Bluepad | Bluepad
Bluepad
ओळख
Rutu Vijay Ghodmare
Rutu Vijay Ghodmare
23rd Sep, 2022

Share

ओळख
"अहो उठताय ना,चहा घ्या थोडासा गरम गरम". थरथरत्या हातानी ती त्याच्या शेजारी असणाऱ्या स्टुलावर चहा ठेवते. "चहा...? आत्ताच तर पिला ना...? पण,माफ करा,खरचं तुम्ही माझी खूपच काळजी घेता. कधी कधी वाटत आपले पुर्वजन्मीचे ऋणानुबंध असावेत पण तरीही मी तुम्हाला ओळखत कसा नाही?". तो स्वतःलाच प्रश्न विचारतो.
"अहो असं काय करताय परक्यासारखं,मी तुमची सुमन... बायको...गळ्यातल्या मंगळसूत्रावर हात ठेवत आणि डोळ्यातलं पाणी पुसत ती बोलत असते.
"प्लीज,तुम्ही असं रडू नका...,पण तुम्ही चांगल्या घरातल्या दिसताय,म्हणूनच सांगतोय पर-पुरूषाला असं आपला नवरा समजून त्याची गंमत करणं तुम्हाला शोभतं नाही".
त्याच्या शब्दशरांनी तिच्या झरझरणाऱ्या काळजाचं पाणी पाणी होतं आणि ती धाडकन शेजारच्या खुर्चीवर कोसळते. अव्याहत वाहणार्‍या अश्रूंना बांध घालत ती दोन्ही पापण्या गच्च मिटते आणि तिला चाळीस वर्षा पूर्वीचा तो प्रसंग आठवतो...
डोंगराच्या कुशीतून हिरव्यागार दाट झाडीतून नागमोडी वळण घेत एक लक्झरी,कुलुमनालीच्या दिशेनं धावत असते. पाच दिवसा पूर्वीच लग्न झालेली आणि अजूनही एकमेकांशी पुरेशी ओळख न झालेली ती नवी कोरी जोडी अंगावर शहारे फुलवणाऱ्या थंड हवेची उबदार दुलई पांघरून त्या "हनिमून एक्स्प्रेसच्या" गुलाबी कम्पार्टमेंट मध्ये कुठल्यातरी गोड भावविश्वात हरवलेली असते.
एक मोठ वळण घेवून ती लक्झरी एका रेस्टॉरंट समोर लंच ब्रेकसाठी थांबते. तो खाली उतरतो. ती खिडकीशी बसलेली, थोडीशी बाबरलेली. समोरच्या रेस्टॉरंट मधून तो चहा घेवून बाहेर पडतो.नेमक्या त्याच वेळी लक्झरीचा ड्रायव्हर गाडी स्टार्ट करतो तशी ती घाबरते खिडकीशी बिलगत एक हात बाहेर काढून त्याला लवकर येण्याची खूण करते. तो लांबूनच तिची चाललेली घालमेल पहाता पहाता मनातल्या मनात हसतो आणि दोन्ही हात खिशात घालत देवानंदच्या स्टाईलीश चालीत खिडकीच्या खाली येवून उभा राहतो अगदी त्रयस्था सारखा.
"माफ करा,पण मी आपणाला ओळखलं नाही". क्षणभर तो काय बोलतोय हे तिच्या ध्यानी येत नाही. "अहो असं काय करताय परक्या सारखं,मी तुमची सुमन...बायको..." गळ्यातल्या मंगळसूत्रावर हात ठेवत ती त्याला विनंती करते.
"आत या लवकर,गाडी सुटेल ना?".
गाडीचा आवाज वाढतच असतो तसा तो तिला म्हणतो " मॅडम मानलं तुम्हाला,अनोळखी माणसाच्या गळ्यात पडायची तुमची गंमत अगदी सॉलिड. सॉरी !, पण तुम्ही चांगल्या घरातल्या दिसताय,म्हणूनच सांगतो अशी गंमत करण तुम्हाला शोभतं नाही". आता गाडीच्या वाढणाऱ्या आवाजा बरोबरच आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे संशयाने पाहू लागतात.रडकुंडीला आलेल्या तिच्या डोळ्यात पाण्याचे ढग साचू लागतात आता कोणत्याही क्षणी ढगफुटी होणारच असते इतक्यात तो तिच्या शेजारी येऊन बसतो आणि लाल झालेला तिचा नाकाचा शेंडा पकडत म्हणतो... "आज,कशी गंम्मत केली एका माणसाची ". यावर ती खुदकन हसते आणि अश्शी काय लाजते की बस्स...
कुठंतरी काठी पडल्याचा आवाज येतो तशी ती त्या चाळीस वर्षापूर्वीच्या अवीट आठवणीतून बाहेर येते. तो खाली पडलेली काठी हातात घेण्याचा प्रयत्न करतो तशी पटकन ती त्याच्या हातात काठी देते. काठीचा आधार घेत तो स्वतःचा बॅलन्स सावरत म्हणतो...माफ करा पण एक विचारू?...खूप दिवस पाहतोय तुम्ही स्वतःला चोवीस तास हॉस्पिटलच्या सवेत वाहून घेतलय...रागावू नका...पण तुमचा हा सेवाभाव पाहून मला माझ्या बायकोची...सुमनची आठवण झाली. मला तिला भेटायच आहे हो...प्लीज तुम्ही काही मदत करू शकाल का ?"
त्याच्या या प्रश्नाबरोबर कुठेतरी आशेचा किरण चमकतो. गेली चार-पाच वर्षे अल्झायमर सारख्या आजाराशी झुंजता झुंजता आज प्रथमच त्याला "तिची... सुमनची...त्याच्या बायकोची" आठवण झाली हे पाहून ती मनोमन सुखावते.
कृतज्ञतेने देवाला हात जोडत खिडकीतून बाहेर डोकावते. रात्र बरीच वर चढलेली असते पण अंधाराच्या गर्भात चांदणी एक उगवत असते...
राजन पोळ
-कोल्हापूर
७५८८२६४३२८
21 September -World Alzheimer's Day
Cp

176 

Share


Rutu Vijay Ghodmare
Written by
Rutu Vijay Ghodmare

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad