Bluepad | Bluepad
Bluepad
पॉवर ऑफ अटर्नी भाग १
Dilip Bhide
Dilip Bhide
22nd Sep, 2022

Share


पॉवर ऑफ अटर्नी भाग १
पॉवर ऑफ अटर्नी
भाग १

त्या दिवशी शनिवार होता. पहाटेच विभावरीचं, न्यूयॉर्क हून येणारं विमान मुंबई एयर पोर्ट वर लँड झालं होतं. भल्या मोठ्या तीन बॅगा घेऊन विभावरी टॅक्सी करून पुण्याला यायला निघाली होती. पुण्याला अकरा वाजता पोचली आणि आत्ता तिसर्‍या मजल्या वरच्या आपल्या फ्लॅट समोर उभी होती, आणि कॉल बेल वाजवून दरवाजा उघडायची वाट पहात होती.
दार एका तिशीतल्या तरुणांनी उघडलं आणि तो दरवाज्यात प्रश्नार्थक मुद्रा करून उभा होता. एकदा विभावरी कडे आणि एकदा तिच्या सामानांकडे बघत होता. त्याला पाहिल्यावर विभावरी गोंधळली. तिच्या अपेक्षेप्रमाणे तिच्या मैत्रिणीने, सानिकाने दार उघडायला हवं होतं पण हा तर कोणी भलताच माणूस दिसत होता. विभावरी ला वाटलं की आपला बहुधा मजला चुकला म्हणून ती दोन पावलं मागे सरकली आणि दारावर काय नंबर आहे ते बघितलं. नंबर बरोबर होता. मग हा माणूस कोण असावा आणि सानिका कुठे गेली आहे यांचा विचार ती करतच होती, तेवढ्यात त्या माणसानी विचारलं
“कोण हवंय तुम्हाला ? कोणा कडे आलात तुम्ही ?”
“सानिका कुठे आहे ?” विभावरीने विचारलं.
“सानिका इथे राहत नाहीत आता. तुम्ही त्यांच्या कडे आला आहात का ?” – तो तरुण म्हणजे ज्यांनी दार उघडलं तो. किशोर.
“तुम्ही कोण आहात ? आणि माझ्या घरात तुम्ही काय करता आहात ?” विभावरीने विचारलं आणि हे विचारतांना तिचा स्वर जरा तापला होता.
“मी किशोर, आणि हे माझं घर आहे. मागच्याच महिन्यात आम्ही हे घर सानिका कडून विकत घेतलं आहे. तुम्ही कोण ?” – किशोर.
“मी विभावरी, आणि हे घर माझं आहे. सानिका माझी मैत्रीण आहे आणि ती या घरात माझ्या परवानगीनेच राहात होती. माझं घर ती कशी विकू शकते ? मला कळतच नाहीये की हा सगळा काय प्रकार आहे ते ?”
“एक मिनिट मॅडम, आपण कोण आहात आणि हे घर तुमचं आहे असं म्हणता आहात हा काय प्रकार आहे हे जरा सांगाल का ?” किशोर चा आवाज आता थोडा चढला होता.
बाहेरचा गोंधळ ऐकून शेजारच्या सुलभा काकू बाहेर आल्या. त्यांनी विभावरीला पाहिलं आणि त्या आश्चर्यानी म्हणाल्या
“अग विभावरी, तू इथे कशी ? आणि हे एवढं सामान ? अमेरिकेतून येते आहेस की काय ?”
“हो काकू, पण हे गृहस्थ म्हणताहेत की हे घर त्यांचं आहे म्हणून.” – विभावरी
“हो अग गेल्याच महिन्यात आले ते राहायला. तूच विकलंस ना घर ? आम्हाला वाटलं की तू तिकडेच सेटल होणार म्हणून विकते आहेस.” – सुलभा काकू.
“अहो नाही काकू मी एकाच वर्षा साठी गेले होते.” विभावरी म्हणाली. “मी कशाला विकू ?”
“अग सानिका नी तर असंच सांगितलं आम्हाला. तिनेच सौदा केला घराचा या किशोर बरोबर.” – सुलभा काकू.
विभावरीचा हे ऐकून प्रचंड गोंधळ उडाला. तिने तिच्या काकांना फोन लावला. थोडक्यात सगळी परिस्थिती त्यांना सांगितली आणि म्हणाली की आत्ता इथे येता का ? आणि काका लगेच येतो असं म्हणाले. मग विभावरी काकूंकडे वळून म्हणाली की
“काकू, माझे काका आत्ता येताहेत इथे. मी थोडा वेळ ते येई पर्यन्त तुमच्याकडे बसू का ?” सुलभा काकूंना काहीच अडचण नव्हती त्या म्हणाल्या
“हो चल माझ्याकडे. प्रवासाहून आली आहेस दामली असशील मी चहा करते तो घे म्हणजे जरा तरतरी येईल.”
त्यामुळे विभावरी त्यांच्याकडे गेली. साधारण अर्ध्या तासाने काका आले.
“काय ग विभा, केंव्हा आलीस, आम्हाला काहीच कळवलं नाहीस ? आणि आता काय भानगड झाली आहे ? म्हणून काकाची आठवण झाली की काय ?”
“नाही हो काका, खूप सामान होतं ना बरोबर म्हणून इथे सामान टाकून मी येणारच होते तुमच्या कडे.” विभावरी म्हणाली.
“बरं काय प्रॉब्लेम आहे ? फोन वर काही बोलली नाहीस ?” - काका.
मग विभावरीच्या ऐवजी सुलभा काकूंनीच सगळं सांगितलं. सगळं समजल्यावर काकांचा चेहरा जरा गंभीर झाला. म्हणाले
“म्हणजे, सगळा घोळ सानिकानी घातला आहे. बरं त्या माणसांनी पैसे कोणाला दिले ?”
“माहीत नाही. तो फक्त एवढंच बोलला की त्याला सानिकानी घर विकलं म्हणून.” – विभावरी.
चला आपण त्याच्याशीच प्रत्यक्ष बोलू. म्हणजे नेमका काय व्यवहार झाला आहे ते कळेल. काका म्हणाले.
सगळी वरात मग किशोर कडे.
इकडे किशोर ची आई प्रचंड धास्तावली होती. ती म्हणाली
“काय रे किशोर आता आपल्याला घर सोडून जावं लागणार की काय ? एवढे कर्ज काढून हा फ्लॅट घेतला आणि आता हे काय संकट ?”
“आई तू शांत रहा.” किशोरणी आईला समजावलं. “कोणीही आपल्याला घराबाहेर काढू शकत नाहीये. आपला सारा व्यवहार बँकेच्या कर्जावर झालेला आहे. चोख व्यवहार आहे. तू नको काळजी करू. हां थोडा प्रॉब्लेम झालेला दिसतो आहे पण बघूया काय होतेय ते.”
विभावरीनी किशोरच्या घराची बेल दाबली. किशोरनीच दार उघडलं.
“या या आत या. आत मधे या बसा. उभ्या उभ्याने बोलण्यात काही अर्थ नाही. आपण यांचे काका का ?” किशोरनी काकांनाच विचारलं.
“हो. मी काकांना मुद्दाम बोलावून घेतलं. इथे सॉलिड गोंधळ उडाला आहे.” विभावारीने उत्तर दिलं.
“खरं आहे तुमचं म्हणण.” किशोर म्हणाला.
काकांनीच सुरवात केली.
“हे बघा किशोर साहेब,” काका म्हणाले. “काय घोळ झाला आहे हे तुमच्या लक्षात येतं आहे का ?”
“घोळ झाला आहे हे कळलं पण नेमका काय ते नाही कळलं.” – किशोर.
“ओके. सांगतो, तुम्ही सानिका कडून घर घेतलं तेंव्हा original मालकी कोणाची दाखवली होती ? विभाची की सानिकाची ?” – काका.
“विभावरी मॅडम ची.” – किशोर.
“मग विभावारीची जागा सानिका विकतेय हे समजल्यावर तुमच्या मनात काही
संशय आला नाही का ?” काकांनी विचारलं.
“नाही. त्यांनी .....”
किशोरला पुढे बोलू न देता काकांनीच प्रश्न टाकला.
“असं कसं ?”
“तेच तर सांगतोय.” किशोर म्हणाला. “सानिका मॅडम नी, त्यांच्या नावे केलेलं विभावरी मॅडम चं अधिकार पत्र दाखवलं. सरकारी सही शिक्का असलेलं अधिकार पत्र होतं ते.”
“तुम्ही क्रॉस चेक करायला पाहिजे असं तुम्हाला वाटलं नाही ?” – काका.
“ते पत्र मी बँकेत जमा केलं home loan साठी. आणि बँकेनी लोन पास केलं त्या अर्थी ते पत्र बरोबरच असलं पाहिजे. कारण पूर्ण खात्री झाल्या शिवाय कुठलीही बँक लोन देणार नाही.” किशोरनी सफाई दिली.
“मी असं कुठलंही अधिकार पत्र सानिकाला दिलेलं नाहीये. हा सगळा बनाव आहे तुम्ही दोघांनी मिळून रचलेला.” विभावरी चा संयम आता सुटत चालला होता. तिला वाटलं होतं की काका किशोर ला चांगले खडसावतील आणि आपला फ्लॅट आपल्याला मिळून जाईल. पण काका तर फारच शांत पणे बोलत होते.
“अहो काहीतरीच काय बोलता आहात,” आता किशोर बोलला. “भलताच आरोप करता आहात माझ्यावर. Total baseless. आणि तसं म्हंटलं तर हाच आरोप मी तुमच्यावर पण करू शकतो. पण मी तसं करणार नाही कारण मी सभ्य माणूस आहे आणि तुमची परिस्थिती मला कळते आहे. जरा शांत पणे घ्या”
“माझ्यावर आरोप करणार ?” आता विभावरी चिडली. “काय, म्हणायचं काय आहे तुम्हाला सांगा तरी.”
“जाऊ द्या हो.” किशोर म्हणाला. “तुम्ही काकांना माझ्याशी बोलायला बोलावलं आहे ना, मग त्यांनाच बोलू द्या. मी समजू शकतो की अचानक ध्यानी मनी नसतांना आपलं घर आता आपलं राहिलं नाहीये असं कळल्या मुळे तुमची मनस्थिती सैरभैर झाली आहे. तुम्ही जरा शांत बसा आणि काकांनाच बोलू द्या.”
“विभावरी तू थांब जरा, मला बोलू दे” – काकांनी विभावरीला समजावलं.
“किशोर साहेब, तुमच्या जवळ ते अधिकार पत्र आणि घराची सेल डिड असेलच ना ? तर दाखवता का जरा ?” काकांनी विचारलं
“Original बँकेत जमा केले आहेत. झेरॉक्स आहेत. एक मिनीट थांबा दाखवतो.” किशोर म्हणाला
क्रमश: ..........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद.

237 

Share


Dilip Bhide
Written by
Dilip Bhide

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad