Bluepad | Bluepad
Bluepad
बखर एका अहल्येची
धनश्री अजित जोशी
21st Sep, 2022

Share

बखर एका अहिल्येची (48)
सगळी मनोरथे स्वप्नातच राहिली. वहिनींची मनस्थिती ठीक नव्हती . त्यांचा एकवेळ जेवणाचा हट्ट त्या सोडायला तयार नव्हत्या. त्यामुळे त्यां खूप अशक्त झाल्या होत्या. तब्येत खराब झाली होती.
सासुबाईंची तब्येत दिवसेनदिवस खालावत होती. त्यातच माझे बाळंतपण पार पडलं. मुलगा झाला म्हणून कोण आनंद झाला. घरातल्या घरातच देवापुढे ठेऊन नाव ठेवलं "श्रीरंग ".
मध्यंतरी बाबा आणि दादा येऊन गेले .' श्रीरंगाला ' बाळलेणी रितीप्रमाणे बाळंतविडा घेऊन आले होते.
" तुला बाळंतपणाला घरी यायला नाही जमलं . कशी आहेस रमे." बाबांनी विचारले न तशी डोळे भरून आले .
" बाबा मी ठीक आहे.तुम्ही कसे आहात."
" कसां दिसतोय?" थकलेल्या बाबांनी विचारलंन.
" थकलेले दिसता बाबा." म्हणलं तसे हासले .
." अग आता वयोमानानुसार असे व्हायचेच. मी ठीक आहे हो , पोरी तू मात्र सोसलेस हो. सांभाळ स्वतःला."
मी होकार भरला तशी समाधान झाल्या सारखे वाटले.
श्रीरंगाच्या आगमनाने घरंच वातावरण काही प्रमाणात बदलले. शाळा , शेती वाडी यामधून ह्यांना फुरसत अशी मिळतंच नव्हती.
कित्येक महिन्यात दादांनी काही खबर नव्हती. तुरुंगातील छळांच्या बातम्या कानावर येत. त्यामुळे दादांबद्दल खूप काळजी वाटत असे .वहिनींची अवस्था फार कठीण होती.
सासुबाईंनी हाय खाल्ली .त्या दुखण्यातून सावरल्याच नाहीत .
एक दिवस सकाळी नेहमीप्रमाणे आईला विचारायला हे गेले तर त्यांची काहीच हालचाल दिसली नाही.रात्रीच कधीतरी त्या गेल्या असाव्यात . घरातलं एक आपलं माणूस गुपचुप असं कायमच निघून गेल्यामुळे सगळ्यानाच धक्का बसला.
मामंजींनी सगळ्यातून अंग काढून घेतलं ..सतत नामस्मरण , वाचन , प्रवचन यांत स्वतःला गुंतवून घेतले.
मोठ्या आईंनी जबरदस्त धक्का बसला पण घराला तर सावरायला हवं होते.त्या खंबीर झाल्या.काकू , मनुताई , उमा यांच्या मदतीने त्या घरातलं सगळं बघत होत्या.
त्यातल्या त्यात एक बरं झाले की या सगळ्यांमुळे वहिनींनी उभारी धरली .
घरंच थोडं झाले म्हणून की काय एक दिवस दुपारी राघव भाऊजी दारात दत्त म्हणून उभे राहिले . त्यांच्या नोकरीवर गदा आली होती. अभिनव भारत च्या मंडळींवर सरकारची वाकडी नजर होतीच त्यांना पुणं सोडायला सांगितले.
रात्री मामंजींबरोबर बरीच खलबतं झाली . दामूकाकांनी उपाय सुचवलान. " हे बघा मधलं पडकं घर रिकामेच आहे. त्याची डागडुजी करून तेथे तुम्हाला राहता येईल. "
बराच वेळ उहापोह करून हा पर्याय योग्य असे ठरलं ."राघव भावोजींनी तेथे रहावे. गावच्या शाळेत त्यांची वर्णी लाऊन द्यायचं ह्यांनी मनावर घेतलं .
एक दिवस ह्यांनी घरात विषय काढला." मला असे वाटते की राघव ला विचारून त्याला पसंत असेल तर मनुताईंचे लग्न त्यांच्याशी लाऊन द्यावे ."
" मनुताई विधवा आहेत .हे तू विसरलास का? " मोठ्या आईंनी विचारले. विधवा विवाहाची पध्दत नाही.
" हे बघा मला तरी गौतमाचा विचार अयोग्य वाटत नाही .दोघांना मान्य असेल तर त्यांचा संसार मार्गी लागेल. " मामंजींनी म्हणताच यांच्या मनात उत्साह निर्माण झाला.
" हे बघ आज्जी सरकारने विधवा विवाह कायदा संमंत केलाय . मनुताईंचा नवरा लवकर गेला यात त्यांचा काय दोष? पटतय का तुला."
" ते खरं रे पण गाव काय म्हणेल ? अधिच सुधारणावादी म्हणून लोक आपल्याला हिणवतात..त्यात भर ."
" गाव मनुताईंकडे बघायला तयार आहे का? तिची सुखदुःख तिलाच माहित. किती सोसलन बिच्चारीने. राघव भावोजींना मान्य असेल तर खरंच हरकत नाही." वहिनींनी आपलं मत मांडलं .
" बघा बाबा,उगाच धर्माविरूध्द नको. विधवेचे लग्न कोण लावणार?" मोठ्या आईं म्हणाल्या.
," हे बघ आई शास्रात असे कुठेही म्हटलेले नाही . दोघांना मान्य असेल तर मी लाऊन देईन त्यांचे लग्न ." मामंजींनी मोठ्या आईंचा प्रश्न निकालात काढला .
राघव भावोजींना विचारले.ते अनुकूल दिसले तसे मनुताईंला विचारले ." तुम्ही मला आपलं म्हणून सांभाळत .मी आपल्या शब्दाबाहेर नाही " असे म्हणून मनुताईंनी होकार दिलान तशी शुभ मुहूर्तावर दोघांचे लग्न लाऊन दिले .
गावात बातमी पसरली तशी काही मंडळी जाब विचारायला आली. " हे बघा तुम्ही गावात हे सुधारणेचे वारे आणले आहे.हे बरोबर नाही ."
" स्वतः धर्म शास्र सांगणारेच धर्म बुडवून लागले तर कसे व्हायचे . विधवांना आश्रय दिलात .तो तुमचा प्रश्न होता. आता तुम्ही विधवांची लग्न लाऊन द्यायला लागलात. हे चालायचचं नाही " महादेव शास्री तावातावाने बोलू लागले . जमल्यांनीही त्यांच्या म्हणण्याची री ओढलीन .
मामंजी शांत होते. हे ही गप्प बसून होते. सगळेच एकदम तावातावाने बोलू लागले .
आता काय होणार ह्या विचाराने आम्ही पार घाबरलो होतो.
" गप्प बसून काही होणार नाही .तुमच्या अश्या वागण्याने आम्ही गप्प बसणार नाही..वाळीत टाकू तुमच्या घराला ."
" हो हो वाळीत टाकू. सगळ्या गावात अधर्म पसरायला निघालात. अनर्थ माजेल अनर्थ. "
शब्दाला शब्द लागत होता .
गलका वाढत होता. शेवटी ह्यांनी आवाज चढवला ," हे बघा आम्ही कोणतेही धर्मबाह्य वर्तन केलेले नाही. अधर्म केला नाही . विधवा विवाह कायदा संमत झालाय .आम्ही कायद्या बरोबर आहोत. तेव्हा आपला विरोध आवरा .नाहीतर मला नाईलाजाने पोलीस पाटलाला बोलावावे लागेल . मग तुम्हाला कायद्या विरूध्द वागल्या बद्दल जेलची हवा नाही खायला लावली तर नावाचा गौतम नाही."
कायद्याचे आणि पोलिस पाटलाला बोलवण्याचे काढल्यावर जरा आवाज खाली आला.
" तेव्हा आता निघायचं आपल्या घरी.गप्प बसायचय.या गौतमाच्या नादी लागायचं नाही. आम्ही कायद्याच्या बाहेर नाही..चला निघा.." ह्यांनी आवाज चढवलान तशी गुमानं निघून गेले.
मी बघत राहिले , ह्याचे हे रूप सर्वानाच नवीन होते.
" गौतमा चांगलं खडसावलेस हो." मामंजींनी कौतुकाने म्हटलं.
" नाही तर , ह्यांचे काय जातंय . उगाच दुसर्यांच्या मध्यात पडायचं.कुणाचं चांगलं होतं असेल तर ह्यांचा धर्म बुडतो काय? नाक दाबलंन तसं पळाले ."
" बरं सुचलन हो तुला पोलीसांचा धाक दाखवायला " मोठ्या आईंच्या आवाजातलं कौतुक लपत नव्हतं .
नंतर कानावर कुजबुज ऐकायला येत होती पण कुणी तोंडावर काही बोलत नव्हते.हळूहळू सगळं सुरळीत झाले तसे बरं वाटलन.
राघव भाऊजी आणि मनुताईंचा संसार सुरू झाला पडक्या घराला घर पण आले.मनुताईंनी घराचा कायापालट करून टाकलान.
आपल्या स्वभावाने तिने गावातील लोकांनाही आपलंसं केले.
एक दिवस दुपारी पोलिस पाटलांचा सांगावा आला. तुम्हाला तातडीने पुण्याला बोलावले आहे.
हे पुण्याला गेले आणि येताना दादांना बरोबर घेऊन आले .आम्ही बघतच राहिलो.
दादांनी तब्येत खूपच खालावली होती , तुरुंगात काही झाले तर लोकांच्या असंतोषाला तोंड द्य्यावे लागेल या भीतीने त्यांनी दादांची सुटका केली होती.
त्यांच्याकडे बघत नव्हते.नीट उभेही राहता येत नव्हते. प्रवासाच्या दगदगीने ग्लानी आली होती. सगळीकडे माराच्या खुणा होत्या . त्यादिवशी दादांना एकदम खूप ताप भरला .तातडीने वैद्यांना बोलावले .त्यांनी औषधे दिली.
"ह्यांची तब्येत बरीच खालावली आहे .खूप जपावं लागेल , फार हेळसांड झाली आहे.खरं सांगायचं तर काही खरं नाही. सांभाळा." असे म्हणून वैद्य निघून गेले.
दादांची शुध्द गेली. त्याच्या अवस्थेकडे बघून मोठ्या आई पार खचल्या . वहिनींना काही सुधरत नव्हते.
" हे घरी आले म्हणून आनंद मानानयचा की त्यांची अवस्था बघून दुःख करत बसायाचे? " त्यांच्या डोळ्यांतील पाणी खळत नव्हते.
" हे बघा वहिनी , आता आपल्याला खचून जाऊन चालायचं नाही .यातून दादां ना आपल्याला बाहेर काढायचं आहे. मला तुमची मदत हवीय." ह्यांनी वहिनींना समजावलं.
मामंजींनी महा मृत्युंजय मंत्राचा जप सुरू केलान. मोठ्या आईंनी कुलस्वामिनीला साकडे घातले.प्रत्येक जण आपापल्या परीने दादांना बरं वाटावे म्हणून सुचेल ते करत होता.
अहोरात्र वहिनींनी दादां ची सेवा केली. अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांनी दादां ना दुखण्यातून बाहेर काढलंन.
पंधरा वीस दिवसांच्या प्रयत्नांनी दादा शुद्धीवर आले .वहिनींची तपश्चर्या फळाला आली.
सर्व घरात चैतन्य पसरले. वहिनींना किती दिवसांनी हसताना पहात होते.
खूप दिवसांनी आज घरात आनंद आला होता.
संकटं दिली परमेश्वराने पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग ही दाखवला.एकमेकांना सांभाळून घेणारी मोठ्या मनाची माणसं दिली त्याबद्दल त्याला मनापासून हात जोडले.
"देवा, हा आनंद कायम ठेव रे बाबा." तेवढं च मागणं मागितले.
क्रमशः
सौ.धनश्री अजित जोशी.
#बखर एका अहिल्येची.
बखर एका अहल्येची

172 

Share


Written by
धनश्री अजित जोशी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad