Bluepad | Bluepad
Bluepad
चकवा
p
prathamesh khare
23rd Nov, 2022

Share

विजयनी आंघोळ उरकून खालच्या फरशिवर अंग झोकून दिल.जळिताचा उग्र दर्प त्याच्या रोमारोमात भिनला होता,आत्म्याचा इहलोकाचा प्रवास संपल्यावर उरलेल्या शरीराचा घास घ्यायला हपापलेल्या चितेच्या ज्वाळांची धग अजूनही त्याचे डोळे जाळत होती .अंगाला चिकटलेल्या त्या वासानी त्याची अन्नावरची वासनाही उडली ,त्या गुंगीतच त्याचा डोळा लागला .
विजय लहान असतानाच आईच्या मायेला पोरका झाला. घरचि परिस्थिति बेताचीच ,त्यामुळे बहुतेक नातेवाईकांनी आधीच त्याच्यापासुन फारकत घेतली होती. शीतं नसल्याने भूतांचा त्रास वाचला होता, मात्र आईच्या मायेच्या ओलाव्याशिवायच वाढण त्याच्या नशीबी आल,मनात स्वताविशयी एक न्युनगंड तयार झाला .वडिल भिक्षुक,त्यांचा बहुतेक वेळ,लग्न ,मुंज ,पूजा यात जात होता.होमकुंडाचा अग्नी पेटवल्याशिवाय पोटाची आग विझवण,अवघड होत.मग मदतनीसाची दक्षिणा वाचवण्यासाठी त्यांनी विजयला बरोबर न्यायला सुरवात केली,विजयची शाळा सुटली.पोटात उठणाऱ्या भुकेच्या राक्षसाला रोज काहीतरी खुराक देण अनिवार्य असत. हाच राक्षस नाहीतर एखाद्याला वाममार्गालाही लावतो.त्याच्यासाठीच भिक्षुकीच काम मात्र त्यान शिकून घेतल. वडीलांना मधुमेहाची व्याधी होती,या व्याधीला गोडाची ऍलर्जी,त्यामुळे झटक्यात जीव जाऊन , आयुष्याचा शेवट गोड व्हावा ही अपेक्षा पूर्ण व्हायची शक्यता कमीच. महागडे औषधोपचार परवडणारे नव्हते,अशात निभाव लागण अवघड होत .पण तरीही शरीर झगडत होत.वाळवीनी उभ झाड पोखराव तस मधुमेहानी अंग पोखरल.अर्ध्या शरीरावरन वायु गेला,आयुष्य परावलंबी ,आणी शरीर एका कॉट पुरत मर्यादित झाल.जीभ जड झाली,त्या अवस्थेतून सुटकेसाठी ज्या परमेश्वराची करुणा भाकायची त्याचही नाव जिभेवर येईनास झाल.ते जगण म्हनजे जीवनानी म्रुत्युच्या प्रप्तीसाठी चालवलेलि जणु आविरत तपश्चर्या,पण तोही कदाचित जवळ यायला धजावत नसावा.चोवीस तास केवळ छताकडे पाहत राहायची शिक्षा.जणु सगळ्या शरीरानी मेंदूविरुद्ध असहकार पुकारावा. विजयला बरेच वेळा सकाळची कामगिरी असली की वडिलांचं आवरायला वेळ मीळायचा नाही.रोजचा डायपरचा खर्च आवक्याबाहेरचा होता ,अशावेळी मग म्हाताऱ्याच्या नशिबी निर्जळी उपासा बरोबर विजय परतेपर्यंत ओल्या बिछान्यावर पडून राहायचा आत्मक्लेश ही होता.बाहेरची कामगिरी उरकून घरी आल्यावर विजय ला मग ह्या कर्तव्यावर रुजु व्हायला लागायच .त्या घाणीचा उग्र दर्प अंगावर शिसारी आणायचा,पण कर्तव्याला घ्राणेंद्रीय असू नयेत.मान मोडून तो हे सर्व कष्ट उपसत होता.चीडचीड हि व्हायची ,पण परिस्थितीची तक्रार कोणाकडे आणी कशी करणार?मनाच्या आकाशात आशेचा सूर्य नसल्याने तिथल्या निराशेच्या अंधाराच निराकरण होणं शक्य नव्हत्.मनातल्या या निराशेची वेदना त्याच्या चेहेऱ्यावरहि स्पष्ट दिसायची.कोकिळ देखील निवासा साठी आम्रतरुवरच वास करते बाभळीवर नाही ,विजयच्या आयुष्यात कष्टाव्यतिरिक्त् भोगण्यासारखं दुसर काहीच नसल्याने हे दुख वाटून घ्यायला कोणी सहचारिणी मिळेल ही आशा करण देखील चुकीचं होत.त्या एका मजल्याच्या सहा बिर्हाडान्च्या जुनाट बाभळीवर विजय आणी त्याचा म्हातारा हे दोनच पक्षी नाईलाजास्तव राहात होते ,चाळीतलि बाकिचि पाच दार विजय बघत आला तेव्हापासून बंदच होती. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तसा, नाही म्हणायला विजयला फक्त शरद या आपल्या व्यवसाय बंधुचा आधार होता.शरदच्या ओळखींनी त्याला बऱ्याच वेळा काम मिळायचं ,काही नसलं तरी शरद त्याला मदतनीस म्हणून बरोबर न्यायचा ,बऱ्यापैकी दक्षीणाहि द्यायचा.शरद च्या घरची परिस्थिती चांगली होती.घरात पिढीजात श्रीमंती होती,एवढ्या सहज लक्ष्मीची प्राप्ती झाल्याने सरस्वतीच्या उपासने कडे दुर्लक्ष झाल.मग काहीतरी करायला हवं ,म्हणून वडीलांनि काढून दिलेले अनेक उद्योग त्याने यशस्वीरित्या बुडवले.आपल्या कुलदीपकाच्या चिंतेनी वडिलांच्या झोपेबरोबर केसहि उडाले ,मग काहिच जमत नहि म्हणून हा मार्ग पत्करला.वडिलांनी मग जंग जंग पछाडून चिरंजीवांचे दोनाचे चार हात करून दिले.नुकतच या दोघांच्या आयुष्यात एका नवीन जीवाचा प्रवेश झाला.शरद ला पुत्रप्राप्ती झाली. शरद तसा स्थिरस्थावर होता.पण म्हटल तर दोघेही दारिद्रीच होते ,विजय नशिबानी तर शरद कर्मानि.कदाचित एकमेकांकडे बघून त्यांना आपण दुस्र्यापेक्शा बर असल्याच सुख मिळत असावं.
 • विजयच आयुष्य म्हणजे खवळलेल्या समुद्राच्या पाण्यावर हेल्कावे खाणाऱ्या दिशाहीन असहाय्य जहाजासारखं होत,ज्याच्या नशिबात फक्त संकटांच्या लाटांचे तडाखे खाण लिहिलं होत, एक् सम्पलि कि दुसरि तयार, त्याच्या भाळावर सटवाइ सुखाचे क्षण रेखायलाच विसरली असावी जणू,परिस्थितिच्या उन्हात जीवनाची वाट लाचारीच्या वाळवंटात तुडवत राहायची,थाम्बायची सोय नाही,की विसाव्यासाठी सावली. काळाची गिधाड डोक्यावर भिरभिरत असताना,तुमच्या आत्मविश्वासाच्या ढालिची पकड जरा ढीली झाली की तुमचा घास घ्यायला सदैव तयार ,किनाऱ्याच्या स्वप्नरंजनापेक्षा तरंगत राहणं त्याच्या दृष्टींनी जास्त महत्वाचं होत.पावसापासून बचावासाठी एखाद्यांनी झाडाखाली आसरा घ्यावा ,आणी झाडाची फांदी डोक्यात पडून कपाळमोक्ष व्हावा त्याच अनपेक्षित पणे कोविड च संकट विजयच्या अंगावर कोसळल.होमकुंडांचा अग्नी शासनाच्या आदेशानी बंद झाला.कोविड केवळ माणसांची शरीरच नाहि तर पोटहि पोखरत होता.पुर्वसन्चयावर सुरुवातीचे काही महिने गेले, जंगलात पाणवठयावर मगर काळ बनून जबडा उघडून बसली असली ,तरी प्राण्यांना तहान भागवण्यासाठी तिथे जावंच लागत,तहानेनी कासावीस होऊन तडफडत मरायचं की दैवावर हवाला ठेऊन पाणी प्यायचा प्रयत्न करायचा यातला योग्य पर्याय मुके प्रांणीही निवडतात,विजयनीही योग्य पर्यायाची निवड केली.लॉकडाउन च्या काळात त्यांनी अंत्येष्टिचे विधी शिकून घेतले.सुरुवतिला हे काम करायच त्याला पटत नव्हतं .पण बाकीचे सगळे मार्गच बंद होते.पोटातल्या भुकेच्या राक्षासाला रोजचा अन्नाचा टोल देण बंधनकारक होत.ते देखील मरेपर्यंत .एक पाणवठा सुकला तर तहान शमवण्यासाठी दुसरा पर्याय शोधण क्रमप्राप्त् होत. लॉकडाउन शिथिल झाल्यावर सुद्धा लोक शुभकार्य करायचं टाळत होती. पण स्मशानं मात्र गजबजलेली होती,माणसांची मर्यादा असली तरी गुरुजींची एक जागा रिझर्व्ह होती, लोकांच्या चितेच्या आचेवर आपल्या घरचा स्वयंपाक करण जड होत .तस पाहिल तर ते अभागी कलेवर चितेवर पोहोचेपर्यन्त अनेकांची पोट भरत असत मग त्यात सगळेच आले.आयुष्यात केवळ काही वाढीव श्वास मिळावेत यासाठी चालवलेली विकतची धडपड .मग त्यात चार पैसे आपल्याला मिळाले तर बिघडलं कुठे?ह्या प्रश्नानी तो स्वतःचच समाधान करून घेई.हे काम सुरु केल्यापासून तो अतिशय व्यस्त राहायला लागला.मुहूर्त काढायचा व्याप नव्हता की चांगला दिवस बघायचा,नवरा कींवा नवरी ची प्रतिक्शा करयचिहि गरज् नव्हति. या कामात कॉम्पीटीशनही कमी होती, बर कामाची ठिकाणही दोनच होती,तीही ठरलेली . त्यामुळे धावपळही कमी झाली.खिशात पैसेही बऱ्यापैकी जमायला लागले. सुरुवातीचे काही दिवस तो नेमानी किरवन्ति च प्रायश्चित्त देखील घेत होता,पण कामाचा व्याप जसा वाढला तस तेही अनियमित झालं.घरात त्याच्या या कामावर आक्षेप घेणार कोणीच नव्हतं ,बापाच जिवंत कलेवर तेव्हढ होत ,पण ज्यांना स्व:ताचा श्वास घेणही कठीण , ते आक्षेप काय घेणार .
अनेक महिने यात गेले,प्रत्येक् कमगिरिबरोबर विजयचा खिसा जड होत होता. डोक्यातली सरस्वती जसा विचारांचा परिघ वाढवते,तसा खिशातल्या लक्षुमीचा संचय माणसाचा परिस्थितिशि दोन हात करण्याचा आत्मविश्वास वाढवते बहुधा . विजयनी स्वता:च्या पैशानी एक मोटरसायकल खरेदी केली,आपण मिळवलेल्या यशाच प्रशस्तिपत्रक दुस्र्याकडून घेण्यात माणसाला जास्त आनंद होतो. घरी ते देणार कोणीच नसल्यान ते प्रशस्तिपत्रक घ्यायला तो शरद कडे गेला. आज कितीतरी दिवसांनी त्यांची प्रत्यक्ष भेट होत होती.तस फोनवरच बोलण होत .पण विजयच्या व्यस्त पणामुळे भेटण होत नव्हतं,आताशा विजयनी शुभकार्य करण बंद केल ,नाहीतर एखाद्या कामगिरी च्या वेळेस आपसूक भेट होत असे.विजयनी खालूनच शरदला हाक मारली,शरद आपल्या दोन मजली घरातून खाली आला ,पाठमोऱ्या विजयच्या खांद्यावर हात ठेवून अभिनंदन म्हणाला.विजयनी वळून थँक यु म्हंटलं.त्याला पाहताच शरद च्या चेहेऱ्यावर आश्यर्याचे,भीतीचे ,काळजीचे संमिश्र भाव दाटून आले.विजयचा गोरा रंग आता चेहऱ्यावर शोधूनही सापडत नव्हता, डोळ्यातला निरागसपणा लोप पावला होता,अंगातलं चैतन्यच जस अस्ताला जाऊ लागल ,जणू प्रत्येक चितेच्या अग्नीत तो आपल्या या चैतन्याची आहुती देत होता.वणव्यानी हिरव्यागार रानाचा घास घ्यावा तश्या चितेच्या ज्वाला विजयच आयुष्य जाळत निघाल्या होत्या .शरद डोळे विस्फारुन त्याच्याकडे पहात होता?
काय रे भूत बघितल्यासारखा काय बघतोयस? ह्या विजयच्या प्रश्नानी तो ध्यानावर आला.मान हलवत तो विजयला म्हणाला
शरद:तु शेवटच आरश्यात केव्हा पाहिलवतस स्वता:ला?
विजय :अरे हल्ली धोतराचा काचा मारायला वेळ मिळत नाही,आरशात कुठे बघू?आणी बघून तरी मी दाखवणार कोणाला,आजकाल तर लोक मला बघूनच रस्ता बदलतात.तु माझ्याबद्दल पिकवलेल्या कंडया ऐकलेल्या दिसत नाहीस?मी हल्ली स्मशानातच राहतो? मी देवळात जाण बंद केलय?माझ्या घरातून रात्री ओरडण्याचे किंचाळण्याचे आवाज येतात.?मी कसले तंत्र मंत्र करतो वैगैरे वगैरे.
शरद :माझ्याहि कानावर आल्यात, पण मध्ये एक दिवस तु स्मशानात राहिला होतास,हे तूच तुझ्या तोंडानी मला सांगितलयस?आग लागल्या शिवाय धुर होत नसतो रे.
विजय: अरे तेव्हा एकामागून एक कार्य होती मध्ये फक्त दोन तीन तासाचाच वेळ होता ,तेवढ्या करता घरी या आंघोळ करा ,पुन्हा जा? म्हणून म्हटलं पडू तिथेच जरासं.अरे तुला लोकांचं माहितीच आहे गुत्या समोरुन जरि एखादा गेला तरी तो नेहमि तिथेच पडून असल्याचा गोंगाट करतात हे , ते ही ठीक म्हणीन एकवेळ,घरातन किंचाळन्याचे आवाज कोणि ऐकले ?,माझ्या त्या खुराड्यात शेवटचा आलेला माणुस तु आहेस तोही दोन महिन्यांपूर्वी,मग घरातन कींचाळणार कोण?बाबा जे काही करतात त्याला कींचाळण म्हणता येईल का रे?केवळ मेलेले नाहीत म्हणून जिवंत म्हणायच त्यांना.काही नाही रे,समोरच्याला आपल्यापेक्षा चार पैसे जास्त मिळाले ना की यांच्या सर्वांगाची लाही लाही होते, मग ही असलि पिल्लं सोडायची.आरोपही ह्यांचे,कोर्ट ही ह्यांचीच ,आणी न्यायाधीश ही हेच माझा निभाव लागणार कसा?. म्हणे मला किरवंतीत ल काय येतय?काहीही म्हणायच आणी पैसे काढायचे.मग शुभकार्य करुन लोकांच्या पदरात पुण्य घालायला तुम्ही काय भगवंताचे अधिकृत एजन्ट आहात काय?अरे तुमच्यापेक्षा मी परवडलो मी जे काही करतो ते साफ मनानी तरी करतो तुमच्यासारखे मद,मत्सर ,असुया असले घाणेरडे भाव तरी माझ्या मनात नसतात.अरे तुम्ही कर्मदळीद्रि आहात, माझ्यासारख्या फुटकळ माणसशी तुम्हाला स्पर्धा करावीशी वाटते ह्यातच तुमची उंची लक्षात येते, अरे संधींचा अक्षय भाता पाठीशी असूनही तुम्ही यशाचा लक्षभेद करू शकला नाहीत हा दोष कुणाचा? सगळ अनुकूल असूनही अजून इथेच खितपत पडलायत.
विजय एकदम भानावर आला.आपण हाणलेल्या जोड्यांचा मार नकळत आपल्या मित्रालाही बसल्याच त्याच्या लक्षात आल.
विजय्:तु या सगळ्यांना अपवाद आहेस,तुझ्याबद्दल माझ्या मनात असली भावना अजिबातच नाही.
शरद:आणी बाबांचं काय?
विजय: त्यांना ब्युरोतला माणूस ठेवलावता दोन दिवस.सखाराम नाव त्याच ,आताशा बिझी असलो की त्यालाच सांगतो.बाकी तब्येतिच म्हनशील तर वाइट वाटत रे त्यांन्च्या अवस्थेच.पण हा प्रवास त्यांना स्वतः संपवता ही येत नाही,की धड करताही येत नाही.मी तरी काय करणार,कितीही वाटलं की या सगळ्यातून ते सुटावेत,तरी त्यांचा गळा तर नाही ना आवळता येणार.की मोडक्या वस्तुसारख टाकूनही देता येणार नाही.अगदी मोडलेले असले तरी.लोकांना लांबून उपदेशाची प्रवचन करायला जातय काय?जे कोणी हे बोलतात ना त्याना म्हणावं एक महिनाभर दिवसातून फक्त दोनदा त्यांची घाण काढा,पाठीवर झालेल्या जखमांमधला पू काढा.आणी मग माझ्याबद्दल बोला.
देव देतो तेव्हा छप्पर फाड देतो म्हणतात ना तेच खर आहे रे.फक्त माप सुखाच आहे की दुःखाच ते विचारायच नाही.
शरद:अरे म्हणून स्मशानात झोपायचं ,तुला बाहेर कुठेही झाडाखाली पडता आल असत.रेल्वे स्टेशन ,स्टॅण्ड जागा कमी आहेत का?हे अस ऐकून कोण मुलगी लग्नाला तयार होईल तुझ्याशी?
विजय मोठ्यांनी हसला.
विजय:हो या आधी जणू मुलींची रांगच होती दाराबाहेर,अरे मी ज्या दलदलित आहे ,त्यात आणखी कोणाला कशाला ओढा?आपला माझा मी बरा आहे.ते जाऊ दे ,गाडी कशी वाटली?आहे की नाही झकास?
शरद: अभिनंदन ,अशीच उत्तरोत्तर प्रगती कर.
विजय: चल आज कुठेतरी बाहेर जेवायला जाऊ?माझी पार्टी .
शरद:बाळा गुरुवार आहे आज,आणी मला उद्या पूजा आहे?आज नाही जमणार.तुझाही गुरुवार असतो ना?
विजय: छेरे बंद केले?मग उद्या सन्ध्याकाळी जाऊ,मोकळा आहेस ना?
शरद:ठीक आहे?पूजा सकाळची आहे दुपारनंतर मोकळाच आहे मी.
विजय:चल मग भेटू उद्या संध्याकाळी.जवळच जाऊ कुठेतरी?लांब नको
शरद:चालेल,स्वतःपासूनही फार दूर जाऊ नकोस ,.काळजी घे घरीच झोपत जा.बाकी भेटलो की बोलू सविस्तर.
विजय तोवर गाडी चालू करून पुढे गेला होता ,तो फक्त ओके म्हणाला.घरी पोचताच त्यांनी आधी बाबांना भरवलं.आणी जरा लवकरच झोपी गेला.आजकाल तो वेळ मिळाला की झोपून घेत होता,कधी कामाला जायला लागेल याचा नेम नसायचा.
मध्यरात्रीनंतर कधीतरी फोनच्या आवाजानि त्याचे डोळे उघडले.घड्याळाच्या काटयाचि टीकटीक त्या रात्रिची निरव शांतता चिरत जात होती .वास्तविक ति टीकटीक नेहमिच चालू असते,सकाळच्या कोलाहलात ती फक्त लक्षात येत नाही.अशा कितितरि गोष्टींविषयी आपण अनभीज्ञ असतो रात्रीच्या अंधारात आणी शांततेत त्या ठसठशितपणे समोर येतात इतकंच .विजयनी आपलं आवरलं आणी बाबांना फक्त येतो म्हणाला .ते कदाचित म्हाताऱ्याच्या कानापर्यंत पोहोचल नसावं.गाडीला किक मारून विजय स्मशानाच्या दिशेनी जाऊ लागला.
स्मशानात तुरळकच गर्दी होती,कदाचित आडवेळेचा परीणाम असावा.दहा बारा टाळकी वायफळ गप्पात मग्न होती.मृत व्यक्तीचा बाप आणी विजय दोघच काय ते कार्यात व्यस्त होते.मयत व्यक्ति बर्यापैकि तरुण वाटत होता.मंत्र म्हणता म्हणता विजयची नजर बाहेर गेटपाशी गेली.तिथे एक कृष व्यक्ती या दोघांकडे पाहत उभी होती.ही बाकीच्या लोकांबरोबर गप्पात सहभागी नसल्याच पाहून विजय ला जरा नवल वाटलं.विजयनी आपल काम चालू ठेवलं ,पण राहून राहून त्याची नजर सारखी त्या व्यक्तीकडेच जात होती,तिच तस तिथे एकट्यानी उभ राहणं त्याच्या कामात उगाचच व्यत्यय आणत होत.तिलांजली ची वेळ झाली दहा बारा लोकांनी तिलांजली दिली,ती गेट जवळची व्यक्ती मात्र अर्ध्या तासात तिथून एक इंच सुद्धा हलली नव्हती.विजयनी सगळ्यांच उरकलं का? म्हणुन चांगला मोठ्यांनी प्रश्न विचारला,उद्देश गेटवरचा माणूस आत येईल.पण तरीही तो जागचा हलला नाही.म्हाताऱ्याला ऐकू कमी येत असावं म्हणून त्यांनी जवळच असणाऱ्या एका माणसाला अहो त्या आजोबांना बोलवा,म्हणून सांगितलं.त्या माणसानि एकवार गेटच्या दिशेनी पाहिलं,आणी विजयला विचारलं कोणाला गुरुजी?विजयनी त्रासिक नजरेनी त्या माणसाकडे पाहिलं आणी म्हंटलं अहो ते गेटवर उभे आहेत ना ते,अहो कधीपासन एवढच बोलून विजय थांबला.गेटजवळ ती व्यक्ती जिथे उभी होती तिथे फक्त एक काळी चिंधी दिसत होती,येणाऱ्या वाऱ्याच्या झुळूकेबरोबर फडफडणारी. बाकी आतला माणूस बाहेरच्या अंधारात विरघळून गेला होता जणू .कोणाला बोलावू गुरुजी? त्या माणसानि पुन्हा विजयला विचारलं . विजय जरासा गोधळून गेला,या आधी तो अनेकवेळा स्मशानात आला होता ,पण अस काही तो पहिल्यांदाच अनुभवत होता,अपुऱ्या झोपेचा कदाचित परिणाम असावा अस म्हणत मनात उठणाऱ्या असंख्य प्रश्नांना त्यानी तिलान्जली दिली . नहि काहि नहि असुद्या म्हणून विजयनी बोलन टाळलं. मग कलेवर विद्युत दाहिनीत लोटण्यात आल.दार बंद झाल्यावर लोक पांगू लागली,सगळ्यात आधी विजयच बाहेर पडला राहून राहून ती मगासची आकृती त्याच्या डोळ्यापुढे येत होती .ही लोक आहेत तोवरच निघावं या विचारांनी तो झटपट निघाला,गाडीला चावी लावायला म्हणून पिशवीत हात घातला तर हाताला चावी लागेना.बराच वेळ त्यानी पिशवीत धुंडाळल,पण चावी सापडायच नाव घेईना,तो पुन्हा स्मशानात आला आणी कार्याच्या जागी शोधायला लागला,स्मशानात उरलेली तीन टाळकि देखील त्याच्या मदतीला आली.मृत व्यक्तीचा बाप आणी दोन नातेवाईक.बराच वेळ शोधूनही काही हाती लागल नाही .तेव्हा विजय म्हणाला जाऊदे मी उद्या पाहतो किंवा घरून डुप्लिकेट चावी घेऊन येईन,आपण निघूया उगाच उशीर नको.चौघही मग गेट बाहेर आले,स्मशानात उरलेली ती तिघ एकाच गाडीवर जायची होती,ट्रिपल सीट.त्यातला एक उपचारादेखलं म्हणाला गुरुजी तुम्हाला सोडू का?पण त्यातला शुष्कपणा आणी उपचार दोन्हि विजयच्या ध्यानी आले.आणी विजयनी नको माझ घर जवळच आहे म्हणत तो उपकार टाळला. तिघांनी विजयची गाडी स्मशानाच्या रखवालदाराच्या खोलीशी आणून ठेवली आणी ते तिथून निघाले.तिथला रखवालदार आता विजयच्या परिचयाचा झाला होता,तो ज्या वेळी जागा असेल तेव्हा दारूच्या नशेत असायचा.बरेच वेळा त्याला या कामासाठी विजयही अर्थसहाय्य करायचा.त्याशिवाय तशा ठिकाणी राहणही शक्य नव्हतं.बाकी ही जगातली एकमेव जागा असावी जिथे चोरण्यासारखं काही नाही.पण एखाद्यांनी काही गैरक्रुत्य करून परस्पर पुरावे नष्ट करू नयेत म्हणून ही खबरदारी.बरेच वेळा विजयच मृत्युचा दाखला कार्य उरकून दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे नोंदीसाठी द्यायचा.विजयनी त्याच्या खोलीच दार उघडलं ,महाशय झोपले होते ,विजयनी त्याला जाग केल.गाडी ठेवल्याच सांगितलं .त्यानीही अगदी बिनधास्त ठेवा म्हणून म्हटल.मगाशि गेटशि तु उभा होतास का? विजय नी त्याला विचारल.त्या प्रश्नावर तो मोठ्यांनी हसला आणी म्हणाला काय महाराज चोरून बघायला आत काय लावणी चालते काय? त्यात काय बघायचय एवढ?आणी बघायच असत तर मी आतच नस्तो काय आलो.?
विजय त्या विचारातच मागे वळला,घड्याळ पाहिलं, रात्रीचे पावणे तीन झाले होते.तो रस्त्यावरच्या दिव्यांच्या मंद प्रकाशात पुढे चालू लागला.चपलांची होणारी करकर ,झाडाच्या पानांची वाऱ्यानी होणारी सळसळ विजयच्या कानाला नकोशी वाटत होती,दिवसा उजेडी हिरवीगार आणी आल्हाददायक वाटणारी झाड ,रात्रीच्या अंधारात आक्राळवीक्राळ आणी भेसूर भासत होती.रस्त्याच्या दुतर्फा जणू दैत्य रात्रीच्या दरबारात उभे होते.रस्ता निर्मनुष्य होता,विजय आणी त्याची सावली दोघच ती वाट तुडवत होते.विजय नी ह्या रस्त्यावरून अनेकदा ये जा केली होती.पण आज सगळंच अपरिचित वाटत होत, रस्ता सम्पायच नाव घेत नव्हता.मनातल्या भितिच्या भावनेला शन्का- कुशन्काचे डोंगळे चिकटले होते . बराच वेळ चालूनसुद्धा कुठलीही ओळखीची खूण दिसायच नाव घेत नव्हती,जणू त्या सगळ्या खूणा आज कोणीतरी जाणूनबुजून पुसून टाकल्या होत्या. विजय सहजच घड्याळात डोकावला. काटे पावनेचार ची वेळ दाखवत होते.डोळ्यांनी पाहिलेली ती वेळ मेंदू मात्र स्वीकारायला तयार होत नव्हता ,घरापर्यंतच अंतर आणी वेळ ह्यांचा मेळ बसत नव्हता..कशावर विश्वास ठेवावा समजायला मार्ग नव्हता.या सगळ्या विचारांच्या दलदलितुन एक कर्णकर्कश्श आवाज विजयला फरफटत बाहेर घेऊन आला,एक टीटवी पाठीमागून उडत गेली. भालंदार चोपदार देतात त्याच धाटणीचि वर्दी फक्त कुठल्यातरी काळ्या अस्तित्वाची. विजय एक्दम् भानावर आला,त्यानं आवाजाच्या दिशेनी मान वळवली,आणी तोंडातल्या शिवीचे काही शब्द त्या आवाजाच्या दिशेनी फेकले.पण शिवी पूर्ण देऊ शकला नाही,उरलेले शब्द त्यांनी आव्हंडया बरोबर गिळायचा प्रयत्न केला,पण तोंडाला साफ कोरड पडली होती ,ते शब्द तसेंच घोळत राहिले.विजयनी झटकन मान फिरवली , पावलांना विलक्षण वेग दिला,पुन्हा एकदा डोळ्यांवर विश्वास ठेवायला मेंदू तयार होत नव्हता,खात्री करायला सांगत होता.पण मनाची तयारी होत नव्हती.चालताना त्याच्या पायाच्या चपलेची करकर झाली की कानाला दुसऱ्या पावलाचा आवाज येत होता,प्रतिध्वनी जणू.ते असह्य होऊन विजयनी पटकन चपला हातात घेतल्या.पण पावलांचे आवाज मात्र थांबले नाहीत.डोळ्यांनी पाहिलेलं जणू कानांनी नक्की केल,हा खचितच भास नव्हता,विजयच उरलेल अवसानहि गळून गेल.रात्रिच्या त्या आल्हाददायक वातावरणातही सर्वांगातुन घामाच्या धारा वहायला लागल्या , मेंदूचा मनावरचा लगाम सुटला ,भ्यालेल मन चौखूर उधळलेल्या घोड्यासारख सैरावरा पळू लागल. भीतिच्या भावना घामाच्या रूपाने सर्वांगातून व्यक्त होत होत्या ,कापर भरलं, डोळ्यांपुढे अंधारी आली. विजय रस्त्यावर एकटा नव्हता स्मशानात गेटवर पाहिलेली ती कृष् व्यक्ती दात विचकुन् विजयच्या मागून चालत होती.ति कोण आहे हे विचारायचि गरज नव्हती आणी हिम्मतही? घामानी डबडबलेला विजय कासावीस झाला.त्याच मन वाघ शिकरिसाठी मागे लागलेल्या पाडसा सारखं दिशाहीन धावत होत,.कुठेतरी आसरा शोधायला,ह्या संकटापासून स्वतःची सोडवंणूक करायला. विजय त्या निर्मनुश्य रस्त्यावरुन एका हातात चपला,दुसऱ्या हातात पिशवी ,आणि रोमारोमात भिती घेऊन धावत सुटला,तोंडाला फेस येइपर्यन्त .वाट चुकलेली जनावरं अन्धारातही बरोबर घरापर्यन्त येतात तद्वत् धापा टाकत विजय चाळीपाशी पोहोचला ,इतक्या वेळात ती पहिली ओळखीची खूण त्याच्या नजरेस पडली . त्या मोडकळीस आलेल्या म्हाताऱ्या चाळीनं त्याच्या मनावरच ओझं थोड हलक केल.तो थोडा भानावर आला, पुर्वेकडून सूर्य नारायणाच लोभस रूप पक्षीतिजावर प्रकाशमान होत होत.त्याची असंख्य किरण अंधार जाळीत विश्वाला उजळीत पुढे निघाली.त्या किरणांची उब त्याच्या थकलेल्या शरीराला हवीहवीशी वाटत होती तर समोर दिसणार ते सूर्यबिंब त्याच्या मनाला उभारी देत होत.
विजयनी घराच दार उघडल,घाणीचा उग्र दर्प त्याच्या नाकात शिरला,ही कामगिरी ऐन वेळी आल्यामुळे त्याला सखाराम ला बोलवता आल नव्हतं ,आणी इतका वेळ लागेल हे त्याच्या ध्यानी मनीही नव्हतं.विजय नी घरात शिरून पटकन खिडक्या उघडल्या .सूर्यकिरणांनी घराचा ताबा घेतला.उघड्या खिडक्यांतुन ,दारा तुन वारा खेळू लागला.विजयनि वळून वडिलांना पाहिलं ,त्यांच्या उघड्या डोळ्यात फक्त याचना दिसत होती.
विजय झोपेतून उठला तेव्हा संध्याकाळ झाली होती.मोबाईल वर अनेक कॉल येऊन गेले होते,पण गाढ झोपेमुळे त्याला ते कळलेच नाहीत.असही पहाटेच्या प्रकारानंतर काही दिवस तरी आराम करावा या निशकर्षाप्रत तो आला होता.डोळ्यांनी त्या रात्री पाहिलेल ,अविश्वसनीय,ज्याच अस्तित्वच जगाला मान्य नाही त्याची छबी डोळ्यांनी मनावर उमटवली होती.तशी मनाच्या विस्तीर्ण दालनात अनेक आठवणींचि चित्र लावलेली होती.पण ह्या चित्राच्या जवळपास जाईल अस एकही चित्र नव्हतं.ते तिथून काढताही येत नव्हतं ,आणी त्याकडे दुर्लक्षही करता येत नव्हतं.त्याच्या अस्तित्वानी मनातल्या उत्साहाला ,प्रसन्नतेला,सकारात्मक दृष्टीकोनाला जणू ग्रहण लावलं होत.इतक्यावेळाची शरीरिक विश्रांती मनातलं ते मळभ दूर करू शकली नव्हती.भांभावलेल्या मनाचा परिणाम शरीरावरही आपसूक झाला होता.विजयला उगाच गळून गेल्यासारखं वाटत होत.रात्रीच्या त्या अनुभवाच्या चकव्यात अडकलेल्या विजयला मोबाईल ची वाजणारी रिंगटोन पुन्हा वर्तमानात घेऊन आली.विजयनी दचकून मोबाईल कडे पाहिलं ,नकळत आवंढा गीळला.कालच्या घडलेल्या प्रसंगाची सुरुवात अशाच अनपेक्षित फोननी झाली होती.नशिबानी आजही तोच अनुभव पुन्हा ताटात वाढलाय की काय? या न सुटणाऱ्या प्रश्नानि त्याची पाचावर धारण बसली.फोन थोड्यावेळ वाजून बंद झाला .एखाद्या मारेकर्यांनी आपल्या लक्ष्यावर ताणलेली बंदूक एका क्षणांपूर्ती खाली घ्यावी ,त्याच्या चेहर्यावरच्या जीव वाचल्याच्या त्या खोट्या समाधानाचा असुरी आनंद घ्यावा आणी दुसऱ्याच क्षणी पुन्हा ती बंदूक ताणावी तसा फोन पुन्हा खणखणू लागला.विजय पुन्हा कावरा बावरा झाला.त्यांनी घाबरतच फोनवर चोरटी नजर फिरवली,शरदच नाव पाहिलं, गर्दीत हरवलेल्या लहान मुलान ओळखीचा आवाज आल्यावर त्या आवाजाच्या दिशेनी धावत सुटाव तशी विजयच्या मनाची अवस्था झाली.त्यानी पटकन फोन उचलला.'हॅलो 'धाप लागलेल्या विजयच्या तोंडून कसेबसे शब्द बाहेर पडले.'काय रे व्यायाम वगैरे करायला लागलास की काय? एवढ्या धापा का टाकतोयस? शरद नी सहजच विचारलं .विजय नी काहीच उत्तर दिल नाही.'अरे आज जायचय ना?तुझा काही फोन नाही म्हणून मी केला,पार्टी देणार होतास लेका गाडी घेतल्याची .घरी मी माझ जेवण करू नका म्हणून सकाळीच सांगितलंय.आता जायला तर लागणार बॉस .
हो ...हो ज .ज जाऊया विजय पुन्हा मोजकच बोलला.
शरद:अरे तुझ्या त्या वॉचमन चा फोन आला होता मला,तुझी गाडी अजून तुझ्या कामाच्या ठिकाणीच आहे,त्याला चावीही मिळाली म्हणत होता .त्याला माझा फोन नंबर कोणी दिला कुणास ठाऊक,तू फोन उचलला नाहीस म्हंटला.हरकत नाही मी न्यायला येतो आठ वाजता तयार रहा.म्हणत शरदनी फोन ठेवला.
विजयनी घड्याळ पाहिलं ,संध्याकाळचे सात वाजले होते.हातपाय धुवून विजय देवाजवळ दिवा लावायला गेला.निरांजनात तूप वात घातलि ,काडेपेटी ची काडी पेटवली पण काडी निरांजनाशी नेईपर्यंत विझून गेली.एकामागून एक आठ दहा काड्या पेटवून झाल्या पण निरांजन काही लागेना.दोन खोल्यांच्या त्या घरात एका छोट्या खोलीत गॅस आणी शेगडी ठेवून स्वयंपाक घर केलेलं होत.घरात दारिद्र्य ठासून भरलेलं होत.डब्यामध्ये भरण्यासारखं वा लपवण्यासारखं काहीच नसल्याने तेही हातांच्या बोटावर मोजता येतील इतकेच होते.तिथेच एका कोपऱ्यात मोरी ,त्या समोर छोटा देव्हारा,आणी देव्हार्या समोर एक जुना आरसा .एवढंच सामान.वारा यावा आणी खेळावा अशी सोयच त्या खोलीला नव्हती तरीही विजयनी काडी पेटवावी आणी कोणीतरी फुंकर घालून ती विझवावी असा खेळ चालू होता.वैतागलेल्या विजयनी शेवटी निरांजन शेगडीवर लावायचा विचार केला ,पर्वांच म्हणायला सुरुवात केली आणी तो शेगडीशी गेला.पण शेगडीही पेटायच नाव घेईना,त्यानी शेवटी तो नाद सोडला निरांजन पुन्हा देव्हाऱ्यात ठेवलं .मनात पुन्हा शंकांची वादळ घोंगाऊ लागली,त्याचा आधीच डळमळीत झालेला विश्वास पुरताच नेस्तनाबूद करण्याच्या धमक्या देऊ लागली.तोंडातून रामरक्षेचे शब्द मोठ्यांनी बाहेर पडू लागले.भेदर्लेलि नजर त्या छोट्याश्या खोलीत काहीतरी शोधू लागली आणी समोरच्या आरशात त्या नजरेचा शोध संपला.काल दुरूनच पाहिलेलं ते भेसूर रूप आज आरशात स्पष्ट दिसत होत,खुन्शी डोळे विजयकडे रोखुन् पाहात होते,हनुवटी पर्यंत खाली आलेले कान.डोक्यावर विस्कटलेले केस,नाकाच्या पाळ्यांच्या जागी नुसतीच दोन भोक,विचकलेले किडके दात, जाड्याभरड्या फाटलेल्या ओठांवरती मधलं बोट ठेवून ते रूप एकटक विजय कडे रोखून बघत होत.जणू काही विजयाच्या रामरक्षेचा त्याला त्रास होत असावा,विजयची वाचाही त्या स्थितीत त्याला सोडून गेली,विजय आ वासून नुसताच आरशाकडे पाहात होता.त्याला किंचाळायचं होत , मदतीसाठी ओरडायच होत,पण भेदरलेले शब्द ओठांवर येत नव्हते.ते रूप आरशातून प्रत्यक्ष समोर उभ राहील तर काय? हा प्रश्न विजयला सतावत होता.विजय एखाद्या पुतळ्यासारखा त्या आरशासमोर उभा होता.कशाला ह्या देवांची पुजा ?त्यांनी तुला दिलयच काय आत्तापर्यन्त ?पाठ मोडणारे कष्ट ,सतत्चे अपमान ,पाचवीला पुजलेल दारिद्र्य.हेच जर जगण असेल तर मग मरण परवडल .ही सतत ची वेदना तरी नशीबी नाही.कानात नुसतच कानगोष्टी सांगाव्यात तशी हलकी कुजबुज होत होती.पण मान वळवून बघायची छाती होत् नव्हति दारावर झालेल्या टकटकिन् तो भानवर आला.एखाद्या भयानक स्वप्नातून जागा व्हावा तसा.'अरे झोपलास की काय? दाराबाहेरुन आवाज येत होता.शरद दिलेल्या वेळेनुसार आठ वाजता हजर झाला होता.घराखालून बराच वेळ ओरडून सुद्धा प्रतिसाद न मिळाल्याने तो शेवटी वरती आला होता.विजयनी माथ्यावरचा घाम घातलेल्या शर्टच्या बाहीने टिपून घेतला,दार उघडलं.
शरद:अरे अजून तयार नाहीस.किती वाजलेत बघ.?
विजय:न ..नाही झालच,मी तयारच आहे.असाच येणार.
शरद:असा ,अरे अवस्था बघ तुझी.भूत बीत पाहिलस की काय?
विजय ते ऐकताच दचकला,आणी खोलिभर इकडे तिकडे पाहू लागला.
शरद:काय रे काय शोधतोयस?
विजय:नाही रे काही नाही ,कुठे काय?चल निघूया.
शरद: अरे तोंडावर हात तरी फिरव,कपडे बदल.
विजय:नको रे उगाच वेळ जाईल.कपड्यांच काय , अंगभर कपडे नसले तरी चालेल.खिशात दमडी मात्र पाहिजे.तेवढी आहे, चल .
शरद आग्रह करत असूनही विजय तसाच घराबाहेर पडला.शरदच्या गाडीवर दोघंही हॉटेलात पोहोचले.वेटरनी मेनुकार्ड समोर ठेवलं,शरद नी कार्ड बघितलं ,आज मी डाव्या विचारांचा होणार आहे, उजवी बाजू पाहणार नाही.त्याच्या त्या विनोदावर फक्त तोच हसला.वेटर हिंदी भाषिक असावा,त्याच्या ते सगळंच डोक्यावरून गेल. विजयच त्या कशातच लक्ष नव्हतं,तो अजूनही त्याला आलेल्या त्या दोन अनुभवांची गोळा बेरीज करण्यात व्यस्त होता.शरीर तिथे होत,चित्त मात्र थाऱ्यावर नव्हतं.
शरद:तु काय खाणारेस?की फक्त बिल भरणार.?
शरदच्या प्रश्नांनी तो पुन्हा थाऱ्यावर आला.
विजय:तु सांगितलंयस तेच मलाही सांग.
बाजूला उभ्या असलेल्या वेटरला मग शरद नी भराभर ऑर्डर दिल्या.विजय मध्ये एका दिवसात झालेला फरक त्याच्या लक्षात येत होता ,पण त्याच कारण कळत नव्हतं.आधीच अबोल असणारा विजय ,ह्या अनुभवांनी आणखी कोशात गेला, रात्रीच्या चकव्यातुन् तो शरिरानी बाहेर पडला होता.पण मन अजूनही त्या चकव्यातून बाहेर पडू शकल नव्हतं . तो शरीरानी निरोगी होता पण मन मात्र जखमी होत.शरीराला उपचाराची गरज नव्हती पण मनाला उभारी देणार कोणीतरी हव होत.तेवढ्यात जेवणाची ऑर्डर आली.वेटरनी दोन्ही ताटात आणलेली ऑर्डर वाढली .शरद नी विजय ला पुन्हा जाग केल.
शरद: हा साहेब करा सुरु.
विजय समोरच्या ताटातला एक एक तुकडा तोंडात घालत होता.शरद एकीकडे बोलतच होता.
शरद:अरे काल संध्याकाळी नव्या नगरातला मुन्ना शेठ गेला.?
ही बातमी तशी विजयला नवीन होती.मुन्ना शेठ उर्फ मनोहर टाकळे ,जेमतेम दहावीपर्यंत शिकलेला,ज्याला काही वर्षांपूर्वी गावावरून ओवाळून टाकलेला म्हणायचे,पोलिसांच्या लेखी त्यांना द्यात सगळे गुन्हे करून मोकळा झालेला.त्याच नशीब एकदम पालटल.रस्त्याच्या ठेकेदारीपासून सुरु झालेला प्रवास ,आज काही वर्षातच मॉल ,अनेक हॉटेल्स इथवर येऊन थांबला होता.मागल्या वर्षी तो नगरसेवक,नगराध्यक्ष ही झाला.लोक त्याच्याकडे पाहून वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणायचे. वाल्मिकी सर्व संग त्याग करून साधू झाले.तसा हा लोक कल्याणासाठी राजकारणी झाला.पण त्याग कशाचा केला हा संशोधनाचा विषय होता.
विजय:कश्यानी गेला?
शरद:आत्महत्या केली,स्वताच्या राहात्या बंगल्यात गळफास लावून घेतला.नुकतीच त्याला जुळी मूल झाली होती.
विजय:मग सगळं आलबेल असताना अशी आत्महत्या?
शरद हळुच पुढे होत म्हणाला,सगळा हिशोब इथे पूर्ण करून जावा लागतो रे.त्यांनी काय कमी लोकांची आयुष्य बरबाद केली?ते शाप लागणारच ,सद्मार्गानी आलेली लक्ष्मी असेल तरच घरात सुख शांती राहते.
विजय:तरीपण पटत नाही,आत्महत्या कशाला?
शरद नी हातातला घास खाली ठेवला आजूबाजूला बघितलं,आणखी थोडा पुढे झाला आणी अगदी हळू आवाजात म्हणाला.
शरद:अरे टाटा ,बिर्ला त्यांना कैक वर्ष घसायला लागली रे तेव्हा आजचे दिवस दिसले.आणी हा मुन्ना 4 वर्षात 600 कोटींचा मालक.ही मागल्या वर्षीच्या निवडणूकीच्या प्रतिज्ञा पत्रातील संपत्ती, अरे उधारीवर जगणारा हा ,प्राण्यांकडून शक्य नाही म्हणून,नाहीतर गावातल्या कुत्र्या,मांजरांकडूनही ह्यांनी उधारी केली असती. गावातल्या भिकाऱ्यांच्या कटोर्यातून पैसे चोरणारा हा.एवढे पैसे आले कुठून.माझी जळत्ये अशातली बाब नाही ,पण सांग ना.हे कष्टाचे पैसे का?बर गेल्या चार वर्षात ह्याच्यावर अनेक आरोप झालेच की.आग असल्याशिवाय धुर येत नसतो.
शरद त्याला मिळालेली ऐकिव माहिती विजयला पुरवत होता.बोलता बोलता तो विजयच्या अगदी तोंडाशी आला.अगदी हळू आवाजात पुटपुटला ,तुला म्हणून सांगतो,आपल्यातच ठेव,कुठे बोलू नको.
हा पैसा म्हणे आडमार्गानी मिळवला .
विजय:तस इथे कोण सज्जन आहे?काही करायची संधी मिळाली नाही म्हणून सज्जन, म्हणजे पर्याय नाही म्हणून सज्जन ही आजकाल ची सज्जन पणाची व्याख्या .
शरद: तस नाही रे.तो म्हणजे काळी जादू,तंत्र मंत्र,अघोरीं मार्गाला लागला होता म्हणे..नाहीतर चार वर्षात एवढी छप्पर फाड प्रगती शक्य तरी आहे का?
विजय नी काहीच प्रतीक्रिया दिली नाही.अघोरी हा शब्द फक्त त्याला बोचत राहिला.
शरद: जाऊदे जो तो आपल्या कर्मानी मरतो,आपण कशाला त्यात पडा आणी बोला.आवर, अजून आइस्क्रीम संपवायचय.
शरद आणी विजय जेवणखाण आटपून बाहेर आले.विजय नी फारस खाल्लं नाही.त्याची इच्छाही नव्हती .
विजय:उद्या तुला कुठे जायचय का?मोकळा असशील तर माझ्या बरोबर गाडी आणायला येशील का?
शरद:मग आत्ता जाऊया की?पाच मिनिटात पोचू.तुला उद्या कुठे जायचं असल तरी प्रश्न नको.
विजय:नको आत्ता नको,उगाच रात्रीच कशाला जायच.सकाळी पाहू.
त्याच्या त्या उत्तरानी शरद चपापला.स्मशानात झोपणारा हा माणूस आता रात्री स्मशानात जायला देखील नाही म्हणतोय याच त्याला नवलं वाटल्यावचून राहिलं नाही .
नमस्कार गुरुजी,कोणाची तरी हाक त्या दोघांच्या कानावर आली.आता दोघही व्यवसाय बंधू असल्याने ती नक्की कोणासाठी होती ते दोघांनाही उमगेना.समोरून एक उंचपुरा,धीप्पाड माणूस चालत त्यांच्यापाशी आला.राजकारण्यांचा पांढरा युनिफॉर्म घातलेला ,अर्ध ज्वेलरी शॉप अंगावर मिरवणारा. जवळ पोचताच त्यांनी मोबाईल ची काही बटण दाबली.
अहो तुमची दक्षिणा द्यायची राहिली होती,जिपे केली.तो विजयकडे पाहून म्हंटला आणी जसा आला होता तसाच विजयच्या स्वीकृतीची वाट न पाहताच पुन्हा वाटेला लागला.
विजयनी मानेनी हो म्हंटल,अश्या अनेक दक्षिणा काम केल्यावर कधीतरी अवचित मिळायच्या .विजयच्या बरेचदा लक्षात ही राहत नसे.अर्थात राजकारण्यांकडून जे काही मिळेल ते पदरात पाडून घेण्यात शहाणपण.
शरद: बघितलंस मला अशीच वरचेवर पार्टी देत रहा,झाला की नाही लगेंच शुभ लाभ.अरे आल्या लक्शुमीचा असा अपमान करायचा नसतो, अरे बघ तरी कितीची प्राप्ती झाल्ये.बघ बघ.
शरद नी विजयला भरीला घातलं.विजयनी बळेच तो आलेला मेसेज पहिला .त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना ,त्या आलेल्या माणसानी विजयला एक रकमी पंचवीस हजार रुपये पाठवले होते.अत्तापर्यन्तच्या आयुश्यात विजयला एका कामगिरीसाठी एवढे पैसे कधीही मिळाले नव्हते.त्या भीतीने भरलेल्या मनात नकळत उत्सुकतेचा अंकुर फुटला.हा राजा माणूस कोण हे जाणून घ्यायची अनिवार इच्छा झाली. विजयनी चटकन जि पे वरचा मेसेज पाहिला.क्षणभराच मनाला आलेलं ते उत्साहाच भरत त्याच वेगात लोप पावलं. मनातला शंकासुर पुन्हा जागा झाला,या खेपेला आणखी अक्राळविक्राळ,हिडीस रूप घेऊन.एखादा विषारी सर्प अंगावर पडावा तशी त्याची अवस्था झाली.तो सर्प चावेल या भीतीनी हलताही येत नव्हतं आणी मदतीसाठी बोलवावं एवढ्या जवळ कोणीही नव्हतं.जी पे वर काल त्यानी कार्य केलेल्या माणसाच नाव होत मनोहरशेठ टाकळे ,ती खरच दक्षिणा होती की एखादा शाप.मनाच संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला ताळयावर आणायला विजेचे झटके देतात.पण इथे या असल्या धक्क्यानी विजयला मानसिक कडेलोटा पर्यंत आणून सोडल होत.विजय मोबाईल हातात घेऊन तसाच उभा होता.काल रात्रीपासून घडलेल्या सगळ्या प्रसंगांची मन उजळणी करत होत आणी त्याच थेट प्रक्षेपण जणू डोळ्यांना दिसत होत.त्याचे डोळे पुन्हा नकळत विसफारले गेले,मोबाईल धरलेला हात थरथरू लागला.छाती फोडून बाहेर येईल एवढ्या वेगानी हृदय धडधडू लागल.काल रात्रीपासून जो गुंता तो सोडवू पहात होता,त्याच एक टोक त्याच्या दुर्दैवानी या हॉटेलबाहेर त्याला सापडलं.आयुष्यात नुकत्याच सुरु झालेल्या या नाटकाचा शेवट काय असेल या कल्पनेनीच त्याची बोबडी वळायची वेळ आली.
त्याची तशी अवस्था पाहून शरद नी तो मोबाईल हातात घेतला ,नाव वाचताच त्याला विजयच्या पडलेल्या चेहेऱ्याच्या आणी त्याच्या चेहेऱ्यावरुन वाहणाऱ्या घामाच्या धारांचा उगम कळला.पण त्याचा इलाज करण त्याच्या हातात नव्हतं.हॉटेलातल्या टेबलावर त्यानी अनावधानानी विजयच्या माथ्यावरच ओझं कमी करण्याऐवजी वाढवलच होत.एखाद्या व्यक्तीला आपल्याला काहीतरी दूर्धर व्याधी जडल्याची शंका यावी आणी दुसर्यानी नकळत त्या व्याधीने शरीराला होणाऱ्या वेदनेच इतिवृत्त सांगाव अस काहीस शरदच्या हातून नकळत घडलं होत.ते सगळे शब्द परत घेता आले तर त्यानी घेतलेही असते.बंदुकीची गोळी करणार नाही तेव्हढ नुकसान कधी कधी शब्द करतात.मगाशच्या हॉटेलातल्या संभाषणाचा आणी विजयच्या आताच्या मनस्थितीचा काहीतरी संबंध आहे,एवढा अंदाज शरदला आला.
शरद :अरे तुला लोकांच माहितीच आहे,एक एक बातम्या सोडायच्या आणी मग मजा बघत बसायची .अरे असे जर पैसे मिळत असते तर देवपूजा कधी कोणी केलीच नसती ना राव.कशाला उगाच वेळ घालवा.अरे माणूस जेवढा मोठा तेवढ्याच त्याच्या समस्या मोठ्या.तू ते सगळ डोक्यात ठेवू नकोस,अरे घोडा घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या ?आपण आपल काम करायच.
आपणाकडून अनावधानानी झालेल्या जखमेवर मलमपट्टी करायच्या उद्देशानी शरद म्हणाला.
शरद :चल बस उशीर होतोय,तुलाही घरी बेबी सिटिंग आहे आणी मलाही.गेल्यावर मला मुलाला सांभाळायचंय,प्रणव रांगायला लागल्यापासून घरभर भिर भिर फिरतो,दमला की झोपतो.आपल मात्र तसा नाही ,बाकीची काम असतात रे.
शरद नी मघापासून ते ज्या विषयावर होते,त्याचा ट्रॅक बदलायचा प्रयत्न केला.
शरद :अरे तुही ये की घरी एकदा.वेळ कसा जातो ते कळत नाही मुलांबरोबर .जरा चेंज
शरद च्या मुलाचा विषय निघताच आपसूकच विजय च्या कपाळावर पडलेल्या आठ्या निवळल्या.शरद चा मुलगा अतिशय लोभस होता,कोणालाही पटकन लळा लावेल असा.विजय नी त्याला काही महिन्यांपूर्वी पाहिल होत,पण तेव्हाही तो विजय घरच्या मंडळींपैकी एक असल्यासारखा सहज त्याच्याकडे गेला,विजयलाही त्यानी पहिल्या भेटीतच आपलस केल.माणसाला त्याच्या वेदना काही काळापूर्त्या का होईना,विसरायला लावण्याची किमया लहान मूल करू शकत.त्याच्या निरागस आणी निष्पाप हास्याचा आणी स्पर्शाचा परिणाम असावा.
विजय :हो आणी तू ही ये एकदा,तूला वेळ कसा जातो ते कळत नाही आणी माझा वेळ जाता जात नाही.तुलाही जरा चेंज.त्याच्या त्या बोलण्यावर शरद खो खो हसायला लागला.ते पाहून विजयच्या चेहेऱ्यावरही हास्याची लकेर उमटली.काळवण्डलेल्या आकाशात विजेची रेघ उमटावी तशी,निमिषमात्र,पण डोळे सुखावणारी.गेल्या 24 तासात तो जणू हसणंच विसरला होता.शरद ला ते पाहून समाधान वाटल.त्याने तोच धागा पकडून बोलायला सुरुवात केली.विजय गाडीवर बसला.काही वेळातच शरद विजयाच्या चाळी समोर थांबला.जो प्रवास संपूच नये असं विजयला वाटत होत तो अगदीच अल्पजीवी ठरला.त्या छोट्याशा प्रवासात तो ते सगळे अनुभव विसरला होता.इच्छा नसतानाही आता उतराव लागणार होत.आनंदाचे क्षण वळवाच्या पावसासारखे मनाला रोमांचांची आणी शरीराला सुखाची अनुभूती देऊन जातात.हो पण त्यासाठी मन आणी शरीर दोन्ही उन्हाच्या झळानी त्रासलेल हव.तरच त्याची किंमत कळते.विजय गाडीवरून खाली उतरला.चाळीकडे पाहून त्यानी एक दीर्घ उसासा टाकला.
विजय :घरी माझ कर्तव्य माझी आतुरतेनी वाट बघत असणार.कधी कधी हे सगळ सोडून कुठेतरी पळून जावस वाटतं रे.काय साल नशीब घेऊन जन्माला आलो यार मी? .तुझा कधी कधी हेवा वाटतो रे मला.घरी भांडायला का होईना कोणीतरी पाहिजे रे.
शरद :म्हणून म्हणतोय लग्न कर.
विजय :मनाला लाख एकट वाटेल.पण मनातल्या इच्छा मेंदूच्या सारासार विचारांच्या कसोटीवर टिकल्या पाहिजेत ना रे.माझ्या नशिबाच्या ताटात दैवानी जे काही वाढून ठेवलय,ते कोणाबरोबरही वाटण्यासारखं नाही रे.माझं मलाच संपवल पाहिजे.लहानपणी समजायला लागायच्या आतच आई गेली.माझ्या आईकडचे नातेवाईक तेव्हापासून मला सैतानच समजतात,स्वतःच्या आईचा घास घेणारा.बाबाही चिडले की अधून मधून अशा शब्दांच्या डागण्या द्यायचे.तेव्हा खरंच वाटायचं आपल्याला देवानी जन्माला तरी कशाला घातल.पण मग ही वेदना नाईलाज म्हणून स्वीकारली .नाहीतर जगणच अशक्य होत.शाळेत नेहमी वाटायचं आपल्याला का नाही बाकीच्यांसारख ट्रीप ला जाता येत,चांगले रंगीबेरंगी कपडे घालता येत,कळत नव्हतं तोवर झोप येईपर्यंत घरी बाबांशी कटकट,रडारड करायचो.पण त्यांचाही नाईलाज होता,त्यांना जे जे शक्य होत ते सगळ केल त्यांनी माझ्यासाठी.आणी दुसरा माणूस तू,कसलीही अपेक्षा न ठेवता माझ्याशी मैत्री केलीस,आणी अजुन निभावतोयस.नाहीतर तू भेटे पर्यंत मैत्रीचा अनुभव,म्हणजे भिकाऱ्याला भीक घालतात तसाच होता.काही जण वेळप्रसंगी ते तोंडानी बोलून दाखवायचे तर काही नजरेनी.
बाबांचे उपकार बहुधा फेडून होतील.पण तूला द्यायला माझ्याकडे काही नाही.
शरद :असा नको विचार करू विजय?हेही दिवस जातील.ऋतू बदलतात तस नशीबही बदलेल एक दिवस.
विजय :बत्तीस वर्ष गेली रे आयुष्याची वाट बघण्यात.अजुन काही ऋतू बदललेला दिसत नाही,आयुष्यात वेळेलाही महत्व आहे रे.थंडीनी कुडकुडून मेलेल्या माणसाला,मग सरणाच्या आगीचा काय उपयोग सांग पाहू.योग्य गोष्ट,योग्य वेळी आणी योग्य ठिकाणी मिळाली तर तिची किंमत.असो माझ ताट मलाच संपवल पाहिजे.
शरद निरुत्तर झाला.त्याला काय बोलाव कळेना,जणू मागच्या बत्तीस वर्षातल्या त्याच्या कधीही न भरणाऱ्या जखमा आज त्यानी शरदला दाखवल्या.थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही.
विजय :जाऊदे रे,तू उगाच डोक्याला ताप करून घेऊ नको,आज सकाळपासून माझंच चित्त थाऱ्यावर नव्हत.शरीराच पित्त वाढल की ते उलटीतून बाहेर आल्याशिवाय जसा आराम पडत नाही.तस हे मनातल्या विचारांच पित्त,कुठेतरी हे विचार बोलून दाखवल्याशिवाय हलक वाटत नाही रे.तू निघ घरी प्रणव तुझी वाट पहात असेल.
शरद :चल येतो,उद्या फोन करतो,किती वाजता जाऊया गाडी आणायला.
विजय :ये कधीही तुझ्या सवडीनी,मी घरीच आहे.
शरदची गाडी दिसेनाशी होईपर्यंत विजय तिथेच उभा राहिला.त्यानी वळून अंधारात एकट्याच उभ्या असलेल्या त्या चाळीकडे एकवार पहिल.वर्षानुवर्ष ती ऊन,पाऊस,वारा या तिच्या आयुष्यातल्या सगळ्या संकटाना तोंड देत उभी होती,आयुष्याच्या लोढण्यासाठी लढणं बहुतेक वेळा अनिवार्य असत,ते सुसह्य करण्यासाठी मग लोक त्याला आत्मविश्वास,लढाऊ बाणा वगैरे विशेषणांनी सजवतात.त्या चाळीत आणी त्याच्या वडिलांच्यात बरच साम्य होत,दोघंही मृत्यूच्या प्रतीक्षेत होते.संथ पावलं टाकत विजय चाळीतल्या आपल्या खोलीकडे मार्गस्थ झाला.दार उघडून विजय आपल्या कर्तव्यावर रुजू झाला.बाबांचे कपडे बदलले,आणी हॉटेलमधून आणलेली खिचडी चमच्यानी त्यांना भरवू लागला .हा कार्यक्रम कमीत कमी तासभर चालणार होता.
विजय अतिशय संयमानी त्यांना एक एक घास भरवत होता.आपल्या वडिलांची अवस्था त्याला पाहावत नव्हती.त्यानी दिलेला घास ते मोठ्या कष्टानी जमेल तसा चावत होते.चेहऱ्याच्या स्नायूनच्या असहकारा मुळे त्यातला अर्धा घास लाळे बरोबर बाहेर येत होता,विजय लाळेर घेऊन ते पुसत होता.विजय ला त्यांची अवस्था पाहून वाईट वाटत होत.त्यांची ह्या रोजच्या मरणातून लवकर सुटका व्हावी एवढीच त्याची इच्छा होती.ह्या विचारात असतानाच चमचा वडिलांच्या आटळ्याला लागला,खाल्लेल्या खिचडीतली बहुतेक खिचडी उलटीबरोबर बाहेर आली,त्यांच्या अंगावरचे कपडे,चादर सगळी त्यात माखली.ते पाहताच विजयच्या संयमाचा बांध फुटला.देवा अरे बघतोयस का विसरलास,अरे धड आयुष्य दिल नाहीस,मरण तरी दे,का तेही आमचंच आम्ही घ्यायचं.अरे कोणीतरी सोडवा ह्यांना,किती शिक्षा भोगायची माणसांनी.काहीही करायला लागलं तरी चालेल पण ह्या त्रासातून ह्यांना मुक्त करा,सोडवा एकदाच त्यांना आणी मलाही.विजय रडत रडत त्यांचे कपडे बदलत होता.चादर बदलून झाली,आता खायला द्यायला काही शिल्लक नव्हत आणी काही करून द्यायची ताकदही.ती विजय ती माखलेली चादर आणी अंगावरचा कपडा घेऊन मोरीकडे वळला.त्यांची उस्तवारी आवश्यक होती,विजय त्या कापडयांना चिकटलेली खिचडी मोठ्या कष्टानी वेगळी करत होता.तो असह्य वास,विजयच्या पोटातल अन्न ढवळून काढत होता,त्याला सारखे ओकंबे येत होते.
'तूला खरंच बाबा सुटावेत अस वाटतय.?
पुन्हा कानात कुजबुज झाली.वैतागलेल्या विजयला ह्या खेपेला हे बहुधा आपल अपराधी मन असावं अस वाटलं.स्वतःच्याच जन्मादात्याच्या मृत्यूची इच्छा त्याच्या मनात आली होती.
हो वाटतंय मला.असच वाटतंय.त्यांच्या ह्या जगण्याला तरी काय अर्थ आहे?
प्रत्येक कामाची किंमत असते.तुझी द्यायची तयारी आहे.?
पुन्हा कानात कुजबुज झाली.
ही मोजतोय ही किंमत काय कमी आहे का?बाबा आणी मी दोघंही बारा महीने तीनशे पासष्ठ दिवस ,याहून वाईट काय असू शकत.?
म्हणजे किंमत मोजायची तुझी तयारी आहे तर.?
बाबा ह्या परावलंबी आयुष्यातून मुक्त होणार असतील तर हे पाप माथ्यावर घ्यायला मी तयार आहे.
हाताला कसली तरी वेदना जाणवली आणी तो एकदम भानावर आला.मोरीमध्ये चादर एका बाजूला झाली होती,विजय खालच्या फरशीवर नकळत किती तरी वेळ हात घासत बसला होता,अंगठा सोडला तर उरलेल्या चारही बोटातून रक्त वहात होत.हात थरथरत होता.आपण कुठे हरवलो होतो हे त्याच्या ध्यानात येत नव्हत.एवढी जखम होईपर्यंत आपल्याला काहीच जाणवू नये? न सुटणाऱ्या प्रश्नांच्या यादीत आणखी एका प्रश्नाची भर पडली .त्यानी ते कपडे तसेच बादलीत बुडवले,त्या दुखऱ्या हातानी ते आत्ताच धुण त्याला शक्य होणार नव्हत.हाताला झालेल्या जखमेत साबण गेल्याने होणाऱ्या वेदना डोक्यापर्यंत जात होत्या.त्यानी पाण्यानी हात धुतले,साबण आणी रक्त दूर झाल्यावर झालेल्या जखमेचा त्याला अंदाज आला,जखम बऱ्यापैकी खोल होती.त्यानी जखमेवर मलम लावल,आणी खाली फारशीवर तसच अंग टाकल,विचारांच्या टिटव्या कर्कश्श आवाज काढत मनात घिरट्या घालतच होत्या.
मध्यरात्रींनंतर केव्हातरी त्याला जाग आली,हातावरची जखम पहिल्यापेक्षा कितीतरी अधिक वेदना देत होती.चारही बोटांना सूज आली होती,मनगटाखालचा उजव्या तळहाताचा भाग डाव्याच्या दुप्पट आकाराचा दिसत होता.त्या जखमी बोटांतून पुन्हा रक्त सांडायला सुरुवात झाली.वेदना असह्य होऊन तो ओरडला,हात अंगापासून कापून वेगळा करावा इतका ठणकत होता.तो फरशिवरून उठला,बोटातून रक्त सांडतच होत.त्यानी घरातले लाईट चालू केले, हात धुवायला मोरीकडे वळला.हात पाण्यानी धुतला, मलमाची बाटली मिळाली नाही,त्यामुळे त्यानी जखमेवर हळद चेपली.परत झोपायला म्हणून तो बाहेर आला,आणी एखाद्या पुतळ्यासारखा स्तब्ध झाला.श्वास सोडले तर जिवंतपणाचं कुठलही लक्षण त्याच्या ठायी राहिलं नाही,त्या श्वासांचा आवाजही नकोसा वाटत होता.त्याच्या कुठल्याच वैचारिक,काल्पनिक कसोटीवर न उतरणार अस काहीतरी तो समोर पहात होता.विजयचे अंथरुणाला खिळलेले,मृत्यूची वाट पाहणारे परावलंबी वडील अथरुणावर उठून बसले होते.म्हाताऱ्याच्या चेहेरा तसाच व्याधीग्रस्त होता,पण डोळ्यात मात्र वेगळीच चमक दिसत होती.त्यांच्या आवाजातही कमालीची लयबद्धता आली होती.मधेच अमानवी हसण्याचे गुरगुरण्याचे आवाज येत होते.तर कधी विव्हळण्याचे आणी रडण्याचे.विजय ची जागेवरून हलायची हिम्मत होत नव्हती.म्हाताऱ्यानी एकवार विजयकडे पाहिले मान हलवली,पुन्हा एकदा ते काळीज हदरवणार गडगडाटी गुरगुरण विजयच्या कानावर पडलं.आणी विजयच्या ध्यानी मनी नसताना,काल खिचडीच पार्सल कापायला,वापरलेली टेबलावर पडलेली सूरी अलगद दोन्ही मनगटांवर फिरवली.त्याही परिस्थितीत बाबा म्हणून विजयनी आर्त हाक मारली,आणी पुढे जायचा प्रयत्न केला,पण म्हाताऱ्यानी आपला रक्ताळलेला उजवा हात तोंडावर ठेवून मान हलवली.अगदी थेट काल आरश्यात पाहिलेल्या त्या आकृतीसारखीच.काही क्षण तसेच गेले,आणी विजयच्या डोळ्यांदेखत म्हातारा पुन्हा गादीवर कोसळला.अंगात आलेलं ते बळ जसं आल तसच अचानक नाहीस झाल.दोन्ही हातातून आधीच कमी असलेलं रक्त वहात होत.त्यांना तस पडलेलं पाहून विजयनी बाबा बाबा म्हणत हंबरडा फोडत त्यांच्यापाशी धावला .तेल संपत आलेल्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे बाबांचे डोळे निस्तेज होऊ लागले.चिरनिद्रेत हरवू पाहणाऱ्या त्या म्हाताऱ्याला विजय बाबा बाबा म्हणून हाक मारत होता.दोन्ही हातानी मनगटातून बाहेर पडणार ते रक्त थांबवायचा प्रयत्न करत होता.विजय ओक्साबोक्षी रडत होता.लहानपणीही तो एखाद्या गोष्टीसाठी असाच हट्ट करायचा,तेव्हा परिस्थितीनी हात बांधले असल्याने बाबा काही करू शकले नव्हते.विजयचे बहुतेक हट्ट त्याच्या रडण्याबरोबरच वाहून गेले.आयुष्याच्या प्रमेयात परिस्थिती नावाचा भाग शून्यावर स्थिर असल्याने त्याचा गुणाकारही शून्यच होता तेव्हाही आणी आत्ताही.विजयचा हा ही हट्ट वडिलांना पुरवता आला नाही.पूर्वी खिशातले पैसे संपलेले असायचे,ह्या खेपेला श्वास संपले.ह्यावेळी त्याला कुठलीही गोष्ट नको होती,पण एकटेपणाची भीती वाटत होती.पापण्यांचा डोळ्यांवरचा पहारा संपला,बाबांचे उघडे डोळे विजयनी हातानी बंद केले.पुढे काय कराव त्याला सुचेना,त्या वेळी त्याला सगळ्यात जास्त गरज होती ती सोबतीची,आणी त्यासाठीचा एकमेव आधार म्हणजे शरद,त्यानी शरद ला अनेक फोन केले ,प्रत्येक वेळी फोन वाजून बंद झाला.रात्री तीन वाजता शरद फोन उचलायची शक्यताही कमी होती.गोंधळलेल्या मानस्थितीत तो बाबांच्या बिछान्याजवळ तसाच डोकं धरून बसला.शरीराबरोबर मनालाही प्रचंड थकवा आला होता.
दार वाजवण्याच्या आवाजानी तो दचकून उठला .काही तासापूर्वीच घडलेला प्रसंग खरा की फक्त्त एक वाईट स्वप्न ह्याची खातरजमा करायला म्हणून त्यानी नजर फिरवली,रक्तानी चिंब झालेल्या बिछान्यावर बाबांचा निष्प्राण देह पडला होता.ते पाहून त्याला पुन्हा रडू कोसळलं.तेव्हढ्यात पुन्हा दरवाजा वाजला त्यानी रडत रडतच दरवाजा उघडला,समोर शरद उभा होता.त्याला पाहून तृषार्त वाटसरुला पाणवठा पाहून वाटावं तस समाधान त्याला झालं,एखादा गर्दीत हरवलेल लहान मूल मायेचा माणूस पाहून त्याला बिलगावं तसा तो शरदच्या गळ्यात पडून रडू लागला.त्याच रडणं पाहून काय झालं असावं याची कल्पना शरद ला आली.
अरे हे कधीतरी व्हायचंच होत,तू तुझ्या कर्तव्यात कुठेही कमी पडला नाहीस याचा तूला अभिमान हवा.?
ते ऐकून विजयनी हलकेच नजर वर उचलली,आणी नकारार्थी मान हलवली.तो दारातून बाजूला झाला.
समोरच दृश्य पाहून तो हादरला,विजयनी हे केलेल नाही याची त्याला खात्री होती,तरी प्रश्नार्थक नजरेनी त्यानी विजयकडे बघितल.?
ज्या माणसाला धड कुशीलाही वळता येत नाही तो असलं कृत्य करेलच कस?हा प्रश्न विजयनी त्याच्या डोळ्यात वाचला.
विजय :नाही रे नाही तशीच वेळ आली असती तर मी माझं आयुष्य संपवलं असतं रे .हा गुन्हा कधीच केला नसता.मी अपयशी कमनशिबी आहे रे गुन्हेगार नक्कीच नाही.तू माझा एकच मित्र आहेस,त्या मैत्रीची शपथ घेऊन सांगतो.
शरद :सॉरी यार ,हे सगळ माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडंच आहे.त्यामुळे नकळत शंका आली,अरे पण माझ्या जागी तू असतास तरी तुलाही हीच शंका नसती का आली?ज्या माणसाला स्वतःच्या तोंडातून गळणारी लाळही स्वतःच्या हातानी पुसता येत नाही.तो हे करण म्हणजे जरा....बर ते नंतर पाहू.
शरद :तू कोणाला कळवलयस का?
विजय :तुझ्याशिवाय कोण आहे दुसरं?
शरद :तस नाही रे पोलिसाना वगैरे.
शरद :अरे बाबा फॉर्मॅलिटी असते,आत्महत्येची केस आहे.तु घेतलेली मैत्रीची शपथ मला लाखमोलाची असली तरी कायद्याच्या लेखी कवडिमोल आहे.तू काही बोलू नकोस त्यानी फक्त्त सततच्या आजारपणाला कंटाळून हे केल एवढंच सांग.मी बाबांनाही बोलावून घेतो त्यांची ओळख आहे.
शरदनी मग पटापट फोन फिरवले.ऍम्ब्युलन्स,पोलीस,पोस्टमार्टेम,मृत्यूचा दाखला सगळे सोपस्कार पार पडले.स्वर्गाच्या रस्त्यावर स्मशानात भरायला लागणारा हा टोल, पोलिसानीही फार रस दाखवला नाही.म्हाताऱ्याला मारून मिळवता येईल असं काही घरात,बँकेत गावाकडे काहीच नव्हत ,ते राजकीय पुढारी नव्हते कीं लक्ष्मीपुत्र,कीं एखादी प्रसिद्ध असामी ज्याचं भांडवल करता येईल.इथे चालत्या फिरत्या माणसाच्या मृत्युंच दुःख करायला कोणाला वेळ नाही.तर जगाच्या दृष्टीनी निरूपयोगी शरदच्या बाबांवर अश्रु कोण ढाळणार?नजरेत भरणारा,छाया फळ देणारा मोठा वृक्ष पडला तर त्याच्यासाठी हळहळणार जग ,झुडूपांसाठी कशाला अश्रु ढाळेल.संध्याकाळी ही सगळी जमवाजामव झाल्यावर बाबांचं कलेवर स्मशानात पोचलं,विजय ह्या त्यांच्या मुलानी उपचाराचे शेवटचे चार आसू ढाळले,आणी बाबांना भडाग्नी दिला.विजय त्या ज्वालांमधून पार पहात होता.बाबा त्या कारागृहातून सरते शेवटी मुक्त झाले होते,जिवंतपणीच्या मरणयातना संपल्या,त्यांच्या ताटात नशिबानी वाढून ठेवलेले भोग संपले,विजय नी ते संपवायला मदत केली होती का?या प्रश्नांला आता काही अर्थ नव्हता,मनाला अपराधी पणाचे असंख्य विंचू जरी एकाच वेळी डंख मारत असले तरी कायद्याच्या खाती त्याची आत्महत्या म्हणून नोंद झाली .आयुष्यात पहिल्यांदाच त्याची एखादी इच्छा फलद्रूप झाली होती.इचछा्पुर्तीची पद्धत नीतिमत्तेच्या कसोटीवर पारखून घेण्यासारखी नसली तरी शेवटचा निकाल मनाजोगा होता.आजच्या जीवनात त्यालाच अनन्यसाधारण महत्व आहे.इकडे विजयच्या काळजात कुठेतरी अपराधी मन थरथरत उभ होत ,आणी स्मशानाच्या गेटवर मारेकरी अजूनही दात विचकत हासत उभा होता.कदाचित त्याची बीदागी घ्यायला.
चितेच्या ज्वाळांनी विजयच्या वडिलांच शरीर जाळलं,पण विजयच्या मनातली पश्चातापची धग तिथल्या अपराधाची भावना जाळू शकली नाही.शरद नी तिथल्याच एका परिचयाच्या माणसाला विजयची गाडी त्याच्या घराखाली लावायला सांगितली.
शरद :तू काही दिवस तरी माझ्याकडेच राहायला चल,खाली आजोबांची खोली आहे.तिथे राहा तूला वाटेल तेव्हा जा परत.
विजय :नको रे मला वाटलं तर तूला सांगीनच पण आत्ताच नको.घरी सगळ आवरायचंय.मला आपल घरी सोड.
शरदनी आपल्या गाडीवर विजयला घरी सोडलं.
शरद :जेवायचं काय
मी लावीन कुकर.
शरद:नक्की,मी येऊ,काहीही लागलं तरी फोन कर.तुझी गाडी माझ्या घरी लावायला सांगितल्ये,काही दिवस तरी गाडी चालवूच नकोस.तेच बर,चल येतो.
विजयनी नुसतीच मान हलवली.
गाडी वळवून शरद दिसेनासा झाला.विजयनी नाईलाजानी आपली पावलं घराकडे ओढली.त्या घरात पुन्हा पाऊल ठेवायचीही त्याची इच्छा नव्हती.पण निवड ही फक्त्त पर्याय असलेल्यांनाच करता येते.विजय सारख्याच्या नशिबात फक्त्त दोनच पर्याय असतात जीवन आणी मृत्यू,त्यानी पहिला पर्याय निवडला आणी घराकडे चालू लागला.कडी उघडून तो आत शिरला,रक्तात भिजलेल्या चादरी त्यानी साबणाच्या पाण्यात बुडवल्या,ओली गादी दुसऱ्या दिवशी उन्हात टाकायला हवी होती.आदल्या रात्री शिल्लक असलेल्या चादरी धुवून वाळत घातल्या.कुकर लावून जेवण उरकल.बाहेरच्या खोलीतली लादी पुसून अंथरुण घातल.आणी अथरुणावर अंग टाकलं.हे कस शक्य आहे?हा शरदला पडलेला प्रश्न आता त्याच्या डोक्यात रुंजी घालत होता.एक पूर्णपणे परावलंबी माणूस ज्याला कुठलेच शरीरधर्म पाळता येत नाहीत,त्याच्या अंगात अचानक स्वतःच आयुष्य संपवायचं बळ आल कुठून,आणी शक्यच असतं तर ते त्यांनी फार पूर्वीच केल असत.कोणाला हव असणार असं दुसऱ्याच्या आधारावर बांडगुळासारख जगणं.काल बाबा सुटावेत म्हणून मी रात्री थकव्यामुळे चिडून म्हणालो म्हणालो,कपडे धुतानाचा तो आवाज,कानात कोणाचातरी आवाज येणं ,हाताला झालेली ती जखम,मध्यरात्रींनंतर केव्हातरी पुन्हा जखमेतून वाहणार रक्त.आणी बाबांनी केलेलं अकल्पित कृत्य,आणी दोन दिवसात आलेले अनुभव,त्या हिडीस चेहऱ्याच्या माणसानी स्मशानातून इथवर आपल्या मागे मागे येणं,त्या आकृतीच मग अचानक घरात दिसणं, आज पुन्हा पहिल्या खेपेला पाहिलं तिथेच तीच उभ असणं ,या सगळ्या घटना वरकरणी पाहिल्या तर वेगवेगळ्या वेळी,ठिकाणी घडलेल्या.पण त्या सगळ्या घटनांमध्ये कमालीच सातत्य होत.आपण व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करणारी,दोन दिवस जीव नकोसा करणारी ती कृष व्यक्ती कोण आहे?देव खाचितच नाही,तीनी आपल्यासाठी हे का कराव?प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते म्हणजे काय?मुन्नाच्या मृत्यूशी तीचा काय संबंध?ह्या अशा अनेक प्रश्नानी त्याचा थकलेला मेंदू पोखरायला सुरुवात केली?त्याची समाधानकारक उत्तर त्याला सापडेनात,योगायोग हा शब्द पॅरासीटॅमोल सारखा आहे, कुठल्याही दुःखण्यासाठी त्याचा सर्रास वापर केला जातो तसाच अनुत्तरीत प्रश्नासाठी माणसांनी शोधलेल योगायोग हे एक सर्वमान्य उत्तर.विजय त्या पॅरासीटॅमोल पलीकडलं काहीतरी शोधायचा प्रयत्न करत होता.अचानक त्याच्या थकलेल्या मेंदूनी त्याला एक पर्याय सुचवला,तो अंथरुणातून उठला.उभ्या उभ्याचं दोन मिनिटं कसलातरी विचार केला,माणसाच्या आकलनशक्ती पलीकडंच्या निबीड प्रदेशात तो प्रवेश करू पहात होता,त्यांनी घरातल्या त्या छोट्या आरशाच्या दिशेनी पावलं टाकायला सुरुवात केली.त्याच्या प्रश्नांची उत्तरं तिथे मिळतील याची त्याला खात्री होती.तो जिथे जाऊ पहात होता तिथून परतीचा रस्ता आहे कीं नाही याचीही त्याला जाणीव नव्हती.ज्या अनुभवानी त्याला वेड करायचंच बाकी ठेवलं होतं,तो अनुभव पुन्हा अनुभवायला तो निघाला होता.तो थरथरत आरश्यासमोर उभा राहीला.बाहेर टिटवीच्या ओरडण्याचा पुन्हा आवाज आला,का कुणास ठाऊक पण दूरवरून कुत्री रडण्याचे आवाज येऊ लागले,त्या कोंदट वातावरणात एक गार वाऱ्याची झुळूक त्याच्या अंगावरून गेली,अंगावर सरसरून काटा उभा राहीला,भावनांच्या समुद्रात हेलकावे खाणाऱ्या त्याच्या मनाच्या शिडात भीतीच वार भरलं,मन पुन्हा दिशाहीन भरकटायला लागलं. त्या छोट्याश्या खोलीत खरं तर वारा शिरायला जागाच नव्हती.कानात गुरगुरण्याचा आणी अमानवी हसण्याचा आवाज घुमला.बाबांच्या तोंडातून शेवटच्या घटकेला येत होता तसलाच,लाल डोळ्यांचं ते हिडीस रूप पुन्हा आरशात प्रकाशमान झालं, मनाचा ठाव घेणारे लालबुंद डोळे जणू विजयच्या मनातले प्रश्न वाचत होते.
मी तुझंच प्रतिबिंब आहे,पुन्हा कानात आवाज यायला सुरुवात झाली.त्या वाक्यानी विजय चरफडला.
नाही मी असं काम करूच शकत नाही.
तू.....तू जो कोणी आहेस तूच मारलयस बाबांना.
पुन्हा एकदा त्या अमानवी हसण्याचा गडगडाट विजय च्या कानात घुमला.
अरे आरंशात आपण स्वतःचच प्रतिबिंब पाहतो रे,तू जे काही पाहातोयस ते तूझच रूप बर वाईट जस असेल तस . प्रत्येकात देवपण असतं तसाच मीही असतो.खोलवर कुठेतरी दडलेला,न सुटणाऱ्या प्रश्नानी मन ढवळून निघालं कीं मग मी पृष्ठभागावर दिसायला लागतो उत्तरं म्हणून .आपल्या सोयीनी जो तो माझा वापर करतो कोणी पैशासाठी,कोणी आयुष्यातली आणखी काही कष्ट दूर करण्यासाठी.आता तुझ्या बाबांचं म्हणशील तर त्यासाठी मला जबाबदार धरण म्हणजे एखाद्या खूनासाठी बंदूकीला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभ करण्यासारखं आहे.बाबांना मुक्ती मिळावी ही कामना तुझी मी फक्त्त निमित्तमात्र.
विजय :मी बाबा सुटावेत एवढंच म्हंटलं.
मी ही तेवढंच केल.त्यांना सोडवलं.
विजय :त्यासाठी ह्या असल्या मार्गाचा अवलंब करायला मी कुठे सांगितलं.?
त्या बोलण्यावर आरशातल ते रूप छद्मी हसलं.
अरे तुझ्या देवाकडे भीक मागून मागून दमलास तु ,काय मिळालं काय? दारिद्र्य,अपमान आणी लाथा .तीस वर्षाच आयुष्य खर्ची घातलस तरीही अजुन जमेची बाजू रिकामीच ?ना पैशाचं सुख ना संसाराच.अजूनही रोज कष्ट उपसतोयस,तुझाही शेवट असाच तुझ्या बापासारखाच व्हायला हवा असेल तर कोण काय करणार.अंतिम निकाल महत्वाचा,रस्ता नाही.
विजयच गळून गेलेलं अवसान हळू हळू परतू लागलं.तो दबक्या आवाजात म्हणाला.
विजय :पण माझे भोग मी भोगत होतो,तुझ्या दारी मी माझं गाऱ्हाणं घेऊन कधी आलो नाही.तूला मी बोलावलंही नाही,तूच माझ्या मागोमाग इथवर आलास.
रोज मनात प्रत्येक क्षणी फक्त्त याचना करत होतास.कुणीतरी सोडवा कसही सोडवा या त्रासातून या दारिद्र्याच्या दलदलीतुन.तुझी हाक मी ऐकली मी , मला तूच बोलावलस.बोलावल्याशिवाय मी कुठेही जात नसतो,आणी सांगितल्या शिवाय काही करत नसतो.
विजय :बाबांचा असा शेवट करायला मी सांगितलं तूला?त्यांना नैसर्गिक मृत्यू यावा इतकीच इच्छा होती माझी.विजय वैतागून म्हणाला.
तु करार केलायस माझ्याशी.
ह्या वेळी विजय छद्मीपणे हसला.
विजय :मी आणी करार.कसला करार?
ते ऐकताच त्या हिडीस चेहेऱ्याच्या आकृतीचा गुरगुराट वाढला.त्याचे डोळे अधिकच लाल झाले.एका विचित्र आवाजात विजयच्या कानात सुस्पष्ट करडा आवाज घुमला
तुम्ही माणसं सगळी एकजात कृतघ्न.मी तुला स्पष्ट सांगितलं होत,प्रत्येक गोष्टीची किंमत असते.त्याला तूच होकार दिलास तुझ्या रक्तानी तु करार पक्का केलास आणी आता नाही म्हणतोस.अरे मिळालेल्या संधीच सोन कर,तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घे.मी काय करू शकतो,मला काय शक्य आहे,ते तु पाहिलेलंच आहेस.मला अशक्य काहीच नाही.आजपासून तु मागशील ते तुझ्या पायाशी आणायची जबाबदारी माझी.फक्त्त काय,कस कुठून असले फालतू प्रश्न विचारायचे नाहीत आणी पडूनही द्यायचे नाहीत.प्रश्न विचारण्यात वेळ घालवायचा नाही.मी मगाशी म्हंटलं तसं अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं,कुठल्या रस्त्यानी गेलास ते नाही .
पाठीवर इतके दिवस वागवत असलेल ते दारिद्र्याचं ओझं आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी कायमच उतरवण्याविषयी विचारत होत.इतके वर्षांच्या सवयीनी ते ओझं म्हणजे शरीराचाच भाग झाल्यागत वाटत होत.सुखवस्तू आयुष्याच्या नुसत्या कल्पनेनी त्याच मन थुई थुई नाचू लागलं.
तुझ्या स्वीकृतिशिवाय काहीही करण शक्य नाही.त्यामुळे ह्या आपल्या तोंडी करारावर तुझ्या होकाराच्या शब्दांची सही हवी.कसला विचार करतोयस?अरे ऑपरेशन च्या वेळेला देखील डॉक्टर च्या बोडक्यावर जबाबदारीच्या सहीचे कागद मारताच ना तुम्ही.आणी असही भिकाऱ्यांना फक्त्त भीक हा एकच पर्याय असतो,तुझं नशीब भलं तूला दुसरा पर्याय तरी मिळतोय.
विजय :पण हे कस शक्य आहे ?आणी तु जो कोणी आहेस माझ्यासाठी हे का म्हणून करतोयस.?
पहिला प्रश्न सोडवायची जबाबदारी माझी.दुसरा प्रश्न म्हणशील तर त्याच उत्तरं बाहेर जगात बघितलंस तर मिळेलच.इथं कोणी कुणासाठी काहीही फुकट करत नाही.प्रत्येक केलेल्या कामामागे स्वार्थ असतोच .हा,कदाचित मोबदल्याच स्वरूप बदलत असेल.
विजय :तूला काय मोबदला द्यायचा?मी तूला काय देणार.आणी तुझ्या सारख्याला काय हव असणार.?
तो :ते मी वेळ आल्यावर सांगीनच .फक्त्त तेव्हा मी जे मागीन ते द्यायला मागे पुढे पाहायचं नाही.आता तूला जे हवय ते मिळवून द्यायला यापुढे मी जे कष्ट उपसीन त्याची परतफेड करायलाच हवी.कुणाचीही उधारी ठेऊ नये.उपकाराचं ओझं तर नाहीच नाही.जा आज शेवटची रात्र या गरिबीत काढ,उद्यापासून तुझे दिवस फिरणार.
विजय :ठीक आहे माझी तयारी आहे म्हणत विजयनी करारावर होकाराची सही केली.आणी पुन्हा निद्राधीन झाला.
नाही म्हणणं शक्यच नव्हत कदाचित तो पर्याय ही नव्हता. वर्षानुवर्षे कुपोषित माणसापुढे भरलेलं ताट आल्यावर जे काही होईल त्याला आधाशीपणा किंवा हावरटपणा खाचितच म्हणता येणार नाही.
उघड्या राहिलेल्या खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी विजयला जाग केल .सकाळचीं ती कोवळी किरण हवीहावीशी वाटत होती.कालच संभाषण अजूनही मनात आणी डोक्यात ताज होत.पुन्हा तोच तोच प्रश्न तो स्वतःलाच पुन्हा पुन्हा विचारत होता.काल रात्री घडलं ते सत्य कीं स्वप्न?जणू हा प्रश्नही आता त्याच्यासाठी नित्याचाच झाला होता.त्यानी सकाळची काम उरकली आणी थोडंफार सामान आणायसाठी म्हणून बाजाराची वाट धरली.त्याची गाडी अजूनही शरद च्या घरीच होती,त्यामुळे चालण भाग होत येताना गाडीही परत आणायचा त्याचा विचार होता.त्यानी वाट तुडवायला सुरुवात केली,चालताना तो मधूनच दचकून मागे पहात होता.स्मशानातून येताना घडलेल्या त्या घटनेनी दिलेल्या अनुभवाच्या जखमा अजूनही ताज्या होत्या.बाजारपेठ गजबजलेली होती.माणसांचा अव्याहत प्रवाह त्या रस्त्यावरून वाहात होता.फक्त्त त्यांचे अंतस्थ हेतू भिन्न होते.चालता चालता तो एका ठिकाणी थांबला,त्या ठिकाणी अगदी सारखी दिसणारी दोन कपड्यांची दूकान होती.जुळी भावंडच जणू.एक दूकान ग्राहकांनी गजबजलेल तर दुसर रिकाम.भावंड जरी जुळी असली तरी त्यांची नशीब जुळी असतीलच ह्याची शाश्वती नाही.एकावर लक्षुमी्ची कृपा तर दुसऱ्यावर अवकृपा असं काहीतरी दिसत होत.'दूकान सगळ्या सेटअप सकट भाड्यानी देणे आहे ' असा बोर्ड दूकानाबाहेर टांगला होता.विजयच त्यापैकी कुठल्याच दूकानात काहीच काम नव्हत तरीही संमोहित व्यक्तीनी डोळे मिटून एखाद्या आदेशाचं पालन करावं तशी त्याची पावलं आपसूक त्या रिकाम्या दूकानाकडे वळली.आपल्या पोटाचा पसारा सांभाळत साठीच्या आसपासचा एक म्हातारा तिथे बसला होता.बाकी दूकानात मदतनीस वगैरे कोणी दिसत नव्हते. विजय आत येताच तो पोट सांभाळत उठला ,या शेठ या,काय दाखवू?50 % डिस्काउंट आहे.काहीपण घ्या.वास्तविक त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर उपकार करा पण काहीतरी घ्या असले भाव दिसत होते.परिस्थितीनी त्याला असहाय्यतेच्या या जंगलात आणून सोडल होत.तिथून सुटकेसाठी तो म्हातारा जंग जंग पछाडत होता.तो बाहेर लावलेला बोर्ड म्हणजे खरंतर मदतीची याचना होती.बऱ्याच वेळेला मनात लपवलेली गुपितं नकळत डोळ्यांतून सांडून जातात.
विजय :माफ करा,मला काही घ्यायचं नाहीये.विजयला ते सांगण जीवावर आल,पण इलाज नव्हता.
म्हाताऱ्याच्या चेहेऱ्यावरचे निराषेचे भाव विजय वाचू शकत होता.
दुकानदार :मग पत्ता विचारायला आले असणार.बघू सांगतो.म्हातारा थोडा हताश झाला.
विजय :नाही ती बाहेरची पाटी वाचली,दूकान भाड्यानी द्यायचं आहे.
ते ऐकताच म्हाताऱ्याच्या निस्तेज डोळ्यांत आशेचे दिवे लकाकले.बरेच दिवसांनी बहुधा एखादी बरी बातमी त्याच्या कानावर पडली होती.त्या असाहाय्यतेच्या जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग जणू त्याला दिसू लागला.
दूकानदार :कोणला पाहिजे?त्यानी आधाशिपणे विचारल.
विजय त्या प्रश्नावर काहीच बोलला नाही.त्या म्हाताऱ्या दूकानदाराच्या ते लक्षात आल.
दुकानदार :हे बघा शेठ,व्यवहार जमला,तर तुमचं काय असेल ते आपण बघू ना काळजी कशाला करता.पण पार्टी कोण आहे.हे बघ मी डायरेक्ट सांगतो,मी राजेश शहा दूकानाचा ओनर.एक लाख रुपये भाडा,नी दहा लाख डेपोसिट,आणी पंचवीस लाख रुपये भरलेल्या मालाचे . ह्याच्या खाली व्यवहार शक्य होणार नाय.
विजयच्या कानात पुन्हा आवाज येऊ लागले.विजय त्याकडे दूर्लक्ष करायचा आटोकाट प्रयत्न करत होता.कामाच बोलताना मधेच कोणीतरी व्यत्यय आणल्यावर व्हावा तसा त्याचा चेहेरा त्रासिक दिसू लागला.
विजय :हे जास्त आहेत.एव्हडे जमणार नाहीत.
असुदे म्हणत विजय बाहेर पडू लागला.तो त्याच्या शरीराला तिथून बाहेर ओढायचा प्रयत्न करत होता.पण मेंदूनी आदेश देऊनही हातपाय हालायला तयार नव्हते.आपण हे सगळं का करतोय हे त्याच्या ध्यानात येत नव्हत.
एवढ्यात राजेशभाईंनी विजयचा हात धरून त्याला थांबवलं.
राजेश भाई :अरे आपण बसून बोलू,तु तुझी ऑफर बोल ना .व्यवहार म्हंटला कीं थोडा मागे पुढे करावा लागतो.राहूदे,जाऊदे ह्या शब्दांचीं व्यवहाराला ऍलर्जी असते
तु ऑफर बोल ना शेठ.पटलं तर ठीक नाहीतर सोडून द्यायचा.
विजय :पंचवीस हजार भाडं,आणी प्रॉफिट मधला 10% ही फायनल ऑफर आहे.
राजेश भाई :काय मजा करतो काय माझी.अरे भर बाजारपेठेत मोक्याच्या जागी असलं दुकान आता भेटायचं नाय.घेतलंस कीं करोडपती झालास म्हणून समज.
इतक्या वेळ पडद्यामागे असणारा,विजयच्या कानात वाजणारा तो आवाज अचानक त्याच्या ओठांवर आला.
विजय :मग तुम्ही का देताय?विजयनी म्हाताऱ्याकडे बघत प्रश्न विचारला.पहिल्यांदाच विजयची आणी म्हाताऱ्याची नजरानजर झाली.म्हातारा चपापला.विजयच्या आवाजातल मार्दव कस कुणास ठाऊक लयाला गेलं, कुठल्याश्या अनामिक भीतीनी एखाद लहान मूल लपावं तस.विजयच्या नजरेत त्याला ओळखीच्या काही खूणा सापडल्या.म्हातारा डोक्यातल्या आठवणीच्या फायली चाळण्यात मग्न झाला.पण विजयचा चेहरा कुठे सापडत नव्हता.
राजेशभाई :आपण या आधी कुठे भेटलोय काय?
विजय :मला तरी आठवत नाही.इथे रस्त्यावर तुम्ही कधी पाहिलं असेल तर कल्पना नाही.ते महत्वाचं नाही,मी तुम्हाला दिली ती शेवटची ऑफर,पटत असेल तर बोला,वर्षभरा साठी करार करू .
राजेशभाई :आजून पार्टी शी बोलून काही होत असेल तर बघा कीं शेठ,
राजेशभाई विनवणी करत म्हणाले.
विजय :पार्टी तुमच्या समोरच बसल्ये.
राजेशभाई :म्हणजे तु चालवणार दुकान.तु स्वतः?
विजय :हो मी,मीच चालवणार.आणी हो सुरवातीचे काही महीने मला तुमची साथ लागेल,हा म्हणजे तुमचे सप्लायर वगैरे त्यांच्याशी बोलायला.मी ह्या धंद्यात नवीन आहे.असही जितका नफा त्यातला 10% तुमचा.म्हणजे जेव्हढा धंदा जास्ती तेव्हढी तुमची कमाई जास्ती.तुम्ही इथे असलात कीं मग त्यावर लक्ष ठेवता येईल.म्हणजे मी तुम्हाला फसवायला नको काय.मग व्यवहार पक्का समजायचा का?
राजेशभाई :अरे भाडा खूपच कमी वाटतोय,परवडणार न्हाय मला.तु नुसतीच तुझी ऑफर सांगितली मी हो कुठे म्हटलो अजुन.तु पुढचा सगळा ठरवून मोकळा झाला.बर दुकान तूला द्यायचा आणी मी तिथे काम करायचा.राजेशभाई उपहासांनी हसले.त्या हसण्यातली बोच विजय बरोबरच आणखीही कोणालातरी टोचली.
विजय डोळे रोखून राजेशभाई कडे बघत होता.
राजेशभाई :अरे असा काय बघतो माझ्याकडे,खाऊन टाकशील का काय मला,ओळख आपली पण हाय,दादागिरी चालायची नाय.चल निघ दुकानातून.
त्या ओतप्रोत भरलेल्या रागाच्या फुग्याला जणू राजेशभाईंच्या शब्दांची टाचणी लागली. ते ऐकताच विजयच्या तोंडातून गुरगुरण्याचा आवाज यायला लागला.डोळ्यांत जाळ पेटला.त्या नजरेचा राजेशभाई ना त्रास व्हायला लागला.ती नजर म्हाताऱ्या राजेशभाई ला सहन होईना.ते असह्य होऊन,राजेशभाई वळला.
विजय :ए थेरड्या चाललास कुठे?तोंड फिरवलेल्या राजेशभाई च्या कानावर ते शब्द पडले.मगाशी विजयची नजर त्यांना ओळखीची वाटत होती.हा आवाज मात्र त्यांच्या चांगलाच परिचयाचा होता.भूतकाळातल्या कुठल्यातरी अनुभवाच मढ मनातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात जाग झालं.त्यांनां आता कुठलीच शंका उरली नाही .त्या ओळखीच्या वाटणाऱ्या नजरेचाच हा आवाज होता,.राजेशभाईंनी अवंढा गिळला,पण वळून पहायची हिम्मत होत नव्हती.
त्या अमानवी आवाजानी राजेशभाईंना आधी अर्वाच्य शिव्यांची लाखोली वाहिली,तूला दोन वर्षांपूर्वी विचारलं होत तेव्हाही नाही म्हणालास,अजुन तुझ्या अंगातली मस्ती पुरती उतरलेली दिसत नाही.बाहेर बोर्ड कशाला लावलायस रे भ..
दुकानाला लागलेल्या आगी,तुझ्या नोकरांचे पंख्याला लटकलेले मुडदे पुरेसे नाहीत?.का आता तिथे तूला झोके घ्यावेसे वाटतायत,तुझी तीही इच्छा पुरी करतो मी लवकरच .प्रेमानी सांगितलेल तुझ्या ह्या रिकाम्या डोक्यात शिरत नाही.
राजेशभाईंची पाचावर धारण बसली,ते उभ्या उभ्या थर थर कापू लागले.
विजयच्या तोंडातून अमानवी हास्याचा गडगडाट झाला,आणी तो पुन्हा राजेशभाईंवर खेकसला.
विजय :अरे कर्जात आकंठ बुडालायस,बुडत्याला काडीचा आधार असतो हा तोच समज आणी देऊन टाक दुकान.तुझंही भलं होइल,अशीही दुकानावर येणारी जप्ती आता लांब नाही.दोन वर्षांपूर्वी ऐकल असतंस तर ही वेळ आली नसती.भरभराटीच आणी प्रगतीच दार संधी आयुष्यात एकदाच उघडते ,तु नशीबवान माझ्यामुळे तूला दुसऱ्यांदा ते भाग्य मिळतंय,आणी तुझ्या चरबी आल्ये भो.....बऱ्या बोलानी हो म्हण नाहीतर तुझ्यासाठी नर्काच दार उघडायची व्यवस्था करतो.तुझ्या सारख्याला झोपवायला मला वेळ लागणार नाही.तिथे माझी ओळखही आहे.चांगली खातीरदारी करतील तुझी विजयच्या तोंडातून पुन्हा गडगडाटी हसणं बाहेर पडलं
राजेशभाईंच उरला सुरला धीर त्या दर्डावण्यानी त्यांना सोडून गेला.वळून पाहायची हिम्मत नव्हती,गोंधळलेल्या मनस्थितीत ते इकडे तिकडे पाहू लागले.समोरच्या आरशावर त्यांची नजर स्थिरावली,आरशातल ते रूप पाहताच तो साठीच्या आसपासचा गृहस्थ मुसमुसून रडू लागला.
विजय :उद्या येतो सगळं तयार ठेव.
राजेशभाई :हो...हो देतो,करतो.कायभी करतो.
राजेशभाईचं उत्तरं ऐकायला विजय तिथे थांबला नाही.तो तसाच दुकान सोडून बाहेर आला.त्याच्या कुठल्याही निर्णयावर जणू त्याच नियंत्रणच राहील नव्हत.कठपुतळीच्या बाहुलीप्रमाणे दोऱ्या जणू कोणीतरी दुसरच ओढत होत.त्या तालावर नाचण एवढंच त्याच्या हातात शिल्लक होत.आपल्या हातातली पिशवी दुकानात विसरल्याच त्याच्या ध्यानात आल.तो पुन्हा दुकानात आला.नुकत्याच बसलेल्या त्या अनपेक्षित धक्यातून सावरलेले राजेशभाई त्याला पाहताच पुन्हा थरथरू लागले,विजय च्या नजरेला नजर द्यायची त्यांची हिम्मत होत नव्हती.ते स्वतःच्या पायांकडे पहात तसेच अपराधी असल्यासारखे उभे होते.
विजय :काय झालं?बरे आहात ना?कोणाला फोन लावून बोलावू का?
विजयचा तो आवाज ऐकून राजेशभाई ताळ्यावर आले,त्यांना हायसं वाटलं .नाहीतर मगाशी त्या आवाजानी सांगितलेलं नर्काच दारंच उघडायला तो परत आल्यागत त्यांना वाटलं.अर्थात ते अनुभवत होते तेही नरकयातनापेक्षा वेगळं नसावं.
राजेशभाई :काही नाही,तु काय म्हणला ते...ते सगळ मला मंजूर आहे.पंचवीस हजार भाडा आणी 10%.
विजय :अहो मला आठवतंय,तुम्ही मगाशी परवडणार नाही म्हणाला,आता हो म्हणताय,तुम्हाला घाम आलाय,कापर भरलय.बरे आहात ना?दुकान तुमचं आहे.नीट विचार करा.मी माझी पिशवी राहिली तेव्हडीच परत घ्यायला आलो.
राजेशभाई :एकदम पक्का विचार झालाय,तु घे दुकान चालवायला.असाभी मी आता म्हातारा झालोय,आमच्या पोरांना काय धंद्यात इंटरेस्ट नाय.तुला हाय तर तु कर,मी गाईड करणार तूला,शपथ सांगतो.रोज दुकानात येणार.
विजयला ह्या राजेशभाई चा नकार होकारात कसा बदलला ते कळत नव्हत.विजयच्या तोंडातून राजेशभाईंवर कोणीतरी चालवलेले शब्दांचे चाबुक विजयच्या लक्षात नव्हते. तर त्या फटक्याची वेदना राजेशभाईंना विसरता येत नव्हती .
विजय :मग भाडे करार कधी करूया?
राजेशभाई :अरे माझा तुझ्यावर फुल भरोसा हाय फुल ,करार बिरार होतच राहतात तु आधी दुकानात ये,सगळा समजून घे.
मग वाटलं तर सगळं दुकानच विकत घे तु काय.
राजेशभाईंच्या चेहेऱ्यावरची भीती विजयला स्पष्ट वाचता येत होती.पण त्याच कारण कळत नव्हत.त्या भीती चा संबंध आपल्या दुकानातल्या उपस्थितीशी आहे एवढं मात्र त्याच्या ध्यानात आल.राजेशभाई जणू विजय तिथून बाहेर पडायचीच वाट पहात होते.
ठीक आहे,उद्या येतो मी,काळजी घ्या म्हणून विजय बाहेर पडला.एखाद दुकान चालवायला घेणं इतकं सोपं असू शकत,तेही आपल्याला हव्या त्या अटी शर्तीवर याचच त्याला नवल वाटत होत.
बाजार आटपून विजय शरद च्या घराकडे वळला.त्याची गाडी तिथे होती,आणी ही नवी बातमीही शरदला द्यायची होती.विजय पुन्हा रस्ता तुडवत शरदच्या घरापाशी आला.त्यानी शरदला हाक मारली,शरद त्याच्या गाडीची चावी घेऊन घराखाली आला.
आज विजयचा चेहेरा बरेच दिवसांनी बराच बरा दिसत होता.
विजय :नशीब तु घरी भेटलास?मी म्हटलं असशील कीं नाही कुणास ठाऊक.
शरद :वा हे बर आहे.अरे कितीदा फोन लावला तूला पण लागतंच नाहीये.आत्ता तुझ्याकडेच यायला निघणार होतो.अरे म्हंटलं फोन का लागतं नाही.?
विजय :चला माझी जगात कोणालातरी काळजी आहे.हेही नसे थोडके.अरे सकाळी बाजारात जायला म्हणून घाईत निघालो मोबाईल बरोबर घ्यायचाच राहीला,दूध आणी इतर वाणसामान आणायचं होत.ते घेतलच पण येता येता अनपेक्षित पणे आणखी एक खरेदी झाली,लॉटरी लागली म्हटलीस तरी चालेल, एक दुकान चालवायला घेतलं कपड्यांचं.
शरद ला एकदम गोंधळल्या सारखं झालं.
शरद :अरे कपड्याच्या दुकानात नोकरी करण्यापेक्षा किरवंती काय वाईट आहे.तु तुझा खुदमुखत्यार तरी राहशील.
विजय :नाही नाही,तुला जरा करेक्ट करतो.मी दुकानात नोकरी करणार नाहीये.मी स्वतः ते चालवणारे,माझी खुदमुखत्यारी तशीच अभंग राहणार.
शरद :काय?अरे पण त्या छोट्या खोकयांवर कपडे विकून तु काय मिळवणार?हे असलं काहीतरी करायच्या आधी कोणाचातरी सल्ला घेतलास का?अनोळखी पाण्यात असं उतरू नये म्हणतात रे,बुडायची भीती असते.
विजय :परत तूला करेक्ट करतो,मी कपड्यांचा खोका नाही दुकान म्हणालो शाह होसीएरी,जय भारत नाक्यावरच.आणी सल्ल्याच म्हणशील तर तो देणार कोण,आणी दिलाच तर तो असुया,मत्सर ह्यात बरबटलेला नसेल ह्याची खात्री काय? आयुष्यात आपलें मार्ग आपणच शोधावे लागतात.अनोळखी असलं तरी पाण्यात उतरल्याशिवाय खोलीचा अंदाज येत नाही,आणी पाण्याचाही.त्यामुळे त्याची फळ भोगणार मीच बुडलो तरी आणी तरलो तरी.असही मी असलो किंवा नसलो तरी त्यानी कोणाला काहीच फरक पडणार नाही.
अचानक बोलता बोलता विजय थांबला.
विजय :मला तर अग्नी देणाराही कोणी नाही.माझं एक काम करशील,तूला विचारण देखील तस चुकीचं आहे.तरीही विचारतो.मी मरीन त्यावेळी मला काडी लावायचं काम तु कर.चालेल ना?आयुष्य सगळं बेवारशी चाललंय,गेलाबाजार मरणाला तरी वारस असावा एवढी आपली इच्छा.नाहीतर नगरपालिका आहेच.
शरद :मी जिवंत असेपर्यंत मला संधी मिळेलस वाटत नाही.पण ठीक आहे,माझ्या हातून राख होऊन तूला मोक्षप्राप्ती होइल असं वाटत असेल तर तुझं अज्ञानातलं सुख तूला लखलाभ .ते असो मी नकारात्मक बोलतोय,किंवा असुयेनी,मत्सरांनी बोलतोय असं समजू नको.पण शाह होसीएरी बद्दल तु ऐकलेल आहेस ना?मोक्याच्या जागी असूनही गेले आठ महीने ती जागा भाड्यानी गेलेली नाही.किंवा बाजारात कोणीही तीला हात लावलेला नाही.तीचा इतिहास फार चांगला नाही म्हणजे काही आत्महत्या,लागलेल्या आगी वगैरे वगैरे .
विजय :मला त्याच्यात इंटरेस्ट ही नाही.आता कुठलीही जागा घेतलीस तरी तिथं कोणाचातरी कधीतरी शेवट झालेला असणारच.भूतकाळ विसरून आता फक्त्त भविष्याची स्वप्न पाहायची आणी प्रत्यक्षात आणायची हे ठरवलंय मी .तु काळजी करू नकोस असं म्हणत विजयनी शरद च्या हातातली चावी घेतली आणी गाडीला किक मारून दिसेनासा झाला.
कालपर्यंत अंधारात चाचपडणारा,आशेच्या एखाद्या कवडश्याला मोताद झालेला विजय आज स्वतःच आशेचा सूर्य होऊ पहात होता.त्याच्यात झालेला हा बदल अविश्वसनीय होता.त्याला निराशेच्या काळ्या डोहातून बाहेर काढणारा हा मनोचिकित्सक कोण ह्याचा विचार करत शरद मागे वळून घराच्या पायऱ्या चढू लागला.
दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून विजय दुकानात पोचला,बरोबर आणलेले पंचवीस हजार रुपये त्यानी राजेशभाई च्या हातावर ठेवले.राजेशभाईंनी त्याला दिवसभरात मालाचे सप्लायर आणी धंद्यातल्या इतर खाचा खोचा जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सांगितल्या.
रात्र झाली तरी अजूनही कोणी गिर्हाईक तिथे फिरकलं नव्हत.दुकान बंद करायच्या वेळेला विजय नी बाहेर लावलेली सेल चीं पाटी फेकून दिली.ते पाहून राजेशभाई त्याला म्हणाले.
राजेशभाई :सुरुवातीला काही दिवस तरी सेल चालू ठेवावा असं मला वाटते.
विजय :उद्यापासून गरज पडणार नाही.
एवढंच तुटक बोलून,राजेशभाईंकडे वळून न पाहताच विजय चालू लागला.काहीतरी अघटित घडणार एवढीच कल्पना राजेशभाईंना आली.
विजय चाळीचा जिना चढून वर आला,बरोबर आणलेला वडापाव पोटात ढकलला,आज त्याच्या मेंदूला विलक्षण क्षीण आला होता.तो पडल्या पडल्या झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी त्याला दुकानात जायला उशीर झाला.दुकानात तोबा गर्दी उसळली होती.राजेशभाईंनी स्वतःच्या बायकोला आणी मुलाला मदतीला बोलावून घेतलं होत.त्या गर्दीतूनच विजय नी राजेशभाईंना हात केला.
राजेशभाई :अरे एवढा लेट काय म्हणून आला?जाऊदे काउंटर वर बस.
विजय :एवढी गर्दी कशी काय?
राजेशभाई :नंतर सांगतो एवढंच राजेशभाई म्हंटले.
रात्री दुकान बंद होईपर्यंत विजय काउंटर वरच बसून होता.सगळ्या दिवसाचा धंदा लाखाच्या वर झाला होता.
राजेशभाई :आज माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एका दिवसांत एव्हडा बिझनेस झाला.?
विजयनी प्रश्नार्थक नजरेनी राजेशभाईंकडे पाहिलं.
राजेशभाई :काल रात्री मुन्नाशेठच्या दुकानाला आग लागली शॉर्टसर्किट नी.वस्तीला असलेले तीन नोकर जिवंत जळाले.ही तिथलीच गर्दी.
विजय :असो जगात प्रत्येक क्षणी काहीनाकाही अपघात होतच असतात.त्या सगळ्यात भावनिक गुंतवणूक करायला लागलो तर आपल्यावर बुडायची वेळ येईल .आपल्या धंद्याची सुरुवात चांगली झाली हे महत्वाचं,अहो प्रॉफिट मधला 10% तुमचा आहे.आहात कुठे.
राजेशभाई :तूला एक बोलू काय?मला हा पैसा नको.तु मला माझा भाडा आणी मालाचे पैसे दे,वर तूला वाटतील तेव्हढे इथे कामाचे पैसे दे.पण ह्या प्रॉफिट चा पैसा माझ्या घरात नको.
विजय :अहो पण का?काय संन्यास घ्यायचा विचार आहे काय?
राजेशभाई :बास झालं काम आता,रिटायर होतो.तूला माझी गरज अजुन किती दिवस लागेल?तेव्हडे दिवस मी येतो,नंतर तु हा सगळा दुकानच विकत घे माझ्याकडून.म्हणजे तु मोकळा आणी मीही.
विजय आणी राजेशभाईंनी दुकान बंद केल.रस्त्यावरून जाताना मुन्नाशेठच्या जळलेल्या काळ्या दुकानाकडे विजयनी एक कटाक्ष टाकला.ध्यानी मनी नसताना एखाद्या बहरलेल्या वृक्षाला दामिनीनी ध्वस्त करावं तसं ते दुकान वाटत होत.विजयनी घरची वाट धरली.
बघता बघता दोन वर्ष काळाच्या पुलाखालून वाहून गेली .नशिबानी कूस बदलली,बाजारात जळलेल्या मुन्नाशेठच्या दुकानाच्या कलेवरात विजयनी प्राण फुंकले.एक हॉटेल देखील चालवायला घेतलं.चाळीतल खुराड सोडून तो एका फर्निश फ्लॅट मधे राहीला आला.विजयनी डोळे मिटून केलेल एखाद शरसंधान ही यशाचा लक्ष्यभेद करत होत.विजयच्या यशाची चर्चा गावातल्या नाक्या नाक्यावर कानी पडू लागली.त्याला बघून नाक मुरडणारे,त्याला टाळणारे देखील त्याच्याशी दोन शब्द बोलायला मिळावेत म्हणून धडपडू लागले.
शरद आपल्या पौरोहित्यात समाधानी होता.तसंही घरची श्रीमंती असल्यामुळे त्याला फार काही करायची गरज पडत नव्हती.जे मागच्या पिढ्यानी साठवल त्यात फारसा क्षय होऊ न देता ते पुढल्या पिढीकडे सोपवायचं हे इति कर्तव्य मानून तो आयुष्य कंठत होता.प्रणव आता चांगला तीन वर्षाचा झाला,कुठल्याश्या इंग्लिश प्लेस्कूल मधेही जात होता.त्याची आणी विजयची चांगली गट्टी होती.विजयमामा त्याला चॉकलेट,खेळणी असलं बरच सामान न मागता आणून देत असे.संसार तरुवर राकेश नावाचं नवं शेंडेफळ आलं,शरदच चौकोनी कुटुंब पूर्ण झालं.राकेशही सहा एक महिन्यांचा झाला होता.विजयला राकेशनी चांगलाच लळा लावला,ते बहुतेक वेळा रोजच भेटत असत,कधी विजयच्या च्या घरी तर कधी शरद त्याला घेऊन दुकानात येत असे.शरद नी काही दिवसांपासून विजयच्या मागे लग्नासाठी भुण भुण लावली होती,त्याच्या बायकोच्या नात्यातली एक दोन स्थळही आणली होती.पण दर वेळेला लग्नाचा विषय निघाला कीं विजय 'माझं एक कर्ज फेडायचं राहिलय तेव्हढं झालं कीं तु म्हणशील त्या मुलीशीच काय मुलाशीही लग्न करायला मी तयार आहे म्हणून दर वेळेला विषय टाळत असे .लक्ष्मी घरी पाणी भरत असूनही याच्या डोक्यावर एव्हढं कुठलं कर्ज आहे,ज्यामुळे हा गृहलक्ष्मी तूर्तास नको म्हणतोय हे शरदला कळत नसे.असही त्याच्या माहितीप्रमाणे विजय कर्जमुक्त होता.
राजेशभाई अजूनही दुकानाच्या भाड्याचे पंचवीस हजार रुपये घेत होते,प्रॉफीट मधला एकही पैसा त्यानी दोन वर्षात घेतला नाही.विजयनी बाजारभावानी सगळ दुकानच आपल्याकडून विकत घ्यावं असं ते विजयला नेहमी सांगत.पण विजयला राजेशभाई आपल्या यशोमहालाची चावी वाटत,त्यांच्याशिवाय तो या दोन्ही दुकानांची कल्पनाचं करू शकत नव्हता.प्रॉफिट मधला नसला तरी विजय त्यांना दरमहा बऱ्यापैकी पगार द्यायचा आणी त्यांचा मान ठेवायचा,दुकानात आता बरीच नोकरमंडळी होती.पण राजेशभाई उभे असले तर तो कधीही स्वतः खुर्चीत बसायचा नाही.आजही तो दुकानात असला तरी गल्ल्यावर आग्रहानी राजेशभाईंनाच बसवायचा.त्यांना झालेलं सगळं कर्जही त्यानी फेडून टाकल होत.ते त्याच्या ह्या उपकारांच्या ओझ्याखाली होतेच,पण गेल्या दोन वर्षात सहवासानी त्यांचं विजय बद्दल चांगलं मत झालं होत.गेल्या दोन वर्षात विजयच्या नजरेत आणी वाणीत त्यांना कधीही आरंशात पाहिलेल्या त्या व्यक्तीचं दर्शन झालं नव्हत .विजयला न सोडण्यात कदाचित ही भीतीही होती .,न जाणो त्याला सोडायच्या केवळ बातमीनी ते निद्रिस्त रूप पुन्हा अस्तित्व दाखवायचं.ज्याच्या पासून सुटका करून घ्यायच्ये तेच भूत मानगुटीवर बसायच.
विजय मुळे राजेशभाई आणी शरद ची देखील चांगली ओळख झाली होती.काम नसल कीं शरद वेळ घालवायला दुकानात येत असे.विजय नसला,तरी राजेशभाई कमालीचे बोलघेवडे होते.त्यांना विषयाची टंचाई कधीच पडत नसे,मोटेनी पाणी उपसाव तसें विषय एकामागून एक त्यांच्या डोक्यातून बाहेर पडत.एक दिवस विजय आजूबाजूला नाही पाहून ते शरद ला म्हणाले,
राजेशभाई :शरद भाऊ एक वार्ता केली तर तूला राग तर नाय न येणार,नाही म्हणजे तर बोलतो.तुझ्या दोस्ता संदर्भात हाय म्हणून म्हंटला.
शरद :वा आता तुम्ही हे सांगितल्यावर मी नाही म्हणीन का?
राजेशभाई :नाही म्हणजे तुम्ही या छोट्याना जरा विजय पासून दूर ठेवा असा मला वाटते.का? कशाला?काय झालं? हे सवाल मला तुमच्या चेहऱ्यावर दिसतायत पण त्याचा जवाब माझ्याकडे नाय.आपला म्हाताऱ्या चा सल्ला त्यात काय पण नसेल.पण उगाच वाटलं म्हणून बोल्लो.सोडून दे.
त्यांचं बोलणं सुरु असतानाच मग विजय आल्याने ते बोलणं तिथेच थांबलं आणी शरदच्या विस्मृतीत गेलं.
विजयनी शहरापासून जवळच एक जमीन विकत घेतली,तिथे एक मोठा गृहनिर्माण प्रकल्प उभारायचा त्याच्या मनात होत.सगळ्या कायदेशीर कावळ्यांना पिंडदान करून त्यानी प्रकल्प पुढल्या प्रवासाला लावला . तो घरी आला तेव्हा बऱ्यापैकी उशीर झाला होता.अंघोळ पांघोळ झाल्यावर घरी कामाला असलेल्या मावशीनी करून ठेवलेलं जेवण त्यानी गरम करून खाल्लं.आणी बिछान्यावर आडवा झाला.दिवसभराच्या कष्टानी शरीर थकल होत,पण झोपेचा पत्ता नव्हता.अस्वस्थपणे तो फक्त्त कूस बदलत होता.ह्या खेळात दोन एक तास गेले,खोलीतल्या एसी चा आवाज फक्त्त येत होता.तो वैतागून उठला,बेसिनशी जाऊन तोंडावर पाण्याचे फटकारे मारले,टॉवेलनी तोंड पुसल.त्याला घरात त्याच्या शिवाय कोणाच्यातरी अस्तित्वाची जाणीव होत होती.चार खोल्यांच्या त्या प्रशस्त घरात फक्त मंद लाईट चालू होते बाकी सगळा अंधार होता.तो पुन्हा त्याच्या खोलीकडे वळला,त्यानी अंथरुणावर अंग टाकल.तो एसी चा होणारा आवाज त्याच्या कानाला बोचत होता,त्याच्या कानोसा घ्यायच्या प्रयत्नात तो आवाज व्यत्यय आणत होता.त्यानी टेबलावर पडलेल्या रिमोट नी त्या एसी चा आवाज बंद केला.सगळीकडे एकदम शांतता पसरली,ती शांतता खरी आवाजापेक्षाही अधिक बोचरी होती.एखाद्या मारेकऱ्यांनी थंड डोक्यानी तोंड दाबून जिवंतपणीच शरीराचे तुकडे पाडावेत,तसंच ही शांतता विजयच् काळीज चिरत होती.ते असह्य होऊन विजयनी पांघरूणात तोंड लपवलं.तो इतका वेळ ऐकू पाहणारा आवाज शेवटी त्याच्या कानी पडला.तो आवाज त्याच्या कानात गरम तेल ओतल्यासारखा जात होता.आधी पुसटसा येणारा आवाज हळू हळू स्पष्ट होऊ लागला,तो आवाज जवळ येत असल्याची उकल मेंदूनी केली,अखेर तो पावलांचा आवाज थांबला.विजय घामानी ओला झाला,त्या पांघरूणात त्याला गुदमरल्यागत होत होत.पण पांघरून दूर करायची हिम्मत होत नव्हती.इतक्यात दार हलल्याचा दुसरा आवाज कानावर पडला,आणी पुन्हा पहिल्यासारखी शांतता पसरली.सुतळी बॉम्ब चीं वात एखाद्यानी पेटवावी आणी कानावर हात ठेवून तो फुटायची वाट पाहावी पण बऱ्याच प्रतीक्षेनंतरही तो न फुटल्याने कानावरचे हात काढावेत आणी बॉम्ब फुटावा तसा विजय डोक्यावरून पांघरून घेऊन काहीतरी घडायची वाट पहात होता.पण बराच वेळ काहीच न झाल्याने त्यानी शेवटी कूस बदलली,फक्त्त डोळा उघडा होइल एवढंच पांघरून वर उचलल,किंचित उघड्या दारातून बाहेर लावलेल्या झिरो च्या बल्ब चीं तिरिप खोलीत डोकावत होती बाकी दारापाशी कोणीच नव्हत.ते पाहून त्याचा धीर चेपला,त्यानी पांघरून बाजूला केल,आणी त्याच्या पायगती उभ्या असलेल्या त्या लाल डोळ्यांशी त्याची नजरानजर झाली.अंधारात त्याला फक्त्त त्याचे लाल डोळेच दिसत होते.गुरगुरण्याचा आवाज यायला लागला,त्यापाठोपाठ शब्दही आले.
काय विसरलास कीं काय?विसरणारच म्हणा ,दोन वर्षात बरीच प्रगती केल्येस.पैसा भरून सांडतोय.पण हे सगळं तुझ्या पायाशी आणून ओतणारा मी आहे हे लक्षात ठेव.
विजय :न...न नाही,बरेच वर्षात दिसला नाहीस ,म्हणून.
तो :रोज भेटायची इच्छा आहे का?तीही पूर्ण करतो.
हे असल रोज अनुभवायच या विचारांनी विजयच्या अंगावर सरसरून काटा आला.
विजय :नाही म्हणून मला वाटलं.
तो :मी विसरलो,तुझ्या बरोबर केले तसें करार माझे अनेक जणांशी असतात.त्यांच्याकडून किंमत घ्यायची असते.
विजय ला त्याच्याशी फार बोलण्यात रस नव्हता,काय ती किंमत देऊन त्याला वाटेला लावावा या हेतूनी तो म्हणाला.
विजय :बोल ना काय पाहिजे,पैसा-अडका ,सोन-नाणं?
ते ऐकून ती आकृती विचित्र हसली.आणी म्हणाली
तो :म्हणजे जे मी तूला दिल,तेच तु मला परत देणार.हा कुठला व्यवहार?मला जे हवय ते वेगळं आहे?
विजय :तु फक्त्त बोल काय पाहिजे.?
त्यानंतर विजयच्या कानावर जे शब्द पडले त्यावर त्याचा विश्वास बसेना.त्या दोन चार शब्दांची वाळवी त्याचा मेंदू पोखरत होती.तो विचारांच्या वावटळीत कुठेतरी हरवला.
तो :मग कधी देणार माझी किंमत ?
त्या प्रश्नानी तो भानावर आला.
विजय :तु मागितलेली किंमत मला देता येईल असं वाटत नाही.तु दुसरं काहीही माग पण हे शक्य होणार नाही.त्या आकृतीकडे न पाहताच विजय म्हणाला तो अजूनही बिछान्यावर तसाच बसून होता.त्याच्या डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच ती आकृती विजयच्या पुढ्यात येऊन उभी राहिली,तीच गुरगुरण वाढल,ते गुरगुरण नेहमीपेक्षा वेगळं होत,त्यातला रागाचा आणी नापसंतीचा सूर विजयनी ओळखला.तो काहीच बोलत नव्हता.ते पाहून त्या आकृतीच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या शब्दांचे घण विजयच्या आत्मविश्वासाच्या ठीकऱ्या उडवू लागले.
तो :कराराची माझी बाजू मी पूर्ण केली,आता तुझी वेळ आल्यावर पळायला बघतोस .त्या मुन्ना नी हेच केल,सुरवातीची किंमत मोजली त्यांनी,आणी बरच काही मिळवल.पण त्याच्याजवळच जे हव होत ते तो देऊ शकला नाही.तीच खरी परीक्षा,त्यात नापास झाला आणी मग पळाला घाबरट.हा व्यापार आहे आणी व्यापारात नाती आणायची नसतात एवढं साधं सूत्र समजू शकला नाही.माझी इतक्या वर्षाची गुंतवणूक वाया गेली.हाता तोंडाशी आलेला घास गेला.आता काय राहिलंय त्याच,जिथून प्रवास सुरु झाला होता तिथेच येऊन संपणार.दुकान जळालं,नानाविध चौकश्या मागे लागल्यात.लक्षात ठेव मी जर काही देऊ शकतो तर नेऊ ही शकतो.सुखान्त म्हणतात मला,किंमत मी वसूल करणारच या नाहीतर त्या मार्गानी,तु तुझ्या मार्जिनी दिलीस तर ठीक नाहीतर मी माझ्या पद्धतीनी घेईन .मी काय करू शकतो ते तु पाहिलंस आहेस.अरे ही एवढी किंमत मोजायला काय हरकत आहे,नफया तोट्याच्या तागड्यात घातलंस तर नफ्याच पारड कितीतरी जड आहे.दोन दुकान,हॉटेल.तुझ्या डोक्यातला गृहनिर्माण प्रकल्प आणी उज्ज्वल भविष्य या सगळ्यावर पाणी सोडून पुन्हा ते भिकाऱ्याच आयुष्य जगायचीं तुझी तयारी आहे,आणी मी जे काही करीन त्यानी तु पुन्हा समाजात तोंड दाखवयाच्या लायकीचा राहणार नाहीस .लोक तुझ्या सावलीलाही उभ राहायची नाहीत.त्यापेक्षा मी मागितलेली किंमत बऱ्या बोलानी चुकती कर आणी ह्या सगळ्याचा उपभोग घे.तुम्हा लोकांना सगळं फुकटात का हव असतं?स्वप्न आभाळाला गवसणी घालायची ,पण त्यासाठी बर वाईट जे करायला पाहिजे ते करायची मात्र तयारी नाही.अर्थात ज्याचा उपभोग घेशील त्याची त्याची किंमतही मोजत राहावी लागणार.तूला काय वाटतंय तु हे जे काही वैभव अनुभवतोयस ते तुझ्या घामाचं,कष्टाचं आहे.नाही रे नाही तुझ्या प्रत्येक यशाच्या इमल्याखाली रक्ताचा चिखल आहे.मग मी मागतोय ती किंमत द्यायला कचरतोयस कशाला?नीट विचार कर,फक्त्त माझ्या उपस्थितीनी तुझी भीतीनी गाळण उडते,माझ्या काळ्या जगातली आणखी काही जण दर मिनिटा मिनिटाला तुझ्याकडे यायला लागली तर तुझं काय होइल.ती वेळ येऊ द्यायची कीं नाही सर्वस्वी तु ठरवायचस.
विजय :पण मी हे कस करायचं?
तो :अरे असं काहीतरी बोल,मी आहे ना,दोन दिवसांत तशी संधी तूला मिळेल.तु चवथ्या मजल्यावर राहतोस.आणी अपघात काय कसेही होतात,आल ना लक्षात.मला सगळंच सांगायची गरज नाही,तु तसा समजदार आहेस.ती आकृती गडगडाटी हसली
आणी पुन्हा त्या काळोखात बेमालुमपणे विरघळली.
त्या सैतानी हास्याची विजयला अतोनात चीड आली.पण त्याला काहीच करता येण्यासारखं नव्हत.तूर्तास त्यानी विजयकडे जी किंमत मागितली होती,त्यासंधर्भात काहीतरी करण आवश्यक होत.विजयनी पांघरून बाजूला केल,तो खोलीतच येरझारा घालू लागला.त्यानी मागितलेली किंमत मोजणं अशक्य होत.त्यातून बाहेर पडायचा मार्ग तो शोधत होता.त्या येरझाऱ्यांमध्येच रात्र सरली.विजय आवरून घराबाहेर पडला.जाताना त्याची नजर खाटीक खान्याबाहेर बांधलेल्या एकांड्या बोकडावर पडली.त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या अनेक साथीदारांची केलेवर टांगलेली होती.तिथून पळून जाण शक्य नव्हत.खाटीक तिथल्या दगडावर सुरीला धार काढत होता.तो बोकड शांतपणे आपल्यावर गुदरणाऱ्या प्रसंगाची वाट पहात जणू उभा होता.विजयला त्याच्या आणी बोकडाच्या परिस्थितीत कमालीच साधर्म्य आढळून आल.दुर्दैवाशी लढणं शक्य नव्हत,त्यामुळे त्याच्याशी तह करण्यात शहाणपण होत.कदाचित तो मागतोय ती किंमत मोजून आजच मरण उद्यावर ढकलता आल असत.पण सूरी आज ना उद्या गळ्यावरून फिरणार इतक निश्चित होत.ते दृश्य पाहून विजयनी मनाशी काहीतरी ठरवलं.तो दुकानात आला,त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग भरून आले होते,रात्रभर जागरणामुळे चेहेरा ओढल्या ओढल्यासारखा दिसत होता.त्याला इतक्या लवकर दुकानात पाहून राजेशभाईंना नवल वाटलं.
राजेशभाई :काय शेठ,तब्येत बरी हाय ना?रात्री झोपलेला दिसत नाय तु.
विजय :हो जरा जागरणच झालं.
राजेशभाई :तूला बाकी कसला नाय एकटेपणाचा त्रास लय होतोय,त्याचा इलाज डॉक्टरकडे भेटणार नाही.त्यासाठी तूला साथीदार पाहिजे आयुष्य शेअर करायला.अरे घरी वाट बघायला कोण नसेल तर घरी जावासा वाटेल काय?बेटा लग्न करून टाक,माझा ऐक.
विजयनी राजेशभाईचं बोलणं ऐकलं,तो त्यावर काहीच बोलला नाही.दुकानातला बाकीचा सेवकवर्ग अजुन आला नव्हता.विजयनी राजेशभाईंकडे बघितलं आणी विचारलं
विजय :तुम्हाला एक विचारू,हो पण मला खरं उत्तरं हवय.
राजेशभाई :अरे मग मी तुझ्याशी काय खोटा बोलतो काय?विचार कायपण.
विजय :दोन वर्षांपूर्वी तुम्ही मला तुमचं दुकान चालवायला दिल,अगदी कमी किमतीत,कुठलही डेपोसिट न घेता?मला जे आपल झालेलं बोलणं आठवतंय त्यात तुम्ही मला दुकानातन चालू पड म्हणून म्हंटला होतात .मग मी माझी विसरलेली पिशवी घ्यायला परत आलो तेव्हा तुम्ही सगळ्या अटी शर्ती मान्य केल्यात,तुमची माझी ओळख नव्हती,माझं नाव गावही तुम्हाला माहित नव्हत.मग हे हृदय परिवर्तन कशामुळे झालं.?
इच्छा नसतानाही विजयचे शब्द राजेशभाईंना पुन्हा फरफटत दोन वर्ष मागे घेऊन गेले.त्या प्रसंगाच्या भरलेल्या जखमा पुन्हा ओल्या झाल्या,राजेशभाई कावरे बावरे,घामाघूम झाले.
विजय राजेशभाईंजवळ आला.त्याने राजेशभाईंच्या खांद्यावर हात ठेवला.
विजय :तुमचं उत्तरं तुमच्या चेहऱ्यावर लिहिलंय,बोलायची गरज नाही.तुम्ही धंद्यातल्या प्रॉफिटचे 10%घ्यायला नकार का देत होतात त्याचही उत्तरं मला मिळालं,तुमच्याबद्दलचा आदर आणखी वाढला.तुमचं हे दुकान तुम्हाला ठेवून घ्या,तुमच्या इतके वर्षाच्या घामाची किंमत मोजून दुकान विकत घेणं मला शक्य नाही.मी येतो.
राजेशभाईंना अवघडल्या सारखं झालं.
राजेशभाई :तु कुठे निघालास.?
विजय :जरा वकिलांना भेटून येतो.काही काम मार्गी लावायच्येत.
राजेशभाई :मी दोन वर्षांपूर्वी तूला दुकान का दिल ते तूला कळलंय,पण तो निर्णय योग्य होता एवढंच आज तूला सांगतो.दुकान अजूनही तुझाच आहे.
विजय राजेशभाईंकडे पाहून फक्त्त हसला आणी वकिलांकडे जायला निघाला.वकिलांकडंच काम आटपून विजय घरी पोचला तो वर बरीच रात्र झाली होती.सकाळी गडबडीत मोबाईल घरी राहीला होता.त्यावर बरेच कॉल येऊन गेले होते.शरदचे देखील काही कॉल आले होते.पण उशीर झाल्याने विजयनी आता फोन करायचं टाळलं.किचन मधे जाऊन त्यानी जेवण उरकलं.आणी त्याच्या खोलीत अंथरुणावर बसला,जवळच पडलेली डायरी उचलली आणी तारीख घालून लिहायला सुरुवात केली.काही वेळानी त्याच्या कानावर परिचयाचे पावलांचे आवाज पडले.त्यानी डायरी बाजूला ठेवली.त्या लाल डोळ्यांची आकृती आज पुन्हा समोर उभी होती.पण आज विजय नी मनाची तयारी केली होती.तो घाबरला नाही,कीं आज त्याला घामही फुटला नाही.
तो :माझी किंमत?
विजय :वेळ आली कीं मी चुकती करीन.
तो :वा वा वा,योग्य निर्णय घेतलासच शेवटी.अरे माणसानी आपल्या फायद्याचं बघावं बाकी सगळं गेलं चुलीत.मी तुझ्यासाठी सगळी व्यवस्था करून आलोय.उद्या भेटू.माझी किंमत मला मिळाली कीं पुन्हा काही वर्षांसाठी तु मोकळा विजयनी नुसतीच मान हलवली.तेव्हढं बोलून ती आकृती पुन्हा त्या काळोखात एकरूप झाली.विजयनी आपली डायरी पुन्हा उचलली लिखाण पूर्ण केल आणी डायरी बंद करून पुन्हा झोपी गेला.
विजय सकाळी लवकर उठला त्यानी अंघोळ करून पूजा केली.आज किती दिवसानी पूजा केली हे त्याचच त्याला आठवत नव्हत आज अचानक पूजा का करावीशी वाटली?याचही उत्तरं त्याच्यापाशी नव्हत .पण त्याला प्रसन्न वाटत होत.चित्त स्थिर होत त्यानी सकाळचा नाश्ता केला.सकाळचे दहा वाजून गेले पण आज त्याला कसलीही घाई नव्हती .बाहेरच्या सोफ्यावर पडलेल्या त्याच्या मोबाईल नी त्याला हाक दिली.शरद च नाव पाहून त्याने फोन उचलला तो फक्त्त अरे बापरे इतकंच म्हंटला.त्यानी पटापट कपडे चढवले आणी घाईघाईत हॉस्पिटल मधे पोहोचला,शरदच्या वडिलांना हृदयाविकाराचा झटका आला होता.त्यांना अतिदक्षता विभागात भरती केल होत.त्यांच्या भोंवती असंख्य यंत्र सामग्री आणी डॉक्टर कोंडाळ करून उभे होते,यमानी फेकलेला पाश त्यांच्यापर्यंत पोहोचू नये या प्रयत्नात.काचेच्या बाहेर उभ राहून शरद हे सगळं पहात होता.शरदच्या आईनी लहानग्या प्रणव ला आपल्या मांडीवर झोपवल होत.वास्तविक शरद चे वडील अतिशय शिस्तबद्ध आयुष्य जगत होते,व्यायाम,आहार सगळ्याचं बाबतीत ते स्वतःची काळजी घेऊन होते.त्यांना हॉस्पिटल मधे आणावं लागण शरद च्या कुटुंबियांसाठी अनाकलनीय होत.विजय ला पाहताच शरद पुढे आला.
शरद :अरे सकाळी फिरून आले तोवर ठणठणीत होते,सकाळी नाश्ता केला,गच्चीवर काही आणायला म्हणून गेले,आणी एकदम ओरडले.जाऊन पाहतो तर तिथेच पडलेले होते.
विजय :तु आणी आईंनी काही खाल्लंय का?तशीही जेवायची वेळ झाल्ये.मी थांबतो तुम्ही जेवून या.
शरद :नको रे राहूदे,ताई आत्ताच घरी पोहोचल्ये,ती संध्याकाळी येणार आहे तोवर मी थांबतो.बाबांची स्थिती जरा नाजूक आहे म्हंटल्यावर आई ही यायची नाही.तु प्रणव ला घरी सोडशील का?अरे काल रात्रीपासून राकेशला आणी बायकोला दोघांनाही ताप आलाय.म्हणून त्यांना एकाच खोलीत ठेवलय,नाईलाजानी प्रणव ला इथे आणायला लागलं.काय करणार.
विजय ते ऐकल्यावर जरा अस्वस्थ झाला.त्याला काय कराव सुचेना.त्याची ती अवस्था पाहून शरदला आश्चर्य वाटलं.
शरद :नाही म्हणजे तूला कुठे काम असेल तर राहू देत मी माझ्याबरोबरच नेईन.तशी गरज नाही.
त्या टोकदार शब्दांची बोच विजयला जाणवली.तेवढ्यात प्रणव उठून येऊन विजयला बिलगला.आज बऱ्याच दिवसांनी तो आपल्या लाडक्या मामाला पहात होता.
विजय :तस नाही रे,प्रणव माझ्या कुठल्याही कामापेक्षाचं काय प्राणापेक्षाही मोलाचा आहे.?त्याला मी कधीच सोडलंय .तुझ्या उपकारांची परतफेड ह्या जन्मी शक्य होणार नाही असं मला नेहेमी वाटायचं.पण ती मी करणार.
शरद ला त्याच बोलणं उमंगल नाही.शरद त्या बोलण्यातल्या अर्थाची उकल करण्यात व्यस्त असतानाच विजय प्रणव ला कडेवर घेत म्हणाला,चल बाबांना बाय कर,प्रणव नी हसत बाबांना बाय केल.
विजय :तु दिलेले वचन लक्षात आहे न,काडी लावायचं,हो पण त्याआधी माझी डायरी अवश्य वाच.चल येतो.म्हणून विजय चालू लागला.त्याच बोलणं शरदच्या डोक्यावरून गेलं माझी डायरी वाच म्हणजे काय.?
विजय आपल्या गाडीजवळ आला.त्यानी प्रणव ला पुढल्या सीटवर बसवलं,बेल्ट लावला.आपण स्वतः ड्राइवर सीट वर येऊन बसला आणी गाडी सुरु केली.गाडी सुरु होताच त्याच्या कानात पुन्हा तोच आवाज वाजू लागला.आपल्या योजनेबरहुकूम पहिला टप्पा यशस्वी झाला.आता दुसरा टप्पा तर अगदीच सोप्पा आहे.उघडी गॅलरी,स्टूल आणी अपघात,बस्स.काम फत्ते.तो आवाज आणी ते शब्द ऐकून विजयला स्वतःचीच घृणा वाटू लागली.लहानग्या प्रणवला त्यानी कडेवर घेतलं घराचं दार उघडलं.प्रणवला त्याच आवडत टॉम अँड जेरी च कार्टून लावून दिल.हेडफोन त्याच्या कानाला लावले आणी स्वयंपाकघरात गेला..त्याच्या कानात एकच आवाज वाजत होता ,
वा वा शाब्बास अरे बरेच दिवसानी माझी किंमत चुकत करणारा कोणीतरी सापडलाय.आता ह्या जगातल्या सगळ्या सुखाना मी तुझं मांडलिक करणार.आता कच खाऊ नको,पुढे हो अरे ती गॅलरी उघड,तिथे स्टूल लाव कीं काम झालंच
विजय पुढे झाला त्यानी गॅलरी च दार उघडलं,तिथे स्टूल लावलं.
शरदची बहीण हॉस्पिटल मधे पोहोचली,आणी शरदला प्रणव अजूनही घरी न पोहोचल्याच कळलं.अर्थात त्याला फारशी काळजी वाटली नाही,प्रणव असा कितीतरी वेळा विजयकडे राहीला होता.त्यानी त्यासाठीच विजयला फोन केला, फोन वाजून बंद झाला,पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही विजयनी फोन उचलला नाही.तेव्हा जाताना आपणच त्याला घेऊन जावं असा विचार करून तो बाहेर पडला,गाडीवर बसताच त्याचा फोन पुन्हा वाजला.फोनवर पलीकडल्या माणसानी तो पोलीस असल्याच सांगितलं आणी त्याला तातडीने विजयच्या घरापाशी बोलावलं.खोदून खोदून विचारून देखील त्या पोलिसानी बाकी काहीच सांगितलं नाही.शरदला अचानक तुझ्या मुलांना विजयपासून दूर ठेव हा राजेशभाईंनी दिलेला सल्ला आठवला,विजयच बदललेल नशीब आणी काहींवर्षांपूर्वीचा मुन्नाशेठ ह्यात त्याला कमालीच साधार्म्य वाटू लागल,इतके वर्ष आपल्या नजरेसमोर असूनही हे आपल्या लक्षात कस आल नाही याचा दोष तो स्वतःला देत होता.बाकी कसलीच माहिती नव्हती,शक्यतांच्या समुद्रात अडकलेल्या शरदला कुठेही खात्रीचा किनारा दिसत नव्हता.वैरी झालेलं मन नको त्या कल्पनांचा विचार करत होत.शरदचा धीर खचला.तो गाडीवरच ओक्साबोक्षी रडू लागला, आणी डोळे पुसत पुसतच वाऱ्याच्या वेगानी विजयच्या घरापाशी पोहोचला.बिल्डिंग खाली बरीच गर्दी जमली होती त्यातून वाट काढत आत जाण अशक्य होत,तिथेच असलेल्या एका पोलिसाला त्यानी आपली ओळख सांगितली.त्या पोलिसानी मग गर्दीकडे पाहून आपला ठेवणीतला पोलिसी आवाज लावला,गर्दी आपसूक बाजूला झाली,शरद पुढे झाला,खालच्या फारशीवर रक्ताच्या थारोळ्यात त्याचा जिवा भावाचा मित्र विजय निपचित पडला होता.तिथून दूर एका महिला पोलिसाच्या कडेवर प्रणव बसला होता.ती त्याला शांत करायचा प्रयत्न करत होती,पण तीला ते जमत नव्हत.त्याला पाहताच शरद धावत तिथे गेला आणी प्रणवला त्यानी उराशी कवटाळल.
विजयनी त्याच्या घराच्या गॅलरीतून उडी मारून आयुष्य संपवलं होत.पोलिसानी रडणाऱ्या प्रणव ला घराचं दार फोडून बाहेर काढलं.ज्या खोलीतून त्यानी उडी मारली त्या खोलीच दारही बंद होत,कदाचित प्रणव च्या सुरक्षेसाठी.आत्महत्ये नंतरचे सगळे कायदेशीर सोपस्कार पार पडले.रात्री उशिरा शरद आणी शव वाहिके बरोबरचे दोन मदतनीस एवढी तीनच टाळकी स्मशानात पोचली.त्याच्या मृत्यूनी कोणालाही फारसा फरक पडणार नव्हता,मागे राहून गेलेलं कुटुंब नव्हत.त्याच्या आयुष्याची कमाई म्हणजे फक्त्त शरद होता,त्याच्याही डोक्याला अनेक प्रश्नांचे विंचू क्षणा क्षणाला डसत होते.पण त्याची उकल करण्याची आणी उत्तर शोधण्याची ही वेळ नव्हती.शव वाहिकेबरोबर आलेल्या दोन मदतनीसानी विजयच केलेवर विद्युत दहिनीत ढकललं आणी आपले पैसे घेऊन तिथून निघून गेले ,स्मशानाच्या रखवालदारानी दाहिनी सुरु केली.
'तुम्हीही या साहेब आता ' रखवालदार शरद ला म्हणाला.उद्या मी अस्थी काढून ठेवतो,विजयभाऊंनी मला ही अनेकदा मदत केल्ये.अगदी भाऊंचे शेठ झाल्यावरही मला विसरले नाहीत.
विजय अजूनही प्रश्नांच्या वावटळीत हरवलेला होता.
हॉस्पिटल मध्येही जावं लागणार होत.पण आता कुठलंच वहान उपलब्ध नसल्याने त्यांनी तशीच वाट चालायला सुरुवात केली.कर्कश्श आवाजात ओरडत जाणाऱ्या टिटवीच्या आवाजानी तो भानावर आला.त्रसिक नजरेनी त्यानी आवाजाच्या दिशेनी मागच्या बाजूला पाहिलं.त्याच्या घशाला कोरड पडली,डोळे विसफारले गेले,आणी त्यानी आपल्या पावलाना विलक्षण वेग दिला.त्याच्या पावलांच्या आवाजाबरोबर आणखी दोन पावलांचे आवाज दात विचकून त्याच्या मागे चालत होते.

168 

Share


p
Written by
prathamesh khare

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad