Bluepad | Bluepad
Bluepad
जागतिक व्यासपीठावरिल भारताच्या नव्या भूमिका
Mangesh Acharya
Mangesh Acharya
19th Sep, 2022

Share

जागतिक व्यासपीठावरिल भारताच्या नव्या भूमिका
डॉ. मंगेश आचार्य
8550971310
जागतिक व्यासपीठावर भारताचा चढता आलेख आणि प्राप्त होत असलेल्या सन्मानाने अनेक देशांना मागे टाकत भारताने आपली कामगिरी सिद्ध केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या जागतिक जबाबदाऱ्या व भूमिका भारताला पार पाडाव्या लागणार आहेत. निश्चीतच भविष्यात याचे सकारात्मक परिणाम सर्वत्र पाहावयास मिळतील. अत्यंत महत्वाची समजली जाणारी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओची) शिखर परिषद शुक्रवारी उझबेकिस्तानच्या समरकंद येथे संपन्न झाली. या शिखर परिषदेमध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती यासाठीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शिखर परिषदेमध्ये आपली उपस्थिती लावली होती. या परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात एक महत्वाची बैठक पार पडली. भारताने आजवर जागतिक व्यासपीठावर आपली भूमिका सक्षमतेने पार पडली असून जगाने भारताचे प्रतिनिधित्व मान्य केलेले आहे. ही एससीओ सुद्धा भारतासाठी खूप महत्वाची असणार आहे कारण पुढील वर्षी भारत एससीओचे अध्यक्षपद भूषवणार आहे. एससीओची आगामी शिखर परिषदही भारतातच होणार आहे. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय संघटना आणि गटांचे अध्यक्षपदही भारत भूषवणार आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही एससीओ मध्ये भाग घेतला पण भारतीय पंतप्रधान आणि चीनचे अध्यक्ष यांच्यात औपचारिक बैठक झाली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मात्र एससीओच्या अध्यक्षपदासाठी भारताला पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे. याव्यतिरिक्त, शी जिनपिंग यांनी आपल्या भाषणात जोर आहे दिला की, "जागतिक नेत्यांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेनुसार विकासाला चालना देण्यासाठी तर्कशुद्ध दिशेने एकत्र काम केले पाहिजे." त्याचबरोबर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही एससीओ च्या अध्यक्षपदासाठी भारताचे अभिनंदन केले आहे.
मुत्सद्देगिरीच्या क्षेत्रातील भारताची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. विशेष म्हणजे एससीओ व्यतिरिक्त, भारताला यावर्षी जगातील 20 शक्तिशाली देशांच्या जी-20 गटाचे अध्यक्षपदही मिळणार आहे. भारत 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर २०२३ पर्यंत जगातील 20 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या या गटाचे भारत नेतृत्व करेल. जी-20ची शिखर परिषदही पुढील वर्षातच भारतात होणार आहे. याचा अर्थ अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह जगातील अनेक मोठ्या देशांचे प्रमुख भारतात असतील.
जी-20 चे अध्यक्षता प्राप्त झालेल्या देशाला अतिथी देश म्हणून कोणत्याही देशाला त्यात सहभागी करून अधिकार असतो. भारत या संधीचा लाभ घेत जी-20 मध्ये बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन आणि संयुक्त अरब अमिराती या देशांना अतिथी देश म्हणून आमंत्रित करेल, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहाराच्या दृष्टीने आणि या देशांच्या भौगोलिक अस्तित्वाचे महत्व लक्षात घेवून हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. शेजारी देश असलेला बांगलादेश हा तर महत्वाचा देश आहेच त्या व्यतिरिक्त या यादीत अरबस्तान, युरोप, आफ्रिका आणि पूर्व आशियातील देशांचा समावेश करण्यात आला आहे.
जी-20 देश हे जगाच्या जीडीपी च्या 80 टक्के, आंतरराष्ट्रीय व्यापारात 75 टक्के आणि लोकसंख्येच्या 60 टक्के प्रतिनिधित्व करतात. जी-20 च्या संपूर्ण भारतात सुमारे 200 बैठका होणार आहेत, त्यापैकी काही बैठका जम्मू आणि काश्मीरमध्ये आयोजित केल्या जाऊ शकतात. तेथे कोणत्या बैठका होणार आहेत आणि कोणते देश तेथे जात आहेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
एससीओ, जी-20 व्यतिरिक्त भारत संयुक्त राष्ट्रातही आपली महत्त्वाची उपस्थिती बजावणार आहे. भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (युएनएससी) अध्यक्षपदही मिळणार आहे. या वर्षाच्या अखेरीस भारताकडे ही जबाबदारी देण्यात येत आहे. भारत डिसेंबर २०२२ मध्ये सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषवेल आहे. भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य नाही. याशिवाय जगातील सात बलाढ्य देशांची संघटना असलेल्या जी-7 मध्ये भारताचा समावेश करण्याबाबत चर्चा सुरू आहे. या वर्षी जूनमध्ये जर्मनीत झालेल्या जी -7 शिखर परिषदेत भारताने अतिथी देशाची भूमिका बजावली होती. जर्मनीने जी -7 मध्ये भारताला अतिथी देश म्हणून आमंत्रित केले होते.
अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताला अध्यक्षपद मिळणे हा मोठा राजनैतिक विजय म्हणून पाहिले जात असून या माध्यमातून भारत जगावर एक मोठा राजनैतिक ठसा उमटवेल यात दुमत नाही. गेल्या काही वर्षांत जगामध्ये भारताची भूमिका अधिक महत्त्वाची बनली आहे आणि एससीओ, जी20 आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद मिळणे हे भारताचे भविष्य उज्वल असल्याचे दर्शवते. भारताला अशी भूमिका देण्यामागे अनेक कारणे आहेत; भारतात 150 अब्ज डॉलरची विक्रमी एफडीआय गुंतवणूक झालेली आहे. देशातील 60 टक्के लोकसंख्या तरुण आहे, परकीय चलनाचा साठा $ 600 अब्जांवर पोहोचला आहे आणि आर्थिक वर्षाचा अंदाजे विकास दर 9 टक्क्यांपर्यंत आहे. हे सर्व भारत सतत प्रगती करत असल्याचे स्पष्ट करते.
भारतातील निर्माण झालेल्या विकासाच्या वातावरणामुळे आणि कोरोन महामारीनंतरच्या आर्थिक स्थिरतेमुळे विश्वास आहे की, भारताची राजनैतिक शक्ती सतत वाढत जाणार आहे. पण त्याच वेळी, भारताला विकसित देश म्हणून घोषित करण्यासाठी अनेक दशके लागतील हेही सत्य नाकारून चालणार नाही. कारण भारतात करोडो लोक अजूनही गरिबीत जगत आहेत. भारताची पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सप्टेंबरच्या सुरुवातीला भारत ब्रिटनला मागे टाकत सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) बाबतीत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला होता. मार्च 2022 च्या अखेरीस भारताने ब्रिटनला मागे टाकल्याचे ब्लूमबर्ग डेटाने नोंदवले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) च्या आकडेवारीच्या आधारे ब्लूमबर्गने हा निष्कर्ष काढला आहे. ब्लूमबर्गच्या मते, भारताची अर्थव्यवस्था या वर्षाच्या मार्च अखेरीस $ 854.7 अब्ज होती, तर ब्रिटनची अर्थव्यवस्था $ 816 अब्ज होती.
पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणे आणि जागतिक संघटनांमध्ये स्थान मिळवणे हे भारताची ताकद दर्शवते. या सामर्थ्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय दर्जा वाढतो आहे. येत्या काही महिन्यांत आणि वर्षांत भारत विकासाची नवे शिखर गाठेल असे दिसून येते. अशातच देशाने शत्रू राष्ट्राच्या कुरघोड्याकडे सुद्धा बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. चीन-पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्रांच्या पोटात दुखणे हे स्वाभाविक आहे. निश्तिच भारताला या सर्व बाबीचा विचार करावा लागेल. भारत ज्या सक्षमतेने जागतिक व्यासपीठावर झळकतो आहे ते भाताच्या महासत्ता बनण्याच्या संकल्पाला बळ प्रदान करेल हे मात्र निश्चित आहे.

234 

Share


Mangesh Acharya
Written by
Mangesh Acharya

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad