Bluepad | Bluepad
Bluepad
आनंदात जीवनाचे सहा सोपे नियम
Vikas Gaikwad
Vikas Gaikwad
22nd Sep, 2022

Share

माणसाचे जीवन अमूल्य आहे. मनुष्य जन्म आपल्याला एकदाच मिळतो. असा एकदाच मिळालेला मौल्यवान जन्म रडत कुढत घालवायचा की हसत हसत हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.
आयुष्यात काळजी करणं, दुःखी होणं, चिंता करणं हे काही वाईट घडलं की आपल्याकडून सहज घडतं पण या आनंदी राहणं मात्र सगळ्यांना सहज जमतंच असं नाही.
रडत कुढत जगणारेच आपल्या अवतीभोवती जास्त दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आनंदी राहण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत.
१. स्वतःवर प्रेम करा
आनंदी राहण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःवर प्रेम करा. आपण आपल्या कुटुंबियांवर, मित्र मैत्रिणींवर खूप प्रेम करतो. पण स्वतःला मात्र काहीच महत्व देत नाही. त्यामुळे स्वतःच्या छोट्या छोट्या चुकासुद्धा आपल्याला मोठ्या वाटायला लागतात. त्यामुळे आपण सतत दुःखी, स्वतःवर चिडलेले असे होऊ लागतो. ज्या गोष्टींबाबत इतरांना दोष देण्याचा आपण विचारही करत नाही त्याच गोष्टींचा स्वतःच्या बाबतीत मात्र अगदी कठोर होऊन विचार करत राहतो. स्वतःलाच शिक्षा करतो. असे करू नका. स्वतःवर खूप प्रेम करा.
२. स्वतःच्या चुका किंवा फजितीवर हसायला शिका
बरेचदा असे होते की आपल्या हातून काही चुका होतात किंवा आपली फजिती होते. अशा वेळी अपमान न वाटून घेता त्या फजितीवर हसायला शिका. त्यातून काय चुकलं हे जाणून घेऊन सुधारणा करा. निर्माण झालेला विनोद खिलाडूवृत्तीने स्वीकारून पुढे चला. त्यामुळे झालेल्या गोष्टींचा विचार करत कुढत न बसता तुम्ही आनंदी राहू शकाल. लक्षात ठेवा स्वतःवर केलेला विनोद हा सर्वोत्तम असतो आणि जो स्वतःवर हसू शकतो तो कधीच दुःखी होऊ शकत नाही.
३. स्वतःशी बोला
चकित झालात ना, पण खरंच मित्रांनो, आपण इतरांशी किती बोलतो.. आपले कुटुंबीय, सहकारी, मित्र मंडळी ह्यांच्याशी बोलताना आपल्याला वेळ पुरत नाही. परंतु स्वतःशी मात्र आपण अभावानेच बोलते. आपल्याला स्वतःला काय हवं आहे, काय करायचं आहे ह्याची स्वतःच्या मनाशी उजळणी करत रहा. त्यामुळे काही करायचं राहून गेलं, हातातून वेळ निघून गेली असे दुःख करत बसायची वेळ येणार नाही. आपण नेहेमी आनंदी राहू शकू.
४. दिवसातला काही वेळ तरी फोन दूर ठेवा
सध्या आपले मोबईल फोनशिवाय पान हलेनासे झाले आहे. आपल्या हाताचा जणू काही एक भागच असावा इतका फोन आपल्या हाताला चिकटलेला असतो. परंतु असे सतत फोनमध्ये लक्ष घातल्याने आपले विचार फक्त इंटरनेट, सोशल मीडिया ह्यावर कॉन्संट्रेट होतात. आपल्या आजूबाजूच्या वातावरणाकडे आपले लक्षही जात नाही. आपण अगदी एकलकोंडे बनत जातो. असे होऊ देऊ नका. दिवासतला काही काळ कटाक्षाने मोबाईल फोन दूर ठेवा. आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे लक्ष द्या. त्यांच्या आनंदात आनंद घ्यायला शिका.
५. सतत सगळं चांगलं होईल अशी अपेक्षा करू नका
आपल्या दुःखी होण्याचे मुळ कारण बरेचवेळा अपेक्षाभंग हे असते. जीवनाकडून सतत चांगले होण्याच्या अपेक्षा न करता काही गोष्टी आपल्या मनासारख्या होणार नाहीत ह्याचीही तयारी ठेवा. त्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख करावे लागणार नाही, आहे त्यात समाधान मानले की आपोआप आनंदी वृत्ती वाढीस लागते.
६. इतरांना माफ करायला शिका
अनेक वेळा आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याशी चुकीचे वागतात, आपल्यावर अन्याय होतो. त्याचा प्रतिवाद करणे ठीक आहे. पण ती गोष्ट फार काळ मनाशी धरून ठेवू नका. त्यामुळे आपल्याला फक्त दुःखच मिळणार. वारंवार त्या वागण्याची, अन्यायाची मनाशी उजळणी केल्यामुळे आपण मनातल्यामनात पुन्हा पुन्हा त्याच प्रसंगांचा अनुभव घेतो. त्यामुळे आपले दुःख वाढते. त्यापेक्षा आपल्याशी अयोग्य वागणाऱ्या लोकांना माफ करायला शिका त्यामुळे आपण आणि आपल्या आजूबाजूचे लोक आनंदात राहू शकू.
तर ह्या आहेत ६ ट्रिक्स. ह्या वापरुन तुम्ही नेहेमी आनंदी राहू शकाल. ह्या ट्रिक्सचा वापर जरूर करा.
शिवाय तुमच्याकडे आनंदी राहण्याच्या आणखी काही टिप्स असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला जरूर कळवा.

190 

Share


Vikas Gaikwad
Written by
Vikas Gaikwad

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad