Bluepad | Bluepad
Bluepad
येवा, कोकण आपलाच आसा!
बाबू घाडीगांवकर
बाबू घाडीगांवकर
20th Nov, 2022

Share

येवा, कोकण आपलाच आसा!
कोकण प्रांत एकदा प्रत्यक्ष फिरून पाहिला तर कोकण म्हणजे धरतीवरचा स्वर्ग का म्हणतात याची प्रचिती येते. कोकणचं सौंदर्य सदासर्वदा खुलून दिसत असले तरी पावसाळ्यात ते जरा जास्तच लोभस दिसतं. कोकणचा पाऊस तसा जगप्रसिद्ध. कोकणातल्या पावसाचं वर्णन अनेक दिग्गज साहित्यिकांनी आपापल्या पुस्तकांत भरभरून केलं आहे. धुरकट वातावरणात संततधार पडणारा पाऊस काही वेळेस वैताग आणत असला तरी अनेक वेळेस तो अनुभवणाऱ्यास, बघणाऱ्यास स्वर्गीय आनंद देतो. गावात कौलारू लाल छप्परांवरून पडणारा पाऊस, झाडा-माडांवरून टपटपणारा पाऊस, खळखळ वाहणारे पऱ्हे, ओहळ, दुथडी भरून ओसंडून वाहणाऱ्या नद्या, मळ्यात शिरलेलं नि तुडुंब भरलेलं पाणी हे सारं पाहताना जे नेत्रसुख मिळतं, त्याला तोड नाही.
कोकण प्रांतास लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा हे कोकणास मिळालेलं दैवी वरदान म्हणावे लागेल. येथील स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारे, रुपेरी वाळू, चंदेरी मासळी, लाटांवर डुलणाऱ्या होड्या, किनाऱ्यावरच्या माडा- पोफळीच्या वाड्या हे चित्रच किती सुंदर दिसते! येथील चवदार मासळीचा आस्वाद घेताना एक अद्भुत स्वर्गसुख लाभते असंच म्हणावं लागेल.
कोकणातली माणसे फणसासारखी रसाळ व मधुर स्वभावाची आहेत जे जगजाहीर आहे. कोकणातील माणसांच्या याच स्वभावगुणधर्मामुळे कोकण प्रांतात नोकरी धंद्यानिमित्त आलेला बाहेरचा माणूस अल्पावधीत इथला होऊन जातो. येथील प्रेमळ वातावरणात मिसळून जातो. असे अनेकजण येथे स्थिरावले असून आता अस्सल ' कोकणस्थ ' बनले आहेत. कोकण प्रांतातली ही जादू अशी अनेकांस येथे खिळवून ठेवते हे वास्तव आहे.
कोकणातील माणूस उत्सवप्रिय व सणांचा भोक्ता आहे. वर्षभरातील जवळपास सारे सण तो मोठ्या उत्साहात साजरे करतो. त्यातही गणपती, होळी हे कोकणात साजरे होणारे मोठे सण आहेत. कोणताही सण साजरा करताना तो कधी हात आखडता घेत नाही हे कोकणातील माणसांचं वैशिष्ट्य आहे. सणासुदीच्या काळात पोटापाण्यासाठी शहरांकडे गेलेले अनेकजण कोकणातल्या आपल्या घरांकडे येतात. कोकण प्रांत मुला-माणसांनी फुलून जातो. सणासुदीच्या दिवसांत कोकणातील निसर्गही नटलेला दिसतो.
कोकणातील मुख्य व्यवसाय शेती असला तरी आता ही शेती बरीच कमी झाली आहे. भात, नाचणी, भुईमूग, कुळीथ, उडीद यांची शेती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पुर्वी शेतीने बहरलेली माळरानं, कुणगे आता पडसार व ओसाड दिसतात. मात्र तरीदेखील आज पावसाळ्यात आणि उन्हाळ्यातही कोकणातील शेतमळे फार सुंदर दिसतात.
कोकण प्रांतास भगवान परशुरामाची शापित भूमी म्हणत असले तरी कोकणात अनेक प्रसिद्ध व जागृत देवस्थानं आहेत. कोकणातील माणूस ' देवभोळा ' म्हणूनही परिचित आहे. काही प्रसिद्ध देवस्थानांबरोबरच अनेक छोटी मोठी देवस्थानं कोकणात पावला पावलावर आढळतात. कदाचित तेहतीस कोटी देवांचा राबता कोकणात असावा इतकी ही देवस्थानं आहेत. तरीही प्रत्येक देवस्थानाची स्वतःची अशी ओळख व स्वतःचा असा महिमा आहे हे विशेष.
तसा सांस्कृतिक क्षेत्रातही कोकण प्रांत कमी महत्वाचा कधीही नव्हता व आजही नाही. कोकणातील दशावतार, प्रासादिक भजन, जाखडीनृत्य, भारूड, नाटक, दिंडी, शास्त्रीय गायन, चित्रपट क्षेत्रातील अनेक नररत्नांची खाण कोकणभूमी आहे. याशिवाय आत्तापर्यंतच्या भारतरत्नांपैकी सर्वाधिक ' भारतरत्न ' कोकणातील आहेत हे सुद्धा अभिमानास्पद असेच आहे. अनेक थोर विचारवंत, क्रांतिकारक, समाजसुधारक कोकण प्रांतानेच देशाला व जगाला दिले आहेत. कोकणभूमी ही विचारवंतांची भूमी आहे. पारंपारिक व समृद्ध संस्कृतीची कास न सोडता पुरोगामी विचारसरणी जोपासणारा हा ऐकमेव प्रांत असावा हे आवर्जून सांगावसं वाटतं ते यामुळेच.
कोकण प्रांतात फार मोठे उद्योगधंदे नसले, फार मोठ्या बाजारपेठा नसल्या तरी तरी येथील प्रदेश तसा सुजलाम सुफलाम आहे. येथील केवळ वनराईचा विचार केला तरी कोणीही मनुष्य जंगली मेवा आणि कंदमुळांवर आपले जीवन कंठू शकेल इतकी सुबत्ता येथील वनराईत आहे. मासे, खेकडे, शिंपले, रानभाज्या येथे सर्वत्र मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. फार मोठी अवास्तव स्वप्नं कधीही उराशी न बाळगणारा येथील माणूस नेहमीच सुखी व समाधानी दिसतो. त्याला मुले, सुना, नातवंडे, पै-पाहुणे यांच्या गोतावळ्यात राहायला नेहमीच आवडतं. मात्र गेल्या काही वर्षांपासून कोकण प्रांतालाही शहरीकरणाचा स्पर्श झाला आहे. येथील घरांची, वाड्यांची, गावांची रचना व रुपडेही दिवसागणिक बदलत चालले आहे. पुर्वी सर्वत्र दिसणारी मातीच्या भींतींची, लाल कौलारु घरे आता येथे अगदीच तुरळक झाली आहेत. अनेक ठिकाणची वनराई ' टाऊनशीप ' च्या आक्रमणात रसातळास गेली आहे. दिवसेंदिवस अधिक विकृत, कुरुप व अनैसर्गिक दिसणारं हे चित्र आता कोकण प्रांताची नवी ओळख बनू पाहत आहे हे निश्चितच दुर्दैवी आहे. तरीही कोकण अद्याप फार सुंदर व स्वर्गीय आहे ही जमेची बाजू. ते तसंच रहावं असे वाटणं स्वाभाविक आहे. कोकणचं स्वर्गीय सौंदर्य डोळ्यांत साठविण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक कोकण प्रांतास भेट देतात. प्रत्येक कोकणस्थ नेहमीच नव्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतो. जणु तो सांगत असतो, " येवा कोकण आपलाच आसा! "
बाबू घाडीगांवकर
येवा, कोकण आपलाच आसा!

240 

Share


बाबू घाडीगांवकर
Written by
बाबू घाडीगांवकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad