Bluepad | Bluepad
Bluepad
सवाल जवाब (शेती विषयक) भाग १
संजय ब.शिंदे.
21st Sep, 2022

Share

सवाल जवाब (शेती विषयक) भाग १.
अहो,कैक संकटं झेलत झेलत धनधान्य देई कितींदा...
पालन पोषण करतो तो शेतकरी जगाचा पोशिंदा...
अगं शेतीवरचा सवाल ऐकून,डोस्क्यात लख्ख प्रकाश पडंल गं...
अन् जवाब देता देता, कृषी दर्शन आपोआप घडंल गं...
सोनं चांदी ना नाही पैका,बघावं म्हणलं त्याचं उत्तर हाय का...
मुजरा करूनी सर्वांना, पहिला सवाल सांगते ऐका.....
१.सवाल:-दोनच अपत्यांचीअट घालून दिली, कुटूंब नियोजनला
सर्वात पुढं कोणआली गं...
मांडव घालून ऐसपैस ती,अशी कोणती वेली गं....
जवाब:-अगं, एका काडीला दोन घडाची नियमावली, अन् कुटूंब नियोजनाला सर्वात पुढं तीआली गं...
मांडव घालून ऐसपैस दिसते अशी द्राक्षेची वेली गं....
२ .सवाल:-बीयाविणा डोळ्यातून जन्माला त्याचं येणं, नियमित
त्याच्या गोडव्याला नाही कुठलं उणं गं...
अन् सांग नेमकं उत्तर त्याचं, असा कोणता पिकाचा वाण गं...
जवाब:-बुटकांडीची लागण करता, डोळ्यातून जन्माला पिकाचं येणं गं...
जगविख्यात गोडवा ऊसाला निसर्गाचं एक देणं गं अन् नाजूक डोळ्यांची बुटकांटी हे तर ऊसाचं बेणं गं...
३ .सवाल:-अगं फुल न येता थेट जन्म होतो कोणत्या फळाचा...
जवाब देऊन सांग निसर्गातला चमत्कार हा कोणत्या वृक्षाचा...
अन् सवाल ऐकून भजा होईल तूझ्या गं डोस्क्याचा...
जवाब:-अस्स,अगं जवाब द्यायला आली मी सोडून पदर कंबरचा
अन् फुल न येता थेट जन्म होतो या उंबराचा..
निसर्गातला चमत्कार आहे हा उंबराच्या वृक्षाचा...
४ .सवाल:-कुण्या राजाराजकुमार अन् कुण्या राजाची राजकन्या
वनवासाला गेली गं...
अन् सांग मला तू त्यांच्या नावाने कोणती फळें नावारूपाला आली गं...
जवाब:-दशरथाचा राम न् जनकाची सीता वनवासाला गेली गं
अन् वनवासातील रामफळ आणि सिताफळ ही दोन फळें नावारूपाला आली गं...
५ .सवाल:-दूध दही तूप लोणी कुणा पासूनी, कोण कुणाची सेवा करी गं...
अन् असा कोण तो,त्याने कुठला पर्वत कवेत घेऊन उचचला वरी गं...
जवाब:-अगं गायीगुरांपासूनी दूध मिळते,देवता त्यांची सेवा करी गं...
अन् गोकुळातला श्रीकृष्ण तो, त्याने गोवर्धन पर्वत कवेत घेऊन उचचला वरी गं...
६ .सवाल:-कमरेवरती काकला कोण लेकरु घेते गं .... अन् डोक्यावर जावळ
भरपूर असं पिक येते कोणते गं....
जवाब:-कमरेवरच्या लेकरापरी मकेला कणिस येते गं...
अन् डोक्यावरच्या जावळापरी केसर कणसाला येते गं....
अहो या पिकांची किमया भारी, मनुष्य आणि प्राण्यांचे जीवन हे
आहे सारे शेतीवरी...
अन् पुन्यांदा सांगतो आम्ही शेवटी शेती ही दौलत आहे सारी...
संकल्पना आणि लेखन-संजय बबन शिंदे.

176 

Share


Written by
संजय ब.शिंदे.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad