Bluepad | Bluepad
Bluepad
वेध नवरात्रीचे
n
nikhils
19th Sep, 2022

Share

श्रावण महिना आटोपला की उत्सवी सोहळ्याचे दिवस जीवनात चैतन्य निर्माण करतात. नागपंचमी सणापासून ते पुढे दिवाळीपर्यंत नुसती धमाल असते. यात नवरात्रीचं महत्व अबाधित आहे. काळानुसार प्रत्येक सण, उत्सवाचं रूप बदलत गेलं पण नवरात्रीतील उत्सवाने आपलं स्थान कायम ठेवलं. आदिशक्ती आदिमाया असणाया देवीच्या विविध रूपांची ओळख आपल्याला आहेच.दुर्गामाता , सरस्वती,काली माता अशी देवीची वेगवेगळी रूपे आहेत नुकताच हिवाळा सुरु झाला असतो.पहाटेच्या गुलाबी थंडीत उठून स्नान करण्याची मजा काही औरच असते.सकाळी सगळीकडे मंगलमय वातावरण असते आणि त्यात पायी जाऊन देवीचे दर्शन घेण्याची मजा काही औरच असते. सकाळच्या वेळेत सूर्यनारायणाच्या किरणं सुद्धा देवीच्या दर्शनासाठी हजर असतात.
देवीच्या दर्शनासाठी परगावातील लोक सुद्धा आतुर असतात त्यामुळे मंदिराचा परिसर भाविकांमुळे फुलून जातो. ज्या देवी मंदिरात काही ठराविक भाविक जातात तिथे असे उत्सवाचे स्वरूप आल्याने भाविक गर्दी करायला सुरुवात करतात मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप आलेले असते त्यातून बऱ्याच लोकांना प्रत्यक्ष्य व अप्रत्यक्ष्य रित्या रोजगार प्राप्त होतो.नवरात्रीत नऊ ठिकाणी जवळपासच्या नऊ देवीचे दर्शन घ्यायचे असा पायंडा पडला. काही लोकांकडे सलग ९ दिवस अखंड ज्योत प्रज्वलित ठेवतात तर काही लोक सलग ९ दिवस अनवाणी राहणे पसंद करतात तर काही निर्वीकाल उपास ठेवतात. या नऊ दिवसातील एक आनंदाचा व कौतुकाचा इव्हेंट म्हणजे कुमारिका पूजन. या नऊ दिवसात सप्तमी, अष्टमी, नवमीच्या दिवशी कुमारिकांचे पूजन केले जाते. या छोट्या- छोट्या म्हणजे अवघ्या दोन वर्षांपासून ते आठ- नऊ वर्षांपर्यंतच्या कन्या अगदी नटून-थटून घरी येतात. त्यांचं छान सभोवती रांगोळी काढलेल्या पाटावर किंवा चौरंगावर बसवून पूजन केले जाते.त्यांच्या आवडीचे जेवण त्यांना दिले जाते.
अलीकडच्या काळातील नवरात्रीच्या आठवणीत दांडिया-गरबाच्या आठवणी रमणीय आहेत. ठिकठिकाणी जाऊन देखावे बघण्याचा आनंद तर अवर्णनीय. देखाव्यात देशभरातील प्रसिद्ध देवींच्या मुखवट्याचे मंदिरांच्या प्रतिकृती तयार केल्या जातात. त्यामुळे जी कधी बघायला मिळाली नाही अशा देवीचं दर्शन होते. महिला वर्ग त्या बघण्यासाठी गर्दी करतात . यातून सार्वजनिक मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या कल्पकतेतून अनेक गोष्टी चित्र आणि मूर्ती बघताना होणारा आनंद वेगळा असतो कुणी पर्वताचा देखावा तर कुणी गुहेचा. धार्मिक कथेतील देखाव्यांना प्रसिद्धी मिळतात . काही देवींच्या मुर्त्या तर कायम आठवणीत राहतील इतक्या उत्तम बनविल्या जातात . काही देवींच्या मूर्त्यांचा साजशृंगार तर इतका सुरेख असायचा की त्याची सर्वत्र चर्चा होते . यातून काही कलाकार उदयास आलेत. त्यामुळे त्यांच्या कल्पकतेला नंतर देखील वाव मिळत असे. एवढंच कशाला, पुढे अशा ठिकाणी वेगवेगळे इव्हेंट होऊ लागले. त्यांना व्यवसायिकतेच स्वरूप आले
एकत्र येऊन आरत्या, स्तोत्र पठणाने वातावरण भारावून जाते . धूप, राळ, उदबत्ती, गुग्गुळाचा सुगंध वातावरण आणि मन प्रफुल्लित करतो . कालांतराने दिवस बदलत जात तसे ठीकठिकाणी या नवरात्रीचे स्वरूप वेगळे असले तरी पावित्र्य, उत्साह तोच आहे
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी देवीचे मंदिर आहेत, माहूरची रेणुका देवी , वाणीची शप्तसुंगी देवी , कोल्हापूरची अंबाबाई,अंबेजोगाई - अमरावतीची अंबाबाई या ठिकाणी नवरात्रौत्सव असतो.
दहाव्या दिवशी विजयादशमीनि नवरात्रीची सांगता होते. आपल्यातील दहा विकारांचा पराभव.परत परत विकार वाढु नये म्हणून पूर्ण उच्चाटन. नउ दिवस नवरात्रीचे आपल्यातील विविध शक्ति जागृत करण्यासाठी ....आत्मबल वाढवण्यासाठी...आपल्यातीलच विकाररूपी रावणाचा सामना करून वध करण्यासाठी .चांगल्या विचारांची कोणत्याही परीस्थितीत आनंदी व समाधानी राहण्याची अखंड ज्योत लावावी. नवरात्रीतील आठवणींचा हा चित्रपट तसा रंजकच. कारण यात, उत्साह, चैतन्य आणि आनंद असतो. येणाऱ्या नवरात्रोत्सवावासाठी आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्या.

176 

Share


n
Written by
nikhils

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad