Bluepad | Bluepad
Bluepad
*झाले मोकळे आकाश.*
तुषार पाटील
तुषार पाटील
22nd Nov, 2022

Share

*ती घरची मोठी सून..आल्यापासून घराला अगदी आपलंसं केलं. सासू-सासरे, दिर, नणंद आणि नवरा सगळ्यांसाठी सगळं केलं. सणवार, आला-गेला, रीतिरिवाज, दुखणी- खुपणी सगळं सांभाळलं..*
*आता तर दोन मुलांची जबाबदारी.. त्यांच्या शाळा.. सतत कामात बुडालेली, पण तितकीच सगळ्यांच्या कौतुकास पात्र असलेली.. आता धाकट्या दिराचं लग्न.. तो शिकलेला, तीही शिकलेली.. देखणी, एकुलती एक लाडकी लेक आईबाबांची.. शिवाय नोकरी करणारी.. सगळ्यात अजून भर म्हणजे, हा प्रेमविवाह!*
*पण हल्ली काहीतरी बिनसलंय मोठीचं.. चिडचिड, धुसफूस होतेय तिची.. नवऱ्याबरोबर कधीही न भांडणारी, आता भांडायला कारण शोधत असते.*
*आजवर मीच सून होते या घरची.. माझा हात सगळ्या वास्तूला.. माझंच प्रेम इथल्या माणसांना.. मलाच मिळत होतं, सगळ्यांचं कौतुक... पण आता वाटेकरी...!*
*आजवर सगळ्यांचं करताना काही वाटलं नाही.. आता मी हिचंही करायचं का? नवरा, दिर, मुलं यांच्यासोबतच हिलाही डबा द्यायचा का?*
*हि कामावरून आल्या-आल्या गरम चहाचा कप आणि नाश्ता.. रात्री आयतं जेवण..? मी का करावं? मी काय हिची मोलकरीण आहे? करत असेल ती नोकरी.. मीपण तर घर उत्कृष्ट सांभाळते!!!*
*या आणि असल्या अनेक विचारांनी डोकं नुसतं भिरभिरल्यासारखं व्हायचं तिचं! नवीन सून थाटामाटाने लग्न करून घरांत आलीही.. आगत-स्वागत.. परंपरा.. पूजाअर्चा.. सगळं कसं अगदी छान पार पडलं.. दोन दिवसांत आता हनिमूनला जायची तयारी..*
*मोठीच्या "आत" मात्र कुठेतरी अजूनही ते वादळ घोगावंतय.. लग्नाची इतक्या दिवसांची गडबड.. उशिरापर्यंतची जागरणे.. पाहुण्या- रावळांच्यासाठीचं करणं.. आणि मनाच्या आतलं ते वादळ..*
*व्हायचा तोच परिणाम झाला अन काम करता-करता मोठी अचानकच चक्कर येऊन पडली.. सगळा गोंधळ उडाला, सासूसासरे घाबरून गेले, मुलं रडू लागली.. दिराने लगेचच शेजारच्या डॉ ना बोलावले.. "रक्तातील साखर कमी झालेय, शिवाय अंगात ताप आहे बराच, अशक्तपणाही वाढलाय.. विश्रांतीची जास्त गरज आहे!"*
*मोठी अजूनही ग्लानीतच होती, इंजेकशनमुळे गाढ झोप लागली, ती थेट सकाळी याच विचारांनी जाग आली..*
*"मुलांना शाळेत जायचंय.. यांचं ऑफिस, आई-बाबांचं पथ्याचं खाणं.. मला उठलं पाहिजे!"*
*तितक्यांत एक हळुवार हात कपाळावर आला.. मोठीनं डोळे उघडून पाहिलं.. कालपरवा आलेली धाकटी सून तिच्या जवळ बसली होती, काळजीनं अन प्रेमानं तिचा ताप बघणं, तिचं पांघरून नीट करणं.. हे सारं करत होती.. मोठी उठायला लागली.. तर..*
*"ताई, उठू नका बरं.. झोपून राहा, डॉ नि सांगितलंय ना तुंम्हाला आराम करायला.!" आवाजात अगदी गोडवा आणि आग्रही आपलेपणा!*
*"अग, पण माझी कामं..?"*
*"ताई, झालीत सारी..! आईबाबांना सारं पथ्याचं खाणं.. भावजींचा डबा, मुलं शाळेला गेली.. कामवालीला कामंही सांगितलित, आईंना विचारून-विचारून!*
*"आता तुम्ही फ्रेश व्हाल तेव्हा, दोघी मिळून मस्त चहा-बिस्किट्सचा नाश्ता करू.. आवडतो ना तुम्हांला.. आई सांगत होत्या!"*
*किती प्रेमाने बोलत होती ती! "अग, पण तुम्हाला फिरायला जायचं होतं ना आज?"*
*"ताई, आम्ही ते पोस्टफोन केलं.. तुम्ही इतक्या आजारी असताना आम्ही का जावं?*
*आता तुम्ही आराम करा.. आईंच्या मदतीने मी करेन सगळं!" तिचे ते आश्वस्त शब्द!*
*"अग, पण तुला सवय नसेल.. तू नोकरी करतेस, शिवाय तुझ्या घरी कमी माणसं... इथे इतकी सारी.!"... मोठीच्या मनातलं वादळ परत घोंगावलंच!*
*"हो ताई, आम्ही तसे तीनच जण.. पण घरी येणारे- जाणारे, नातेवाईक कायम असायचे, त्यामुळे माणसांची सवय आहेच.. मी जशी नोकरीला जायला लागले, तसा कटाक्षाने एक स्वतःपुरता नियम तयार केला.. जितकं जमेल तितकं घरासाठीही करायचं.. आईवर कुठलाच ताण येऊ नाही द्यायचा.. मी रोज ऑफिसला जाताना अन आल्यावरही सगळं जेवण बनवतेच.. माझ्या ऑफिसच्या वेळा सांभाळून कुठल्यातरी एका वेळेला तिघे एकत्र जेवतो.. मला या साऱ्या कामांची सवय आहे.. शिवाय.." आता जराशी हळवी होऊन ती बोलू लागली..*
*'शिवाय, आईला माहेरी आता कुणीच नाही उरलं.. ती एकटीच राहिलीय, त्यामुळे जेव्हडे जमेल तेव्हडे मी तिच्यासाठी करते... तिच्यासाठी मी काहीही केलं की आई मला म्हणते, जणू तुझ्या रूपाने माझी आईच माझ्यासाठी करतेय, तुझ्यात मला माझी आई दिसते.. आणि ताई, जणू माझ्याकडून हे तिचं माहेरपणच होतेय!"*
*मग स्वतःला जरा सावरून म्हणाली.. "आणि बघा, इथे मला तुमच्या रूपाने मोठी बहिणही मिळाली.. आता जरा फ्रेश व्हा, मी आपल्यासाठी चहा आणते!"*
*ती चहा आणायला किचनमध्ये गेली.. अन मोठीला हुंदका फुटला.. "कसले कसले विचार माझ्या मनात चालू होते? किती negative झाले होते मी! जी मुलगी घरात आलीही नव्हती, तिच्याविषयी आधीच मन वाईट करून बसले होते मी... अन तिने मात्र आल्याआल्या थेट माझ्या काळजालाच हात घातला..*
*देवा.. मला चुकताचुकता वाचवलंस तू... ती मला तिची "मोठी ताई "म्हणाली, तिच्यात मात्र मला माझीही "आई"दिसली... अशीच हिच्याचसारखी हळुवार, समंजस आणि मनाने मोठी!"*
*आणि आता जाणवले मोठीला... ......जणू झाले मोकळे आकाश...!*
*(पूर्वग्रह न ठेवता,स्वच्छ नजरेने अन तितक्याच स्वच्छ मनाने एखाद्या गोष्टीकडे पाहिले ना, तर अपेक्षेपेक्षाही अधिक सुखद अनुभव येऊ शकतो.. शिवाय आपल्या मनातील नकारात्मकतेला आपणच बांध घातलेला बरा.. दरवेळी कुठली "धाकटी".. मोठी होऊन नाही येणार आपल्याला समजून घ्यायला!)*

175 

Share


तुषार पाटील
Written by
तुषार पाटील

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad