Bluepadजागतिक पुस्तक दिनी, वाचू पुस्तके कौतुके....
Bluepad

जागतिक पुस्तक दिनी, वाचू पुस्तके कौतुके....

Mridula Shinde
Mridula Shinde
23rd Apr, 2020

Shareमाझ्या वाचनाच्या आवडीचे बीज रोवले गेते ते शाळेच्या अभ्यासातून. शाळेच्या भाषा विषयांच्या पुस्तकात मुलांना आवडतील अशा पुस्तकातील प्रकरणे धडे म्हणून दिले जातात. आम्हाला आमच्या बाईंनी सांगितलं होतं की त्यातील जो धडा आवडेल तो ज्या पुस्तकातला आहे ते पुस्तक ग्रंथलयातून घ्या आणि वाचा म्हणजे तो धडा आणि त्या पुस्तकाच्या लेखकाविषयी अधिक माहिती मिळेल. आम्ही तसं करायचो आणि अशीच मी जी.ए.कुलकर्णी, पु.ल.देशपांडे, आचार्य अत्रे, द.मा.मिरासदार, राम गणेश गडकरी, वि.स.खांडेकर, व.पु.काळे, चि.वि.जोशी, ग.दि.मा, व्य.दि.मा., कुसुमाग्रज, आरती प्रभू, शांता शेळके, शिरीष पै, इंदिरा संत, बहिणाबाई, अनिल, बी, नारायण सुर्वे, दलित साहित्यिक ज.वि.पवार, दया पवार, विनोदी नाट्य लेखक मधुकर तोरडमल अशा अनेक लेखकांची पुस्तकं शाळेत असतानाच वाचून काढली. त्यात माझ्या वडिलांकडे किमान ४-५००० पुस्तकांचा संग्रह त्यावेळी होता. असं वाचनासाठी फार पोषक वातावरण होतं. माझ्यासारखी ज्यांना वाचनाची आवड असते त्यांच्यासाठी एखाद्या रेसिपी बूकपासून मोठमोठ्या ग्रंथाची पानं नेहमीच फडफडत असतात. ग्रंथालयांचे दरवाजे सताड उघडे असतात. पण ज्यांना वाचनाची आवड नसते त्यांची मजल रोजच्या व्यवहारातील वाचन आणि आता फेसबुक आणि व्हाट्सअप पोस्ट वाचण्याच्या पलीकडे जात नाही. सोशल मीडियाचा उद्रेक गेल्या १० वर्षापूर्वी सुरू झाला होता. पण वाचनाची आवड नसलेल्यांसाठी फार पूर्वीपासूनच प्रयत्न सुरू झाले होते.
संपूर्ण जगभरातील साहित्यात रोज फार मोठी भर पडत असताना आणि ग्रंथालये पुस्तकांनी वाहून जात असताना विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या विश्वाने मात्र आपला मोर्चा तंत्रज्ञानाकडे वळवला होता. त्यावेळी लोकांचं लक्ष पुन्हा एकदा वाचनात लागावं म्हणून स्पेनचे एक अग्रगण्य लेखक वीसेण्टे क्लेवल अँड्रेस यांनी स्पेनचे नाटयकार आणि कादंबरीकार मिगेल दे करवानटेस यांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्मृतीदिनी ‘पुस्तक दिवस’ आयोजित करण्याचा विचार प्रथम मांडला. हा दिवस होता २३ एप्रिल. ह्याच दिवशी म्हणजे २३ एप्रिल १६१६ रोजी विल्यम शेक्सपियर यांचाही स्मृतीदिन असतो. अँड्रेस यांच्या प्रस्तावला मान्यता देऊन द युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायजेशन (The United Nations Educational, Scientific and Cultural) अर्थात यूनेस्कोने दरवर्षी २३ एप्रिल हा ‘पुस्तक दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला आणि १९९५ पासून याची सुरुवात झाली.
इथे एक गोष्ट नमूद केली पाहिजे की यूनेस्कोने २३ एप्रिल हा दिवस फक्त ‘पुस्तक दिन’ म्हणून नाही तर ‘कॉपीराइट दिन’ म्हणून देखील साजरा करण्याचं आवाहन केलं. आपल्याकडे असे अनेक लेखक असतात जे खूप अप्रतिम लिहितात. पण त्यांच्या साहित्याला स्वत:च्या नावावर खपवणारे अनेक उपटसुंभ अभिजात साहित्यावर नजर ठेऊन असतात. अशा वाङमय चोरीच्या घटना जगात सातत्याने घडत असतात. साहित्याची चोरी ही अशी चोरी आहे ज्यावर कोणीही सहज मालकी हक्क सांगू शकत नाही. ही प्रतिभेची चोरी त्या त्या लेखकाच्या खच्चीकरणासाठी पुरेशी असते. त्यामुळे तुम्ही जे काही लिहाल, एक ओळ जरी लिहाल तरी तिच्यावर तुमच्या नावाचा ठसा उमटला गेला पाहिजे. यासाठीच पुस्तकासोबत त्यातील साहित्याची जपणूक होण्यासाठी कायद्यासह जनजागृतीची आवश्यकता आहे. म्हणूनच ‘पुस्तक दिना’ सोबतच ‘कॉपीराइट दिन’ देखील साजरा केला जातो.
पुस्तक दिन जगभरात साजरा केला जातो. स्पेनमध्ये वाचन संस्कृती फार विस्तारलेली असल्याने तिथे जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला एक पुस्तक भेट देण्याची पद्धत आहे. लंडनमध्ये मुलांना टोकन दिले जातात आणि मग मुलं ते टोकन घेऊन जवळच्या पुस्तकांच्या दुकानात जातात आणि आपल्याला हवं ते पुस्तक विकत घेतात. स्वीडनमध्ये या दिवशी प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये लेखन स्पर्धा आयोजित केल्या जातात.
आज आपण जगात बेस्ट सेलर पुस्तकांची क्रेझ किती वाढते आहे ते पाहतो आहोत. लेखन आणि वाचन हे परस्परावलंबी गोष्टी आहेत. चांगलं आणि खिळवून ठेवणारं लेखन असेल तर वाचक त्यावर उड्या मारतात तर साहित्यिक मूल्यांची जाण असलेल्या चांगल्या वाचकांमुळे एखादं दुर्लक्षित राहिलेलं साहित्य देखील उजेडात येतं. यासाठी पुस्तकांचे परीक्षण ही एक फार मोठी तारक बाब असते. परीक्षण जर चौफेर लिहिलं गेलं तर वाचकाला त्या पुस्तकाचा अंदाज येतो. म्हणजे एका लेखकाची भिस्त दुसर्‍या एका लेखकावर असते असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
मराठीमध्ये साहित्य अफाट आहे. वाचू तेवढं कमी. पण आपल्याकडे वाचन संस्कृतीला उभार देण्यासाठी साहित्य सम्मेलंनांकडून किंवा वाचक चळवळीकडून ही फार प्रयत्न होत नाहीत. पुस्तक दिनाच्या निमित्ताने ह्याची सुरुवात ऑनलाइन पद्धतीने का होईना पण व्हावी ही आजच्या जागतिक पुस्तक दिनी शुभेछा.

2 

Share


Mridula Shinde
Written by
Mridula Shinde

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad