Bluepad | Bluepad
Bluepad
चित्तरकथा : अशाच एका मी काढलेल्या चित्राची.
पद्मनाभ प्रभाकर हिंगे
पद्मनाभ प्रभाकर हिंगे
25th Nov, 2022

Share

चित्तरकथा : अशाच एका मी काढलेल्या चित्राची.
चित्तरकथा : अशाच एका मी काढलेल्या चित्राची.
काल खंडेरायाच्या पूजनानं मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली. मार्गशीर्ष हा बारा मराठी महिन्यांमधील सर्वार्थाने सर्वोत्तम महिना, मासोत्तमी मास.. भगवंतानंही गीतेतल्या विभूती योगात या महिन्याला महत्वाचा महिना म्हणूनच सांगितलंय. भगवंतानं, "मासांनां मार्गशीर्षोsहम्..." 'महिन्यांमधील 'मार्गशीर्ष' मी आहे..' या शब्दांत मार्गशीर्ष महिन्याचं महत्व सांगून ठेवलं आहे.
काल मार्गशीर्ष महिन्याबद्दल बऱ्याच मित्रांकडून व्हॉट्सऍपवर काही माहिती पर, काही उपदेशपर पोस्ट्स येऊन पडल्या आहेत! रिपीटेड पोस्ट्स, एकच पोस्ट चार चार जणांकडून. मात्र त्यातल्या उपदेशांविषयी इथं काही कुणाला मी डोस पाजत बसणार नाही. शेअरोबाजी मला रुचत नाही आणि मी क्वचितच करतो. यात इगो वगैरे काही नाही. आहे ते आहे.
पावसाळा संपून हिवाळ्यातल्या थंडीची मस्त हुडहुडी भरू लागते. ह्या उत्तम अश्या मार्गशीर्ष महिन्यात आरोग्यदायी वातावरण असते. सृष्टीवैभव खुललेले असते. शरीरात उत्साह भरलेला असतो. मन ताजंतवानं असतं.
जरा इकडं कान करा.. तुमचं लग्न व्हायचं असेल तर गोष्ट तुम्हांला सांगून ठेवतो. ऐकायचं की नाही ते तुम्हीच ठरवायचं. मला असं ऐकल्याचं आठवतंय की, म्हणे मार्गशीर्षातले लग्नाचे मुहूर्त जरा 'जास्तच' पवित्र असतात. कुणाला सांगू नका, माझं, आमच्या घरातली बहुतेक सर्व‌ लग्नं...
मार्गशीर्षातलीच !!
मला तर हा मार्गशीर्ष महिना म्हणजे काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा देणारा वाटतो. नव्याने वाचन करायला, लेखन करायला, फिरायला, फोटो काढायला, इत्यादी.. अर्थात हे सारे छंदच बरं का.
मी वाचक आहे का? हो हो, आहे तर. मी सतत वाचत असतो. म्हणजे धडपडताना वाचणे, असंच नाही तर, वाचन करीत असतो. वृत्तपत्रे, पुस्तके मी वाचतोच. आवडतं मला वाचायला. आताशा मोबाईलमधल्या लांबसडक पोस्टीतर वाचायच्याच असतात.
थोडा विषय बदलू का? 'लांबसडक' हा शब्द मला भारी आवडतो. कारण कादंबऱ्यांतून कादंबरीतल्या हिरॉईनच्या सुंदर सौंदर्याविषयी लेखक अनेक उपमा अलंकारांत शब्दयोजना करीत असतो. त्याचबरोबर तिच्या म्हणजे त्या ललनेच्या, सुंदर चेहऱ्याबरोबर तिच्या घनदाट, कृष्णमेघासारख्या आणि लांबसडक कुंतलांचंही मोठ्या रंजक मोहक शब्दांत लेखक वर्णन करीत असतो, कौतुक करीत असतो. त्यामुळे मला 'लांबसडक' केसांचं खूपच हे आहे, आपलं काय ते हां, आकर्षण आहे.
'लांबसडक' शब्द वाचण्यात, लिहिण्यात येऊ घातला तर डोळ्यांवर धुंदी येतेच. अश्या धनदाट केशसंभारामुळे खुलून दिसणाऱ्या एखाद्या सुंदर ललनेचं चित्र काढता येईल का मला? किंवा त्यावर फार फार लिहावं, जम्मेल तसं चितारावं असंही वाटतं हो, अगदी लांबसडकच्या लांबसडक ....
थांबवतो इथेच हा 'लांबसडक' विषय आणि येतो मूळ विषयावर.
मी लेखक आहे का? अं.. तशी शाळेत 'ग म भ न' अशी अंकलिपी शिकवली होती. गुरुजींनी शाळेत, आईने घरी आणि वडलांनी ऑफिसमधून आल्याबरोबर गिरवूनही घेतली होती. चुकल्यानंतरचे आजही आठवणारे रट्टे, फटकेही खाल्ले होते. त्यामुळे चार ओळी लिहू शकतो. म्हणून मी मला लिहा-वाचायला येतं असं ठामपणे सांगू शकतो. अर्थात, यावरून काही मी मोठा लेखक असल्याचा कधीच दावा करत नाही.
शाळेत चित्रकला हा विषय होताच. पण तेव्हा मजल जायची, उगवता सूर्य, त्रिकोणी डोंगर, नागमोडी वाहणारी नदी, चार चार चार असा देवनागरीतला चारचा आकडा चारसहावेळा टाकला की झाले आभाळात उडणारे पक्षी!
पुढे 'मिस'रुड दिसायला सुरुवात झाली. आणि जाणवू लागलं आपल्याला चित्रं काढायला बहुतेक आवडेल!
अं..हं.. आवडायचं बुवा आपल्याला पुढे, त्या गंधधुंद वयात, पट्टीच्या चित्रकारांनी चितारलेली सुंदर आकर्षक आकारातली सौंदर्यवतींची गोडाकार चित्रे.
एखादी सुंदर रमणी आपल्याला निदान चित्रात तरी बांधून ठेवता येईल का? प्रयत्न करावा काय? असंही वाटू लागलं.
'त्या काळी फारसं मोकळं वातावरण नसायचं, मोकळीक तर नव्हतीच. आजच्या सारखे 'क्या..मेरा' वाले मोबाईलही नव्हते. असे काही असू शकेल भविष्यात, असं कुणी बोलू लागलं तर त्याला कितपत घ्यायचं, विश्वास ठेवायचा की नाही अशी परिस्थिती होती. 'हॉटशॉट' 'क्या..मेरा' घेण्याइतकीही खरंतर ऐपत नसायची. मग चित्रं काढूयात का? हा विचार मनात रुजू लागला.
तशी बरीच चित्रे मी माझ्या गंधधुंद वयात काढायचा प्रयत्न करीत असे. पण म्हणून मला कुणी चित्रकार म्हणून संबोधण्याचा प्रयत्न केला तर, तर खबरदार! मी नाही हं हे खपवून घेणार!
कृष्णा कुसूरकर आणि सुरेश शिंदे असे दोन मित्र होते माझे. कृष्णा उत्तम चित्रकार तर सुरेश अव्वल मूर्तिकार. नलेश खेडकर हा माझा मित्र तर आता प्रसिद्ध शिल्पकार म्हणून नावारुपाला आलाय. या तिघांच्या अप्रतिम कलाकृती पाहण्यात मी रंगून जायचो. मला येतील का काढता सुंदर चित्रं? विचार बळावला. या मागे आणखी एक गुप्त कारण होतं. आता गुपित हे गुपित असतं ना. हे सिक्रेट कसं फोडायचं?
तुम्हांला म्हणून सांगतोच झालं हे सिक्रेट. कुणाला सांगू नका, म्हणजे झालं! मला काही पहेलवानासारखी देहयष्टी नाही, किंवा राजबिंडं रूप नाही. पिक्चर मधल्या हिरोसारखी एकही हरिणाक्षी किंवा मीनाक्षीच्या डोळ्यांत भरेल अशी गुणवत्ता नाही. बॉक्सिंग पण शिकण्याचा प्रयत्न केला बरं मी! आत्ता आठवलं. माझा एक मित्र होता विलास मालेगावकर, त्याला शाळेत बॉक्सिंगमध्ये पहिलं पारितोषिक मिळाल्याचं त्यानं सांगितलं होतं मला. त्यानं चार दोन ठोसे शिकवताना मारल्यावर वाकड्या तोंडानं त्या प्रकाराकडे मी डोळेझाकच केली. असो. विषय वाढवत नाही. 'ते' सिक्रेट सांगूनच टाकतो ना.
अहो, कसंय मुलींवर छाप पडण्यासाठी आपल्याला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवता आलं पाहिजे ना !!...
मूळ 'चित्तरकथा : ..' या विषयावर बोलणं आवश्यक आहे. 'पुढे काय ते बोल' असं तुम्ही कुत्सितपणे बोलण्या अगोदर त्या विषयाला हात घालतो.
वर केलेल्या साऱ्या फालतू बडबडीनं तुम्ही सुद्धा कंटाळलात ना?
कृष्णाने काढलेल्या आणि काढताना पाहिलेल्या चित्रांतून प्रेरणा घेऊन मी ड्रॉईंग पेपर्स, ब्लॅक पेन्सिलचा बॉक्स, जलरंगांची पेटी, 'खोडरबरां'चा मोठा बॉक्स इत्यादी साहित्य हप्त्याहप्त्याने, पैसे जमवल्यावर आणले. ड्रॉईंग पेपर लावण्यासाठी आवश्यक असलेला लाकडी स्टँड काही विवक्षित आणि नेमक्या डोळ्यांना दिसेल अश्या वेळी अगदी मिरवत मिरवत आणला. अर्थात उसनवारीने.
इमानदारीने चित्रं रेखाटण्याचा प्रयत्न सुरू केला. कृष्णा थोडं मार्गदर्शन करायचा. तनुजा, मीनाकुमारी यांची छायाचित्रे समोर लावून पेन्सिलीच्या रेघांवर एक एक सेंटीमीटर वर खुणा करून चौकटी आखून घेतल्या. पुढे चित्र पूर्ण झाल्यावर खोडरबराने चित्राला धक्का न लागता रेघा खोडता येतील अश्या.
मनापासून, तास न् तास मानपाठ एक करीत पाच पाच सहा सहा दिवस एक एक चित्र काढू लागलो. जमतंय असं वाटू लागलं. बॉबीफेम डिंपलही ड्रॉईंग पेपरवर प्रसन्नतेनं प्रकटली. संत मीराही आनंदानं अवतरली. तसा देवआनंद लाडका असला तरी, मनापासून कागदावर यायला तो अनुत्सुकच होता. ओळखता येईल इतपतच प्रकटला.
उत्साह वाढला. काहीतरी वेगळं काढण्याची उर्मी आली होती. काय काढावं?
एके दिवशी सहजच अजिंठा वेरुळच्या लेण्यांची छायाचित्रे पहायला मिळाली. विचारचक्र फिरू लागलं. एक मोठं सुंदर शिल्पचित्र डोळ्यांसमोर आलं.
'बोधिसत्व पद्मपाणि....... !!!'
सेंटीमीटरचे, रेघांचे संकेत, पद्धत दूर ठेवून मुक्तहस्त चित्र काढता येईल का? असा विचार मनात आला. अंमलातही आणला. अगदी तन्मयतेने, तीन चार महिने हे पेन्सिल स्केच मी काढत होतो !!
चित्र पूर्ण झालं की नाही, हे मला सांगता येणार नाही. खूप मित्र स्नेही यांना मी, हे मला स्वत:लाच खूप आवडलेलं, खूप कष्टपूर्वक काढलेलं, चित्र मी उत्साहाने दाखवू लागलो. त्यांच्या प्रतिक्रिया काय येतील ते उत्सुकतेनं ऐकण्यासाठी कान आतूर असायचे....
पण हाय.. फारसं काही कुणाला कौतुकच नव्हतं. निदान आपल्याला कुणी चुकलेलं सांगावं, मार्गदर्शन करावं, ही अपेक्षा सुद्धा भंग पावली....
जाऊ दे झालं..
अहो कुठे ते बलाढ्य प्रतिभावंत चित्रकार आणि कुठे मी. नाद नाही करायचा...
चित्र काढण्याचा छंद म्हणाल तर तोही इमानदारीत जोपासता नाही आला मला.
नाही जमवता आलं. कारण नैराश्याबरोबर 'कं-टा-ळा' नावाचा कुंभकर्णी राक्षस. वाईट वाटतं याचं.
चित्रं जपून ठेवली होती खरी. पण, दहा वेळा घर बदललं. कागद जीर्णशीर्ण झाले. शक्य तितक्या चित्रांचे फोटो काढून ठेवले. काही दिवसांपासून ही चित्रं व्हॉट्सअँपवरून शेअरू लागलो. काहींच्या प्रतिक्रियांनी सुखावलो. "छान छान, सुंदर.. पुन्हा सुरु कर, करा.."
मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी लक्ष्मी पूजन व्रत आर्थिक संपन्नतेसाठी करतात. येतही असेल संपन्नता. पण खरं वैभव आपल्या मनात असलेले काही छंद जोपासायला मिळाले तर मिळणाऱ्या आनंदात असू शकेल. त्यातलं समाधान हे महत्वाचे असू शकेल. संपन्नता म्हणजे तरी काय हो. पैसा पैसा म्हणजे किती हवा?
महिना, मासोत्तमी मास, मार्गशीर्ष सुरु झाला आहे. पुन्हा एकदा प्रेरणा. मला पुन्हा एकदा नवी प्रेरणा मिळाली. या आनंदाप्रीत्यर्थ मी काढलेले ते चित्र तुम्ही सुद्धा पहा. आवडलं तर तसं कळवालही.
एक सांगू का? तुम्ही सुद्धा तुमचा एखादा आवडीचा छंद असेल तर करा की विचार. जे जे सुंदर, आहे अंदर, लाओ बाहर. हा सुंदरं मार्गशीर्ष आत्ताच तर सुरू झालाय. चार आठवडे आहेत संपायला..
विचार करा पण विचार करीत नुसतेच बसू नका. हसू नका...
य्येस आय एम,
पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे.
पुणे वाले..
मिती : मार्गशीर्ष शुक्ल द्वितीया, दक्षिणायन, शरद ऋतू. शुभकृतनाम संवत्सर, शालीवाहन शके १९४४.
शुक्रवार दिनांक : २५ नोव्हेंबर
२०२२.

232 

Share


पद्मनाभ प्रभाकर हिंगे
Written by
पद्मनाभ प्रभाकर हिंगे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad