस धम्मो सनन्तनो'
-भगवान बुद्ध

अर्थात, वैर वैराने शमत नाही, ते अवैरानेच संपते. या अवैराच्या विचारातून सर्वांबद्दल प्रेम, मैत्री आणि सद्भाव वाढू लागतो. यातूनच करुणेचा उदय होतो. ही मैत्री, करुणाच सामाजिक स्वास्थ्य वाढविते. हा सुंदर संदेश देणारा भगवान गौतम बुद्ध भारताने सर्व जगाला दिला. सर्व जगाने ही बुद्धची शिकवण मान्य केली पण आजच्या वर्चस्वाच्या लढाईत त्या शिकवणुकीशी फार मोठी फारकत होताना दिसत आहे. चीन हे त्याचं अगदी प्रत्ययकारी आणि वेदनदायी उदाहरण आहे. महासत्ता होण्याच्या नादात चीनने सर्व जगाला जैविक युद्धाच्या आणि आर्थिक दुर्बलतेच्या उंबरठ्यावर आणून ठेवलंच आहे याशिवाय अनेक वेळा ज्या देशासोबत शांती आणि मैत्रीपूर्ण व्यवहाराचे कागदी घोडे नाचवले त्या भारताच्या उरावर येऊन बसण्याचा प्रयत्न आता करीत आहे. संपूर्ण जगाला न भूतो न भविष्यती अशा कोरोना संकटात ढकलल्यावर या बेमुर्वत देशाला मैत्रीचे संबंध तोडत युद्धखोरी कशी काय सुचते?

१९५० पासून भारत आणि चीनमध्ये राजकीय संबंध सुरू आहेत. १९५४ मध्ये भारताचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी “पंचशील” ह्या राजनीतिक तत्त्वांचा पाया रचला आणि त्याला जगातील अनेक देशांनी पाठिंबा दर्शवला, यामध्ये चीन सुद्धा होता. पण १९६२ साली त्यांनी ह्या तत्त्वांचं उल्लंघन करत “हिन्दी चीनी भाई भाई” असं तोंडदेखलं म्हणत भारतावर आक्रमण केलं. हे युद्ध भारत जिंकू शकला नाही. त्यानंतर पुन्हा भारत आणि चीन संबंधांमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न झाले. भारताने आजवर चीनच्या बाबतीत आक्रमकपणा कधीही दाखवला नाही. या दोन राष्ट्रात मॅकमोहन लाइन, अरुणाचल प्रदेश – लडाख सीमा, अक्साई चीन अशा अनेक बाबतीत मतभेद आहेत पण ते सर्व शांततापूर्ण आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न भारताकडून झाला आहे. १९८८ मध्ये राजीव गांधी यांच्या बीजिंग दौर्‍यापासून याची खरी सुरुवात झाली. पण जसा १९६२ साली चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला तसाच तो आता ही खुपसला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या २०१४ पासून आतापर्यंत १८ वेळा भेटी झाल्या आहेत. भारत-चीन संबंधांची सत्तरी समारंभपूर्वक साजरी करण्याची घोषणा २०१८ च्या नोव्हेंबर मध्ये केली होती. त्यासाठी दोन्ही देशांत ७० कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार होतं. पण असं काही व्हायच्या आतच चीनने सर्व जगाला जैविक हल्ल्याच्या दावणीला बांधलं आणि आता तब्बल ५८ वर्षांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीच्या लडाखमधील गलवान परिसरात घुसखोरी केली आहे. अक्साई चीन हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे यापूर्वीच भारताने संगितले आहे पण चीनने त्याच अक्साई चीनलगतची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली आणि त्यातून उद्भवलेल्या संघर्षांत २० भारतीय जवानांचा बळी गेला आहे.

लडाख परिसरातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारतीय बाजूस एका रस्त्याचं बांधकाम सुरू असताना चीनकडून याबाबत अडथळे आणले गेले. एप्रिल महिन्यात या भागात मोठय़ा प्रमाणावर चिनी घुसखोरी झाल्याचं इथल्या नागरिकांनी पाहिलं होतं. भाजपचे लेह प्रांतातील चुशुल येथील लोकप्रतिनिधी कोंचोक स्टांझीन यांनीही या संदर्भात सूचना दिल्या होत्या. ते म्हणाले होते, ‘‘चिनी सैन्य खूप आत आले आहे आणि अनेकांना त्यामुळे आपापल्या घरी जाता येत नाही, अशी परिस्थिती आहे.’’  तरीही भारतीय लष्कराने त्या वेळी या घुसखोरीस लष्करी प्रतिसाद दिला नाही. याआधी चीनने देपसांग (२०१३), चुमार (२०१४) आणि सर्वात गाजलेल्या डोकलाम (२०१७) मध्ये अशीच घुसखोरी केली होती पण त्यावेळी चीन आल्या पावली परत गेला होता. ह्या एप्रिल मधली घुसखोरी मात्र खूपच गंभीर आहे.

यावर उपाय म्हणून दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी ६ जून २०२० रोजी या संदर्भात बोलणी केली. त्यातून निष्कर्ष निघाला की दोन्ही देशांच्या लष्कराने या प्रांतातून माघारी फिरावे. युद्ध नको म्हणून दोघांनीही ते मान्य केलं. त्यानुसार या माघारीस या आठवडय़ात सुरुवात झाली. त्यानुसार चिनी सैनिक खरोखरच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे गेले आहेत का हे पाहण्यासाठी गेलेल्या आपल्या टेहळणी पथकावर संख्येने त्यापेक्षा किती तरी अधिक असलेल्या चिनी तुकडीने अमानुष हल्ला केला. नियंत्रण रेषेवर कितीही तणाव निर्माण झाला तरी एकमेकांवर गोळीबार करायचा नाही, असा ‘नियम’ दोन्ही देशांत होता. पण घातकी चीनी सैनिकांनी गोळीबार नाही तर अणकुचीदार खिळे ठोकलेल्या लाठय़ाकाठय़ांनी भारतीय जवानांवर हल्ला केला. काहींचा कडेलोट केला असंही म्हटलं जात आहे. आपल्या नि:शस्त्र असलेल्या सैनिकांना काय वेदना सहन कराव्या लागल्या असतील याची कल्पनाही करवत नाही! तरीही भारतीय जवानांनी ४३ चीनी सैनिकांना मारलं असं म्हटलं जात आहे, कारण चीनी सरकार किंवा माध्यमं ही गोष्ट उघड करू इच्छित नाहीत.

चीनच्या ह्या मुजोरीला आता सुद्धा फक्त कागदावर उत्तर देणं पुरेसं होणार नाही कारण चीनच्या नादी लागून आता नेपाळसुद्धा भारताच्या विरोधात उभा ठाकला आहे. तिकडे पाकिस्तानच्या कलागती, बांग्लादेशाच्या घुसखोरी सुरूच आहेत आणि शिवाय देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून या रांगेत भारत जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. एवढ्या सगळ्या आव्हानांना एकावेळी तोंड द्यायचं आहे. यावेळी सर्व जनतेने आणि सर्व पक्षांनी एक दिलाने या सर्व परिस्थितीचा सामना करणं आवश्यक आहे. सीमेवरचे आपले जवान आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सक्षम आहेतच पण आपण ही त्यांना खंबीर साथ द्यायला हवी. आपल्यासारखे सर्वसामान्य चीनी वस्तूंवर बहिष्कार घालून आपला केवळ संताप व्यक्त करू शकतात. पण आपण चीनी कंपन्यांना भारतात दिलेला प्रवेश सुद्धा आपण नाकारला पाहिजे. यात कदाचित आपल्या जीवनशैलीवर परिणाम होईल पण भविष्यासाठी तेच उपयुक्त आहे. संकट येतं ते आपल्यातील सामर्थ्याची ओळख करून देण्यासाठी याची आपण जाणीव ठेवली पाहिजे.

22 

Share


S
Written by
Siddharth Deshmukh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad