Bluepad | Bluepad
Bluepad
ब्लॉग - बाई आणि स्वयंपाकघर
वंदना गवाणकर
21st Sep, 2022

Share

कालच्या ब्लॉग मध्ये लिहिलेलं सणासुदीला छान साड्या घालून घरात वावरणारी स्त्री, आपल्या भारतीयामध्ये कमी दिसते, कारणं किचन मध्ये वावरताना चांगली साडी घालणं म्हणजे त्या जेवणाचा अपमान असतो, साडिकडे लक्ष द्यायचं का जेवणाकडे? हा मला पडलेला प्रश्न. हळद, कोकम, तेल, गरम मसाले ह्याचे डाग लवकर जात नाहित, मग ते घालताना छान साडीवर अप्रोन घातला तरी मनात भिती असतेच, आणि आपली वाईट सवय..... गाऊन ला हात पुसणे..... जाता जात नाही ही सवय.
हिंदी आणि हल्ली मराठी सिरियल किंवा सिनेमात जेवढ्या नट्या किचन मधे काम करतांना दाखवतात त्या सणासुदीला नटल्या सारख्या असतात, कानात वेल, मोठे कानातले, गळयात दोन हार आणि एक मोठं मंगळसूत्र, हातात कमीत कमि दहा ते बारा बांगड्या, सोन्याच्या काचेच्या सर्व..... कमरेला छल्ला...हातात तीन तीन अंगठ्या, शरीराच्या वरच्या भागात एवढी आयुध सजवून ह्या बायका कणिक मळतात कश्या?, भाज्या कापताना मोठं मंगळसूत्र सुरीत अडकत नाही का? कणिक अंगठ्यात जाऊन बसत नाही का? कानातले झुमके खोबरं खवण्याचया वेळेला किती हिंदकोळे घेतं असतील, ते जड वाटतं नसेल का? बांगड्या सोन्याच्या असतील तरी काचेच्या बांगड्या अजून घालून एवढं वजन पेलवत भजी कशी तळत असतील? ती काच तापत नाही का? आणि त्यात लांबसडक सोडलेले केस,. हे कधीच ह्याच्या जेवणं करण्याच्या मध्ये येत नाहीत....ते पहिल्यापासून छान शाम्पू केलेले सरळसोट असतात, त्यांना एवढं सगळं काम करताना घाम येतो का? ......हे मला पडलेले प्रश्र्न... पण त्या हे हसतमुखाने करतात.... आपल्याला दाखवायला.
ह्याच्या विरुद्ध खरे आपणं....ऑफिस मधून या किंवा घरातल्या घरात किचन मध्ये प्रवेश करतांना.... पहिला गाऊन हा आवडता वेश परिधान केला की केसाचा बुचडा एकदम शक्य तेवढे गोळा करून त्या क्लिप मध्ये बसवायचे आणि मग डोक्यावरती टांगायचे. मंगळसूत्र छोटंसं असतं त्याचा काही त्रास नसतो कारण त्याच्या आजूबाजूला कोणीच नसतं, कानातले असतील तर....शक्यतो नसतात.... बांगड्या एखाद दुसरी...एकीला एक बास. आम्ही आणि स्वयंपाक ह्याचा मेळ बसला की तो झाल्यावरच आमचा अवतार पाहायला वेळ मिळतो..... आमचे नवरे अजून आमच्या पाककृतीवर अवलंबून असल्यामुळे ते आमच्या दिसण्याच मनावर घेत नाही.....कारणं त्यांचं कुठल्याही गोष्टीवर कॉमेंट्स करणं ह्याचा डायरेक्ट इफेक्ट जेवणावर होतो....हे त्यांनाही माहीत असते. खरं सांगायचं तर ते पणं अवतारात असतात, शॉर्ट्स किंवा बर्मुडा वरती बनियन किंवा जूनापुरणा टीशर्ट, आपल्याला काय सांगणार नीट राहतं जा म्हणून....
माझ्या बऱ्याच मैत्रीणी मला सांगतात ' आम्ही ना घरी शनिवार रविवार ड्रेस घालून असतो, कोणी ना कोणी येत...मग बर दिसतं नाही त्यांच्या समोर गाऊन वर असणं '. ऐकायला छान वाटतं....पणं लोकांसाठी आपला कंफर्ट का सोडायचा? त्यांना सवय होऊ दे आपल्या गाऊनची. माझ्या ऑफीस मधल्या कलिगच्य घरी एकदा मी सहजच गेलेली, बायकोने अर्थात किचन मधून पाणी आणि चहा घेऊन प्रवेश केला, सफेद रंगाचा चुडीदार घातलेला, ओढणी एका खांद्यावरून घेऊन कमरेला बांधलेली, सफेद म्हणायला थोडासाच रंग ड्रेस वर होता बाकीचे हळदीचे डाग, ओला झालेला ड्रेस, सगळी स्वयंपाक घरातील गृहिणीची लक्षण होति, आताच भाजिशी मारामारी करून, आमटी फोडणीला टाकून, कूकर ची शिट्टी बंद करून आलेली, घामाने भिजलेली. मला काही नवल वाटलं नाही कारण असच असतं, तुम्ही ड्रेस घाला किंवा गाऊन. त्या कलिगला वाईट वाटलं बायकोचा अवतार बघून. दुसऱ्या दिवशी तो आम्हाला समजावत होता, मेरी बिबी कित्ना अच्छा खाना बनाती है, घरवलोंका खयाल रखती हैं, लेकीन ठीकठाक नाही रहती..... वैगरे.
मी एकच शब्दात सांगितलं ' आमच्यात नवऱ्याच्या आणि सासरच्यांच प्रेमाचा रस्ता पोटातून जातो असं म्हणतात, म्हणजे चांगल खायला बनवलं की ते खूष, मग आपण खूष ( अर्थात हे सगळीकडेच लागू होते असे नाही....पणं तरीहि ) तेव्हा तुझी बायको जे काही बनवते आणि जे काही तू अभिमानाने मिरवतो की माझी बायको सुगरण आहे, तिकडे लक्ष दे, ती कशी दिसते इकडे नाही..... ती आहे म्हणून तू आणि घरचे आहेत'.... किती पटलं माहीत नाही त्याला पणं दुसऱ्या दिवशी पासून बायकोने बनवलेले एक दोन नवीन पदार्थ आमच्यापण ताटात दिसायला लागले.
🙏 वंदना ❤️

236 

Share


Written by
वंदना गवाणकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad