Bluepad | Bluepad
Bluepad
मुलांवरील संस्कार ............... एक सहज शिक्षण....
Sagar Ambre
Sagar Ambre
19th Sep, 2022

Share

पालकांनी काय करावे.....
आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आईवडील म्हणजे दोन्ही पालक यांचे नोकरी अथवा व्यवसायाच्या निमित्ताने कायमच व्यस्त राहुन त्यांचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष हे खरोखरच संस्कृती, संस्कार आणि जीवनाच्या नितीमूल्यांचा ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरत आहे. मुलांवर संस्कार करण्यासाठी काही विशेष परिश्रम घ्यायला हवेत असे नाही. पालकांनी फक्त घरात नेहमीच्या म्हणजे दैनंदिन जीवनशैलीचाच वापर करुन मुलांनाही त्याची सवय लावावी. त्यालाच तर सहज शिक्षण म्हणतात. वर्षानुवर्षे आपण याच पध्दतीचा वापर करत आलो, आणि म्हणूनच तशी संस्कारक्षम पिढी घडत गेली. आज मात्र पालकांकडून या पद्धतीचा अवलंब होताना दिसत नाही ही गोष्ट जीवनमूल्यांच्या ऱ्हास होण्यासही कारणीभूत ठरत आहे. संस्कार हे मुलांना एका जागी बसवून अभ्यासासारखे पाटीवर किंवा वहीवर लिहून देऊन त्याचे पाठांतर करायला सांगून त्यांच्या मनावर बिंबवता येत नाहीत. थोरामोठ्यांचे जसे आचरण असते तसेच संस्कार मुलांच्यावर घडत असतात. पालक जसे वागतात त्याचेच अनुकरण करुन मुलं तशी वागतात, म्हणुन मुलांसमोर चांगले आचरण ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यांना लहानांसोबत वडीलधाऱ्या माणसांचा तसेच इतरांचा मान-सन्मान ठेवायला शिकवणे, अदबीने बोलायला सांगाणे. बोलताना वाणी सुस्पष्ट आणि चांगली ठेवण्यास सांगणे आवश्यक आहे.
आपली मुले ही समाजात आदर्श व्हावीत असे प्रत्येक पालकांना वाटत असते म्हणून त्यांना समाजाचा मागोवा घ्यायला शिकवा. मुलांकडे वंशाचा दिवा, परक्याचं धनं किंवा म्हातारपणाची काठी म्हणून पाहू नका. ती तुमच्या भविष्याची सोय नाहीत याचे भान कायमचं असू द्यावे. मुलांना दररोज एक चांगले काम करण्याची सवय लावा, त्या कामासंदर्भात शक्य असेल तर दररोज एकत्र बसून चर्चा करा. किमान आठवड्यातून एकदा अश्या प्रकारचे चर्चा सत्र व्हायलाच हवे. मुलांसमोर घरात कोणताही वितंडवाद, भांडणं तसेच आदळ आपट करु नये. मुलं पालकांच्या कृत्याचे निरीक्षण करत असतात याचे भान असावे. रात्री जेवतांना सर्वांनी एकत्र बसून जेवणं करायची सवय घरातील सर्वांना लावावी. मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय ठेवा. जेवणं करताना शक्यतो टीव्ही मोबाईल बंदच ठेवावा. पालकांनी कायमच मुलांसाठी आपला खास वेळ राखून ठेवायलाच हवा. आजकाल मुलांसाठी वेळ न दिल्याने मुलांवर त्याचा गंभीर परिणाम होताना दिसत आहे. मुलांना सर्वांदेखत किंवा नेहमी नेहमी अपमानास्पद बोलू नये, त्यामुळे मुलं तुम्हांच्या मताचा अनादर करायला सुरुवात करतील, तुम्हाला टाळायला चालू करतील. मुलांसमोर मोठ्यांनी छोट्या छोट्या गोष्टींमधून एकमेकांविषयी आदर, प्रेम, आपुलकी व्यक्त करणे आवश्यक आहे.
मुलांवरील संस्कार ...............               एक सहज शिक्षण....
मुलांसमोर कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे व्यसन करु नये याचे भान प्रत्येक पालकांनी ठेवणे अत्यावश्यक आहे. मुलांना चांगल्या व्यसनाची सवय लावावी. जसे की वाचन, लेखन. घरातील कोणत्याही महत्वपूर्ण निर्णयात आपल्या मुलांची मतेही विचारात घ्यावीत, निर्णय प्रक्रियेत त्यांनाही समाविष्ठ करुन घ्यावे. मुलं लहान असतात म्हणून दुर्लक्षित करु नयेत. मुलांनी चुका केल्यास त्यांना प्रथम चांगल्या प्रकारे संयमाने समजावून सांगावे, चुकीच्या दुष्परिणामाची सखोल आणि सविस्तर कल्पना द्यावी. त्यांना माफ करावे मात्र माफी सदैव मिळणार नाही याची परिस्थिती नुसार भाषेचा वापर करुन सौम्य अथवा कडक शब्दात समज द्यावी. मुलांनी केलेल्या चांगल्या कामाचे कायमच तोंड भरुन कौतुक करावे. मुलांचे छंद, आवडीनिवडी जाणून पालकांनी मुलांचे जे छंद आपण सहज जोपासू शकतो त्याबाबत जागरूकतेने मुलांशी चर्चा केली पाहिजे. मुलांमधील खिलाडीवृत्ती निर्माण करण्यासाठी त्यांना मैदानी खेळ खेळण्याची सवय लावावी. पराभवाबरोबर अपयशही पचविण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी योग आणि स्वाध्यायाची सवय लावावी.
पालक म्हणून मुलांच्या प्राथमिक गरजांचे भान ठेवून त्या पूर्ण कराव्यात. त्यामुळे मुलांचा पालकांवरील विश्वास दृढ व्हायला मदत होते. मुलांना विज्ञाननिष्ठ बनविताना सामाजिक परंपरेचा विसर पडू देऊ नये. त्यांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजावून सांगताना मुलांच्या प्रश्नांना वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून समर्पक अशी उत्तरे द्यावीत. कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देणे टाळू नका. माहीत नसल्यास चुकीची माहिती देण्यापेक्षा किंवा उगाचच तू गप्प बैस असं बोलून वेळ मारून नेऊ नका. माहिती नसल्यास तसे कबूल करून नंतर तुला याबाबत माहिती घेऊन सांगतो असे त्यांना आश्वस्त करून नंतर स्वतः आठवणीने योग्य ती माहिती द्या. मुलांशी कधीही नकारात्मक बोलू नये. मुलांना कोणत्याही अपमानास्पद शब्दांनी संबोधू नये, मुले सज्ञान असतील तर त्याचा वाईट परिणाम मुलांवर होतो. मुलांना प्रेमाचा धाक असावा मात्र कोणत्याही परिस्थितीत अमानुषपणे मारझोड करु नये, त्यामुळे मुलांमध्ये नकारात्मक येऊन मुले खोटं बोलायला सुरुवात करतात. आवश्यकता असल्यासच मुलांना मोबाईल द्यावा. खेळणे म्हणून मोबाईल देणे म्हणजे योग्य नाही त्याचे दुष्परिणाम होतात. शिक्षणाची आवश्यकता म्हणून संगणक किंवा तत्सम साधनांची व्यवस्था करावी. मुलांनी केलेल्या मागण्या सर्रासपणे पूर्ण करु नयेत त्यांना आपण करत असलेल्या कष्टाची जाणिव करुन देतानाच नकाराची सवय लावण्यास विसरु नये. त्यामुळे त्यांना आपल्या मेहनतीचे महत्त्व समजण्यास मदत होईल. मुलांनाही काही गोष्टींचे गांभीर्य ओळखून जोखीम पत्करण्याची मुभा द्यावी, त्यामुळे त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढला जाऊन निर्णय क्षमता प्रगल्भ होण्यास मदत होईल.
मुलांवरील संस्कार ...............               एक सहज शिक्षण....
मुलांना कोणत्याही नकारात्मक विचारांमध्ये बांधून ठेवू नये. त्यांना कोणत्याही प्रकारची धमकी देऊ नये. मुलांच्या काही क्षम्य अपराधाबद्दल त्यांना माफी द्यावी मात्र थोडी समज देतानाच त्यांच्या चांगल्या वर्तनाचे कौतुक करावे करण्यास विसरु नये. घरात असताना मुलांसोबत नेहमी यशस्वी लोकांबाबत त्यांच्या कार्याबद्दल चर्चा करावी. मुलांच्या प्रगती पुस्तकाकडे निकोप दृष्टीकोन ठेवून पाहतानाचा त्याच्या सामाजिक वर्तणुकीकडेही पहायला विसरु नये. प्रगती पुस्तक हे मुलांचे भविष्य असू शकेल कदाचित मात्र आयुष्य असणार नाही याची जाणीव ठेवावी. समाजात दैनंदिन घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांबाबत मुलांशी चर्चा करा. त्यांना वर्तमानपत्र वाचायला तसेच दूरदर्शन पाहताना बातम्या पाहण्याची सवय लावा. सामाजिक आंदोलने, उपोषण, हत्या, आत्महत्या, हिंसा या बाबीवर सविस्तरपणे सांगून त्यातील चांगल्या वाईट गोष्टी त्यांना समजावून सांगा. मुलांना कधीही खोट्या गोष्टी नेहमी सांगू नका, कारण मुले त्या विचारांचे अनुकरण करतील आणि तशी वागायला सुरवात करतील. मुलांचे मित्र, मैत्रीणी कोण आहेत? याची पालकांना संपूर्ण माहिती असायला हवी किंबहुना ती पालकांनी ठेवायलाच हवी. मुलांच्या मित्र मैत्रिणींसोबत मैत्रिपुर्ण संवाद असायला हवा. मुलांच्या मित्र मैत्रिणी मध्ये पालकांबाबत विश्वास कसा ठेवता येईल याबाबत पालकांनी जागरुक रहायला हवे. शेवटी संस्कार हे दररोज आपल्या घरात व परिसरात होत असलेल्या घटना, परिस्थितीनुसार घडत असतात. त्यासाठी वेळोवेळी मुलांना चांगले वाईट काय सांगून पालकांनी मार्गदर्शकची भुमिका निभावणे आवश्यक आहे.
आजच्या तंत्रज्ञान युगात आपण जीवनशैलीकडे दुर्लक्ष करत आहोत याचे भान ठेवत मुलांना योगा तसेच व्यायामाची सवय लावावी. त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष ठेवताना आवशकते नुसार तज्ञांचा सल्ला घ्यावा. योग आणि स्वाध्याय ही खरचं आपल्याला संस्कृतीने दिलेली दैवी देणगी आहे. शिक्षकांसोबत पालकांची भूमिका महत्वपुर्ण असून त्यांनी चांगले गुरु होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मुलांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहित करुन त्यांची हिम्मत व उमेद वाढवा, त्यांना स्वतःला स्वयंपूर्ण तसेच आत्मनिर्भय बनवण्यासाठी प्रयत्न करा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण या भारत मातेचे सुपुत्र / सुकन्या आहोत हे त्यांच्या मनावर कोरण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील रहा. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला सांगून ठेवले आहे ते म्हणजे देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्या देशाचे देणं लागतो. हे मुलांना सांगताना देशभक्तीचे संस्कार करा. कुटुंबासोबत समाजाचे पर्यायाने देशाचे नाव लौकिक वाढविण्यासाठी त्यांना प्रेरणा द्या. आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायला शिकवा. परस्परांतील जिव्हाळा कायम जपायला शिकवा. स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांच्याशी प्रेमपूर्वक संवाद साधत रहा. शेवटी संस्कार हे एक सहज शिक्षण आहे ते कोणत्याही विद्यापीठात प्रवेश घेऊन मिळत नाही तर दैनंदिन जीवनातील आपल्या रितीरिवाज, परंपराच आपल्याला शिकवत असतात. म्हणुन संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. हे लक्षात असू द्या.

190 

Share


Sagar Ambre
Written by
Sagar Ambre

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad