Bluepad | Bluepad
Bluepad
स्माईल प्लीज
Rajashri Bhavarthi
Rajashri Bhavarthi
19th Sep, 2022

Share

*#स्माईल_प्लीज*
संडे माझा घरासाठी , माझ्या स्वतःसाठी दिलेला प्राईम टाईम..! महिन्यातून एकदा एखादा चित्रपट ठरवून निवांतपणे लॅपटॉप वर पाहणे ही माझी आवड...! कालच " स्माईल प्लीज " हा विक्रम फडणीस दिग्दर्शित माझी आवडती अभिनेत्री मुक्ता बर्वे चा तरल अभिनयाने समृद्ध असलेला व दमदार अभिनयाचा बादशहा प्रसाद ओक चा चित्रपट पाहिला.
नंदिनी जोशी आयुष्यातील संघर्षातून फिनिक्स भरारी घेत , प्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून नावारूपास आलेली नायिका मुक्ता बर्वे...! एक करीअरस्टिक स्त्री फोटोग्राफर... फॅशन मनोरंजन क्षेत्रात स्वतःचा नावाचा रुबाब , दबदबा असणारी.
मानवी नातेसंबंधावर टाकलेला प्रकाशझोत..! करिअरच्या बाबतीत अत्यंत महत्वकांक्षी असलेली नंदिनी आयुष्यात सेलिब्रिटी बनते. तिचं अख्खं आयुष्य संपूर्णतः कलेसाठी झोकून दिलेलं..!
सर्व काही समंजस पातळीवर समांतरपणे सुरळीत चालू असताना अचानक आयुष्यात एका पाठोपाठ एक वादळ धडकतात. आई बनलेल्या नंदिनी ला पती शिशिर ( प्रसाद ओक ) ने काम थांबविण्याचा दिलेला प्रस्ताव धुडकावून ती पुढे जाते. त्याची परिणती घटस्फोटात होते व मुलगी नुपूर च्या मनात आईबद्दलची अढी निर्माण होते.
वडिलांसोबत रहात असलेली नुपूर ( वेदश्री महाजन ) आपल्या आईचे आपल्याकडे लक्षच नाही ही भावना मनात ठेवत तिच्याबद्दल आकस ठेवून जगते.. परिणामी आई - मुलीचे खटके उडालेले पाहायला मिळतात. कोणतीही स्त्री बाह्य जगात नावाजलेली असली आणि व्यक्तिगत आयुष्यात मात्र तणावाखाली जगत असल्यास त्याचा परिणाम तिच्या कामावर होतो. त्यातूनच सुरू होतात आरोग्याच्या तक्रारी...! कामावरील निष्ठा , संपूर्णपणे त्यात झोकून देण्याची वृत्ती असलेल्या नंदिनी ला सतत काहीतरी निसटत चाललंय ह्याची जाणीव होते. मेंदू दगा देतोय , आपण सतत काहीतरी विसरत चाललोय ह्या कल्पनेने ती सैरभैर होते.
आपली मैत्रीण मानसोपचार तज्ञ डॉ अंजली ( आदिती गोवित्रीकर ) ला भेटते तेंव्हा चेकअप केल्यावर जो रिपोर्ट येतो त्यामध्ये नंदिनीला डिमेंशिया ( स्मृतिभ्रंश ) झाल्याचं निदान होतं. या अवस्थेत नंदिनी पूर्णतः हतबल होते. स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसते. नंदिनीच्या वडिलांनी (अप्पा - सतीश आळेकर ) केलेला अभिनय तर अफलातून...!
ज्या वयात मुलीने वडिलांना साथ द्यायची त्या वयात एका कोमल मनाच्या बापाला आपल्या मुलीला आधार द्यावा लागतो. नंदिनीच्या बालपणी आईला पोरकी झालेल्या या मुलीला वाढविताना अप्पांनी तिच्या महत्वकांक्षा जपल्या होत्या. आणि आता ह्या टप्प्यावर मुलीचे यश पहात असताना झालेला हा आघात पचवणे सोप्प नसतं एका म्हाताऱ्या बापाला....!
त्याच दरम्यान नंदिनी च्या आयुष्यात आलेला विराज ( ललित प्रभाकर )...! तो कोण असतो ? ह्या साठी आपणांस चित्रपट पहायला हवा. मित्र बनलेला विराज मुळे आयुष्यात आलेली स्थिरता...! आई मुलीच्या नात्यातील दुरावा दूर करण्याचा त्याचा प्रयत्न...! नंदिनीला पुन्हा परत मिळवून दिलेला तिचा आत्मविश्वास...!
तिच्या कलेचे Exhibition चे स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लावलेला हा मित्र...!
बरेच काही अलवार प्रसंग ह्या चित्रपटात पाहायला मिळतात...!
काळजाचा ठोका चुकतो जेंव्हा नुपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत नंदिनी बाथ घेऊन अपुरे कपडे सावरत गाऊन मध्ये , ओल्या अवस्थेत बाहेर येते तेंव्हा...! मित्र विराज धावत जाऊन नंदिनीला सावरतो. परंतु नवरा नावाच्या पुरुषी अहंकाराला तेंव्हाच तडा जातो. खरेतर समाजात स्त्री - पुरुष मैत्री ही शारीरिक संबंधाच्याही पलीकडे असते हे कोणी मान्य का करत नाही...?
जग वेडी ठरवत असताना , मित्राने आपल्या मैत्रिणीला दिलेली साथ मोलाची नाही का , तिला माणसात आणण्याचा केलेला प्रयत्न दिसत नाही का..? असो असे अनेक प्रश्न अजूनही समाजात अनुत्तरित आहेत...!
हल्लीच्या जमान्यात सततच्या ताणतणावात जगताना डिमेंशिया ला बळी पडत असलेल्या अनेक केसेस डॉक्टर हाताळतात. त्यावर काहीच उपाय नसल्याने.... औषधांची मात्रा फक्त पेशंटला स्थिर ठेवण्यापुरती होते. त्यांचा गमावलेला आत्मविश्वास , आयुष्यातील आनंद त्यांना पुन्हा परत मिळावा ह्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी , मैत्र परिवार यांनी त्यांना दिलेली साथ मोलाची ठरते. आपल्याला काहीतरी भयंकर आजार झाला असल्याचा त्यांच्या मनातलं गिल्ट...! आपले लोकं आपल्याकडे दुर्लक्ष करतात का..? ही मनात दाटून आलेली खंत...त्यातूनच मेंदू नावाच्या प्राण्याचा प्रचंड गोंधळ उडतो व वारंवार समोरच्या व्यक्तीला एकच प्रश्न सतत विचारला जातो.
कधीकधी मनमोकळ्या गप्पा मारून , मनमोकळं हसू ही ह्या डिमेंशियाग्रस्त लोकांच्या आयुष्यात सुखाचं चांदणं आणू शकतात. आणि हे काम उत्तमरीत्या करायला हवं आपल्याचं हक्काच्या माणसांनी...!
मुक्ता बर्वे चा ताकदीचा अभिनय ..!
लॅव्हिश स्टाईल राहणीमान..! प्रसाद ओक चा दमदार अभिनय , स्वतःच्या मुलीच्या आयुष्याला दाखवलेली योग्य दिशा...!
तिच्या जडणघडणीत बाप नावाच्या पात्राला दिलेला पुरेपूर न्याय...! सारं काही मनाला स्पर्शून जातं...! हल्लीच्या तरुण पिढीच्या आपल्या पालकांकडून अपेक्षा...! अप्पा नावाचे पात्र साकारलेले सतीश आळेकर यांचा अभिनय म्हणजे बोलण्यापेक्षा नजरेने वठवलेला इमोशनल ड्रामा अफलातून...!
अप्पांच्या घरी काम करणारी ज्योती ( तृप्ती खामकर ) सगळ्यांचंच काम अप्रतिम झालंय...! हे काही प्रसंग पाहताना डोळ्यातून दोन अश्रू ओघळतातचं...!
डीमेंशियाच्या रुग्णांना जगण्याची नवी दिशा देणारा...सकारात्मक दृष्टिकोन दाखविणारी ही कथा आपल्या सर्वसामान्यांच्या ही आयुष्यात घडताना दिसते. तुटलेल्या नात्याची नाळ सांधायला मदत करणारा हा चित्रपट म्हणजे " स्माईल प्लीज " 😊
😊🤝🌹😊🤝🌹
©️®️सौ राजश्री भावार्थी
स्माईल प्लीज
पुणे

188 

Share


Rajashri Bhavarthi
Written by
Rajashri Bhavarthi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad