Bluepad | Bluepad
Bluepad
किमयागार
Girish
Girish
21st Sep, 2022

Share

किमयागार -प्रमुख
ओॲसिसच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या तंबूच्या दारात असलेल्या पहारेकऱ्यासमोर तरुण उभा राहिला व म्हणाला, मला प्रमुखांना भेटायचे आहे. मला काही संकेत सांगायचे आहेत. तो पहारेकरी काही न बोलताच तंबूत गेला आणि थोड्या वेळाने एका शुभ्र कपड्यातील तरुण अरबाला घेऊन आला. तरुणाने अरबाला त्याने काय पाहिले ते सांगितले. अरब म्हणाला, तू इथेच थांब व तो आत गेला.
रात्र झाली. बाहेरच्या शेकोट्या पण हळूहळू बंद होत होत्या, सगळीकडे शांतता पसरली होती, त्या मोठ्या तंबूत प्रकाश दिसत होता. या सर्व वेळात तरुणाच्या मनात फातिमाचा विचार चालू होता. त्यांच्या भेटीत झालेले संभाषण त्याला आठवत होते आणि त्याचा अर्थ त्याला अजूनही नीट समजला नव्हता.
बराच वेळ गेल्यानंतर पहारेकऱ्याने त्याला आत जाण्यास सांगितले. आत गेल्यावर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. वाळवंटात अशा प्रकारचा तंबू असू शकतो याची त्याने कल्पनाही केली नव्हती. तो आत्तापर्यंत इतक्या सुंदर कार्पेटवरून चालला नव्हता. तिथे हाती बनवलेले सोन्याचे दिवे होते व त्यात कॅंडल ठेवल्या होत्या. प्रमुख एका बाजूला अर्धवर्तुळाकार बसले होते व मुलायम रेशमी उशांना टेकून बसले होते. चांदीच्या ट्रेमध्ये चहाचे ग्लास होते. काही नोकर इतर कामे करीत होते. आणि वातावरणात हुक्क्याचा सुगंधी धुर पसरला होता.
ते एकूण आठजण होते. पण त्या अर्धवर्तुळात मधोमध बसलेल्या व शुभ्र व सोनेरी कपडे घातलेल्या सर्वात मुख्य अशा अरबाकडे तरुणाचे लक्ष गेले. त्याच्या जवळ आधी भेट झालेला अरब बसला होता. तरुणाकडे बघत एक प्रमुखाने विचारले संकेतांबद्दल सांगू इच्छिणारा परकिय माणूस कोण आहे?. तरुण म्हणाला मी आहे, आणि त्याने सर्व हकीकत सांगितली.
दुसरा प्रमुख म्हणाला, आम्ही इथे अनेक पिढ्या राहतो आहे आणि वाळवंट एका परक्या माणसाला संकेत कां देईल?.
तरुण म्हणाला माझे डोळे अजून वाळवंटातील वातावरणात रुळले नाहीत त्यामुळे वाळवंटातील लोकांना न दिसणारे काही मला दिसू शकते. हे बोलतं असताना त्याच्या मनात विचार आला की, मी जगद्आत्म्याला जाणत असल्याने पण असे झाले असेल.
तिसरा प्रमुख म्हणाला, ओॲसिस हे तटस्थ मैदान असते. ओॲसिसवर कोणी हल्ला करीत नाही.
तरुण म्हणाला, मला जे जाणवले ते मी सांगितले. यावर काय करायचे ते सर्वस्वी आपल्या हातात आहे.
यानंतर ते एकमेकात बोलू लागले. ते अरबी भाषेत बोलत असल्याने तरुणाला कळतं नव्हते. तो बाहेर जाऊ लागला पण त्याला थांबवण्यात आले. तरुणाला भीती वाटली. काहीतरी गडबड आहे असे त्याचे मनात आले, आणि उंटचालकाबरोबर हा विषय आपण बोलून चूक तर केली नाही ना असे वाटू लागले.

171 

Share


Girish
Written by
Girish

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad