Bluepad | Bluepad
Bluepad
काजवा महोत्सव .....
Mrs. Mangla Borkar
Mrs. Mangla Borkar
24th Nov, 2022

Share

ग्रीष्म ऋतू संपतो न संपतोय तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांच्या रुपात धरतीवर अवतरलाय की काय असा विचार मनात चमकून जातो. गगनातील तारांगणच जणू भुईवर उतरलेय… इथे रात्रच चांदण्याची झालीय… असा आभास काजव्यांची मायावी दुनिया निर्माण करते. काजव्यांच्या अस्तित्वाने रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ तासन-तास पाहत बसलो तरी मन काही तृप्त होत नाही. त्यामुळेच नुसतेच काजवे पाहणे निसर्गप्रेमींच्या दृष्टीने एक अविस्मरणीय अनुभव असतो.
दरवर्षी प्रमाणे याही मे महिन्याच्या शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यानच्या काळात भंडारदरा-घाटघर-कळसूबाई परिसरातील हजारो झाडांवर काजव्यांची ही मायावी दुनिया अवतरते. कळसूबाईच्या पायथ्याशी वसलेल्या घाटघर, उडदावणे, पांजरे, मुरशेत, मुतखेल, कोलटेंभे भंडारदरा, चिचोंडी, बारी, या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली आहेत. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा अदभूत खेळ ज्या झाडांवर काजव्यांची काही क्षणाची का होईना ‘वस्ती’ असते, ती झाडे ‘ख्रिसमस ट्री’सारखी दिसतात! झाडांच्या खोडांवर, फांद्यावर, पानांवर लक्ष लक्ष काजवे बसलेले असतात. लुकलुकत होणारी काजव्यांची प्रकाशफुले आपल्या डोळ्यांना सुखाऊन जातात. कुतूहलमिश्रीत आणि विस्मयचकित मुद्रेने निसर्गवैभव आपण पाहतच राहतो. आणि पाहता-पाहाता भान हरपून जातो. भोवतीच्या विराट पसा-यात रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ खेळत स्वत:ला हरवून बसतो.
अनुभवस्पध बोलायचं ठरलं तर एखाद्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या वेळी दिव्यांच्या माळांची जशी चाचपणी चालू असते ना, तशी ती उत्साही मंडळींची लगबग चालू होती. कुठंतरी एखाद्या झाडावर काजव्यांची लकेर दिसता दिसता विरून जात होती. कुठं शेकोटीतल्या निखाऱ्यांवरून ठिणग्या उसळाव्या तशा उसळत होत्या. रात्र चढता चढता रस्त्यातील वाहतूक कमी होत गेली आणि काजव्यांच्या झुळकावर झुळका यायला लागल्या. मिट्ट काळोख, ओथंबलेलं आभाळ, गार वारा.. हळूहळू नीरव शांततेनं आसमंताला घेरून टाकलं आणि आतषबाजी रंगात आली. रात्र चढत गेलेली कळलंही नाही. काजव्यांनी वेडंपिसं करून सोडलं होतं. रंधा धबधबाच्या अलीकडचं वळण तर कळसाध्यायच होता. रस्त्यालगत १५-२० फुटांच्या परिघात तीन उंच झाडांनी गोलाकार फेर धरलेला होता. माथ्यावर त्यांच्या फांद्या-पानांचा पसारा आणि मध्ये आकाशाचा तुकडा! त्या तीनही झाडांना पानांऐवजी काजवेच आले होते. झाडं पेटूनच उठली होती. कधी हे झाड, तर कधी ते!
..आणि अचानक आकाशातली अभ्रं दूर झाली. झाडांमधून दिसणारा आकाशाचा चतकोर, चांदण्यांनी लखलखला. नजरबंदी झाली. इथं आकाश नव्हते पण चांदण-भरले आकाश वरती की खाली, हा संभ्रम नक्कीच होता. आता धुक्याचा पडदा कळत न कळत जाणवत होता. मन उगीचच हुरहुरलं. आता उजाडेल. सूर्यप्रकाशापुढे काजव्यांची प्रभा ती काय?
हा तिरकसपणा जमेस धरला तरी रात्रीच्या राज्यातला काजव्यांचा दिमाख वेगळाच! दरीच्या काठावरून हा नजारा न्याहाळत असताना अचानक प्रियाच्या माझ्या पुतणीच्या केसांत काजव्याने फूल घालावं तसं स्वत:ला माळून घेतलं. आयुष्यभरासाठी मनात अशी एखादी आठवण, एखादा क्षण ओठंगूनच राहातो!
” या काजव्यांच्या अंडय़ांचीही गंमत असते. ती एखाद्या बशीत गोळा करून, शांत-निवांत जागी एक-दोन दिवस ठेवायची. मग अंधारात हलकेच बशीवर टिचक्या मारून तरंगलहरी उमटवल्या की, अंडीही लुकलुकून प्रतिसाद देतात. अंडं फुटून नवजात काजवा बाहेर येतो, तो क्षणही चमकीलाच असतो हे बघतांना कुतूहलमिश्रीत आणि विस्मयचकित मुद्रेने निसर्गवैभव आपण पाहतच राहतो. आणि पाहता-पाहाता भान हरपून जातो.” काजव्यांच्या शेपटीत एक विशिष्ट अवयव असतो. त्यात ल्युसिफेरीन नावाचं एक रसायन असतं. या रसायनाची ऑक्सिजनशी विक्रिया झाली की त्यातून प्रकाश बाहेर पडतो.
श्रीमती मंगला बोरकर
काजवा महोत्सव .....

178 

Share


Mrs. Mangla Borkar
Written by
Mrs. Mangla Borkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad