Bluepad | Bluepad
Bluepad
आज त्यांनीच माझ्याकडे काम माघीतलं.. !
Tushar Vandhekar
Tushar Vandhekar
22nd Nov, 2022

Share

आज त्यांनीच माझ्याकडे काम माघीतलं.. !
आज त्यांनीच माझ्याकडे काम माघीतलं.. !
साधारण, मी आठवीला असेल. शिक्षणात जास्त हुशार नव्हतो. त्यामुळे घरच्यांना नक्कीच वाटलं असणार याचं पुढं काही होणार नाही, म्हणून घरच्यांनी गावातील एका सुप्रसिद्ध, नावाजलेल्या टेलरकडे आमच्या मुलाला टेलर काम शिकवा म्हणून विनवणी केली. विजय टेलर म्हणजे आमच्या गावातील हुशार व बिनचूक कपडे शिवणारा टेलर म्हणून गावात प्रसिद्ध. गावातील प्रतिष्ठित लोकांपासून ते सर्वसाधारण लोकांपर्यंत सर्वांचेच तो कपडे शिवायचा.
मी आता शाळा बघून विजय टेलेरकडे मोकळ्या वेळेत जाऊ लागलो. त्यांनी कात्रीपासून ते टेपपट्टीपर्यंत सर्व सांगितले. गुंड्या कशा लावायच्या आणि गुंड्या कशा खेळायच्या इथंपर्यंत सांगितले. गुंड्या खेळायच्या म्हणजे ग्राहक दुकानात आला की, पाहिले तो सांगायचा मला दोन, चार दिवसात कपडे शिवून द्या बरं कार्यक्रमाला जायचं आहे. असा दुकानात येणारे साठ टक्के लोकं असेच म्हणायचे. प्रत्येकाला देतो म्हणायचं कोणाचा शर्ट शिवायचा तर कोणाची पॅन्ट आणि ग्राहक कपडे मागायला आला की, त्याला सांगायचं तुझा शर्ट झालेला आहे, पॅन्ट मात्र बाकी आहे. टेलरचं काम ठरलेलं वेळेत कधी झालं का. .? अशा गुंड्या मला देखील शिकवल्या..
मी बारावीपर्यंत शिक्षण कसं-बस पूर्ण केलं. आता मात्र मी पूर्णवेळ विजय टेलर यांच्याकडे जात होतो. तो मला महिन्याला चार हजार रूपये देऊ लागला. माझ्यासाठी ते चार हजार म्हणजे मोठी नोकरी लागल्यासारखेच होते. त्यात मित्रांपासून ते गावातील लोकांपर्यंत मला आता टेलर म्हणू लागले होते. माझ्या आई-वडिलांसाठी मुलगा टेलर झाला म्हणून ही, अभिमानाची गोष्ट होती. मी दुकानातील बारीक, सारीक गोष्टी पाहू लागलो.
विजय टेलर याचं नाव तालुक्यात चांगलं फेमस असल्यामुळे अनेक तालुक्यातील लोकं टेलरकडे येऊ लागले. कामाचा व्याप वाढला होता. मला आणि विजय टेलर यांना काम उरकत नसल्याने आम्ही अजून दुकान मोठं करून त्यामध्ये चार ते पाच मशीन लावल्या. लोकं वाढवली. आता धंदा जोरात चालू होता. लग्न सराई, असो की, अजून काही सर्वांसाठी एकच फेमस टेलर विजय टेलर...
म्हणतात ना लक्ष्मी जेव्हा प्रसन्न होते तेव्हा भरभरून देते. विजय टेलर यांनी बंगल्याचे काम काढले. अजून शेती विकत घेतली. टोलेजंग बांगला बांधून तयार झाला. बंगल्यासमोर शोभून दिसावी यासाठी टेलरने काळ्या रंगाची नवी कोरी स्कॉर्पिओ गाडी आणली. गाडीच्या माघे गोल्डन अक्षरात विजय टेलर असे नाव टाकले. लोकं टेलरचं कौतुक करू लागले. फार कष्टातून कमावलं टेलरने, असं पारावर बसलेले म्हातारे कोतारे लोकं बोलू लागले.
मी हे सगळं बघत होतो. मला वाटत होतं आपलं देखील एक दिवस गावात असेच मोठं घर, गाडी असेल. मी त्याच झोतात काम करत होतो. आता मी देखील टेलर झालो होतो. घरचे माझ्यासाठी मुलगी बघत होते. आमचा मुलगा टेलर आहे. असे मुलीच्या वडिलांना सांगायचे. हातावर पोट असल्याने आई-वडील मोलमजुरी करायचे. पण मी, टेलर झालो याचा आनंद त्यांना सगळ्यात जास्त होता. आपण नाही शिकलो, निदान आपला मुलगा तरी सावलीत काम करत आहे, याचाच आनंद त्यांना असावा.
विजय टेलर यांनी गाडी घेतल्यापासून दुकानात कमी येऊ लागले. वेगवेगळ्या लोकांसोबत उटणं , बसणं होऊ लागलं. दुकानातील लक्ष कमी झाले. जे लोकं दुकानात काम करायला येत होते ते आता त्यांचं स्वतःच छोटा, मोठं दुकान टाकून सेट होऊ लागले.
टेलर आता रम, रमा आणि रम्मीच्या चांगलेच नादी लागले होते. रम म्हणजे दारू.. रमा म्हणजे बाई... आणि रम्मी म्हणजे पत्ते यामध्ये टेलर दिवस रात्र असायचे ना घराकडे लक्ष ना दुकानाकडे लक्ष यामुळे टेलर आता हळूहळू कर्जबाजरी होऊ लागले. जुने लोकं आजही सांगतात माणसाने रम, रमा आणि रम्मी यांच्यापासून दहा हात लांब रहावे. पण टेलरने तिन्ही गोष्टी सोबत केल्या.
आता सावकार लोकं व्याजाने दिलेले पैस मागण्यासाठी दुकानात येऊ लागले. शेती विकावी लागली. शेती विकून कर्ज फिटले नाही, मग गाडी विकावी लागली. आता घरावरही बँकेची जप्ती आली. मी ज्या दुकानात काम करत होतो. म्हणजे टेलरच्या दुकानाला टेलरने आता विक्रीस काढले होते. नंतर मी पाहुण्याकडून पैसे जमा करून ते दुकान साहित्यांसह विकत घेतले. आता मी दुकानाचा मालक झालो होतो.
दहा बारा वर्षांत काळ एवढा झपाट्याने बदलला होता. म्हणतात ना कोणी कोणाची प्रगती रोखू शकत नाही. आणि कोणी कोणाची अधोगती रोखू शकत नाही. टेलरने जेवढं कमावलं होतं ते सर्व गेलं.
टेलर आता भाडोत्री खोली घेऊन राहत होता. टेलरची बायको आता कपड्याच्या दुकानात कामाला जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागली होती. टेलर जो कधी काळी खादीच्या कापड्याशिवाय कपडे घालत नव्हता तो आज देशी दारूच्या दुकानाच्या ओट्यावर पडलेला असायचा.
काळाचा महिमा किती झपाट्याने फिरला होता. त्यामुळे सांगत गुण फार महत्वाचा असतो.
कोणी कुठं बसावं हे ज्याने त्याने ठरवावे. एखादी माशी भाजी विक्रेत्याच्या तराजूत जाऊन बसली तर काही फरक पडत नाही. पण तीच माशी सोनाराच्या तराजूत जाऊन बसली तर खूप मोठा फरक पडतो.
टेलरला अनेक लोकांनी समजावून सांगितले. तुझ्याकडे कला आहे परत सुरू कर. जा टेलर व्यवसाय सुरू कर. एके दिवशी सकाळी टेलार दुकानात आले. मी येऊ का कामाल असे म्हणाले. मी पटकन हो म्हणालो. तुमचंच आहे. कधी पण या. तुमच्याकडून अजून खूप शिकायचं आहे मला. असे मी टेलरला म्हणालो. टेलरने एक शब्दही उच्चारला नाही......
मालक म्हणून डबघाईस गेलेले टेलरने आता नव्या आयुष्याला एक कामगार म्हणून सुरुवात केली आहे...
- तुषार वांढेकर
9011356092
--------------------

180 

Share


Tushar Vandhekar
Written by
Tushar Vandhekar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad