Bluepad | Bluepad
Bluepad
भुवनेश्वर ठरला पराभवाचा खलनायक !
Dr. Datta Vighave
Dr. Datta Vighave
21st Sep, 2022

Share

भुवनेश्वर ठरला पराभवाचा खलनायक !
घर के शेर मायदेशातही ढेपाळले ; मिशन वर्ल्ड कपला गालबोट लागले.
युएईत झालेल्या आशिया चषक स्पर्धेत टिम इंडियाला अनपेक्षित पराभव पत्करावा लागल्यानंतर आगामी विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी टिम कंबर कसून तयारीला लागेल असे वाटत असतानाच सोमवारी रात्री मायदेशात मोहाली येथे ऑस्ट्रेलियाविरूध्द तिन टि२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात गोलंदाज व क्षेत्ररक्षकांच्या ढिसाळ कामगिरीमुळे फलंदाजांच्या शानदार कामगिरीवर नांगर फिरलाच शिवाय अवघ्या महिनाभरावर आलेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी टिम इंडिया पूर्णतः तयार नसल्याचे विदारक दृश्य क्रिकेट जगता समोर आले आहे.
ऑस्ट्रेलियात विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने बीसीसीआयने तेथील वातावरणाशी निगडीत खेळपट्टया बनवून भारतीय संघाला चांगला सराव मिळण्यासाठी धाडसाचे पाऊल टाकले. नाणेफेक जिंकण्यात कमनशिबी ठरललेल्या कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजीला आल्यावर एक चौकार, षटकार ठोकून धडाक्यात सुरुवात केली. मात्र त्याची खेळी अकरा धावांवरच थांबल्याने भारताला झटका बसला.
आशिया चषकात डेड रबर सामन्यात आफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर तुटून पडणारा विराट कोहली त्याची ती शतकी खेळी फ्ल्यूक असल्याचे स्वतःच सिध्द करून परतला. मात्र त्यानंतर केएल राहुल ५५, सुर्यकुमार यादव ४६ व हार्दिक पांडया नाबाद ७१ यांच्या वादळी खेळामुळे भारताने कांगारूंसमोर २०९ धावांचे अवघड लक्ष्य ठेवले.
मात्र घरच्या मैदानावर दादा असणारे भारतीय गोलंदाज या वेळी पुरते ढेपाळले आणि भारताला एका धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला.
भारताला नशिबाने दगा दिला म्हणण्यापेक्षा गचाळ क्षेत्ररक्षकांनी भारताची संधी दवडली असे म्हणणेच जास्त संयुक्तीक ठरेल. कॅमेरून ग्रीनने ३० चेंडूत ६१ धावा करून ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया भरला. मात्र या डावात ग्रीनच्या कर्तुत्वापेक्षा क्षेत्ररक्षक व गोलंदाजांच्या मेहरबानीचाच जास्त वाटा होता. सुरूवातीला अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर तो पायचित होता. परंतु कोणीच पंचाकडे अपिल न केल्याने तो बचावला व नंतर केएल राहुल व अक्षर पटेलने त्याचे झेल सोडून भारताच्या संकटात भरच घातली.
उमेश यादवच्या धारदार माऱ्यामुळे सामना भारताकडे काहीसा झुकलाय असें वाटत असतानाच अठराव्या षटकात हर्षल पटेलने मॅथ्यू वेडचा झेल टपकला. त्यावेळी तो २३ धावांवर खेळत होता. या जीवदानाचा फायदा घेत वेडने नंतर ११ चेंडूत ३४ धावा ठोकून चार चेंडू व चार गडी राखत ऑस्ट्रेलियाला विजयी करत मालिकेत आघाडी घेतली. यावेळी कमनशिबी गोलंदाज उमेश यादवच होता.
आशिया चषकात भारताच्या पिछेहाटीचे प्रमुख कारण खराब गोलंदाजी हेच होते. आणि येथेही खराब गोलंदाजीनेच पुन्हा एकदा घात केला. कर्णधार रोहितने या सामन्यात सहा गोलंदाजांचा वापर केला. मात्र त्यातील पाच गोलंदाजांनी अकरापेक्षा अधिक सरासरीने धावा दिल्या. त्यातील फक्त अक्षर पटेलच किफायती ठरला. त्याच्या चार षटकात केवळ १७ धावाच निघाल्या. इतर पाच जणांनी १५.२ षटकात १९१ धावा दिल्या, यावरून गोलंदाजांच्या फजितीची कल्पना लगेच येते.
प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार तर अतिशय खराब गोलंदाजी करत असून त्याच्यावरच विश्वास टाकण्याची चूक भारताला चांगलीच महागात पडत आहे. आशिया चषकात निर्णायक क्षणी पाकिस्तानविरूध्द १९ व्या षटकात १९ तर श्रीलंकेविरूद्ध १४ धावा देऊन भारताचाच कर्दनकाळ ठरलेल्या भुवनेश्वरने या सामन्यात सतराव्या षटकात १८ व १९ व्या षटकात वीस धावा देऊन भारताच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले. त्याच्या ४ षटकात ५२ धावा, हर्षल पटेलच्या चार षटकात ४९ धावा, हार्दिकच्या दोन षटकात २२, उमेशच्या दोन षटकात २६ तर फिरकीचा प्रमुख गोलंदाज यजुवेंद्र चहलच्या ३.२ षटकात ४२ धावा निघाल्याने भारताच्या अपेक्षांना सुरूंग लागला.
हर्षल पटेलची दुखापतीनंतर कामगिरीत घसरण, भुवनेश्वरची फक्त कमजोर संघांविरूध्दची झकास कामगिरी, चहल चा जोरात चेंडू फेकण्याचा अट्टाहास भारताला भारी पडत आहे. तर कर्णधार म्हणून रोहित शर्माची प्रभावहिन कामगिरी नुसताच चर्चेचा विषय ठरत नसून संघाच्या पराभवाला कारणीभूतही ठरत आहे. त्याच्या शांत, संयमी स्वभावाचे चिडखोर, रागीट कर्णधारात रूपांतर झाल्याचे केविलवाणे चित्र सध्या मैदानावर बघावयास मिळत असल्याने त्याची विजयाची साखळी तुटल्याचे दिसत आहे. भुवनेश्वर स्लॉग ओव्हर्समध्ये सातत्याने फेल होत असताना त्यालाच त्या षटकात गोलंदाजी देण्याचा त्याचा अट्टाहास भारताला भारी पडत आहे. उमेश यादवने एकाच षटकात दोन बळी घेऊन सामना भारताकडे झुकवला असताना नंतर त्याला गोलंदाजीच न देणे याचे उत्तर केवळ रोहितच देऊ शकतो. संघाकडून चांगली कामगिरी करून घेण्यात रोहित कमी पडत असल्याचे दृश्य आहे.
आगामी विश्वचषकापूर्वीच भारताच्या कमजोर बाजू उघडया पडत असल्याने विश्वचषकाला जाण्यापूर्वी त्या दुरूस्त करणे गरेजचे आहे. अन्यथा आयसीसीच्या विजेतेपदासाठी आणखी एका स्पर्धेची प्रतिक्षा करावी लागण्याची वेळ टिम इंडियावर येऊ शकते.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

177 

Share


Dr. Datta Vighave
Written by
Dr. Datta Vighave

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad