Bluepad | Bluepad
Bluepad
देहाचियारंगी पान ४३
Vidyadhar Raosaheb Pande
Vidyadhar Raosaheb Pande
22nd Nov, 2022

Share

सिमींता २
नातेसंबंध अप्रत्यक्ष लग्नासमान. त्यानुसार पुरुषाचे स्त्रीच्या बाबतीत सामाजिक दायित्व असेल. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. ही बातमी वाचायला मिळाली.मला आणखी बळ मिळालं.मी नात्यात राहायचा निर्णय घ्यायचा ठरवलं.मामी बाहेर ओट्यावर होत्या. त्यांना आत बोलावलं आणि म्हणाले,
"मामी एक मास्तर आहेत.त्यांना बायको पण आहे.तरी पण ते माझ्याशी लग्न करायला तयार आहेत.कसं करू?" मामीची म्हणनं आलं,
"तुला कायम संबाळील का दीईल मंदीचं सुडुन?" मी म्हणाले,
"त्याचं आजच काय सांगावं."तसं त्यांनी सुचविले,
" ईचार तुज्या आई-बाप भावाला .तु जितं राजी तीत मी.माजंकाय उरलय."
मी पडत्या फळाची आज्ञा घेतली.आणि तयारीच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलले.
मी संदीपची आणि गुरुजींची एक दिवस भेट घालून दिली.आमचं सविस्तर बोलणं झालं.गुरुजींना कायदेशीर लग्न करता येत नव्हतं आणि त्यांना घटस्फोट घ्यायचा नव्हता. आम्ही नाते संबंधात राहायचा निर्णय घेतला. एम ए च्या दुसऱ्या वर्षीची पहिली सेमिस्टर संपली होती.तो निकाल लागायच्या अगोदर लग्नाचा निकाल लावायचा ठरवल.
एकेदिवशी संदीप आला होता. त्याने गुरुजींना नवे कपडे,मंगळसूत्र,जोडवे घेऊन यायला सांगितले होते. तोपर्यंत संदीपने सरपंच, डांबरे भाऊजी यांना बोलून घरातच माळा घालायची तयारी केली.आम्ही माळा घातल्या. मामीच दर्शन घेताना त्यांचे डोळे भरून आले.एकमेकीच्या गळ्यात पडून खूप रडलो .
मी माझं चार पत्र्याच्या घरातील स्वातंत्र्य फेकून अनामिक प्रवासाला निघाले होते.माझं हक्काचं घर माझं विश्वं होतं.सासू आई होऊन म्हणाली होती,
'पोरी हे तुझं दुसरं माहेर आहे.' ते शब्दं आठवत होते. मामीचा शब्द न शब्द मला सोडत नव्हता.त्या प्रेमळ शब्दांच्या तप्त लोहाच्या डागण्यांचे मला चटके बसत होते.मी प्रेम भावनांनी भाजून निघत होते.माझ्या इवल्याशा विश्वाच्या उंबरठ्याजवळ येऊन थांबले.पाऊल बाहेर पडत नव्हते. सिमिंता थांब.आणखी विचार कर वेळ निघून गेली नाही.अजून तू उंबरठ्याबाहेर पाऊल टाकलं नाहीस.अस एक मन म्हणत होतं.
नव्हतं टाकलं बाहेर पाऊल.उंबरठ्या आत उभी होते.एका प्रेमभावाने उंबरठ्या आत खेचून धरले होते.दुसरा प्रेमभाव वासनेच्या हाताला उंबरठ्याबाहेर खेचत होता . प्रेमापेक्षा वासना प्रबळ होत होत्या.शेवटी प्रबळापुढे दुर्बलता हताश होते. तशी मीही आज हाताश झाले.टाकले बाहेर पाऊल. निघाले नव्या भविष्याच्या शोधात.
वासनेला भविष्या असतं का? हा नवीन प्रश्न मला त्या क्षणी पडला.नैतिक अनैतिक हा शब्दांचा खेळ उगीच आपण खेळतो की नाही?तो खेळ येथेही सुरू झाला.
जेथे शरीरसुखाच्या परमोच्चबिंदूवर इतर शरीराच्या आधारे आपण पोहोचतो. मग तेथे नैतिक अनैतिक शब्दांना अर्थ उरतो का? निसर्गात सृजनाला महत्त्व आहे. नवनिर्मितीला महत्त्व आहे.माध्यमाला अजिबात अडकाठी नाही.अनैतिक शब्द हा फक्त निर्बंध आहे. वासना निर्बंध जाणत नाही .म्हणूनच निसर्गातील नवनिर्मिती थांबत नाही. ती कोणी थांबवू शकत नाही.ही उत्तेजना ठराविक वयात पशु पक्षी,वनस्पती, किड्या मुंग्या यांच्यात निसर्गत:निर्माण होण्याची प्रक्रिया घडली नसती,तर नवनिर्मितीच काम या विश्वात झालं नसतं.या विश्वात कोणता जीव उत्पादित झाला नसता.
नैतिकतेपेक्षा आपण अनैतिकतेलाच का जास्त महत्त्व देतो? सुखापेक्षा दु:खात जास्त गुरफटून का पडतो? ती आपली अनावश्यक विचार प्रवृत्ती असते.चांगल्या वाईटाचा खेळ मांडते.कोणीतरी असंबंध,काय म्हणतील? या गर्तेत तो विचार घेऊन जातो.तिथे काहीच नसते.मनाच्या कल्पनेशिवाय.कारण प्रत्येक व्यक्ती तोच विचार करतो. ' ते काय म्हणतील? ' लोक कधीच मनायचे थांबत नसतात.कारण ते कोणीच नसतात. ते आपल्या मनात आपण कायम निर्माण करून ठेवलेले भय असते.
" ते दे फेकून.निघ उंबरठ्या बाहेर.आता कसला विचार करतेस ? तुझी निर्णय शक्ती तू इतरांच्या स्वाधीन करून बसली आहेस.ती तुला उंबरठ्याबाहेर खेचणार आहे.जा आता नव्या विश्वात .जोपर्यंत रमता येईल तोपर्यंत रम.तू तुझ्या पदराची गाठ कोणाच्या तरी कापडाला बांधली आहेस. आणि तुझे पंख छाटून घेतलेस. आता ती गाठ नरडी चा फास जरी वाटत असला. तरी आता दुसरा मार्ग नाही .आता तू सन्मानाने उंबरठा नाही ओलांडला तरी तुला बाहेर तो खेचणार आहे.तुझे आपले घरातून तुला प्रेमळ स्वरूपाचे धक्के देत बाहेर काढणार आहेत. आता तू उचललेलं पाऊल मागे घेऊ शकत नाहीस. जा फार विचार करू नको. हे वासनेच निसर्गचक्र निर्मिती केल्याशिवाय कुणाला सोडत नाही.संत तुकाराम सुद्धा दोन दोनदा या फेऱ्यात अडकले होते.महात्मा गांधीच्या बाप करमचंद गांधी या फेऱ्यात चौथ्यांदा अडकले. म्हणून तर मोहनदास गांधी विश्वाला मिळाले.तशीच एकादी निर्मिती निसर्गाला कदाचित तुझ्याकडून अपेक्षित असू शकते."
असं एक मन म्हणत होतं.
मी विचार करत मनाची ठाम भूमिका घेतली. जायचं आहे पण मामींना सोबत घेऊनच.ज्या अनपड बाईने स्वतःच्या अनुभवातून जोडीदार विरहित जगणं काय असतं ? हे जाणलं.ती स्त्री एका तरुण स्त्रीला कर्तव्यापोटी पुनर्विवाह लावून देते. त्या कर्तव्याचा विसर मला पडत नव्हता. सासू शिवाय मी जाऊ शकत नव्हते.मलाही कर्तव्याची जाणीव होत होती. म्हणून मी त्यांना सोबत घेऊन जाणार असं ठरवलं. आणि मी गुरुजींना म्हणाले,
"सासूबाईंना सोबत घेऊन निघायचे." गुरुजींनी मानेन होकार दिला.आम्ही गेलो नव्या वाटेच्या अनुभवाकडे.
अध्याय ५ समाप्त.

118 

Share


Vidyadhar Raosaheb Pande
Written by
Vidyadhar Raosaheb Pande

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad