Bluepadचला जाऊ वनाकडे
Bluepad

चला जाऊ वनाकडे

Vinisha Dhamankar!
Vinisha Dhamankar!
30th Nov, 2021

Shareएक सुंदरसं बेट | माय अवनीची भेट |
सर्व सोडुनिया थेट | चला जाऊ वनाकडे ||
झालो सारेच गुमान | नको फुकाचा सन्मान
नको सामान सुमान | चला जाऊ वनाकडे ||
दाटे विषाणूची भीती । मरणकळाही सोसती।
अस्त्र शस्त्रही ना पुरती। चला जाऊ वनाकडे ।।
रसायनांच्या विळख्यात । आलो सारेच जाळ्यात ।
खुल्या हिरव्या मळ्यात । चला जाऊ वनाकडे  ।।
ठाव घेतला धरणीचा | शाप लागे धरित्रीचा |
भोग आपुल्या करणीचा | चला जाऊ वनाकडे ||
निळं छप्पर माथ्यास | नदी नितळ काठास |
मनी दाटेल उल्हास | चला जाऊ वनाकडे ||
तिथे वाघ सिंह हत्ती | हरिण माकडे ही कित्ती |
ती तयांचीच वस्ती | चला जाऊ वनाकडे ||
तिथे नको घुसखोरी | लांडी लबाडी अन् चोरी |
आत्मा असावा बिल्लोरी | चला जाऊ वनाकडे ||
तिथे नको राजेशाही | नको हावही जराही |
माणसाचा धर्म वाही | चला जाऊ वनाकडे ||
आधुनिकतेची खाज | असे माणसाचा माज |
तिथे निसर्गाचे साज | चला जाऊ वनाकडे ||
तंत्र यंत्रांची सावली | इथे पावलो पावली |
तिथे निसर्ग माऊली | चला जाऊ वनाकडे ||
कसले आहे तंत्रज्ञान | उसने मशीनचे ज्ञान |
घेऊ मातीतले ज्ञान | चला जाऊ वनाकडे ||
नको गरीब श्रीमंत | पैसा नसे गुणवंत |
होऊनिया धिरवंत | चला जाऊ वनाकडे ||
वन प्राण्यांचे असावे | प्राणी म्हणून जगावे |
प्राणा प्राणास जपावे | चला जाऊ वनाकडे ||
आता कामाला लागूया | स्वप्न सत्यात आणूया |
जगणं जवळ करूया | चला जाऊ वनाकडे ||

घरगुती हिंसा बाबत माझ्या दुसरा लेख वाचा या लिंक वर - https://www.bluepad.in/article?id=5e9e7208618e0d0007fe4a70

0 

Share


Vinisha Dhamankar!
Written by
Vinisha Dhamankar!

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad