Bluepad | Bluepad
Bluepad
कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या.... स्वस्ताई बये, दार उघड...
Anjela Pawar
Anjela Pawar
24th Apr, 2020

Share


कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या.... स्वस्ताई बये, दार उघड...
महागाई कमी करण्याचे अनेक प्रयत्न करूनही ती बया काही जायचं नाव घेत नव्हती. ती सर्वसामान्यांचा जीव घेतच होती. पण कोरोनाने आता माणसासोबतच ह्या बयेला सुद्धा कोनाड्यात बसवलं आहे. जगभरात झालेली कच्च्या तेलाच्या किंमतीतील घट याला करण ठरली आहे.
इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमती शून्याखाली घसरल्या आहेत. म्हणजेच आता कच्च्या तेलाचं उत्पादन करणारे देश त्यांच्याकडून खरेदी करणाऱ्यांना पैसे देऊन तेल विकत घेण्याची विनंती करत आहेत.
लॉकडाऊनमुळे सध्या जगभरात लोक आपापल्या घरांमध्ये आहेत, विमानसेवा ठप्प आहेत आणि त्यामुळे इंधनासाठी, परिणामी कच्च्या तेलासाठी असलेली मागणी रोडावली आहे. कच्च्या तेलाची घटलेली मागणी आणि तेल साठवून ठेवण्याची मर्यादित क्षमता, यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत ही विक्रमी घसरण झाली आहे.
यामुळे भारतात कच्च्या तेलाची साठवणूक करून भविष्यात लोकांना त्याचा फायदा मिळू शकतो. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कमतरता येऊ शकते. महागाईच्या दरातही कमतरता येऊ शकते. कच्च्या तेलाच्या किमती घटल्यामुळे भारताचा विकास दर वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात सरकार व्याजदरात घट करू शकते.
मात्र मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला मोठा फटका बसला. अंबानीच्या एकूण नफ्यापैकी तब्बल ६० टक्के नफा तेल व्यवसायातून मिळतो, त्यामुळे सध्याच्या तेल आपत्तीचा त्यांना मोठा फटका बसतोय. दररोज अंबानींचं जवळपास २९०० कोटी रुपयांचं नुकसान होत होतं, त्यामुळे गेल्या दोन महिन्यात अंबानींचं पावणे दोन लाख कोटींचं नुकसान झालंय. सध्या त्यांची संपत्ती ३  लाख ६० हजार कोटी रुपये (४८ अब्ज डॉलर्स) इतकी आहे.
अमेरिकन तेलाच्या किमतींबाबत वेस्ट टेक्सास इंटरमीजिएट (WTI) ला बेंचमार्क म्हणजे पाया मानलं जातं. इथे तेलाच्या किंमतीत घसरण होऊन किंमत प्रति बॅरल शून्याखाली म्हणजेच उणे ३७.६३ डॉलर्स झाली आहे. कारण आपल्याजवळच्या तेलाची विक्री झाली नाही तर उत्पादन करण्यात आलेलं तेल साठवायचा कुठे, असा मोठा प्रश्न उत्पादकांसमोर मे महिन्यात उभा राहू शकतो.
तेल साठवून ठेवण्याबाबतच्या अडचणी लक्षात घेता आता तेल उत्पादक कंपन्यांनी वाढीव स्टॉक ठेवण्यासाठी टँकर्स भाड्यावर घेतले आहेत. पण या सगळ्याचा परिणाम अमेरिकेतल्या तेलाच्या किमतींवर झाला आणि या किमती अगदी शून्याच्याही खाली गेल्या. त्यामुळे आता उत्पादित तेल कुठे साठवयाचं आणि या तेलाच्या घसरलेल्या किंमती या दोन्हींची चिंता आता अमेरिकन कंपन्यांना आहे.
सोमवारी अमेरिकेत झालेल्या या घसरणीचा परिणाम जगभरातल्या तेल बाजारांमध्ये झाला. तेलाचा आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असणाऱ्या 'ब्रेंट'मध्येही कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये ८.९% घसरण नोंदवण्यात आली. इथे तेलाच्या किमती घसरून प्रति बॅरल २६ डॉलर झाल्या आहेत.
कमी झालेल्या मागणीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं कच्च्या तेलाचं उत्पादन घटवण्यात यावं का, याविषयी तेल उत्पादक देशांमध्ये सुरुवातीला वाद झाले होते. यानंतर तेल उत्पादक १० टक्क्यांनी कमी करण्याबाबत तेल उत्पादन करणाऱ्या 'ओपेक' आणि इतर देशांमध्ये एकमत झालं. जगभरातलं कच्च्या तेलाचं उत्पादन इतक्या मोठ्या प्रमाणात कमी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पण उत्पादन कमी केल्यानेही तेल उत्पादकांसमोरच्या अडचणी कमी झाल्या नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
तेल उत्पादन करणाऱ्या ओपेक आणि रशियासारख्या इतर देशांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन घटवण्याचं ठरवलं होतं. अमेरिकेनेही असं केलं. पण तरीही सध्या जगात गरजेपेक्षा जास्त तेलसाठा आहे. आणि इतकं तेल वापरलं जाणार का, फक्त हाच प्रश्न नाही. तर लॉकडाऊन शिथील होऊन पुरेशी मागणी निर्माण होईपर्यंत इतकं तेल साठवून ठेवता येणार का, ही देखील मोठी चिंता आहे. साठवण क्षमता झपाट्याने संपतेय आणि तेल उत्पादन सुरूच असल्याने भविष्यात कच्च्या तेलाच्या किंमती आणखी खाली येण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलासाठीची जगभरातली मागणी वाढली तरच ही परिस्थिती सुधारेल. पण सध्यातरी हे जगभरातल्या आरोग्यसंकटावर अवलंबून आहे.

2 

Share


Anjela Pawar
Written by
Anjela Pawar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad