Bluepad | Bluepad
Bluepad
गावाक ऱ्हवान करू काय?
बाबू घाडीगांवकर
बाबू घाडीगांवकर
24th Nov, 2022

Share

गावाक ऱ्हवान करू काय?
कोरोनाच्या महामारीत मुंबईत कुत्र्या-मांजरासारखी माणसं मरायला लागली तेव्हा जीवाच्या भयानं बाबल्याने गावाकडची वाट धरली. बाबल्याच्या आयेला जरी लिहीता वाचता येत नसलं तरी कर्णोपकर्णी झालेल्या कोरोनाच्या बातम्या तिच्याही कानांपर्यंत पोचल्या होत्या. बाबल्या मुंबईतल्या कामधंद्याचा विचार न करता सुखरूप गावाकडे यावा यासाठी तिने सगळे देव पाण्यात बुडवून ठेवले होते. बाबल्या गावी आला तेव्हा तिचा जीव भांड्यात पडला.
कोरोना महामारीच्या काळात गावोगावची शेती फारच ' व्हायरल ' झाली. अनेक ठिकाणी मुंबईचे चाकरमानी पारंपारिक व आधुनिक शेतीकडे वळलेले पहावयास मिळाले. मुंबईतील दररोजचं धकाधकीतलं आणि दगदगीचं आयुष्य जगण्यापेक्षा गावात राहून शेतीभाती नाहीतर मोलमजूरी करून सुखासमाधानाचं समाधानी आयुष्य जगण्याची इच्छाही अनेकांनी बोलून दाखवली. बाबल्या आधीपासूनच अतिशय कामसू. कोरोना महामारीच्या काळात गावाकडेही अतिशय कडक निर्बंध लादलेले. गावाकडची दुकानं, बाजारपेठा, सगळीकडे कडकडीत बंद! तशा काळात बाबल्या घरात बसून राहिला नाही. त्याने गेली कित्येक वर्षं पडसार असलेली जुन्या घरठाणाची जागा साफसूफ केली. त्या जागेत त्याने मुळ्याची , माठाची भाजी पेरली. पडसार जागा आणि बाबल्याची मेहनत फळास आली आणि दोन्ही भाज्या जोमात वाढल्या. बाबल्याचा भाजीपाला तयार झाला तोपर्यंत कोरोनाचे कडक नियम काही प्रमाणात शिथिल झाले. घाटावरची भाजी येणं बंद झाल्याने बाबल्याची ताजी कुलकुलीत भाजी गावातच हातोहात खपू लागली. बाबल्याच्या मेहनतीला मिळालेलं फळ बघून बाबल्याची आये सुखावून गेली. कडक लाॅकडाॅऊनच्या काळात सर्वत्र मंदीची लाट असताना बाबल्याच्या हातात मात्र चार पैसे आले.
एके दिवशी चहा पिण्यासाठी आलेल्या शेजारच्या अण्णाकडे बाबल्याच्या आयेने बाबल्याच्या लग्नाचा विषय काढला. " माझ्या बाबल्याक याक सुमाराक्सा पोरग्या बघ अण्णा..." या तिच्या बोलण्यावर अण्णा नाक मुरडत म्हणाला," हल्लीच्या चेडवांक मुंबैत ऱ्हवणारो घोव होयो. मुंबैत फ्लॅट होयो... हापिसातली नोकरी होयी. बाबल्याची आसा काय अशी रुम? " अण्णाच्या प्रश्नावर बाबल्याची आये निरुत्तर झाली. पण मनात काहीसं आठवित म्हणाली," माझो बाबलो मेहनती हा, कष्टाळू हा. घेय्त लवकरच सोताची रुम." त्यावर अण्णा म्हणाला, " घेय्त ह्या नुको... आज हा काय तेची रुम मुंबैत?" यावर काहीच न बोलता बाबल्याची आये चहाचा कप घेऊन होवऱ्यात गेली. अण्णाही चंचीतलं पान तोंडात कोंबून, पुढे पानाचा तोबरा समोरच्या चिवारीच्या बेटात थुंकून पाणंदीच्या वाटेला लागला
" आये, असो कधीपण... कोणाकडे पण माझ्या लग्नाचो विषय काढू नको. माका शरम वाटता." बाबल्या होवऱ्यात जाऊन आयेची समजूत घालत म्हणाला. त्यावर बाबल्याच्या आयेचे डोळे भरून आले. ती म्हणाली," अरे पण बाबल्या, लगीनकार्य येळेत होव्क होया ना रे... येळ उलटान गेल्यार फुडची सगळी गणिता बिघाडतंत. माझे डोळे उघडे आसासर तुझा लगीन होव्कच होया." मग बाबल्या यावर काहीच न बोलता कंबरेला आकडी-कोयती लावून परड्यात बेनणावळ करायला गेला.
कोरोना महामारीची जवळपास दोनेक वर्षं बाबल्याने ढोर मेहनत करून चार पैसे गाठीस बांधले. आता मुंबईतील धावपळीच्या जीवनापेक्षा गावातलं जीवन सुखकर वाटू लागलं. एके दिवशी बाबल्याची आयेच बाबल्याला म्हणाली, " बाबल्या आता मुंबैत जाव्चो इचार करू नको. हयच ऱ्हवान काबाडकष्ट करून सुखाचे चार घास खा... सुमाराक्सा पोरग्या गावल्यार बार उडवून देवया." यावर " बघूया कसा काय ता... " असे म्हणत बाबल्या पायताण घालून पंजोळेतल्या भुईमूगास पाणी द्यायला गेला. त्यावर्षी बाबल्यास भुईमूगाचं छान व भरघोस उत्पन्न मिळालं. एके दिवशी सकाळीच बाबल्याचा चुलता दत्त म्हणून घरी हजर झाला. कोणतीही पुर्वकल्पना न देता तो आला तरी त्याला पाहून बाबल्या व त्याच्या आयेलाही फार आनंद झाला. सकाळी चहा वगैरे झाल्यावर बाबल्या व चुलता फिरावयास बाहेर पडले. बाबल्याने मोठ्या कौतुकानं चुलत्याला पंजोळेतली शिपण्याच्या भुईमूगाची शेती दाखवली. " झक्कास बाबल्या... आपले पडसार पडलंले कुणगे अशे परत हिरवेगार होतील असा स्वप्नातय वाटला नाय हुता..." बाबल्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देत चुलता म्हणाला. " सगळी ' तिची कृपा " असे म्हणत बाबल्याने पंजोळेजवळच्या पावणेच्या देवळाकडे बघत पायताण काढून हात जोडले. " फुडे काय करूचा येवज्लंस? " चुलत्याने नकळत विचारलं. " काय म्हणजे... काकानु, जमात नि झेपात तितके दिस गावात काढायचे. कंटाळो इलो काय मुंबैची वाट धरायची... बाकी काय..." बाबल्या म्हणाला. " बाबल्या, गावाकडची हवा, हवामान लय मस्त वाटता. मी आजच सकाळी मुलखात पाऊल टाकलंय, पण आता वाटता परत मुंबैत जाव्च नये. हयच ऱ्हवाचा कायमचा! तू पण आता गाव सोडू नये असा माका वाटता." बाबल्याचा खांदा थोपटत चुलता म्हणाला. " मग ऱ्हवा ना हय मुलखात येव्न... सगळ्यांक घेव्न येवा... इचार कसलो करतास... खरोखरच ऱ्हवाचा ठरवलास काय ओ?" या बाबल्याच्या प्रश्नावर चुलता निरुत्तर झाला. " चल वाय्च परक्याच्या हाटेलात जावया. लय वरसांत परक्याची भजी खाव्क नाय..." असे म्हणत चुलत्याने बाबल्याच्या खांद्यावर हात टाकला आणि दोघेही परक्याच्या हाॅटेलाकडे टेंबावर निघाले.
संध्याकाळी बायकोशी फोनवरून काही मोघम बोलणं करून चुलत्याने बाबल्या व त्याच्या आयेला लोट्यावर बोलावलं. " काय गे वयनी... कसा काय चल्लाहा? बाबल्याच्या बाबतीत काय इचार केलंस फुडचो?" चुलत्याने बाबल्याच्या आयेला विचारलं. " कसलो इचार करतलं... बाबल्याचो बापूस मुलखात ऱ्हवान, वावर संभाळता संभाळता राब राब राबलो नि दांडगेपणीच डाव अर्ध्यावर सोडून गेलो. नाय तेच्या गाठीक काय, नाय बाबल्याच्या गाठीक... इचार करतंय, कोनयेतला याक वाटाप इकूचा नि बाबल्याचा लगीन करूचा... तुम्का कसा वाटता...?" बाबल्याच्या आयेने तिच्या मनातला विषय चुलत्यापुढे ठेवला. एक दीर्घ आवंढा गिळत चुलता म्हणाला," जमीन इकण्याबद्दल माझा काय्येक म्हणणा नाय. पण आता माझ्या बायकोन माका येगळ्या विषयावर फोन केल्ल्यान. तिचा म्हणणा काय, गेली कितीतरी वरसां जमीन कसतास, खातास. वाडवडलांनी उटवलंली कलमा दर वरसाक लागतंत, इकतास. वाडवडलांनी उटवलंले माड, काजी लागतंत. खातास, इकतास. यंदा बाबल्यान सराय्क बारा पंधरा मण शेंगे इकल्यान, तितक्याच भात पिकला. आम्का सगळा कळता. हयचे सगळे बातमे आमच्यापर्यंत येतंत, वाऱ्यासारखे. तुम्ही मेहनत करतास, खातास. आमचा काय्येक म्हणणा नाय. पण आतापर्यंत आम्ही कधी तुम्का कसलो इरोध करूक नाय, फुडेय करुचो नायहा. पण आता जो जमीन इकूचो विषय काढलंस, त्या गोष्टीक माझो इरोध हा! माझ्या बायकोचा म्हणणा हा, आतापर्यंत तुमीच पिकवलास, तुमीच खाल्लास... ह्येच्याफुडे ह्या चलाचा नाय. बायको म्हणता, चार पंच बोलवा नि जमीन, घराची वाटणी करून टाका. माझे पाॅर कधी मुलखात येतीत, न येतीत. पण आता वाटणे होव्क होये... बोल आता काय ता..." असे म्हणत चुलता बाबल्या आणि आये काय उत्तर देतात याची मनातल्या मनात चाचपणी करू लागला. बाबल्याच्या पायाखालची वाळू सरकल्यागत बाबल्या बसल्या जागेवर थिजून गेला. बाबल्याची आये चुलत्याकडे फार मोठ्या प्रश्नार्थक नजरेनं बघत राहिली. आता चुलत्याला काय बोलावे हेच तिला सुचेनासे झाले. मात्र पुढच्याच क्षणी ती कंबर खोचत उभी राहिली आणि म्हणाली, " होवदेत वाटणे भावजीनु...!" पुढच्या अर्ध्या तासात याच विषयावर तिघांत साधक बाधक चर्चा झाली आणि आता लगेच नको, पण मे महिन्यात घराच्या, जमिनींच्या वाटण्या करण्याचं नक्की झालं.
दुसर्‍या दिवशी सकाळी चुलत्याने मुंबईस निघण्याची तयारी केली. आयेच्या नकळत बाबल्यानेही त्याची बॅग भरली. बाबल्याची भरलेली बॅग बघून आयेला धक्काच बसला. " बाबल्या, तू खय चल्लंस बॅग भरून?" तिने बाबल्यास विचारलं. " मी पण चल्लंय मुंबैत... दिवा गाडयेन." बाबल्या म्हणाला. " अरे, पण हयच गावात ऱ्हवान शेती करूचा नक्की केलं हुतंस ना? असो कसो अचानक मुंबैत चल्लंस?" आयेने विचारलं. आयेकडे पाहिल्यावर बाबल्याचे डोळे भरून आले. गालांवरून खाली ओघळणारे अश्रू रुमालानं पुसत बाबल्या आयेकडे पाहत म्हणाला, " गावाक ऱ्हवान करू काय...?"
गावाक ऱ्हवान करू काय?

232 

Share


बाबू घाडीगांवकर
Written by
बाबू घाडीगांवकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad