Bluepad | Bluepad
Bluepad
भरणी श्राद्ध ( भयकथा )
Prathmesh kate
Prathmesh kate
20th Sep, 2022

Share

भाग १ ला
भरणी श्राद्ध ( भयकथा )
आज रंगाच्या वडिलांचे भरणी श्राद्ध होते. सकाळची वेळ. किचनमध्ये तयार होणाऱ्या निरनिराळ्या पदार्थांचा घमघमाट घरभर पसरला होता. बाहेरच्या खोलीत लोक येऊन बसायला लागली होती‌. रंगनाथ भिंतीला टेकून ठेवलेल्या खुर्चीत बसून त्यांच्याशी बोलत होता चाहुलीनं त्याची नजर दरवाज्याकडे गेली. त्याचे दोस्त शांताराम दामू आणि येसाजी आले होते.
" अरे शांता, येसाजी या या. ये दामू." रंगाने हसतमुखाने त्या तिघांचं स्वागत केलं. ते आत आले. नेहमी उत्साहाने सळसळणारा, कायम मोकळं हास्य ओठांवर हसणारा येसाजी आज घुम्यासारखा, समोर नजर ठेवून हळूहळू चालला होता. शांताराम आणि दामूने रंगनाथ शी हातमिळवणी केली. बसलेल्या लोकांना राम राम वैगेरे केला‌. येसाजीने मात्र कुणाकडे बघितलही नाही. रंगापुढे दामू, त्याच्या शेजारी येसाजी अन त्याच्या बाजूला शांताराम असे ओळीने बसले. खाली बसताच येसाजीने मान खाली घातली, आणि शरीर पूर्ण ताठ ठेवून बसला. रंगाला जरा आश्चर्यच वाटलं त्यानं जरा वाकून दामूच्या कानाशी तोंड देऊन त्याला येसाजी बद्दल विचारलं तो म्हणाला -
" म्हाईत नाय बाबा काय झालं. येताना तर चांगला मोठमोठ्यानं खिदळत बोलत होता. अंगणात येताच गपच झाला एकदम."
रंगानं शांताराम कडे बघितलं. तसं त्यानेही खांदे उडवले. त्यानं मंग येसाजीकडे नजर वळवली. खाली मान घालून ढिम्म बसलेल्या येसाजीला बघून का कोण जाणे पण रंगाला त्याच्याशी बोलण्याचा, त्याला काही विचारण्याचा धीर होईना ; पण मग आपल्याच दोस्ताला काय घाबरायचं कारण असा स्वतः शी विचार करून तो जरा मोठ्याने म्हणाला.
" येसाजी‌..."
पण येसाजीने काही उत्तर दिले नाही. मात्र इतर लोकांच त्याच्याकडे लक्ष जाऊ लागल. जरावेळ थांबल्यावर, तो काही प्रतिसाद देत नाही असं बघून रंगनाथ पुन्हा आधीपेक्षा अजून मोठ्या आवाजात म्हणाला -
" अय येसाजी..."
" हं " येसाजीने खालमानेनच हुंकार दिला ; पण.. पण तो आवाज ! वेगळाच ( आणि विचित्र ) होता तो. मुख्यतः जाणवली ती त्यातली विलक्षण जरब. रंगाचं सारं शरीर एकदम ताठरलं. दामू अन शांतारामनेही चकित होत झटक्यात माना वळवून त्याच्याकडे पाहिलं. लोकं त्याच्याकडे कटाक्ष टाकून एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागली.
" हंहं... जरा उखडलाय वाटतं भांडण बिंडण झालं आसल गावात कुणाशी. बरं ते जाऊ द्या. शामराव तुमच्या कांद्याला.." स्वतः ला सावरत रंगनाथने विषय बदलला. वातावरण निवळलं. इतक्यात रंगाची बायको सविता आणि दोन तीन बायका पत्रावळी आणि खाण्याचे जिन्नस घेऊन आल्या. सर्वांना पत्रावळी वाटल्या गेल्या. मग त्यांत पदार्थ वाढले जाऊ लागले. पुण्यात वाढले जातात मंडळी सरसावून बसली येसाजी मात्र बिलकुल हालचाल न करता तसाच मान खाली घालून बसला होता. सविता भज्यांचं पातेलं घेऊन त्याच्या समोर आली. आता त्याने जरा चुळबूळ केली.
घ्या भाऊजी तुमच्या आवडीची भजी पत्रावळीत भजी वाढवून सविता म्हणाली केसाची ने झटकन मान वर करून तिच्याकडे पाहिलं सविताची त्याच्याशी नजरानजर झाली अन् , तिच्या काळजात धडकी भरली. डोळे विस्फारले गेले. ती तशीच येसाजीकडे पाहत खिळून उभी राहिली. हात तसाच त्याच्या पत्रावळीवर राहिला. सगळ्यांवर नजर फिरवता फिरवता रंगाचं तिकडे लक्ष जाताच त्यांना सविताला हाक मारली
" एय.. सविते‌."
" उं.. अं ? काय ? " सविताने दचकून त्याच्याकडे पाहत विचारलं.
रंगाने हातानेच तिला पुढे वाढण्याचा इशारा केला. तशी ती पूर्ण भानावर येऊन पदर सावरत नीट उभी राहिली. आणि पुढे वाढू लागली ; पण वाढता वाढता अधून मधून चोरट्या नजरेने ती येसाजी कडेच बघत होती वाढून होता जवळ जवळ पळतच ती किचनमध्ये गेली.
क्रमशः
@ प्रथमेश काटे
आवडल्यास ग्रुपला भेट द्या :-
https://www.facebook.com/groups/758165158061766/?ref=share_group_link

188 

Share


Prathmesh kate
Written by
Prathmesh kate

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad