Bluepad | Bluepad
Bluepad
आजचा दिवस तुमचाच...
पद्मनाभ प्रभाकर हिंगे
पद्मनाभ प्रभाकर हिंगे
22nd Sep, 2022

Share

आजचा दिवस तुमचाच...
एका विशिष्ट आवाजात माझं नारदयंत्र तथा मोबाईल सकाळी वाजायला सुरुवात होते. पाऊस पडण्याआधी पावसाचे टप्पोरे थेंब जसे पत्र्यावर आवाज करीत पडतात; तसे.
छायाचित्रे, माहिती, दृकश्राव्य फिती, गुलाब आणि अन्य फुलांसोबत सुरेख शब्दांतले संदेश येऊ लागतात. भाराभर संदेश वाचायचे, पहायचे तरी कधी? त्यांना उलट टपाली उत्तरं द्यायची, तर कधी? काही ग्रुपातले, काही सुपातले संदेश. काही व्यक्तिगत. सुपातले संदेश पाखडून, चविष्ट, चांगले रुपवान संदेश बाजुला करायचे, तरी खूप वेळखाऊ काम असते.
असं असलं तरी प्रत्येक संदेश डोळ्याखालून गेलाच पाहिजे. पाठवणाऱ्याने आपली ओळख लक्षात ठेवून संदेश पाठवलेला असतो. त्याच्या या भावनेचा आदर करायलाच हवा हा माझा शिरस्ता.
काही निवडक संदेश पाहिल्यावर काहीतरी स्फुरुस्फुरू होऊ लागतं. आणि लिहिण्याचा मोह स्वस्थ बसूच देत नाही. आजचंच उदाहरण द्यायचं झालं तर, वेगळेपण ल्यालेली मला 'माझी सकाळ शुभद, सुखद असावी' असा संदेश घेऊन आलेली दोन गुलाबफुले. एक तांबडं, दुसरं पाढरं! काय बरं तो स्वादिष्ट चविष्ट रसरशीत पदार्थ? ... हां.. तांबडा पांढरा रस्सा !!! हो अस्संच वाटलं.
दोन गुलाबवर्गातली फुले. गोड मोहक रसरशीत. त्यांच्या केवळ चित्राकडे पाहूनच प्रसन्न वाटलं. भल्या सकाळी शुभेच्छासंदेश म्हणून पाठवणाऱ्या स्नेह्याची या मागची मनोकामना आपण समजून घ्यायलाच हवी.
या दोन्ही लाल पांढऱ्या फुलांकडे पाहता पाहता मला चटकन् पटकन् आठवलं, थोडंसं रक्तविज्ञान!
"प्रेम, औदार्य, शौर्य, माझ्या रक्तातच आहे .." असं आपण मोठ्या अभिमानाने वगैरे सहज सांगत असतो. याची आठवण आज या फुलांनी मला करून दिली.
"आता हे काय..?" असा प्रश्न तुमच्या मनात स्वाभाविक पणे येणार.
असं बघा, म्हणजे मी असं पाहिलं की, या तांबड्या फुलाने मला तांबड्या रक्तपेशीची आठवण करून दिली. पांढऱ्या फुलाने पांढऱ्या रक्तपेशीची तांबड्या रक्तपेशी हिमोग्लोबिन वाहून नेतात, पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे प्रतिकार शक्ती. रक्तपेशी, श्वेतपेशी यांचं कार्य महत्वाचं असतं, इत्यादी इत्यादी.. असं मी शाळेत शिकल्याचं अंधुकसं आठवतंय. तुम्हाला...?
आता हे सारं ज्ञानविज्ञान इथं कशाला सांगत बसू? तुम्हालाही माहीत असेलच की.
"तुमचा आजचा दिवस उत्साही प्रसन्न जावो", हेच तर तांबडं फूल मला सांगतंय. आणि
"तुम्ही काया वाचा मने कणखर रहावे", ही सदिच्छा पांढऱ्या फुलाने माझ्याकडे व्यक्त केली आहे.
फुलं मुकी असतात, त्यांनी कसं छान छान दिसावं, सुगंध द्यावा. एवढंच, इतकंच असं कसं म्हणता येईल. माझ्याशी तर बुवा ही फुलं असं छान बोलली. मला जाणवल्या त्यांनी प्रेमाने आणलेल्या भावना.
मला माझी मनोदेवता असंच सकारात्मक पहायला, विचार करायला सांगते...
तुम्ही असा विचार करून पाहिलात कधी? शक्य झाल्यास करून पहाच तर.
माझ्या कानामनाला जाणवलेले या फुलांचे हे मनोगत आता तुम्हालाही सांगतो. " प्रसन्न रहा, सतेज रहा, कणखर रहा. आजचा दिवस तुमचाच आहे "......
पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे..
पुणेकर.
मिती भाद्रपद कृष्ण १२, शके १९४४
गुरुवार दिनांक : २२ /०९/२०२२​

220 

Share


पद्मनाभ प्रभाकर हिंगे
Written by
पद्मनाभ प्रभाकर हिंगे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad