Bluepad | Bluepad
Bluepad
कोरोना...(be positive)
swati jangam
swati jangam
20th Sep, 2022

Share

कोरोना...(be positive)
'असे जगावे दुनियेमध्ये
आव्हानाचे लावून अत्तर...
नजर रोखुनी नजरेमध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर'...
खरंच या कोरोनाच्या दीड दोन वर्षाच्या काळात माणसाने आयुष्य कसे जगावे...? या विंदाच्या कवितेतून आयुष्य जगण्याची सकारात्मकता दिसून येते. या कोरोना रोगाच्या साथीचा प्रादुर्भाव अत्यंत भीषण स्वरूपाचा होता ,की संपूर्ण जगाने त्याची दाहकता सोसली आहे.
कोरोनाची भीषणता मी स्वतः अत्यंत जवळून अनुभवली आहे की ,असा प्रसंग कोणत्याही जीवाच्या वाट्यास येऊ नये. प्रसारमाध्यमातून पॉझिटिव्ह चा आकडा ऐकला तर मानसिकता तर ढासळतेच, पण आपल्या गावात किती पॉझिटिव्ह आहेत हे कळताच पोटात खड्डा पडायचा.
अशा परिस्थितीत मी कोरोनाग्रस्त व्यक्ती असूनही माझ्या मिस्टरांनी ह्या गोष्टीची किंचितही जाणीव मला करून दिली नाही. त्यांनी माझ्याशी कायम सकारात्मक व्यवहार ठेवला. पॉझिटिव्हिटी काय असते ,हे मला माझ्या कुटुंबातूनच समजले.
पण या निगेटिव्ह रोगाला पॉझिटिव्ह का म्हणतात...? हेच मला कळत नव्हते. एखाद्या पेशंटचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, की आपण रिलॅक्स होतो. पण कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की पाया खालची जमीन सरकते.
ह्या व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं. संपूर्ण कुटुंब ,गावे उध्वस्त केली आहेत. हे सत्य जरी शाश्वत असले तरी ह्याच परिस्थितीने जगण्याच्या उमेदीला पॉझिटिव्हिटी दिली. कोरोना येऊन गेला अन् माणसाने माणसाशी माणुसकीच्या वर्तनाची पॉझिटिव्हिटी दिली.
या व्हायरसचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी (डब्ल्यू एच ओ) आणि जगातील प्रत्येक राष्ट्रांना महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले. शासनाने अनेक योजना राबवल्या. कुटुंबात प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेसाठी ठाम निर्णय घ्यावे लागले. औद्योगिक क्षेत्रात उद्योगपतींना देखील ठाम व अचुक निर्णय घ्यावे लागले.
पण याची झळ समाजाला, निसर्गाला, प्राणिमात्राला सोसावी लागली.
याचे कारण आपणच आहोत.
निसर्ग, समाज, पशुपक्षी, घर, कुटुंब शिक्षण, स्वच्छता आणि कितीतरी गोष्टीत ठाम निर्णय बजावण्याची पॉझिटिव्हिटी शिकवली.
"जो खांडावया घाव घाली ।
कालवणे जाने केली ।।
दोघा एकची सावली।
वृक्ष देत तैसा"।।
'पर्यावरण' या शब्दाची उत्पत्ती या संतांच्या काळात नव्हती ,पण 'पर्यावरणाची जाण आणि निसर्गाचे भान' मात्र त्यांना नक्कीच होते.प्रकृतीचे पूजन अर्थात निसर्गाची पूजा करणे हीच आपली संस्कृती आणि हेच आपले संस्कार आहेत.
संतांच्या कृपाशीर्वादाने पावन झालेल्या भूमीत नैसर्गिक संपत्ता सर्वत्र विपुल प्रमाणात आहे. पण जगतगुरु संत तुकाराम महाराज म्हणतात..., की "वृक्षवल्ली आम्हा सोयरी ।वनचरे पक्षीही सुस्वारे आळवी"।। परंतु आपण हे पशु पक्षी वृक्षवल्ली राखण्याचा विचार या व्हायरसने करायला लावला.
कित्येक दशकापूर्वी संतश्रेष्ठ गाडगेबाबांनी..
'देव पाहावा माणसात ।
स्वच्छता आणि शिक्षणात'।।
असा स्वच्छतेचा संदेश मंदिरातील आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून अगदी तळागाळाच्या समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतु या संतांच्या भूमीत आपली घरे, बागा ,सार्वजनिक ठिकाणी रस्ते, मंदिरे आणि त्यांचे परिसर हे प्लास्टिक व प्रदूषणाच्या प्रचंड विळख्यात अडकल्याचे दिसून आल्यावर या करोनाने जन्म घेतला आणि स्वच्छतेची पॉझिटिव्हिटी श्रीमंत पासून ते जनसामान्य पर्यंत पोहोचवली.
निसर्ग तर आपल्याला नेहमी सढळ हातानेच देत राहिला. त्या निसर्गाचे आपणही देणे लागतो पण मानवाने विविध क्षेत्रांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भरारी मारत असताना, आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेतला मात्र तरी त्याची परतफेड करण्याचे तो साप विसरला.
मानवाने तयार केलेला ऑक्सिजन किती दिवस आणि कुणाकुणाला पुरणार होता...? ऑक्सिजन अभावी कित्येक व्यक्तींचे दुर्दैवी अंत झाले.
अमर्याद वृक्ष तोडीमुळे पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढतच राहिले. पशुपक्षी आणि प्राणी वाचवणे हे मानव सृष्टीच्या हिताचे ठरले आहे. चीनमधील वुहान देशातून प्राण्यांकरवीच या रोगाचा संसर्ग झाला. यासाठी सर्वांनी पर्यावरण पूरक गोष्टी राबवणीच्या दृष्टीने जगाचे पोषण पर्यावरणाचा संदेश आणि संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या गोष्टीची जाणीव या कोरोना व्हायरसने करून दिली. आपण पर्यावरणाप्रती, निसर्गाप्रती, प्राण्यांप्रती नेहमीच कृतज्ञ राहिले पाहिजे. असा मोलाचा संदेश आज आपण अनुभवत आहोत.
"अज्ञानतीमीर अंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरूपेन उन्मिलीतम,यैन
श्री गुरुवे नमः"
जीवनातील प्रत्येक क्षेत्रात गुरूंचा महिमा आघात आहे. अध्यात्मिक क्षेत्रात गुरूंना महत्वाची स्थान आहे. समाजात ब्रम्हा- विष्णू -महेश्वर यांच्यापेक्षाही गुरूंना अधिक महत्त्व दिलेले आहे ;थोरवी पण गायले आहेत.
लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालय बंद झाले तेव्हा लहाना- मोठ्यांना शिक्षणाची कमतरता दिसून आली. शिक्षण व शिक्षक समाजाच्या प्रगतीसाठी किती महत्त्वाचे आहेत,हे पालकांचे लक्षात आले.
अध्यापनाचा पर्याय मार्ग म्हणून 'ऑनलाईन शिक्षणाचा 'मार्ग निवडला. तंत्रज्ञाने प्रगतीमुळे मोबाईल वरती ऑनलाईन शिक्षणाचे हे वर्ग भरू लागले.... पालकांना आपल्या पाल्याला शिकवण्याची व शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याची जिद्द कायम होती.
परिस्थिती नसताना देखील कित्येक पालकांनी मुलांना मोबाईल घेऊन दिले. शैक्षणिक दृष्टिकोन समोर ठेवून विज्ञान आणि गुरूंचे महत्त्व या प्रत्येकाच्या आयुष्यात किती आवश्यक व जीवन सार्थकी लागणारआहे. कोरोना व्हायरसने शिकवले...
कोरोनामुळे घरातील व्यक्तींचं प्रत्येकाशी जिवाळ्यात नातं निर्माण झालं. एकमेकांच्या जाणिवेचा अस्तित्व टिकवणार नातं तयार झालं...
समाजातील जातीभेद ,धर्म , गरीब- श्रीमंत हा कोणताच स्तर कोरोनाला माहीत नव्हता. पण सामाजिक बांधिलकी जपण्याची पॉझिटिव्हिटी या व्हायरसने दिली.
पोलीस, डॉक्टर्स, सफाई कामगार हे या व्हायरस विरुद्ध युद्ध झालेत. समाजाला पोलिसातील रक्षक समजला... डॉक्टरां- मधील देव दिसला... नर्स मधील घरातील व्यक्तींची पोकळी भरून काढली... सफाई कामगारांमध्ये संत गाडगेबाबांची शिकवण आठवली.
पहिली- दुसरी- तिसरी लाट आली... कोरोना आला.. डेल्टा आला...
ओमायक्रोन आला... पण सर्व संसर्गजन्य रोगांनी संपूर्ण जगाला स्वावलंबनाची, स्वकृत्वाची ,सामाजिक बांधिलकी जपण्याची शिकवण दिली.
मुक्या-प्राण्यांवरचे प्रेम... निसर्गाचे संतुलन... शिक्षणाविषयीची आत्मियता... पोलीस ,डॉक्टर ,नर्स,सफाई कामगार यांच्याविषयी कृतज्ञता ,शासनाने संरक्षण णासाठी घातलेले नियमांची सुचकता हे सर्व करून आणि व्यक्त करण्याची पॉझिटिव्हिटी या कोरोनांनी दिली.
संत तुकाराम मला म्हणतात ;
"एकमेका साह्य करू"
अवघे धरू सुपंथ "
एकमेकांना साह्य करण्याचे माणुसकीची वृत्ती जगासमोर आणली.. म्हणूनच कोरोना (be positive)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शब्द संकलन :स्वातीधन
*************************

166 

Share


swati jangam
Written by
swati jangam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad