Bluepad | Bluepad
Bluepad
अपेक्षा
Rutu Vijay Ghodmare
Rutu Vijay Ghodmare
21st Sep, 2022

Share

*अपेक्षा*
सहजीवनानंतर एका निवांत क्षणी भावुक होऊन तिला त्याने विचारलं… ”काही हवंय का तुला??” अशा अनपेक्षित प्रश्नाने तारा दचकली. 40 वर्षाच्या संसारात साधं पाणीही न विचारलेला माणूस आज का असं विचारतोय??
कारण आज त्याला जाणीव झाली… आपल्या जीवनाची नौका किती सहजपणे पार झाली या भ्रमातून सुटून त्या नौकेची नावाडी त्याची बायको होती याची जाणीव.
डोळ्यावरचा चष्मा सुरकूतलेल्या काना मागे सरकवत ती म्हणाली…
“हो, खूप काही हवं होतं… पण योग्य वेळी… आता या वयात काय मागू मी?
लग्न झालं आणि या घरात आले, हक्काचा माणूस म्हणून फक्त तुम्ही जवळचे होते... पण तुम्हाला ना कधी बोलायला सवड, ना माझ्यासोबत वेळ घालवायची आवड… सतत आपले मित्र, नातेवाईक आणि भाऊ बहीण…आपल्याला एक बायको आहे… तिच्या काही मानसिक गरजा आहे… ते तुम्ही ओळखून मला तुमच्याकडून मानसिक ऊब हवी होती…
घरातली कामं करून दमायचे, आल्या गेल्याचं जेवण, नाष्टा, पाणी, त्यांचा मुक्काम... अंगावर ओढून घ्यायचे… कितीतरी स्वप्न पाण्यावर सोडायचे, आजारपण अंगावर काढायचे, जीव नकोसा व्हायचा, पण संसाराचे नाव येताच त्राण परत आणून पुन्हा सज्ज व्हायचे…
त्यावेळी गरज होती मला, 2 शब्द फक्त विचारपूस केली असती, तर पुढची 40 वर्ष जोमाने आणि आनंदाने जबाबदाऱ्या पार पाडल्या असत्या…
तुमच्या घरात जेव्हा सर्वजण एका बाजूला राहून माझ्यावर खापर फोडायचे, मला एकटं पाडायचे, तेव्हा मला गरज होती ती तुमची… तुम्ही मात्र तटस्थ… तेव्हाची झालेली जखम आजतागायत मनावर ओली आहे, वेळ निघून गेली, आता कशी पुसणार ती जखम??
गर्भार असतांना माझ्या आई वडिलांवर जबाबदारी टाकून मोकळे झालात, पण माझे डोहाळे पुरवायचे तुमच्या कडून राहून गेलेत... त्या 9 महिन्यात तुम्ही माझ्यासोबत वेळ घालवावा. आपल्या बाळाशी बोलावं… ते हवं होतं मला तेव्हा… आज काय मागू मी??
माझंही शिक्षण झालं होतं, मलाही काहीतरी करून दाखवायचं होतं... तेव्हा प्रेरणा हवी होती, आधार हवा होता तुमचा… आज सगळं संपून गेल्यावर काय मागू मी??
मुलांमागे धावताना, त्यांच्यासाठी आयुष्य ओवाळून टाकताना तुम्ही माझा भार जरा हलका करावा हे हवं होतं मला, तेव्हा शरीराची जी झीज झाली त्याचे व्रण अजूनही तसेच आहेत… आज ती वेळ निघून गेल्यावर कसे पुसणार ते व्रण??
संसाराच्या नावाखाली झालेला अन्याय मी पदराआड लपवला… तुम्हाला कसली शिक्षाही नाही मिळणार, मी कोण तुम्हाला शिक्षा देणारी?? पण एका स्त्रीचं आयुष्य तुम्ही तुमच्या गरजेखाली पणाला लावत तिचं आयुष्य व्यर्थ घालवलं याची नोंद मात्र त्या विधात्याकडे अबाधित असेल…
एका स्त्रीचे आपल्या पतीला सांगणे...
माफक अपेक्षा...
कोणाला बोट दाखवून नाही, पण प्रत्येकीच्या मनातले...
संकलीत
🙏🏻🙏🏻cp

177 

Share


Rutu Vijay Ghodmare
Written by
Rutu Vijay Ghodmare

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad