Bluepadइंटरनेटच्या माध्यमातून कला शिका
Bluepad

इंटरनेटच्या माध्यमातून कला शिका

R
Ramya Deshpande
18th Jun, 2020

Shareइंटरनेट आजच्या युगातील मोठा गुरु आहे. इंटरनेटमुळे ज्ञानसंवर्धंनाच्या नुसत्याच व्याख्या बदलल्या नाहीत तर त्याच्या कक्षा ही फार फार रुंदावल्या आहेत. हा लेख वाचण्यासाठी देखील तुम्ही इंटरनेटचा वापर केला आहे. जगात जे जे विषय आहेत त्या त्या प्रत्येकावर भाष्य आणि माहिती तुम्हाला इंटरनेट वर अगदी सहज उपलब्ध आहे. “जगत जे आहे ते सर्व महाभारतात आहे,’ असं म्हटलं जातं त्यामुळे ‘व्यासोच्छिष्टम जगत सर्वम’ अशी एक उक्ती बोलली जाते. आज इंटरनेट देखील महाभारताप्रमाणे सर्वस्पर्शी झालं आहे. ज्या लोकांना नवीन काही शिकण्याची इच्छा आहे ते इंटरनेटच्या सर्च इंजिन वर लिहून त्याच्या विषयीच्या शेकडो वेबसाइट आणि युट्यूबवरचे विडिओ बघून शिकू शकतात.

इंटरनेटवर शैक्षणिक माहितीपासून सामान्यज्ञान आणि छंद जोपासण्यासाठी अनेक साइट्सवर मार्गदर्शन उपलब्ध आहे. Quora प्रमाणे प्रश्नोत्तरे आणि चर्चेसाठी एक प्लॅटफॉर्म आहे. तसं Coursera सारखी जगातील सर्वोच्च विद्यापीठात आपल्या आवडत्या विषयात ऑनलाइन प्रवेश घेऊन, अभ्यास करून, परीक्षा देऊन, सर्टिफिकेट देणारी वेबसाइटदेखील फार लोकप्रिय आहे. शैक्षणिकदृष्ट्या मार्गदर्शन करणार्‍या अनेक वेबसाईट्स आहेत. याशिवाय सॉफ्टवेअरसाठी आवश्यक कोडिंगच्या वेगवेगळ्या लॅंग्वेज शिकणं, कोरल ड्रॉमध्ये डिजाइन बनवणं, फॉटोशॉपमध्ये फोटो एडिट करणं, इल्युस्ट्रेटर, इन डिजाइन, फ्लॅश, स्काउट, ड्रीमविवर अशा सॉफ्टवेअर्सची संपूर्ण माहिती घेऊन तुम्ही त्यात तरबेज होऊ शकता. शेतीची आवड असेल तर मोठ्या शेतापासून छोट्या बागेपर्यंत आणि कुंडीपासून टेरेस गार्डन पर्यन्त सर्व पर्याय आहेत. यासोबतच तुम्हाला चित्रकला, शिल्पकला, ओरिगामी कला, स्केचिंग, पेन्सिल आर्ट्स, क्राफ्ट्स बनवणे यात आवड असेल तर याविषयीचे विडिओ संपूर्ण माहिती सह तुम्ही पाहू शकता. सध्या घरातील एखाद्या फाटक्या ड्रेस, जीन्स पासून नवीन कलात्मक वस्तू बनवणं किंवा साध्या स्लीपर पासून स्टायलिश चप्पल बनवण्याचे ट्रेंड आहेत. आजकाल आपण आपल्याच व्यापात फार व्यस्त असल्यामुळे आपल्या आवडीच्या कला शिकण्यासाठी कधी वेळच मिळाला नव्हता. आता लॉकडाउनमुळे तुम्हाला तो वेळ नक्कीच मिळाला आहे आणि आता तुम्ही या कला शिकू शकता.

ओरिगामी ही कला मुळची चीनची पण जपानमध्ये तिचा प्रसार झाला म्हणून तिला जापनीज कला म्हणतात. यात एका कागदापासून हव्या त्या कलात्मक वस्तू बनवता येतात मात्र ह्या वस्तू बनवत असताना कागदाला फक्त विविध प्रकारच्या घड्या घातल्या जातात. कुठे कात्री लावली जात नाही की गोंद लावली जात नाही. ह्या वस्तु फार आकर्षक दिसतात. यात शक्यतो घोटीव कागद वापरला जातो पण आपण सध्या लॉकडाउनमध्ये तुम्हाला घोटीव कागद मिळणार नाहीत. त्या ऐवजी तुम्ही जुन्या वह्यांची पानं आणि जुने वर्तमान पत्र वापरुन त्या करू शकता आणि नंतर त्याला रंग देऊ शकता.

आज एखाद्या फोटोचे स्केचिंग करून देणारे अॅप्स मोबाइलवर उपलब्ध आहेत पण त्याऐवजी तुम्ही स्वत: हे स्केचिंग शिकलात तर किती मस्त नाही का! तुम्ही Sketchbook by Abhishek ह्या हिन्दी युट्यूब चॅनेलवर स्केचिंगचं पूर्ण प्रशिक्षण घेऊ शकता. यात तुम्हाला कोणती पेन्सिल कशासाठी वापरावी इथपासून वेगवेगळ्या टेक्निक शिकवल्या जातात.
तुमच्याकडे शिवणाची मशीन असेल आणि जुन्या साड्या असतील तर त्यांचा कलात्मक उपयोग करून त्यांचा पुनरुपयोग केला जाऊ शकतो. तसंच जीन्स, ओढण्या, पॅंट्स, कोणतेही फाटके कपडे यापासून अशा विविध वस्तू बनवता येतात. आपल्याला जर भरतकाम, विणकाम येत असेल आणि त्याच्या वस्तू तुमच्याकडे असतील तर तुम्ही या वस्तूंवर नक्षी काढू शकता. आणि जर तेही येत नसेल तर ते ही तुम्ही इंटरनेटवर पाहू शकता.

टिश्यू पेपर किंवा वर्तमान पत्रांपासून तुम्ही वेगवेगळी फुलं बनवू शकता. गिफ्ट आर्टिक्ल्स आणि गिफ्ट कवर्स बनवू शकता. Govrin Creative Ideas ह्या युट्यूब चॅनलवर अशा अनेक वस्तू बनवण्याचं मार्गदर्शन केलं जातं.
अशा प्रकारे आपण अनेक कला इंटरनेटच्या माध्यमातून शिकू शकता.

13 

Share


R
Written by
Ramya Deshpande

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad