Bluepad | Bluepad
Bluepad
सभ्यता व नम्रतेचे दीपस्तंभ ....... मा. श्री. यशवंतराव चव्हाण.
Sagar Ambre
Sagar Ambre
24th Nov, 2022

Share

महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती नंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार समर्थपणे हाकणारे आणि राज्याला खऱ्या अर्थाने विविधांगी क्षेत्रात प्रगतीपथावर घेऊन जाण्याच्या दैदीप्यमान परंपरेची सुरवात करणारे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री मा श्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण.
१२ मार्च १९१३ मध्ये सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्राच्या प्रागतिक विचारसरणीचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते. एक उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा बोलबाला होता. मा. यशवंतरावांचा शब्दांच्या सामर्थ्यावर आणि त्यांच्या सौंदर्यावर नितांत विश्वास होता. मा. यशवंतराव हे महाराष्ट्रातील राजकारण आणि साहित्य यांचा समन्वय साधणाऱ्या दुर्मीळ नेते मंडळी मधील एक नेते होते. राजकारणी आणि साहित्यिक या दोघांचेही शब्द हेच माध्यम आहे. ते कायम म्हणत असतं की, राजकारणी हे साहित्यिकांचे शब्दबंधू असतात. मा. यशवंतरावांना लिखाणाची अत्यंत आवड होती. त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये विविध विषयांवर लेख लिहिले. दिवाळी अंकातील त्यांचे लेख एक प्रमुख आकर्षण असे. त्यांची आत्मचरित्रात्मक म्हणून प्रकाशित झालेली 'कृष्णाकाठ' आणि 'ऋणानुबंध' ही पुस्तके आजही चोखंदळ वाचकांच्या आकर्षणाची केंद्रबिंदू आहेत. एक विचारवंत राजकीय नेता, असामान्य साहित्यिक आणि शब्दांचा भोक्ता असे मा. यशवंतरावांचे व्यक्तिमत्व होते. साहित्य आणि साहित्य संमेलन ही त्यांच्यासाठी मर्मबंधातील ठेव होती. मा. यशवंतराव फक्त एक विचारवंत नव्हते, तर त्यांच्या व्यक्तिमत्वात एक कृतीशील विज्ञानवादी सक्रिय कार्यकर्ता समाविष्ट होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संघीय भारताची शास्त्रशुद्ध पुनर्रचना करण्यासाठी विज्ञानवादी तरुण निर्माण झाले पाहिजेत अशी त्यांची भूमिका होती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रसाराबाबत त्यांची स्वतःची अशी प्रगल्भ विचारसरणी होती. समाजाला विज्ञाननिष्ठ बनविण्यासाठी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल याची त्यांना जाणीव होती म्हणूनच विज्ञानाचे मूळ स्वरुपच तर्कसंगत, बुद्धिसंमत असे विचार त्यांनी कायम समाज्याला दिले. त्या विचाराच्या जोरावरच आपण आधुनिक समाज निर्माण करु शकतो याचा त्यांना विश्वास होता. जुन्या कल्पना काढून टाकण्याचा हाच एक कार्यक्षम उपाय आहे. या दिशेने जितक्या जलद वाटचाल होईल, तितक्या लवकर आपला देश प्रगतशील राष्ट्रांच्या पंगतीत जाऊन बसेल, अशी आशावादी आणि शास्त्रीय मांडणी ते करीत असत.
सभ्यता व नम्रतेचे दीपस्तंभ .......      मा. श्री. यशवंतराव चव्हाण.
संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर मा. यशवंतरावांनी आपले लक्ष पूर्णपणे राज्याच्या विकासावर केंद्रित केले. विशेषत: शेती, उद्योग, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्था या महत्त्वाच्या विषयांकडे त्यांनी काळजीपूर्वक लक्ष दिले. यासाठी पहिल्या दिवसापासून अतिशय जागरुकतेने त्यांनी उद्योग खात्याची जबाबदारी स्वत:कडेच ठेवली. एमआयडीसी म्हणजेच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ याची स्थापना त्यांनी स्वतःच्या कारकिर्दीत करुन महाराष्ट्रातील कारखानदारीला आणि उद्योग व्यवसायांना शासकीय पाठबळ मिळवून दिले. बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामीण भागात लहान मोठे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. शेती हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा उद्योग आहे. शेती आणि पाणी यांचाही अभेद्य संबंध आहे म्हणून त्यांनी दुष्काळ निवारण करण्यासाठी विविध योजना आखल्या.
१ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राला उद्देशून मा. यशवंतरावांनी जे भाषण केले ते नव्या राज्याबद्दल त्यांची संकल्पना स्पष्ट करणारे होते. त्यात त्यांनी गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील जनतेची जी विचलित अशी अवस्था झाली होती, ती आता संपून महाराष्ट्राला यापुढे स्थैर्याचे दिवस येतील, अशी आशा करण्यास मुळीच हरकत नाही. त्यायोगे लोकांना आता आपल्या विकासाच्या प्रश्नांकडे कटाक्षाने लक्ष देता येईल व विकास कार्याच्या बाबतीत येणाऱ्या निरनिराळ्या अडचणींना ते अधिक परिणामकारकपणे तोंड देऊ शकतील. नव्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीने आपल्याला भरभराटीचे व सुखाचे दिवस येतील, ही सामान्य जनतेची अपेक्षा योग्य अशीच आहे. हा जनतेच्या अपेक्षापूर्तीचा क्षण जवळ आणणे हा महाराष्ट्र राज्याचा मी मानबिंदू मानतो. व्यक्त केलेल्या मनोगतातून, त्यांनी अवघ्या महाराष्ट्र राज्यास शांतता हेच सामर्थ्य आहे हेच पटवून दिले.
आपले राज्य हे उद्योगधंद्यांच्या बाबतीत भारतात आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांचा केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर सर्व देशाच्या अर्थव्यवस्थेवर भलाबुरा परिणाम होतो. उद्योगधंद्यांचा पाया बळकट असल्याखेरील देशाने लागू केलेल्या पंचवार्षिक योजना पूर्णपणे यशस्वी होऊ शकणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत औद्योगिकीकरणाची गती ज्यामुळे रोखली जाऊ नये तसेच व राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम होणार नाही असे काहीही न करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य ठरते. कारखान्यातून तसेच भांडवलशाही मार्गाने मिळणारे उत्पन्न ह्यात सातत्य असायला हवे व त्यामध्ये वाढ व्हायला हवी. कारखानदार व कामगार यांचे संबंध सलोख्याचे व मैत्रीपूर्ण असायला हवेत. एकूणच काय तर राज्यातील औद्योगिक वसाहतीत शांतता आणि प्रगती असायला हवी.
मा. यशवंतरावांवर विठ्ठल रामजी शिंदेंचा फार मोठा प्रभाव होता. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचे काम करण्यावर भर दिला होता. हरिजनांच्या मुलांच्या शिक्षणाचा उपक्रम त्यांनी हाती घेतला होता. त्याचे उद्घाटन करण्यासाठी त्यांनी विठ्ठल रामजींना आमंत्रित केले. तेव्हा यशवंतराव मॅट्रिकला होते. पण, आमंत्रण देण्यासाठी ते कराडहून पुण्यात गेले होते. विठ्ठल रामजी मा.यशवंतरावांच्या घरी राहिले. अस्पृश्यांच्या मुलाना शिकवणे व स्वावलंबी बनविण्याचे महत्त्व विठ्ठल रामजींनी आपल्या भाषणात सांगितले. त्याचा मा. यशवंतरावांनी अंगिकार केला होता. जेव्हा मा. यशवंतराव राज्याचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी ताबडतोब महार वतनाचा कायदा रद्द केला.
सहकारातील कार्यक्रमांना गेल्यावर मा. यशवंतराव त्या क्षेत्रातील चुकांवर अभ्यासपूर्ण भाष्य करायचे. आज जितके सहकाराचे अवमूल्यन झाले आहे तेवढे अवमूल्यन त्या काळात झाले नव्हते. प्रवरा इंग्लिश मिडियम स्कूलच्या उद्घाटन कार्यक्रमास गेले असता त्यांनी ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांची शाळा निघते म्हटल्यावर मातृभाषेतील शिक्षणच सर्वाधिक चांगले, असा परखड विचार तेथे मांडला होता. कोणत्याही क्षेत्रात चुका दिसल्या तर कुणाचाही मुलाहिजा ते ठेवत नव्हते. आजच्या स्पर्धेच्या युगात सहकारी संस्था कशा टिकवता येतील हाच प्रश्न आहे. खासगीकरणाचे पीक आले आहे. सहकाराचे केडर राहिले नाही. परिणामी, पुढच्या दहा-वीस वर्षांत सहकार क्षेत्र आकुंचित होत जाईल. जगातील साम्यवाद मोडकळीस येऊन युरोपात भांडवलशाहीचे काय चालले आहे हे पाहिल्यावर सहकार हाच लोकांच्या पर्यायाने देशाच्या प्रगतीचा तरणोपाय आहे असे त्यांचे ठाम मत होते. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला कोणी तयार नाही याची त्यांना खंत होती. कृषी औद्योगिक क्रांतीचा पाया मा. यशवंतराव चव्हाण यांनी घातला मात्र आज तोच तोच ठिसूळ झाल्यासारखे वाटत आहे.
सभ्यता व नम्रतेचे दीपस्तंभ .......      मा. श्री. यशवंतराव चव्हाण.
मा. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा आदर्श सुसंस्कृत राज्यकर्ता, राजकारणी होणे नाही. त्यांच्या कामाचा आवाका तसेच काम करण्याची हातोटी याचा सर्वंकष विचार करूनच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहास मा. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह असे नाव दिलेले आहे. मुळा एज्युकेशनच्या दंत वैद्यकीय महाविद्यालयाही त्यांचे नाव देण्यात आलेले आहे.त्यांनी खूप काही आदर्श महाराष्ट्र राज्यास घालून दिले. पण या राज्याची शोकांतिका म्हणावी लागेल, एकीकडे प्रगती होत असताना दुसरीकडे राज्यकर्त्यांमधील संवेदनशीलता आणि एकनिष्ठता मात्र संपत चालली आहे. मतदार एकेकाळी राजा म्हणून ओळखला जात होता मात्र आज त्याच्या मताची राजकर्त्यांकडून होणारी पायमल्ली पाहता लोकांचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होतो की काय असे वाटते आहे. सामाजिक प्रगतीचा डोलाराही ढासळताना दिसतो आहे. कायदा सुव्यवस्था सुध्दा कधी कधी संभ्रमावस्थेत असल्यासारखी भासते. शहरात, गावात वैमनस्य आणि स्वार्थी विचारधारा वाढत असल्याचे दिसून येत आहे. माणुसकीचा झरा आटताना दिसत आहे.
मा. यशवंतराव त्यांच्या कर्तृत्वामुळे सत्तेतील उच्च पदे ते गाठणार हे निश्चितच होते. दिनांक २८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेल्या नागपूर करारावर त्यांची सही आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य नेत्यांत त्यांची गणना तेव्हाच होऊ लागली होती. ते एक समतोल विचाराचे पुरस्कर्ते होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी त्यांची भूमिका कोणताही संघर्ष न करता मागण्या मान्य करून घ्याव्यात अशी होती. त्यामुळे त्यांना संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांची टीका सहन करावी लागली. विशेषतः त्यात श्री आचार्य अत्रे यांचा तोफखाना जोरदार होता. मा. यशवंतरावांच्या या समन्वयवादी भूमिकेमुळे १ नोव्हेंबर १९५६ रोजी विशाल द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आले. सन नोव्हेंबर १९५७ मध्ये प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम ठरला. मा. पंडित नेहरूंच्या हस्ते अनावरण होणार असल्याने त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीने जाहीर केले.अनावरणाचा हा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही. समिती कार्यकर्त्याच्या प्रेतावरून पंडित नेहरूंना अनावरणासाठी जावे लागेल, असे वक्तव्य श्री आचार्य अत्रे यांनी केले. मराठा दैनिकातून तसा प्रचारही सुरू झाला. त्यामुळे वातावरण प्रक्षुब्ध होऊ लागले. काँग्रेसजनांचा आणि सरकारचा हा कार्यक्रम पार पाडण्याचा निर्धार होता.
सन १९६२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मा. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी मा यशवंतराव यांची देशाच्या संरक्षण मंत्री पदावर नेमणूक केली. त्यांच्या कारकिर्दीचा हा सर्वोच्च बिंदू होता. त्यानंतरच्या काळात त्यांनी भारताचे उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री ही पदे यशस्वीपणे भूषविली आहेत. सन १९७७-७८ च्या दरम्यान केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना ते विरोधी पक्षनेते होते. त्यांना आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष होण्याचा बहुमानही मिळाला होता.
मा. यशवंतराव महाराष्ट्र राज्याचे मंत्री तसेच मुख्यमंत्री असताना मंत्रालयात विधिमंडळ वार्ताहर संघाची स्थापना झालेली नव्हती. त्यामुळे मंत्रालयात (पूर्वीचे सचिवालय) वार्ताहर आणि मुख्यमंत्री यांचा वार्षिक स्नेहभोजनाचा कार्यक्रम होत असे. तेव्हा पत्रकारही मुख्यमंत्र्यांसमवेत स्नेहभोजन आयोजीत करीत असत. मा. यशवंतराव मुख्यमंत्री असताना वेगळे मुख्यमंत्री कार्यालय किंवा मुख्यमंत्र्यांसाठी वेगळा जनसंपर्क अधिकारी अशी व्यवस्था नव्हती. सन १९६२ मध्ये मारोतराव कन्नमवार मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसाठी जनसंपर्क अधिकारी ही प्रथा सुरू करण्यात आली. आताच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाला तेव्हा प्रसिद्धी विभाग असे म्हणत असत. आणि प्रसिद्धी विभागाच्या प्रमुखास संचालक असे संबोधले जात होते. कोणत्याही मंत्रिमंडळ बैठकीनंतर मात्र मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होत होती किंबहुना तेव्हा तशी व्यवस्था अस्तित्वात होती.
सार्वजनिक जीवनात मुख्यमंत्री असताना मा.यशवंतरावांचा जो सहभाग होता तो त्यांच्या दिल्लीतील वास्तव्यानंतरही कायम राहिला. मुख्यमंत्री असताना त्यांनी मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या 'मार्मिक' साप्ताहिकाचे प्रकाशन केले होते. त्यावेळी शिवसेनेची स्थापना झालेली नव्हती. त्यावेळी मा. बाळासाहेबांची ओळख जी फक्त प्रबोधनकार ठाकरे यांचे चिरंजीव आणि व्यंगचित्रकार अशी होती. मराठीतील पहिले व्यंगचित्र साप्ताहिक म्हणून मार्मिकला त्यांनी प्रकाशन सोहळ्यातील आपल्या भाषणात मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. दादर मुंबई येथील बालमोहन विद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला होता.
ज्याला कधीही कुणीही स्पर्धक नव्हते किंवा ज्यांच्याशी कधीही कुणाला स्पर्धा करायची नव्हती अशी उंची राजकारणात फक्त महात्मा गांधीनांच गाठता आली. तशी ती महाराष्ट्रात मा. यशवंतरावांना गाठता आली. तत्त्वनिष्ठा आणि तडजोड या दोन्ही गोष्टी त्यांना एकावेळी नुसत्या जपता नाही तर त्या सुंदर रीतीने हाताळता आल्या. पण सारेच राजकर्ते गांधी कसे असतील? हा नियतीचा एक संकेतही अशावेळी आपण लक्षात घ्यायला हवा. शिखरावर नेहमीच फार कमी जागा असते. तेथे समूहाने पोहोचता येत नाही तर एकट्यानेच पोहचावे लागते. यशवंतरावांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना एक गोष्ट मात्र साऱ्यांनीच कृतज्ञतेने लक्षात घ्यायला हवी आहे. महाराष्ट्राच्या उभारणीची पायाभरणी करणारा आणि आपल्या असामान्य बुद्धी कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्राला प्रगतीच्या जोरावर राज्य म्हणून नवी ओळख करून देणारा लोकमान्य टिळकांच्या नंतर मा. यशवंतराव महान नेता होते हे महाराष्ट्राला कधीही विसरता येणार नाही.

240 

Share


Sagar Ambre
Written by
Sagar Ambre

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad