Bluepad | Bluepad
Bluepad
शेकोटी
बाबू घाडीगांवकर
बाबू घाडीगांवकर
25th Nov, 2022

Share

शेकोटी
आताच्या काळात ऋतुचक्राचा काहीही भरवसा राहिला नसला तरी हिवाळ्यात कधी कधी कडाक्याची थंडी पडते. आताही गेल्या आठवड्यात तशी थंडीची लाट होती. गेल्या दोन तीन दिवसांपासून परत पावसाचे ढग दुपारनंतर आभाळात गोळा होत आहेत आणि रात्रीची थंडी गायब झाली आहे. आता थंडीपासून संरक्षण करणारी अनेक साधनं घरातच उपलब्ध असल्याने घराबाहेर शेकोटी करण्याचे प्रसंग येत नाहीत. शिवाय शेकोटीसाठी लागणारी सामग्री आता कमी झाल्याने शेकोटी करायची, पण काय पेटवायचं हा प्रश्न निर्माण होतो. मात्र कधी शेकोटीची लहर स्वस्थ बसू देत नाही. मग एखाद्या घमेल्यात नारळाची सोडणं, किश्या, काटक्या गोळा करून आमचं कुटुंब शेकोटीचा आनंद घेतं.
पुर्वी गावातली घरंदेखील साधीसुधी होती. त्यामुळे शेकोटी पेटल्याने जमीन काळी पडेल, टाईल्स खराब होतील, भींती काळ्या पडतील यांसारखे आधुनिक धोके उद्भवत नव्हते. याउलट शेकोटी पेटविल्यावर शेकोटीतलं किटूळ जवळच्या उडवीवर पडेल का... गुरांच्या कावणावर पडेल का...गवताच्या लाट्यांवर पडेल का... नाचणीच्या काडीच्या वरंडींवर पडेल का... भुईमूगाच्या गुळ्यावर पडेल का याबाबत काळजी घ्यावी लागायची. आज शेकोटीसोबतच वरील सर्व गोष्टीही नामशेष झाल्यात जमा आहेत.
भल्या पहाटे महापुरुषाच्या पोखरावरचं पाणी भरण्यासाठी आमची म्हातरी आये आम्हाला झोपेतून उठवायची तेव्हा थंडीचा जोर कमालीचा वाढलेला असायचा. पहाटेची थंडी फारच बोचरी असायची. आम्ही उठून हंडे, कळशा घेऊन थंडीनं थरथरतच पोखरावर जायचो. कडक थंडीतही पोखराचं पाणी मात्र उबदार वाटायचं. आम्हा मुलांना, आईला, पोखराकडे हाकलून म्हातारी आये खळ्यासमोरच्या कुणग्यात पहाटेच मस्त शेकोटी पेटवायची. आमचं पाणी भरून होईपर्यंत ती शेकोटीजवळ अंगाचं मेटकुळं करून बसून रहायची. कधी एखादा भरलेला हंडा घरात ठेवल्यावर परत पोखरावर जाण्याआधी आम्ही शेकोटीजवळ उभे राहायचो. आम्ही उभे राहिलो की म्हातारी आये जाम भडकायची. " जावा तकडे पोखरार... तुम्का पोराटोरांक कसली थंडी रे... पाणी भरा आधी..." आमच्या घरातला कोणीच सहसा म्हाताऱ्या आयेला प्रत्युत्तर करीत नसे. तशी कोणाची हिम्मतही होत नसे. पण मग आम्ही ओठातल्या ओठात " मगे थंडी काय फक्त म्हाताऱ्यांकच लागता वाटता..." असे पुटपुटत परत रिकामे हंडे घेऊन पोखराची वाट धरायचो. पाणी भरून झाल्यावर मात्र आम्ही शेकोटीकडे धाव घ्यायचो. मग उगवतीचा सूर्य चांगला डोंगरावर येईपर्यंत आम्ही शेकोटीभोवती बसून सगळं अंग शेकून घ्यायचो.
कधी आमच्या घरी पाहुणे आल्यावर शेकोटीचा कार्यक्रम आणखी रंगत असे. पाहुण्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा ऐकता ऐकता वेळ कधी निघून जायचा ते कळतही नसे. कधी कधी शेकोटी तोंडाने फुंकताना शेकोटीतला धूर नाका तोंडात जायचा. मग त्या धुरात जीवही गुदमरल्यासारखा व्हायचा. शेकोटीतून वर जाणारा धूर अनेकदा कलात्मक आणि आताच्या भाषेत ' फोटोजेनिक ' वाटायचा. कधी कधी शेकोटीतल्या धुराची छान वलयं वर वर तरंगत जायची. हा नजारा अगदी सुरेख दिसायचा. बऱ्याचदा शेकोटीच्या धुराच्या विळख्यात सापडलेला पाचोळा धुरासोबत उंच उंच उडत जायचा. असं एखादं पान खूप उंच गेल्यावर धुराच्या विळख्यातून सुटेपर्यंत मी त्या पानाची गंमत बघत रहायचो.
शेकोटीचा कार्यक्रम लांबला तर शेकोटी पेटती ठेवण्यासाठी पालापाचोळा, काटक्याकुटक्या जमवून आणण्यासाठी मोठी माणसं आम्हा मुलांना इकडे तिकडे पिटाळायची. पहाटेच्या दवात भिजलेला पालापाचोळा, काटक्या आधी ' धूर ' केल्याशिवाय पेट घ्यायच्या नाहीत. एकदा शेकोटी चांगली पेटली की मात्र मोठी माणसं शेकोटीजवळ आणि आम्हाला त्यांच्या मागे उभं रहावं लागायचं.
अनेकदा शेकोटीतलं किटूळ पडून जवळपासच्या पतेऱ्यास आग लागलेली आठवते. एकदा दोनदा तर गवताच्या उडवीस आणि काडीच्या वरंडींसही आग लागलेली आठवते. म्हाताऱ्या आयेच्या लुगड्यासही अशीच एकदा शेकोटीतलं कोलीत लागून आग लागली होती. पण किती काही झालं तरी थंडीच्या दिवसांत ही शेकोटी आवश्यक व ' मस्त ' वाटायची.
शाळेत शनिवारी सकाळी आमचे गुरुजी आमचा शेकोटीचा कार्यक्रम घ्यायचे. शेकोटीभोवती बसून गाण्यांच्या, शब्दांच्या भेंड्या लावायचे. सामान्यज्ञानावर आधारलेली प्रश्नमंजुषा व्हायची, खूप मजा यायची. स्काऊट-गाईडच्या आमच्या कॅम्पमध्ये तर शेकोटी हा अनिवार्य कार्यक्रम होता.
आता शेकोटी सहसा कुठे दृष्टीस पडत नाही. एखाद्या बसस्टॉपजवळ पहाटे शेकोटीसारखं काही पेटवलं तरी त्या शेकोटीस पुर्वीची ती मजा नाही. शेकोटीजवळच्या पुर्वीच्या त्या गप्पांही नाहीत आणि शेकोटीजवळचा तो पुर्वीचा म्हाताऱ्या आयेचा दराराही नाही. असे व्हायचेच! कालाय तस्मै नमः हेच खरं.
बाबू घाडीगांवकर
शेकोटी

240 

Share


बाबू घाडीगांवकर
Written by
बाबू घाडीगांवकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad