Bluepad | Bluepad
Bluepad
नवे राज्य,नव्या महापालिका-जिल्हे कुणासाठी?
Amol Kale
Amol Kale
23rd Sep, 2022

Share

वर्तमानपत्रात एक ठळक बातमी रोज वाचायला मिळते ती म्हणजे "वेगळे विदर्भ राज्य निर्माण होणार,नव्हे तर आम्ही ते मिळवणारच!"...विदर्भातील डझनावारी नेते ही भाषा वापरत असतात.त्याजोडीला वेगळा कोकण,वेगळा मराठवाडा ह्याही मागण्या कानावर पडत असतात.देशात वेगवेगळ्या राज्यात त्यांच्या त्यांच्या प्रांतासाठी वेगळे राज्य सोबत वेगवेगळ्या महापालिका,जिल्ह्यांचाही विचार अधून मधून पहावयास मिळतो.
आता ह्या वेगळ्या राज्याच्या,वेगळ्या पालिकेच्या मागण्या कशासाठी हा प्रश्न मला काही सुटत नाही.
त्यामुळे तो तुमच्यापुढे मांडण्याचा अट्टहास...!!
प्रश्न-उपप्रश्न यांची मालिका खालीलप्रमाणे अशी....
१)अशा मागण्या केल्याने काय साध्य होत असावे ????
२)नेतेमंडळींना सतत चर्चेत राहता यावे म्हणून...?!
३)राजकीय सौदेबाजी करता यावी म्हणून ?
४)स्वतंत्र राज्याचा निर्माणकर्ता म्हणून मुख्यमंत्रीपदासाठी ?
५)की,तुलनेने मागास भागात विकास गंगा म्हणावी तशी वाहिली नाही व त्याकडे लक्ष वेधले जावे म्हणून?
वरील प्रश्नांची जंत्री भली मोठी आहे.
परंतु,प्रश्नमर्यादा बाळगलेली बरी!
भारत जरी एक देश,एक राष्ट्र असला तरी आपल्या देशात प्रत्येकाचा भारत हा वेगळा आणि निराळा आहे.इथे प्रांतिक-उपप्रांतिक,भाषिक अस्मिता एकमेकांना सहज भिडणाऱ्या आहेत.त्यामुळे प्रभावीपणे मागणी केल्याशिवाय मागणी पूर्णही होत नाही असा काहीसा आतापर्यंतचा अनुभव आहे.
मात्र,वरील स्वतंत्र राज्याच्या आणि महापालिकेच्या,जिल्हा निर्मितीच्या मागण्या लोकांच्या/मतदारांच्या हक्कासाठी कमी आणि राजकीय सोयीसाठी जास्त भासतात/वाटतात.त्यावर औषधी मात्रा म्हणून बऱ्याचदा 'प्रशासकीय सोय' सांगत वेळ मारून नेली जाते.
कारण,काही नेतेमंडळी अशा मागण्या करताना सध्याचे उर्वरित राज्य,प्रांत,परिसर आपल्यावर कसा अन्याय करतो आहे हे आपापल्या मतदारांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न करतात.
'विकास अनुशेष','प्रांतीय समस्या','मनासारखे राजकीय प्रतिनिधित्व' मिळावे म्हणून वरीलप्रमाणे मागण्या करणे ही गोष्ट काही अंशी खरी आणि व्यवहारी असली तरी अशाप्रकारच्या मागण्या करताना आपल्याच देशातील आपले बंधू-भगिनी एकमेकांना दुष्मन वाटू नयेत याचीही काळजी घेतली गेली पाहिजे.
एकत्र राहण्याने प्रांताची ताकद वाढते सामाजिक एकजिनसीपणा, एकसंधता वाढण्यास मदत होते.केंद्रही बडे राज्य म्हणून तत्काळ दखल घेण्यास तत्पर असते.पण,तसे प्रयत्न करण्यासाठी कुणीही धजावत नाही.प्रयत्न करूनही हाती काही येत नसल्यास लोकभावनेचा सन्मान म्हणून सार्वमतासारखी प्रक्रियाही अवलंबली गेली तरी दुमत असण्याचे कारण नाही.
अन्यथा,तऱ्हेवाईक लोकांच्या आपल्या भारतात(हिंदुस्थानात) अखंडपणे चालणाऱ्या 'एक देश-एक राष्ट्र' या उदात्त हेतु,अतूट करार,संकल्प,शपथ-प्रार्थनेच्या पावित्र्याला नख लावण्याचा घाणेरडा प्रयत्न करणाऱ्या देशविघातक शक्ती सक्रिय होण्यास मदत होते.याची प्रत्येक राजकीय व्यक्तीनी दखल घेतली पाहिजे.
-अमोल काळे
भ्र.क्र:8390800009
नवे राज्य,नव्या महापालिका-जिल्हे कुणासाठी?

171 

Share


Amol Kale
Written by
Amol Kale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad