Bluepad | Bluepad
Bluepad
कर्मवीर भाऊराव पाटील जयंती
Uttamrao Nivrutti Nirmal
Uttamrao Nivrutti Nirmal
22nd Sep, 2022

Share

#कर्मवीर_भाऊराव_पाटील_जयंती"
" .........तर असे हे आमचे आण्णा, कर्मवीर भाऊराव पाटील !!!!"
¶महाराष्ट्र हा दगडधोंड्यांचा देश, कडेकपाऱ्यांचा देश, भले रत्नांच्या खाणी या मातीत नसतील पण लाख मोलाची नवरत्ने या मातीने जगाला दिली. त्याच अनमोल रत्नांतील एक, "रत्न" असलेले असे हे आमचे आण्णा ,
“कर्मवीर भाऊराव पाटील”.
¶ज्ञानाचा दिवा महाराष्ट्रातल्या घराघरात पेटवणारे, लोकांच्या मनात स्वाभिमान रुजवणारे, देव दगडात नसतो, माणसात असतो हे हेरून इथल्या माणसांमध्ये माणुसकी पेरणारे, “लोकमहर्षी”, असलेले असे हे आमचे आण्णा,
“कर्मवीर भाऊराव पाटील”.
¶बहुजनांच्या मुलांमध्ये शिक्षण प्रसार करणारे, माणसात देव पहाणारे, परिस्थितीमुळे हतबल झालेल्यांच्या आयुष्यात, शिक्षणाद्वारे उन्मेष जागवणारे आणि खऱ्या अर्थाने, “शिक्षणमहर्षी” असलेले असे हे आमचे आण्णा,
" कर्मवीर भाऊराव पाटील."
¶स्वावलंबी शिक्षण , कमवा आणि शिका, घट्टे आणि चट्टे या त्रिसूत्रीद्वारे , शिक्षण सहज साध्य करण्याचे, साधे सरळ, व्यवहारीक तत्वज्ञान सांगणारे, "व्यवहारज्ञानी" असलेले असे हे आमचे आण्णा,
"कर्मवीर भाऊराव पाटील "
¶एकवेळ जन्मदात्या बापाचे नाव बदलेन, पण वसतीगृहाला दिलेलं “शिवाजी महाराजांचं” नाव नाही बदलणार असं, देणगीच्या बदल्यात नाव बदला , असे सांगणाऱ्यास छातीठोक पणे सुनावणारे, "तत्वनिष्ठ" असलेले असे हे आमचे आण्णा,
“कर्मवीर भाऊराव पाटील”.
¶ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज शंभर वर्षांपूर्वीच ओळखणारे द्रष्टे, ग्रामीण शिक्षण चळवळीचे जनक, "ज्ञानमहर्षी" असलेले असे हे आमचे आण्णा,
"कर्मवीर भाऊराव पाटील."
¶लोकशाहीचा मुळगाभा लोकशिक्षण हे आहे आणि हे लोकशिक्षण समाजाला विकासाकडे नेते हे कर्मवीरांनी ज्ञात होते. म्हणून अनवाणी पायांनी वणवण करून अवघा महाराष्ट्र पिंजून काढून शिक्षणाची गंगा बहुजनांच्या झोपडी झोपडीत आणि झोपडतील्या खोपडी खोपडीत, वाडीवस्त्यावर पाड्यावर घेऊन जाणारे, "भगिरथ" असलेले असे हे आमचे आण्णा,
" कर्मवीर भाऊराव पाटील"
¶ज्यांना, जनता जनार्धनाने, महान संत परमपूज्य गाडगेमहाज यांचे शुभहस्ते " कर्मवीर " या सार्थ उपाधीने सन्मानित केले आहे, समाजाचा "मानबिंदू" असलेले असे हे आमचे आण्णा,
"कर्मवीर भाऊराव पाटील "
¶सामाजिक विषमता, आर्थिक मागासलेपण, जातीपातीच्या उतरंडी, यासर्वांवर मात करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, याचा अचुक वेध घेऊन, रयत शिक्षण संस्थेची स्थापना करुन, अनंत अडचणीवर मात करुन, ज्ञानाची गंगा खेडोपाडी घेऊन जाणारे, "तपस्वी" असलेले असे हे आमचे आण्णा,
"कर्मवीर भाऊराव पाटील "
¶आणि शेवटी, ज्यांच्या शिवाय मला, शुन्यातून येथपर्यंत पोहचणे या जन्मी कदापीही शक्य झाले नसते. माझ्या साठी नेहमीच आदरणीय, प्रेरणादायी आणि नेहमीच "दिपस्तंभ" असलेले असे हे आमचे आण्णा,
" कर्मवीर भाऊराव पाटील "....अर्थातच आम्हा साऱ्यांचेच प्राणप्रिय आण्णा !!!
¶आण्णांची एक हृदय हेलावणारी आठवण.....
अनवाणी वणवण करून आण्णा थकले....
एका माळरानावर झाडाच्या सावलीत दगडावर डोकं ठेऊन निवांत पडले.....
सोबत पांड्या नावाचा पोर होतं....
( पांड्या म्हणजे आपले बॅ. पी.जी.पाटील....आण्णांचा हाच "पांड्या" नंतर रयत संस्थेचे उपाध्यक्षपद , शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूपद तसेच एमपीएससी सदस्यपद भुषविता झाला...... मरणोत्तर त्यांनी त्यांची संपत्ती रयत संस्थेला दान दिली...ते अस्सल "रयत प्रोडक्ट" होते... कर्मवीरांचे मानसपुत्र आणि वैचारिक वारसदार, हीच त्यांची ओळख आहे. )
आण्णा मध्येच पांड्याला म्हणाले ,
"पांड्या , पाय सलतोय रं ,....
बघ जरा काटा हाय का"
पांड्यां न पाय मांडीवर घेतला आणि काटा शोधू लागला.....
तोवर आण्णांचा डोळा लागला होता....
काही वेळातच पांड्याच्या मोठ्याने रडण्याने आण्णांना जाग आली.....
त्यांनी विचारलं पांड्या का रडतुयास रं
पांड्या म्हणाला
"आण्णा, पायात एक न्हाय काटंच काटं हायती"
गोरगरीब पोरांच्या शिक्षणासाठी पायात काटं रोवून घेणारे कर्मवीर आण्णा, हेच आमचे विठ्ठल आणि गोर गरीब पोरांच्या भुकेल्या पोटासाठी स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवणारी रयत माऊली लक्ष्मीबाई, हीच आमची रुक्मिणी....
या विठ्ठलाच्या पायात काटे घुसले कारण...
"माझ्या महाराष्ट्र्रातील एक न एक पोरगा पोरगी शिकत न्हाय तवर पायात पायताण आन डोक्यावं पागोटं घालणार न्हाय" अशी शपथ घेतली होती या विठ्ठलानं.....आणि "माझ्या दाढीतल्या केसाइतकी मुले शिकुन वस्तीगृहातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत मी दाढी करणार नाही" ही प्रतिज्ञा तर त्याही अगोदर केली होती आण्णांनी !!
कर्मवीर आण्णांचा कोणताही फोटो बघा त्यांच्या डोक्यावर फेटा आणि पायात चप्पल दिसणार नाही, डोकं बोडकंच, पाय अनवाणीच अन् दाढी वाढलेलीच दिसेल !!!
¶खुद्द महात्मा गांधी रयत शिक्षण संस्थेचे देणगीदार होते.." कर्मवीर भाऊराव पाटलांसारखे काम मला सेवाग्राम मध्ये करता आले नाही" , याची कबुली महात्मा गांधीनी दिली होती. तत्कालीन सरकारने 1948 मध्ये संस्थेचे अनुदान बंद करण्याचा कद्रूपणा केला होता. पण आण्णा मुळीच डगमगले नाहीत...... जनरेट्यामुळे सरकारला ते पुन्हा सुरु करणे भाग पडले.
¶आणांना राष्ट्रपतींनी "पद्मभूषण" पदवीने सन्मानीत केले असेल, पुणे विद्यापीठाने दिलेली "डिलीट्" ही सन्मानजनक पदवी असेल, परमपूज्य गाडगेमहाजांच्या साक्षीने, जनता जनार्धनाने दिलेले "कर्मवीर" हे नामाधिनाम असेल .....हे काहीही असले तरी आमच्या सारख्या "रयत" वाल्यांच्या हृदयात मात्र, "आण्णा " आणि "रयत माऊली" हीच त्या उभयतांची, चिरंतन ओळख, अखेरपर्यंत राहाणार आहे !!
¶ सर्वार्थाने ज्यांच्यामुळे आज मला इथपर्यंत पोहचणे शक्य झाले अशा या परमपूज्य, प्रातःवंदनीय असलेल्या प्रेरणास्थानास आणि ज्ञानगंगा दारोदारी आणणाऱ्या, या आधुनिक भगिरथास, आजच्या या त्यांच्या जयंतीनिमित्ताने
माझे विनम्र अभिवादन 💐 💐 💐 💐
त्रिवार वंदन. 🙏 🙏 🙏
🙏 🙏 🙏 🙏श्री. उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग 🙏 🙏 🙏 🙏
कर्मवीर भाऊराव पाटील जयंती

241 

Share


Uttamrao Nivrutti Nirmal
Written by
Uttamrao Nivrutti Nirmal

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad