Bluepad | Bluepad
Bluepad
शुभ .....
विश्वास बीडकर
21st Sep, 2022

Share

शुभ बुधवार .
" सांवरे अयजय्यो , सांवरे
जमुना किनारें मोरा गांव...."
कालचा एक दिवस हे जमुना किनारे चं गाव आमचं होतं .
पुर्वीचं अलाहाबाद आणि नवीन बारसं झाल्यानंतरच प्रयाग राज .
गंगा , यमुना आणि सरस्वती या नद्यांच त्रिवेणी संगमाचा गाव . खरं तरं शहरचं .
वाराणसीहून चार तासांत प्रयाग राज ला आलो .
वाराणसीतील एक गोष्ट सांगायची राहिली . काशी विश्वनाथांचं मंदिर सोडलं तर , बाकीची सगळी देवळं गल्ली - बोळातली . सायकल रिक्षा ही न जाणारे मार्ग . ती मंदिरं पाहिल्यावर , कळलं की विश्वनाथांचं मंदिर तर या पेक्षाही गल्लीबोळात होतं . पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगीराज यांच्या दृढनिश्चयामुळे आजचं सर्वांगीण सुंदर मंदिर उभं आहे .
हे लिहितांना देवा प्रतीचा भक्तीभाव दिसावा ही अपेक्षा . राजकीय भक्ती नाही .
आता त्रिवेणी संगमावर येऊ .
समुद्राएवढं नदीचं पात्र असू शकतं हे प्रथम दर्शनी कळलं . यमुना आणि गंगा दोन्ही नद्या अथांग . सरस्वती लुप्त होऊन दोन्ही नद्यांना मिळते हे कळलं .यमुनेच्या किनारयावर वल्हवणारया बोटी मिळतात . अर्धा - पाऊण तासांचा प्रवास . संगमाच्या जागी घेऊन जातात . दोन बोटींच्या मध्ये दोरखंड बांधलेले . पाण्यात खाली चौकट बांधलेली . त्यावर उभे राहून गंगा स्नान करणं अपेक्षित आहे .
आम्ही पाणी हातात घेऊन अंगावर शिंपडून स्नान उरकलं . शहरी मन अशा वेळेस जिंकतं .
त्या आधी बोटीने जायचं का नाही हा परिसंवाद रंगला होता .
अर्थात आमच्या पती - पत्नीत .
वातावरण पावसाळी होतं . थोडासा पाऊस ही पडत होता .
बायकोचं म्हणणं ,
" अशा वेळेस नदीत बोटीनं जाणं धोक्याचं असतं ."
एक नावाडी आणि दुसरा मी अनाडी तिला समजावून सांगण्यासाठी परिसंवाद रंगला . पत्नीला नेमका तेंव्हा " देशी टायटॅनिक " आठवतं असावा .
पण , वादविवादात नावाडी आणि मी आयुष्यात प्रथमच जिंकलो . बहुधा शंकर कृपा एक दोन दिवस टिकत असावी .
नंतर , नेहरूंचं आनंद भवन पाहिलं . इंदिरा गांधीं चा जन्म झालेलं हे ठिकाण . छान जपलं आहे हे सगळं . इंदिरा गांधींचे लग्ना आधीचे आणि मुलांबरोबरचे फोटो खूप सुंदर आहेत .
राजकीय मतभेद विसरून , एक तरूणी आणि आई म्हणून इंदिरा गांधीं ची प्रतिमा पाहून मन थोडंसं हळवं ही झालं .
यमुना नदी परत एकदा दिसली आणि मन परत एकदा प्रसन्न झालं .
विशालतेत वैभव असतं हे जाणवलं !
विश्वास बीडकर .
२१ सप्टेंबर २०२२ .

176 

Share


Written by
विश्वास बीडकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad