Bluepad | Bluepad
Bluepad
*भाषेच्या गमती*
तुषार पाटील
तुषार पाटील
21st Nov, 2022

Share

*भाषा हे विचारांच्या आदानप्रदानाचे एक प्रमुख साधन आहे. आपले विचार, भावना आपण भाषेच्याच माध्यमातून दुसऱ्यापर्यंत पोहचवतो. पण कधी कधी या भाषेच्या वापरातूनही गमती निर्माण होतात. करमणूकही होते. विशेषतः काही वेळा न्यायालयाशी केलेला पत्रव्यवहार, पोलिसांनी दिलेली माहिती, वर्तमानपत्रवाल्यांनी वापरलेली आणि वापरून गुळगुळीत झालेली वाक्ये वाचून बऱ्याच वेळेला खूप करमणूक होते.
अशाच काही गमतीजमती आज पाहू. एखादा गुन्हा घडला असेल आणि त्याचा तपास पोलिसांनी लवकर ( ? ) लावला असेल तर वर्तमानपत्रात साधारणपणे अशी बातमी येते. अमुक एका ठिकाणी दरोडा पडला होता. पण अमुक अमुक पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी/ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या चोवीस तासात दरोडेखोरांना गजाआड केले. यातील मजेदार आणि पूर्वापार वापरात असलेली शब्दरचना म्हणजे ‘ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून…!’ कधी कधी वाटते की ही ( न दिसणारी ) चक्रे कशी असतील ? आणि ती पोलीस कसे फिरवत असतील ? काही वेळा उगीचच एक दृश्य डोळ्यासमोर येते.एखाद्या पो लीस मुख्यालयात काही चक्रे बसवलेली असून दोनचार पोलीस ती मोठ्या कष्टाने फिरवीतआहेत. आम्ही सकाळी फिरायला बागेत जातो. तेथे व्यायामाची काही साधने आहेत. त्यामध्ये हातानी फिरवायचे एक चक्रही आहे. आम्ही ती चक्रे फिरवीत असतो. फार तर अधूनमधून कार चालवतो. त्या कारचे चक्र फिरवतो. मध्यंतरी कार ड्रायव्हरसाठी कोणीतरी वापरलेला ‘ चक्रधर ‘ हा शब्द ऐकला होता. तो आम्हाला अगदी सार्थ वाटला. भगवान श्रीकृष्णाला चक्रधर म्हणतात हे आम्हास माहिती होते. अर्थात खरा चक्रधर तोच आहे. तोच या जगाचे चक्र फिरवतो. तो खरा चक्रपाणी. पण ड्रायव्हर या इंग्रजी शब्दापेक्षा ‘ चक्रधर ‘ शब्द कितीतरी छान वाटतो. आणि चालक, सारथी यासारखे किती सुंदर शब्द त्यासाठी मराठीत आहेत.
एखाद्या ठिकाणी दंगे उद्भवले असतील तर पोलीस नेहमीच ती परिस्थिती संयमाने आणि कौशल्यपूर्वक हाताळतात (असे मानायला काही हरकत नसावी.) मग वर्तमानपत्रात बातमी येते. पुन्हा तेच वापरून गुळगुळीत झालेले शब्द ! तीच तणावपूर्ण सॉरी अर्थपूर्ण ( ? ) भाषा ! ‘ काल अमुक एका ठिकाणी दोन गटांमध्ये दंगा झाला. ( दंगा नेहमी दोन गटातच होत असावा ! ) तर असा दंगा झाला. परिस्थिती पोलिसांनी मोठ्या कौशल्याने हाताळली आणि पुढील अनर्थ टळला. गावात तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात आहे. हे शब्द कसे सुचतात कोणास ठावूक ! पण त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच ! बघा ना, किती सुंदर शब्द आहेत. शांतता कशी तर तणावपूर्ण ! परिस्थिती कशी तर तणावपूर्ण आणि तरीही नियंत्रणात. खूप सुंदर ! खरं म्हणजे तणावपूर्ण ‘ शांतता ‘ असू शकते का ? जी परिस्थिती तणावपूर्ण असते तिला शांतता म्हणता येईल का असे असंख्य प्रश्न माझ्या भाबड्या मनाला पडत असतात ? आणि तणावपूर्ण शांतता असलेली परिस्थिती नियंत्रणात म्हणजे काय कमाल आहे राव ! सिम्पली ग्रेट !
आणखी अशीच गमतीदार शब्दरचना वर्तमानपत्रात बऱ्याच वेळा वाचायला मिळते. एखाद्या ठिकाणी एखादा गुन्हा घडून गेल्यानंतर काही कालावधीत पुन्हा तसाच दुसरा गुन्हा घडला तर वर्तमानपत्रात अशी बातमी येते. ‘ अमुक एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच आठ दिवसाच्या कालावधीत पुन्हा दुसऱ्या मुलीवर अत्याचार ! ‘ काही लक्षात आले का ? नसेल तर पुन्हा नीट वाचा ते वाक्य. म्हणजे अमुक एक घटना ताजी असतानाच दुसरी घटना ! दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अजून काही काळ गेला असता आणि मग ती घटना घडली असती तर चालले असते…असाच अर्थ निघतो नाही का ?
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा खून झाला असेल तर त्याच्याबद्दलची भाषा पोलिसी किंवा कोर्टकचेरीच्या व्यवहारात मोठी गमतीची असते. अमुक एका दिवशी ही घटना घडली तेव्हा सदर मयत व्यक्ती तेथे उपस्थित होती. मयताच्या साक्षीने या सर्व गोष्टी घडल्या असून मयत व्यक्तीने दिलेल्या जबाबात तशी नोंद आहे. आता मला सांगा ‘ मयत व्यक्ती तेथे उपस्थित होती ‘ असे असू शकते का ? मयत झालेली व्यक्ती कशी उपस्थित राहू शकेल ? पुन्हा ‘ मयताच्या साक्षीने ‘ सर्व गोष्टी घडल्या. आहे की नाही मजेदार भाषा ! आपण त्यातील अर्थ समजून घेतो तो भाग वेगळा ! एखाद्याविरुद्ध तक्रार असेल तर त्या अर्जात त्याला ‘ सामनेवाला ‘ असे म्हटले जाते. ‘ सामनेवाल्यानी आमच्या अशिलास शिवीगाळ केली . या ‘ सामनेवाल्या’ शब्दाची मोठी गमत वाटते. त्याऐवजी त्याचे नाव नसते का वापरता आले ? उगीच आपले आमनेसामने येतात ! उगीचच मला मो. रफींचे ‘ मेरे सामनेवाली खिडकी में..’ हे गाणे आठवत राहते. एखाद्या खरेदीपत्रात ‘ कायम फरोक्त खरेदी ‘ आणि ही वास्तू किंवा जमीन तुम्हाला ‘ तदंगभूत वस्तूंसह ‘ दिली आहे असे गमतीदार शब्दप्रयोग आढळतात. केवढे वजनदार शब्द ! कायम फरोक्त खरेदी आणि तदंगभूत वस्तू .
यापेक्षा सोपे शब्द त्यांना वापरता आले नसते का कोणास ठावूक ? म्हणून मला कोणी एखादे शासकीय दस्तऐवज वगैरे वाचायला सांगितले की जरा भीतीच वाटते ! काही काही शब्दांचा अर्थ मला अजिबात कळत नाही. आणि जे लिहितात त्यांना तरी माहित असतो की नाही काय माहिती ! त्यांना नक्की माहिती असावा ! अशा वेळी त्यांचे पाय धरावेसे वाटतात. केवढे अगाध ज्ञान ! भाषाप्रभू मंडळी ! केमिस्टलाच डॉक्टरांचे अक्षर कळते तसाच प्रकार इथे असावा. म्हणूनच वकील आदी मंडळी आपल्या अशिलांकडून ( माझ्यासारख्या अज्ञानी ) फी वाजवून घेतात ! असो. आपण मात्र या गोष्टींचा जास्त बाऊ करून घ्यायचा नाही. उगीच ‘ डोक्याला हेडेक ‘ ( डोक्यालाच असतो ना ! )

176 

Share


तुषार पाटील
Written by
तुषार पाटील

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad