Bluepad | Bluepad
Bluepad
वृक्षनाश म्हणजे संस्कृतीचा नाश ...
Mrs. Mangla Borkar
Mrs. Mangla Borkar
24th Nov, 2022

Share

झाडांचा आणि निसर्गाचा संबंध खूप जवळचा आहे. पृथ्वीवर जगण्यासाठी लागणारी हवा आणि पाणी हे झाडांवर अवलंबून आहे. जलचक्र पूर्ण होण्यासाठी जमिनीवर पाऊस पडावा लागतो. पाऊस पडण्यासाठी थंड आणि पर्यावरणयुक्त असा भूभाग आवश्यक असतो. त्यासाठी सदाहरित वृक्षांची गरज भासते. जेवढी वृक्षसंख्या जास्त तेवढा पाऊस जास्त पडतो. आता जर आपणच झाडे तोडली तर पाऊसाचे प्रमाण कमीच होईल.
झाडे देखील श्वसन क्रिया करत असतात ज्यामध्ये ऑक्सिजन बाहेर सोडून कार्बन डायऑक्साइड आत घेतात. माणसासाठी आणि इतर सजीवांना ऑक्सिजन आवश्यक असतो. तसेच सर्व सजीव कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतात. म्हणजेच झाडे आणि सजीव हे एकमेकांना प्राण प्रदान करतात असे म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही. तसेच गाड्यांमधून आणि कारखान्यांमधून बाहेर पडणारे विषारी वायू हे देखील झाडेच शोषून घेतात.
वृक्षनाश जर झाली तर आपण आपलेच नुकसान करवून घेत आहोत. परिसरात झाडे नसल्याने उष्णता वाढत आहे. मानवी त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी ही उष्णता काही हितावह नाही. तसेच वायू प्रदूषणही झाल्याने आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. वृक्षनाश थांबवून परिसरात जर झाडांची संख्या वाढवली तर माणसाचे आरोग्य सुधारेल आणि दुष्काळ कधी येणार नाही.
झाडे आपली मुळे जमिनीत खोलवर नेतात. त्यांना पाण्याची गरज भासते. पाऊस पडल्यावर जमिनीत मुरणारे पाणी झाडांची मुळे आपोआप शोषून घेतात. त्यामुळे झाडांची वाढ होते. जमिनीचा कस नियंत्रित राखला जातो. मातीची धूप होत नाही. पण जर वृक्षतोड झाली तर मातीची धूप होऊन जमिनीचा कस संपुष्टात येईल. पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही. प्राणी आणि पक्षी जीवन संपुष्टात येईल.
माणसाकडे विकासाच्या नावाखाली अनेक यंत्रे आहेत ज्याद्वारे कित्येक वर्षे जगलेला वृक्ष एका दिवसात नेस्तनाभुत केला जातो. जंगलच्या जंगल रिते केले जाते. तेथील प्राणी आणि पक्षी स्थलांतर करतात. त्यांची पाण्याची आणि खाण्याची समस्या आणखी एकदा डोके वर काढते. सर्वच्या सर्व वन्यजीवन विस्कळीत होते. एखादी नदी असेल, तिच्या शेजारील वृक्ष जर तोडले तर ती नदी उन्हाळ्यात सुकून जाते.
निसर्गचक्रात एक मोठा अडथळा वृक्षनाश मुळे निर्माण झालेला आहे. पृथ्वीवर अचानक तापमान खूपच वाढले आहे. वाढत्या तापमानामुळे आणि प्रदूषणामुळे ओझोनचा थर लोप पावत आहे. अशा एक ना अनेक समस्या फक्त वृक्षनाशशी निगडित आहेत. वृक्षनाश थांबवा. एक आनंदी पर्यावरण स्वतःसाठी आणि समाजासाठी निर्माण करा.
पर्यावरण आणि निसर्ग बचावासाठी अनेक सामाजिक आणि सरकारी संस्था कार्यरत आहेत. त्यांना सढळ हाताने आर्थिक मदत करा. गरज असल्यास श्रमदान करा. वृक्षनाश विरोधात मोहीम राबवा. असंख्य झाडे लावा, त्यांना जगवा. तेव्हाच एक मानवजातीचे उज्ज्वल भविष्य पुढच्या पिढ्यांसाठी आपण निर्माण करू शकतो.
श्रीमती मंगला बोरकर

176 

Share


Mrs. Mangla Borkar
Written by
Mrs. Mangla Borkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad