Bluepad | Bluepad
Bluepad
श्रद्धाचे ते ३५ तुकडे बरचं काही बोलून जातात तेव्हा...!
meghna surve
meghna surve
24th Nov, 2022

Share

‘प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे' हे गाणं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी गुणगुणले असेलच. खरंच ‘प्रेम' ही भावनाच वेगळी आहे. पण ‘प्रेम' या अडीच शब्दात लपलेला गहन अर्थ साऱ्यांना उमजत असतो असे नाही. गुलाबी, निस्वार्थी वाटणारे प्रेम जेव्हा लाल भडक रक्ताचा सडा सांडत स्वार्थी , क्रुर बनते तेव्हा ‘प्रेम' या भावनेवर विश्वास ठेवावा की नाही हेच कळत नाही. हे सांगायचं कारण म्हणजे आठवडाभर सध्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरण खूप गाजत आहे. श्रद्धा सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेला आफताब पुनावालाने तिची हत्या केली आणि कौर्याची परीसीमा गाठत १८ दिवस तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे फ्रीजमध्ये ठेवून रोज एक एक करून दिल्लीभर फेकत राहिला. जेव्हा ही बाब समोर आली तेव्हा साऱ्यांनाच या घटनेने हादरून सोडले. त्यानंतर या प्रकरणाला ‘आफताब' या नावामुळे काहींनी तर ‘लव्ह जिहाद' सारखे धार्मिक रंग देण्यास सुरुवात झाली. आजकाल रस्त्यावर उतरून काही लोक # BoycottJihadi # Sabka Abdul Ek Jaisa He Hai अशी पोस्टर हातात घेऊन फिरताना दिसत आहेत. अनेकांनी वेगवेगळ्या स्तरातून, समाज माध्यमातून पोस्ट टाकून या घटनेच तिव्र निषेध केला.पण गुन्हेगाराला कोणताही धर्म -जात नसते तो गुन्हेगारच असतो.आफताबने केलेल्या गुन्ह्याची कठोरात कठोर शिक्षा त्याला मिळेलच पण समाजाने या प्रकरणाला एक गुन्हा म्हणून पाहणे गरजेचे आहे असो.
साऱ्या देशाला हलवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्या प्रकरणात कळले की, ६ महिन्यांपूर्वीच आफताबने श्रध्दाची हत्या केली. हे क्रौर्य उघडकीस आल्यानंतर रोज श्रध्दाच्या खुनाबाबत एक-एक हादरवणाऱ्या गोष्टींचा उलगडा होताना दिसत आहे. मुंबईत श्रध्दा आणि आफताब यांच्या भयानक प्रेमकहाणीची डेटिंग ॲप पासून झालेली सुरवात ते दिल्लीत तिच्या त्या ३५ तुकड्यांनी केलेला या कथेचा शेवट आतापर्यंत साऱ्यांनाच कळला असेल. त्यांच्या कुटुंबियांना दोघांतील मैत्री माहीत होती. मात्र दोघांचे धर्म वेगळे असल्याने त्यांच्या नात्याला घरच्यांनी विरोध दर्शविला. दोघेही सज्ञान. त्यात श्रध्दा खुप बिनधास्त. स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी. तिने आफताब सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा निर्णय घेतला जो तिच्या वडीलांना मान्य नव्हता. कुटुंबीयांशी संबध तोडून श्रध्दाने मुबंईतून थेट दिल्ली गाठत आफताबशी लग्न करून एक सुखी आयुष्य जगण्याचे स्वप्न रंगवले होते. दुसरीकडे मात्र रागीट स्वभावाच्या आफताबच्या मनात वेगळंच शिजत होत. आपली काजळी घेणारा, खूप प्रेम करणारा या प्रियकरामधला ‘हैवान' तिला कधी दिसलाच नाही. दरम्यान श्रध्दा त्याला लग्नबाबत विचारत होती पण तो सारखे टाळत होता आणि मग दोघात रोज वाद, भांडण, आफताबकडून श्रध्दाला होणारी मारहाण, त्याच्या अमली पदार्थच्या सेवनावर श्रध्दाचा होणारा विरोध, एकमेकांबद्दल असणारा संशय , आफताबचे असलेले इतर मुलींबरोबरचे संबध, त्याला खटकणारा तिचा स्वच्छंदी स्वभाव. तिचा इतरांशी बिनधास्त होऊन मोकळेणाने वागल्याने त्याला येणारा तिचा राग यासर्व गोष्टींवरून कळते की, दोघांच्या नात्यातील तुटत गेलेला विश्वास श्रध्दाचाच श्वास तोडून गेला.
दरम्यान श्रध्दाने आपल्या मित्राला आफताब मारहाण करतो याबद्दल सांगितले होते त्यावर मित्र तिला सोडवायला गेल्यावर श्रध्दानेच आफताबसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मित्रांनी त्याला समजही दिली. त्याच्या विरुद्ध असलेली पोलिस तक्रारही तिने मागे घेतली. इतका
आंधळा विश्वास श्रध्दाने आफताबवर ठेवला होता. तिला वाटत होत की, एक ना एक दिवस तो आपलं ऐकेल आणि सर्व ठिक होईल पण .... झालं भलतच. श्रध्दाच्या वडिलांना आजही आपली मुलगी जिवंत आहे असेच वाटते. आता पुढे काय होणार हेे पोलिस तपासात कळेलही. दोषी आफताबला शिक्षा होणारच यात काही शंका नाही आणि श्रध्दाला न्याय हा मिळेलच. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा विचार करता असे लक्षात येते की, या देशात याआधी देखील अनेक अशा भयंकर हत्या झाल्या आहेत. काल परवा लखनऊमध्ये धर्मांतराला विरोध करणाऱ्या प्रेयसीला गच्चीवरून ढकलून तिची हत्या केली गेली. तर उत्तर प्रदेशमध्ये एका हॉटेलमध्ये प्रेयसीचा गळा कापून त्याचे व्हिडीओ पसरवण्यात आले. त्या आधी विवाहबाह्य संबंधातून बायकोचे कोणी ७० तुकडे केले तर कुणी बायकोला तंदूरीसारखे भट्टीत टाकले. एकतर्फी प्रेमातून मुलींवर ॲसिड हल्ला करणे, तिला जाळणे तर कुठे जमिनी किंवा संपत्तीतून होणाऱ्या वादातून संपूर्ण घर पेटवून देणे, हत्या करणे, सुड म्हणून नात्यातील लेकी बाळींवर बलात्कार करणे अजून कहर म्हणजे जातीयवादातून होणारे हत्याकांड, आंतरजातीय विवाह केल्याने होणाऱ्या हत्या असे अनेक प्रकार घडले आणि घडतातही. याला एक क्रूर अशी मानसिक विकृतीच म्हणता येईल. इतके भयानक कौर्य माणसांच्या हातून घडते.
सध्याच्या यांत्रिक युगात नात्यांवर फार मोठा परिणाम पडलेला दिसतो. हातात स्मार्ट मोबाईल आल्यापासून माणसांतील स्मार्टनेस निघून गेला. ज्या गुगलमुळे आपल्याला घर बसल्या जगभराची माहिती मिळते त्याच गुगलवर सर्च करून लोक खून कसा करायचा ?, प्रेताची विल्हेवाट कशी लावायची हे शोधत आहेत? तर कोणी गुन्हेगारीवर संबंधीत मालिका आणि वेबसिरीज पाहून लोकांचे मुडदे पाडत आहेत. आफताबनेही असेच केले. अमेरिकन ‘डेक्स्टर' ही वेबसिरीज पाहून त्याला श्रध्दाचा खून करण्याची कल्पना सुचल्याचे सांगितले जात आहे. तसेच देशात इतर ठिकाणी घडलेल्या हत्याकांडा संबधात नेटवर त्याने माहिती शोधली होती. खून करण्यासाठी त्याने इंटरनेटवरून रसायनं मागवली होती. लक्षात घ्या विज्ञानाने आपले जीवन सुखी आणि चांगले करण्यासाठी अनेक शोध लावले पण हे असले प्रकार पाहून काही शोध जीवन उद्‌ध्वस्त करण्यासाठीच केले गेल्याची शंका कधी कधी उपस्थित होते. तसेच या अतिरंजक वेबसिरीज वा सिनेमे करताना चुकीचा समज समाजात पसरत जात नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. खचखचून अश्लिल आणि भडक प्रसंग दाखवण्याच्या नादात याचा लोकांवर विशेषतः तरुणांवर होणारा परिणाम काय असू शकतो हे आतापर्यंत सर्वांनाच कळले असेलच.
‘लिव्ह इन रिलेशनशिप' हा भारीभवकम श्रीमंत वाटणारा शब्द भारतात आता काही नवा नाही. सुरवातीला अनेकांनी या गोष्टीला विरोध दर्शविला. आजही विरोध होतोच. लग्नाचं बधंन नको म्हणून अनेक जण ‘लिव्ह इन रिलेशनशिप'चा पर्याय निवडतात. कारण यात जोडीदार बदलण्याची पूर्ण मुभा असते.पाश्चिमात्य देशात असे प्रकार सर्रास चालू आहेत. तिकडे मोठ मोठे कलाकार, खेळाडू, राजकीय नेते ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेक जण ‘लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये राहत आहेत.आता हेच पश्चिमी वारे आपल्या भारतीय हवेतही मिसळले आहेत. मुळात या ‘लिव्ह इन रिलेशनशिप'ला कायदेशिर बंधन असायला हवे.आपल्या जोडीदाराला विश्वासात घेऊन त्याला समजण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा.जर तुमच्या नात्यात काही अडचण असेल तर मित्र मंडळी , कुटुंबीयांचा किंवा फार फार तर मानोपचार तज्ञांचा सल्ला घ्या. आपल्याला होणारा त्रास एकदा तरी घरच्यांशी किंवा जवळच्या मित्रपरीवाराशी बोलून दाखवा. एखाद्या नात्याला किती गांभिर्याने घ्यायला हवे हे आजच्या घडीला ठरवणे गरजेचे आहे.
सध्याच्या काळात ‘नात्यात' असणे फार प्रतिष्ठेचे मानले जात आहे. अगदी शाळा आणि महाविद्यालयामध्ये ‘मी रिलेशनशिप आहे' हे
सांगणे मुलांना कौतुकास्पद वाटते. आजच्या काळात प्रत्येकाला कोणाशी तरी मोकळेपणाने बोलता यावे यासाठी जोडीदाराची गरज भासत आहे. हे सर्व लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी डेटिंग ॲपची निर्मिती केली. यावर मग अनेक तरुण मुलं - मुली भेटायला लागतात आणि मग सुरु होते मैत्री, प्रेम... आणि बरच काही .. यात फसवणूक होऊ शकते. या अशा ॲपवर करारात्मक , सुरक्षितता असावी जेणे करून काही अघटीत घडणार नाही याची हमी या ॲप बनवणाऱ्या कंपनीने द्यावी.
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या किंवा कोणत्याही नातेसंबधात असणाऱ्या मुलींनी हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की, आपला जोडीदार खरचं आपल्यावर इतक प्रेम करतो का ?, त्याला निट तपासून घ्या, वर वर वाटणारे प्रेमाचे रंग आतून किती भयानक असू शकतात हे श्रध्दाच्या ३५ तुकड्यांनी सांगितलेच असेल. एक माणूस समजण्यासाठी अख्ख आयुष्य खर्ची केलं जात. नात्यामधील पारदर्शकता दोघांच्या प्रेमातील विश्वास दृढ करत असतो. नात्यात जर अविश्वास, इगो, संशय यांचा शिरकाव झाला तर ते नात तुटायला वेळ लागत नाही. आपला जोडीदार जर आपल्याला सतत शिवीगाळ, उठता बसता अपमान, रोज मारहाण करत असेल तर रितसर त्याची न घाबरता तक्रार करा. त्याने दिलेल्या पहिल्याच शिवीला लगेच प्रतिउत्तर द्या, तुमच्यावर उगारलेला हात वेळीच धरा, अत्याचार करून खोटे पुरुषार्थ गाजवणांऱ्यावर थोडी फार हिंमत दाखवून लगाम घाला. त्याच्यापुढे हतबल होऊ नका आणि महत्वाच म्हणजे आत्महत्येचा विचारही मनात आणू नका.भावनिक होऊन रडत बसण्यापेक्षा मर्दानी होऊन लढा. तो पुरुष आहे म्हणून तो काहीही करू शकतो हा त्याचा भ्रम तोडून टाका.जर श्रध्दाने अशीच हिंमत दाखवली असती तर ... आज ती आपल्यात असती...!
शेवटी सांगायच तात्पर्य हे की, वयात येणाऱ्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहणाऱ्या तरूणांनी घरच्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिल आहे म्हणून त्याचा गैरफायदा घऊ नये. संकटात असताना आपले कुटुंब, मित्रपरिवार यांना विश्वासात घ्या. आपल्या अडचणी, आपल्याला कोणामुळे त्रास होत असेल तर त्यांना सांगा. कितीही वाद झाले तरी कुटुंब, मित्रपरिवाराशी नात कधीही तोडू नये. पालकांनी देखील आपला मुलगा किंवा मुलगी काय करते याकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या मुलांना कसले व्यसन तर नाही ना, असेल तर लगेच ते सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे त्यांचा मित्रपरीवार कसा आहे? याची माहिती असणे गरजेचे. नुसत पालक होऊन फायदा नाही तर त्यांचे एक चांगले मित्र व्हा. त्यांना समजून घ्या. चांगले, वाईट काय हे त्यांना समजवण्यासाठी त्यांना बंधनात ठेवू नका, त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना वेळीच योग्य ती समज द्या असो. शेवटी काय तर आज ना उद्या आफताबला त्याच्या विकृत आणि क्रूर कर्मांबद्दल शिक्षा होईलच पण या प्रकरणामुळे श्रध्दाचे ते ३५ तुकडे आपल्याला बरेच काही सांगून गेले हे मात्र खरं!
- मेघना सुर्वे
meghnasurve03@gmail.com
८४३३५०२९९४

0 

Share


meghna surve
Written by
meghna surve

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad