Bluepad | Bluepad
Bluepad
Title

D
Datta Mahamuni
20th Nov, 2022

Share

संतुलित जीवन
जीवन, खरेच किती अथांग ,त्याचा कुणाला ठाव लागत नाही.कितीही जगले तरी जगावे वाटते.जगण्यात काहीतरी गमंत आहे म्हणून तर जगावे वाटते.कितीही दुःख असले तरी जगण्याची ओढ काही केल्या संपत नाही.
जगण्याचे अनेक पैलू आहेत,आपण कोणत्या मार्गावर चालतो, एकाच की अनेक हे लक्षात घेतले पाहिजे.जीवन जर असीम असेल तर आपले सीमित जीवन हे
संतुलित जीवन आहे का? सृष्टी हजारों रंगाची उधळण करत असताना,आपण चार दोन रंगच उधळायला हवे का? शेंकडों फळांची रसवंती असताना, दोन तीन फळांचा रस चाखणार का? चौसष्ट कला असताना एखाद्याच कलेत पारंगत किंवा आस्वाद घेणार का?
तर वरील प्रश्नांची उत्तरे शोधताना आपल्या लक्षात येईल की आपण करंटे आहोत, सृष्टीच्या अपार वैभवात आपण न्हाऊन निघत नाहीत.अमृताचा वर्षाव होत असताना दारं खिडक्या बंद करुन बसतो.
आपले जीवन एकांगी, एककल्ली, एकतर्फी आहे, ते चौफेर असावे, सर्वांगीण असावे.सृष्टिने इतके भरभरून दिले आहे की क्षणभर देखील उसंत मिळणार नाही, परंतु सृष्टी बघायला दृष्टी हवी असते, जिच्या अभावामुळे आपणास जीवनरस लाभत नाही.
एकाच गोष्टीवर लक्ष देणे शिकवले जाते, परंतु त्याने माणसे एकांगी, एककल्ली होत आहे ‌.एकाच ठिकाणी राहणे,एकच मित्र असणे किंवा एकच काहीतरी आवडणे हे
जीवन संकुचित करुन टाकते.जीवन ओसंडून वाहिले पाहिजे.खळखळून वाहणारा झरा जसा , जिकडे तिकडे वाहत जातो,तसे आपले जीवन असले पाहिजे.
जीवनाच्या सर्व अंगांना ते स्पर्शून गेले पाहिजे.एकाच जागेवर अमूक वर्षे काढणे किंवा एकाच ग्रंथाचे शेकडो पारायणे करण्यापेक्षा अनेक ग्रंथ वाचावेत.एकाच गोष्टीचे वेड असण्यापेक्षा ते अनेक गोष्टींचे असावे.एकाच गोष्टींमध्ये किंवा कारणासाठी आयुष्य घालवणे मला तरी आवडत नाही.एखादे कामाचे क्षेत्र असले की तेच आपले जीवन बनवू नये,कामात वाहून घ्यावे, परंतु वाहवत जाऊ नये.जीवन
जगणं म्हणजे तरी काय,आपण किती व्यापक होऊ शकतो,यावर त्याची व्याप्ती आहे.नसता एखाद्या खुराड्यात आयुष्य काढणारे असतातच.जीवन अमूल्य आहे, ते
स्वतः स्वतःसाठी जगायला हवे.प्रतिष्ठा, लौकिक हे बुडबुडे आहेत, त्याच्यामागे न
धावता या सृष्टीच्या मागे धावा, सृष्टीशी
एकरुप होऊन जायची तयारी हवी.तरच जीवन उमलेल.
आपले जीवन लिमिटेड करु नका, ते सर्वांगीण करा.सर्वांना मित्र माना,आपले समजा.हे ब्रम्हांड माझे आहे, इतके व्यापक
व्हा.संकुचित होऊ नका, स्वतःला अधिक मोकळेपणाने पसरवा.आखडू नका,जखडून
नका‌.चव असो की गंध,रुप असो की रंग सर्व आवडले पाहिजे.हा चांगला तर तोही
चांगला वाटला पाहिजे.कुठल्याही पक्षाचे किंवा संघटनेचे आजीवन सदस्य होऊन जीवनाचे मातेरे करु नका, कुणाशीही आणि कशाशी बांधिलकी नको.मनसोक्त
जगा.वारा जसा हवा तसा वाहतो,त्याची दिशा कुणी बदलू शकत नाही.लहान लहान
किडे किती स्वच्छंदी जीवन जगतात,मग आपण का म्हणून दबके, मिंधे जीवन जगायचे?
लक्षात असू द्या,या सृष्टीचा कुणी मालक नाही.ती सर्व जीवांसाठी आहे.जितके तुम्ही तिच्या जवळ जाल तितकी तुम्हाला जवळ घेईल.आपण इथे एकटे नाहीत, आपल्या सोबतीला शेकडो इतर जीव आहेत, त्यांच्याशी मैत्री करा.जगण्याचे साधन जीवन बनवू नका.जीवन एक वेगळी गोष्ट आहे, ते तर ओसंडून वाहिले पाहिजे.
भिरभिरणारी फुलपाखरू 🦋 बघा, किती छोटा जीव, आयुष्य मोजत बसू नका, आहे तोवर मुक्त जगा‌.तुम्हाला कुणी बेड्या ठोकू शकत नाही, परंतु तुम्ही त्या स्वतः अडकून घेऊ नका.
व्यर्थ कचरा डोक्यात घेऊ नका,मूर्खांच्या संगतीत राहू नका, निरुत्साही लोकांना भेटून नका‌.कटकटी पासून दूर रहा.महत्वाकांक्षा सोडून द्या.काही मिळवण्यासाठी स्वतःला विकू नका.आपले
जीवन अबाधित राखण्यासाठी,जीवनाचा
अर्थ समजून घ्या.
जगा ... आणि फक्त जगा.चौफेर, चतुरंग..
व्यापक..आकाशाएवढे!
- ना.रा.खराद, मत्स्योदरी विद्यालय अंबड

0 

Share


D
Written by
Datta Mahamuni

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad