Bluepad | Bluepad
Bluepad
ऍडम
Abhishek Ranade
Abhishek Ranade
23rd Nov, 2022

Share

ऍडम
(सदर अनुभव हा व्यक्तिगत आहे.. पुस्तक,कथा,पात्र जरी एकच असली तरीही प्रत्येक वाचकाचा एक वेगळा अनुभव असतो.. हा अनुभव माझा आहे.. )
ज्या पुरुषाच्या नितंबावर तीळ असतो तो अनेक ठिकाणी नोकरी करतो.. आणि ज्या पुरुषाच्या लिंगावर तीळ असतो तो अनेक स्त्रियांना उपभोगतो..
रत्नाकर मतकरी हे नावच खूप मोठं आहे... एका पुस्तक प्रदर्शनात काही पुस्तक विकत घेतली तेंव्हा "ऍडम" शी ओळख झाली... सेक्शुअल लाईफ ह्या विषयी आज हि भारतात मनमोकळे पणे कोणीही बोलत नाही.. हि कथा साधारण ८०-९० सालात घडते अशी... ह्या कथेत लैंगिकता हा विषय अतिशय नाजूकपणे हाताळण्यात आला आहे... पुरुष आणि स्त्री... वयोमानानुसार वाढणारे शरीर... आधी किळसवाणी वाटणारी गोष्ट मग गरज आणि हवीहवीशी वाटत जाते.... लग्नापूर्वी मिळालेले सेक्स मधील अनुभव आणि लग्नानंतर आलेली निराशा... ज्या व्यक्तीवर प्रेम आहे अश्या व्यक्तीनेच पाठीत खंजीर खुपसावा..
जे आपण पेरतो तसेच उगवते ह्या म्हणीचा प्रत्यय नायकाला आणि वाचकाला येऊन जातो... सेक्स हि गरज आहे का एक संस्कार? कोणासाठी गरज, कोणासाठी प्रजनन करणारी क्रिया, कोणासाठी मानसिक नैराश्य निर्माण करणारी किळसवाणी गोष्ट तर कोणासाठी अध्यात्मिक अनुभव.. गोष्टीत अनेक पात्र आहेत.. पण मूळ कथा वरद राजनायक ह्याची आहे.. वयाच्या ३५ शीला एका उंचीवर पोहचलेला वरद कसा जमिनीवर आदळतो ह्याची हि कथा... पुरुष आणि स्त्री ह्यांचे सेक्स विषयीचे समज-गैरसमज, सेक्स करण्यापूर्वी व सेक्स झाल्यावर स्त्री पुरुष नात्यांमध्ये घडणारे बदल, समाजात स्त्री विषयी असलेले दृष्टिकोन, विवाहबाह्य संबंध ह्यांवर "ऍडम" प्रकाश टाकतो...
कथा अतिशय खिळवून टाकणारी आहे... पुस्तक हातात पडल्यावर त्याचा फडशा पडणाऱ्या वाचकांपैकी मी एक.. पुस्तकाचा शेवट मात्र मला फारसा रुचला नाही... काही घटना, काही पात्र ह्यांचे पुढे काय होते ह्या विषयाची उत्सकुता अपूर्ण राहते.. जसे आपल्याकडे स्त्रियांवर अत्याचार होतात तसेच पुरुषांवर हि होतात.. कमी प्रमाणात होत असतील, पण होतात हे नक्की... "ऍडम" मध्ये नक्की नायिका नायकावर अन्याय करते कि नायक नायिकेवर? ह्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक वाचकानुसार वेगळे असू शकते... एमआरएफ सारख्या कंपनीचा मॅनेजर म्हणून काम केलेला नायक, बंगल्यात राहून ऐषोआरामात जीवन जगणारा नायक, रिक्षा चालवतो? का कश्यासाठी? बंगल्यातील मॅनेजर म्हणून जगलेले त्याचे जीवन सुखी असते का रिक्षा चालविताना?
मुळात हि एक कथा आहे जी आपल्या आजूबाजूला घडते... शाळा, दुनियादारी नंतर प्रेमात पाडणारी हि तिसरी कादंबरी... वाचताना माझ्या नजरेसमोर अस्तित्वातील अनेक पात्र निर्माण करणारी.. आणि ह्याचे श्रेय जात ते रत्नाकर मतकरी ह्यांना.. त्यांच्या इतर कादंबऱ्यांचे कौतुक झाले, त्यावर नाटक अथवा सिनेमा आला.. पण हि कादंबरी गाजली ती विवादांमुळे... सेक्स म्हटलं कि सगळे चूप होतात.. किंवा त्यांना ह्या गोष्टी चिप वाटतात.. आणि ह्याचा उल्लेख मनोगतामध्ये लेखकाने केला देखील आहे... परंतु संबंध कादंबरी मध्ये कुठेही अश्लीलता नाही... आपण नेटफ्लिक्स पाहतो, प्राईम पाहतो, आणि ते हि सहकुटुंब-सहपरिवार; त्या मानाने हि कादंबरी "स्वच्छ आणि निर्मळ" आहे.. सेक्स हि नेमकी कश्याची गरज आहे? शरीराची? मनाची? प्रजननाची? का अध्यात्माची?
सेक्स विषयी आज खुलेआम बोलणे गरजेचे आहे ह्याच कारण चुकीच्या पद्धतीने सेक्स हि संकल्पना आपल्या व आपल्या पुढच्या पिढीवर कोरली जात आहे.. आपल्याला "उल्लू" बनविले जात आहे...
अभिषेक रानडे
ऍडम

189 

Share


Abhishek Ranade
Written by
Abhishek Ranade

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad