Bluepad | Bluepad
Bluepad
चला बसुयात.....एक बैठक उंची वाढवणारी.
डॉ अमित.
डॉ अमित.
20th Nov, 2022

Share

चला बसुयात.....एक बैठक उंची वाढवणारी.
चला बसुयात.....एक बैठक उंची वाढवणारी.
चला बसुयात.....एक बैठक उंची वाढवणारी.
चला बसुयात.....एक बैठक उंची वाढवणारी.
चला बसुयात.....एक बैठक उंची वाढवणारी.
शीर्षक वाचून गुदगुल्या होतायत ना! व्हायलाचं पाहिजेत...नाही का?कारण काही काही शब्दांत एक वेगळाचं अर्थ दडलेला असतो..तो नुसता उच्चारताच
कृतीचा भास होतो...डोळ्यांपुढे एक वेगळेचं चित्र निर्माण होते...पण हीच तर खरी गंमत आहे...मराठी भाषेची.. नि त्यातून निर्माण होणाऱ्या शब्दांच्या अर्थाची...पण इथ चला बसुयात...याचा अर्थ तुम्ही समजताय तो तर बिल्कुल नाही.😂😂
आज रविवार...संध्याकाळची वेळ.सहज म्हणून माझ्या मुलाने घरातल्या लायब्ररी मधील सर्व पुस्तके काढली नि एकावर एक रचून ठेवली...पाहता पाहता एक छानं छोटासा पुस्तकांचा थर रचला गेला नि त्याच्या शेजारी तो जावून बसला...मी मग लगेच तो क्षणं फोटो मध्ये टिपून घेतला...पुस्तके चांगली त्याच्या खांद्या पर्यंत रचली गेली होती...त्या सर्व पुस्तकांमधील बरीचं पुस्तके त्याने वाचून संपवली आहेत...शनिवार रविवार आठवड्याच्या शेवटच्या या दिवसात चला बसुयात म्हटले की लाळ गाळणाऱ्या कांहीं अपेयपान करणाऱ्या घटनांचा विचार मनात येण्याच्या आजच्या या जमान्यात पुस्तकांचा लळा लावून वाचनाची बैठक बसवण्याची घटना काहीशी दुर्मिळ होत चाललेली आहे..
जर विचारांची उंची वाढवायची असेल तर वाचनाची बैठक हवी...मोबाईल लॅपटॉप टीव्ही या दृकश्राव्य माध्यमांच्या समोर बैठक मारुन बसण्यापेक्षा पुस्तकांच्या संगतीने वाचनाची बैठक नक्कीचं तुमचे जगणे उंची करेल यात शंकाच नाही...कुठल्या कुठल्या क्लब चे सभासद होण्यापेक्षा आपल्या जवळच्या वाचनालयाचे सदस्यत्वं जर आज घरा घरात घेतले गेले तर नक्कीचं आज वाचन संस्कृती बाळसे धरेल...
इतक्यातचं एक नवीन रिसर्च झालेला वाचण्यात आला होता...आपल्या मराठी मध्ये "वाचाल तर वाचाल" अशी एक सुंदर शब्दरचना आहे.. शास्त्रज्ञांनी नुकतेच एक संशोधन केले आहे ज्यामध्ये तुमची वाचनाची आवड तुम्हाला 'दीर्घायुषी' करते असा निष्कर्ष काढला आहे...म्हणजे काय तर तुम्ही वाचन करत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही काळ नक्कीचं वाढवाल...वाचाल तर वाचाल ही उक्ती अगदी शब्दशः खरी होईल...
रोज काही वेळ जर तुम्ही स्वतःस न चुकता वाचनास बसण्याची सवय लावली तर तुमची ही सवय नक्कीचं तुमच्या संपर्कात येणाऱ्या काही व्यक्तीस सुद्धा वाचनास प्रेरित करेल... असाच एक लेख फेसबुक वर वाचण्यात आला होता ..त्यामध्ये एकाने असे लिहिले होते की मी शिवाजी पार्कवर सहज म्हणून फिरायला जायचो त्यावेळी माझ्या जवळ असलेलं पुस्तक मी तिथे वाचत बसायचो...तिथे पार्कवर फिरायला येणारी काही मंडळी उत्सुकतेने माझ्याकडे वळून वळून पाहत होती...एक दोन जणांनी तर मी इथे वाचत बसलोय ही खूपच छानं गोष्ट आहे असे सांगितले देखील..आणि ती व्यक्ती देखील दुसऱ्या दिवसा पासून तिथे येऊन पुस्तक वाचू लागली...हेच जर मी शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर हातात मोबाईल घेवून बसलो असतो तर कोणी ढुंकून देखील मला पाहिले नसते...पण माझ्या हातात असलेल्या पुस्तकाची ही किमया..त्यांनी लिहिलेला हा त्यांचा स्वतःचा अनुभव खूपच मार्मिक असा होता..
मला तर असे वाटते की खरचं पुस्तकं हे असे किमयागार आहे ज्यात तुमचे संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकत असते..पुस्तके आणि चांगली माणसे लगेच कळतं नाहीत त्यांना वाचावचं लागतं..पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारतं आणि सुधारलेले मस्तक कधीचं नतमस्तक होत नाही.माणसाला दोनचं गोष्टी हुशार बनवतात एक वाचलेली पुस्तके आणि दुसरे म्हणजे भेटलेली माणसं.पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वाचण्यासारखा दुसरा आनंद नाही.वाचन करत गेलो की आपल्याला काहीं ना काहीं लिहीत राहण्याची सवय निर्माण होते नि लिहायला लागलो की आपोआप आजूबाजूचे जग नजरेनं वाचायची सवय जडत जाते..
आपल्याकडे १५ ऑक्टोबर ... डॉ अब्दुल कलाम जयंती हा दिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा केला जातो..गेल्या महिन्यातच तो होवून गेला.. डॉ अब्दुल कलाम या महान व्यक्तीच्या स्मृतीस नमन करून आपणही वाचत राहण्याची प्रेरणा घ्यावी...नि रोजच्या धकाधकीच्या धावपळीच्या वेळेतून काही वेळ वाचनासाठी काढून नित्यनेमाने वाचनास बसण्याची सवय आपण लावावी हीच माझी या लेखातून सर्वांस कळकळीची विनंती आहे ..
तेंव्हा चला बसुयात... बसताय ना...बसायलाच पाहिजे...नाही का?
डॉ अमित.
रविवार.
२० नोव्हेंबर २०२२.

229 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad