Bluepad | Bluepad
Bluepad
भगवद्गीता
Girish
Girish
24th Sep, 2022

Share

विश्व़रूपदर्शन योग.
अर्जुन म्हणाला ! तुम्ही मला अध्यात्माचा उपदेश केलात. त्या तुमच्या उपदेशाने माझ्यातील मोह भावना पूर्णपणे नष्ट झाली आहे. हे कमलनयना ! मी तुझ्या कडून उत्पत्ति व नाशासंबंधी विस्ताराने ऐकले व तुझे अविनाशी माहात्म्य ही ऐकले. हे परमेश्वरा ! तू तुझ्या स्वरूपाविषयी सांगितलेस त्यामुळे मला तुझे ईश्र्वरी रूपाचे ऐश्र्वर्य पहाण्याची इच्छा आहे. हे प्रभू ! मला ते रूप पाहणें शक्य असेल तर हे योगेश्व़रा ! मला तुमचे अव्यय रूप दाखवा. श्रीभगवान म्हणाले, हे पार्था ! माझी शेकडो, हजारो अशी रूपे पहा. माझे अनेक असे दिव्य आकार व वर्ण पहा. माझ्या ठायी असलेले आदित्य, मरूत, रुद्र अश्विनी व वसूंना पहा. तू पूर्वी कधी पाहिली नसशील अशी आश्चर्यकारक रूपे पहा. हे गुडाकेशा ! माझ्या देहा मध्ये सर्व जग सामावले आहे ते पहा. तसेच तुला भविष्य काळातील कांहीं पहायचे असेल तर पहा. संपूर्ण चराचर येथे आहे. तुझ्या डोळ्यांनी तू ते पाहण्यास असमर्थ असल्याने मी तुला माझे योग ऐश्र्वर्य पाहण्यासाठी दिव्यदृष्टी देतो. संजय म्हणाला, हे राजा ! असे बोलून महा योगेश्वर कृष्णाने आपले परम रूप अर्जुनास दाखवले. नाना अद्भुत देखावे, अनेक अनेक मुखे, नेत्र, किती अलंकार,, अनेक दिव्य शस्त्रे. अनेक प्रकारच्या माळा वस्त्रे व दिव्य गंधाचे लेपन असे आश्र्चर्यजनक व सर्वव्यापी असे रूप पाहिले.
एकाच वेळी अनेक सूर्य उगवले तर जेवढे तेज दिसेल तेवढे भगवंताचे तेज होते. अर्जुनाने तेथे देवाच्या अंतरंगात विविध प्रकारची रूपे पाहिली व एक विश्वरूप पाहिले. ही रूपे फक्त अर्जुनालाच दिसली. रोमांचित झालेला अर्जुन आश्चर्याने थक्क झाला होता तो देवास शिरसा नमस्कार करून प्रार्थना करू लागला. तो म्हणाला हे देवा तुझ्या देहात मी अनेक देव व देवांच्या समुदायाने पाहतो आहे तसेच तुझ्यात असलेले कमळावर बसलेले ब्रह्मदेव ,शिवशंकर, ऋषि व नाग कुळांना पाहिले. किती नेत्र, उदरे, वदने आणि अनेक पाय असलेली अशी अनंत रूपे पाहिली आदि अंत नसलेले विश्वेश्वराचे रूप पाहिले. हातात गदा चक्र असलेले व मस्तकावर मुकुट धारण केलेले व अग्नि व सूर्याप्रमाणे असलेले तुझे तेजस्वी रूप खरेतर डोळ्यांनी पाहणे पण कठीण असे तुझे रूप मी आज पाहतोय तू या जगाचा मूळ आधार आहेस, तू अविनाशी सनातन पुरुष व शाश्वत धर्माचे रक्षण करणारा भगवान आहेस तुला आदि अंत मध्य नाही तुझी शक्ती अमर्याद आहे तुला असंख्य हात आहेत . चंद्र व सूर्य हे तुझ्या असंख्य डोळ्यां पैकीच एक आहेत. तुझे मुख अग्नीप्रमाणे आहे व तुझ्या तेजाने हे सर्व जग प्रकाशमय झाले आहे, तप्त झाले आहे.
सर्व दिशांनी व्यापून टाकणारे असे अद्भुत व उघड विश्वरूप पाहून आकाश पृथ्वी व अंतराळ व्याकूळ झाले आहेत सर्व देवगण हे तुला शरण येतात, भयभीत झाले असता तुला नमस्कार करतात तुझी प्रार्थना करतात, महर्षी आणि सिद्धांत समुदाय शांतीपाठ म्हणून मंत्र म्हणून सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत असतात वसू आदित्य शिव सिद्धगण विश्वेदेव अश्विनी पितृगण गंधर्व असुर व सर्व देवदेवतांची समजून तुझ्याकडे विस्मयाने पाहत आहेत हे महाबाहो, तुझे हे विशाल शरीर तुझी असंख्य मुखे, तुझे असंख्य डोळे व हात पाय आणि उदर असलेले तुझे हे विक्राळ अशा दाढा असलेले रूप पाहून मी व सर्व लोक व्याकूळ झाले आहेत. तुझे हे तेजस्वी विशाल मुख आणि डोळे आणि आकाशाला भिडणारे व अनेक रंगी असे रूप पाहून माझे धैर्य सुटत चालले आहे व मी गलीतगात्र झालो आहे. तुझ्या मुखातील विक्राळ दाढा व अग्नीसमान तुझी वदने पाहून मला दिशांचे भान राहिले नाही, मला कसलेही सुख वाटत नाही. हे जगाचे आश्रयस्थान असणाऱ्या देवा माझ्यावर प्रसन्न व्हा. सर्व कौरव, योद्धे, भीष्म, द्रोण, कर्ण, आमच्या बाजूचे सर्व वीर हे मला तुझ्या मुखात शिरताना दिसत आहेत. तुझ्या अक्राळ विक्राळ अशां मुखात ते जात आहेत. काहींचि मस्तके तुझ्या दाढांमध्ये अडकून चुरडली जात आहेत असे दिसतं आहे. जसे अनेक नद्यांचे प्रवाह हे शेवटी सागरात मिसळतात त्याप्रमाणे सर्व योद्धे व शुर वीर तुझ्या अग्नीसमान असणाऱ्या तुझ्या मुखांत प्रवेश करीत आहेत. जसे जळणाऱ्या ज्योती कडे पतंग पूर्ण वेगाने नष्ट होण्यासाठी झेपावत असतात तसेचं हे सर्व तुझ्या मुखात प्रवेश करताना दिसत आहेत. हे विष्णो ! अग्नीप्रमाणे असणाऱ्या तुझ्या मुखातील जिव्हेने चाटत आहेस असे दिसते आहे व तुमच्या तेजःपुंज रूपाने सर्व जगाला व्यापून राहिला आहात असे दिसते आहे. हे उग्र रूप असलेल्या देवा तुम्ही कोण आहात, तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा, मी तुम्हाला नमन करतो आहे. तुम्ही आद्य पुरूष आहात, मी तुम्हाला जाणू इच्छितो. तुमची प्रवृत्ति काय आहे हे मला समजत नाही. श्री भगवान म्हणाले ! मी महान असा काळ असुन जगाचा संहार करण्यासाठी माझा अवतार झाला आहे. तुझ्या वाचून दोन्ही सैन्यातील योद्धयांचा नाश होणार आहे. यासाठी तू लढ व यश मिळव व शत्रु वर विजय मिळवून राज्य कर. हे सव्यसाची ! मी सर्वांना आधीच मारले आहे असे जाणून तूं त्यांच्या नाशासाठी निमित्त हो. जयद्रथ, भीष्म, व अनेक वीर तसेच कर्ण यांना मी मारले आहे असे समजून शोक न करता तूं मार. तू लढाई कर कारण तू शत्रू वर विजय मिळवणार आहेस. संजय म्हणाला, कृष्णाचे हे बोलणे ऐकून भीती ग्रस्त झालेला अर्जुन थरथरत व सद्गदित होऊन कृष्णा ला नमस्कार करून बोलू लागला. अर्जुन म्हणाला, हे ह्रषिकेशा ! तुला सिद्ध पुरुष नमस्कार करीत आहेत, राक्षस भयभीत होऊन पळत आहेत व तुझे नाम ऐकून जग आनंदी झाले आहे. हे देवा ! तू ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ आदि पुरुष आहेस. जगताचे आश्रयस्थान आहेस. अशा हे अनंता तुला सर्व जण नमस्कार करणारचं. तू आदि देव आहेस, पुराण पुरुष आहेस, तू सर्वज्ञ व श्रेष्ठ असे आश्रयस्थान आहेस. हे अनंता ! तूं ही सृष्टी व्यापून राहिला आहेस. सूर्य, चंद्र, अग्नि, वायु व प्रजापती तू आहेस. त्यामुळे मी तुला हजार वेळा नमस्कार करतो. पुनः पुन्हा नमन करतो. पुढे मागे असलेल्या तुला तसेच सर्वत्र व्यापून राहिलेल्या तुला नमस्कार करतो. अपार शक्तिमान, विक्रमी असा तू सर्व व्यापी आहेस तुला माझा नमस्कार.
मी तुला जाणत नसलेने, तुझी महानता माहित नसल्याने तुला मित्र मानून कधी अनादराने बोललो असेन, किंवा प्रेमापोटी चुकीचे बोललो असेन, तुझ्या बरोबर खेळत असताना शयनगृहात असताना, भोजनासाठी एकत्र असताना थट्टेने काही अपमान जनक , अनादराने बोललो असेन तर मी प्रार्थना करतो की मला क्षमा कर. तुच पूज्य गुरू तुच आद्य व तुझ्याशिवाय तुझ्या सारखा कोणीही नाही. या त्रिलोकात तुझ्या पेक्षा थोर कोण असेल काय? म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो. हे देवा ! मी तुमची क्षमायाचना करतो. जसा पुत्राला पिता, मित्राला मित्र तसेच प्रियकर प्रियतमेला क्षमा करतो त्या प्रमाणे तुम्ही मला क्षमा करा. कधीही न पाहिलेले असे तुमचे रूप पाहून मी आनंदित झालो असलो तरी मी भयभीत झालो आहे. हे जगन्नियंत्या ! प्रसन्न होऊन तुमचे चतुर्भुज रूप दाखवा. शिरावर मुकुट व हातामध्ये गदा, चक्र असलेली अशी तुमची चतुर्भुज मूर्ती मला पहायची आहे. तरी तुम्ही ही माझी ही इच्छा पूर्ण करा.
श्री भगवान म्हणाले , तुझ्या वर प्रसन्न होऊन माझ्या योग सामर्थ्याने तुला दर्शन दिले, माझे अनंत , तेजस्वी विश्व़रूप तू एकट्याने च पाहिले आहेस. हे कुरूवीर श्रेष्ठ अर्जुना ! वेदांचा अभ्यास करून , दान करून, पुण्यकर्म करून अथवा तप करूनही लोकांना मला पाहणे अशक्य आहे. तुझ्या शिवाय कोणीही मला पाहिलेले नाही. तू त्यामुळे भ्रांतचित्त होऊ नकोस. माझ्या या रूपाने व्यथीत होऊ नको. तू आता भयमुक्त होऊन प्रेमभावाने माझे पहिले रूप पाहा. संजय म्हणाला , वासुदेवाने असे सांगून त्याला आपले पहिले रूप दाखवले. व आपल्या सौम्य रूपात येऊन भयभीत झालेल्या अर्जुनाला आश्व़स्त केले.
अर्जुन म्हणाला, मी हे तुझे सौम्य रूप पाहून स्वस्थ व शांत झालो आहे.
श्री भगवान म्हणाले ! अर्जुना, तू माझे दुर्लभ असे रूप पाहिलेस जे पाहण्यासाठी देव पण प्रयत्न करत असतात. माझे हे मूळ रूप यज्ञ, वेदपाठ, दान, तप, करून सुद्धा दिसणे शक्य नाही. हे शत्रु वर विजय मिळवणाऱ्या अर्जुना, अनन्य भक्तिने मला पाहणे आणि लीन‌ होणे तुलाच फक्त शक्य आहे.
हे अर्जुना ! जो सर्वांशी मित्रत्वाने वागतो, सर्व कर्मे परमेश्र्वराची आहेत या भावनेने कर्म करतो, मला परमश्रेष्ठ मानुन माझ्या भक्तित रममाण झालेला असा भक्त मला प्राप्त होतो.
अकरावा अध्याय पूर्ण.

183 

Share


Girish
Written by
Girish

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad