Bluepad | Bluepad
Bluepad
देहाचियारंगी २५
Vidyadhar Pande
Vidyadhar Pande
23rd Sep, 2022

Share

सिमींता
मी स्वयंपाक करत होते. संदीपचा ऑटो येऊन दारात उभा राहिला. त्यातून आई-बाबा उतरले . मला आनंद झाला . त्यांचे दर्शन घेऊन पाणी दिले. आई लगेच चुलीजवळ बसली लागली भाकरी करायला. मी म्हणाले ,
" राहू दे ग आई अगोदर चहा घे . घरी एवढं काम इथे तरी आराम घे की." आई म्हणाली,
" दशम्या आणल्यात सोड त्या आन वाढ ताटं बापलेकाली. मिरचीचा खार आणलाय तुला बरणीत .दोन दोन मिरच्या ठीव परातीत."
मी" हो " म्हणाले आणि ताटं वाढू लागले . तेवढ्यात मामी शेजारच्या घरून आल्या .त्यांना ऑटो पाहून संदीपच आला असावा याची खात्री होती. पण विहीणव्याही पाहून त्याही आनंदी झाल्या.त्यांना माझ्या लग्नाविषयी उत्सुकता होती .संदीपला तेच त्यांना बोलायचं होतं .मी म्हणाले ,
" मामी वाढु का ताट लगेच जेवून घ्या ."
त्यांना चांगले ऐकू येत होते .डोळे ही चांगले होते .त्या म्हणाल्या,
" ईनी बरुबर खाईन तुकडा. संदीप भाऊला तुज्या बाबायली खाऊ घाल की पोट भरून. लय दिसाला आलेत बरं वाटलं ." मग माझ्या आईने विचारलं ,
"गरम गरम करून खाऊ घालती कावं सिमू ?"
" तुजी लेक माजी लेक झालीया. लई गुणाची भी हाय. तिच्याकड बगून माजा जीव झूराया लागलाय.म्या आता किती दिसाची हाय,तिला सोबत ? तिचं काई तरी बगा."
"लोक नाव ठीवतील ?"
"घरचेच घरामधी घुसतेत तवा लोकं कुठ असत्यात ?सुना बाळाची अब्रू का भाजीपाला हायका कुणीबी लुचाया.त्यापरिस लगीन करतो का मणला नाय.तव्हा वाटलं असतं रंडीमुंडी सांभाळायला खानदानात कुणीतरी शानसुरत माणूस जनमलय. इजत घ्याया सगळे बसले हायीतकी.लावून टाक लिकीच लगीन."
संदीप आणि बाबा जेवन करुन बाहेर ओट्यावर बसले होते.मी ताट करू लागले.तेव्हा मामी आणि आई बोलू लागल्या होत्या. पुन्हा माझ्या डोक्यात नाच ग घुमा नाचू लागली.रणजीत देसाईंनी उतारवयात माधवीताईना दिलेला घटस्फोट . पुन्हा आठवला.तेवढ्यात आईने मला विचारले ,
"सिमू तुजा डांबऱ्या भावजी मागच्या वेळेस ईशीत आटू आडवून आमच्या संग घरी आल्ताकी. आज दिसना गेलाय.?"
" ते पायी दिंडीत वारीला गेलेत. नाहीतर सारखे येत असतात ." मामी म्हणाल्या,
" व्हयकी डांबऱ्या गेला तसं देवळ बुचबुच लागायलय.रोज बोलणाऱ्या आयाबाया बी दिसणात.करमणाबी गेलय देवळात.कंदी हाय मुटी एकादस ?" मी म्हणाले,
" आणखी आठ दिवस आहे."
खरंच गावात भणभणी सुटली होती. गेली वीस पंचवीस दिवस मी पुस्तक आणि मामी एवढ्याशिवाय कोणाशी बोलले नव्हते . नाच ग घुमा हातचं सोडावं वाटत नव्हतं .त्याचे पारायणवर पारायण करावे वाटत होते. म्हणून ते वाचनालयात परत करावं वाटत नव्हतं .नाच ग घुमा मधल्या स्त्रीच्या वेदना मला माझ्या वाटत होत्या .मला त्या व्यथांनी सावध केलं होतं. तसं स्वप्नपासून दूर जाण्यास प्रवृत करत होत्या . माझी अवस्था दोलायमान झाली होती . दुसरा पती करावा की नाही? या प्रश्नात अडकून पडले होते.मामी तर त्या विषयीचा पिच्छा सोडायला तयार नव्हत्या.आज ही त्यांनी आईसमोर तोच मुद्दा मांडला.आमची जेवनं झाली होती.बाबा आणि संदीप मधे आले.बाबा आईला म्हणाले,
" आनपुरणे बुलीसका पावणीबायीला?"तेवढ्यात मामीच बोलल्या,
" बसाकी,म्या आताच ईनबायला मणले.माजा जगायचा भरवसा नाय.पुरीच उरकून टाका.सीमुचा ईकटीचा जीव या घरात कासाईस हुईल."
" म्या त्ये मणीत नाय.सीरमू त्येचे मायबाप आल्ते.मिटवून घ्या मणीत व्हती.पोराच व्हयचं जायच एकुलतं एक हाय.जेलात ग्येलेस घराचं वाटुळं व्हयील.गयावया करुनशान पाय सूडीत नव्हती."
" व्हय आल्ती इतबी.माप करा मणीत व्हती.म्या उंबराबी सीवू दिला नाय.माज्या सून
देहाचियारंगी २५
ची अब्रु सीरमेन घितली असती तर सुन करून घितली असती का?आपुन कितीदा बी पाया पडला आसताव तरी." क्रमशः

173 

Share


Vidyadhar Pande
Written by
Vidyadhar Pande

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad