Bluepadसुना सुना विठ्ठल
Bluepad

सुना सुना विठ्ठल

pradip kasurde
pradip kasurde
16th Jun, 2020

Share


सुना सुना विठ्ठल

काही आठवणी अशा असतात की त्या काळजात खोलवर घर करून राहतात
त्यातून उमटलेल्या जाणीवा माणसाला समृृदध करून जातात.अशीच एक आठवण माझा काळजात खोलवर घर करून राहिली आहे. त्यावेळी आम्ही नुकतेच मुंबईला आलो होतो भांडूपच्या रमाबाई नगर झोपडपट्टीत एक खोली भाड्यानं घेवून राहत होतो.आमची परिस्थिती नाजूकच होती एकटे वडील कामाला तेही जेमतेम पगारावर.आई आपली काटकसर करून घर चालवत होती.१२ वर्षाचा जरी असलो तरी मला बऱ्याच गोष्टी चांगल्या समजत होत्या.आई आणि वडील"हे ही दिवस जातील, आपण कष्ट करू पण आपल्या मुलांना चांगलं शिकवू, दोघांची साथ असेल तर काहीच अशक्य नाही" असे रात्रीचे बोलताना मी नेहमी ऐकायचो पण त्याचा नेमका अर्थ कळायचा नाही.आईने मला जवळच्या एका शाळेत इयत्ता सातवीत टाकले होते. मी गावावरून आल्यामुळे भीतभीतच वावरत होतो.
ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो तिथं अगदी दाटीवाटीनं कशा ही आकाराच्या खोल्या होत्या.हळूहळू शेजारी पाजारी यांच्या ओळखी होवू लागल्या, मी त्यांच्या घरी जावू लागलो.चाळीत बऱ्याच खोल्या होत्या त्यातच चाळीच्या एका कोपऱ्यावर एक लहानशी त्रिकोणी आकाराची खोली होती तिथे नेहमी अंधार असे आणि आतून कोणीतरी खोकल्यासारखा आवाज येई.मला तर प्रश्न पडायचा ही मुंबई आहे गाव थोडंच आहे गावी असतो अंधार, इथं कुणी असं राहत का? मला तर तिथं गेलं की भीतीच वाटायची मग मी एके दिवशी आईला विचारलं
"आई तिथं कोण राहत गं ? तिथं लाइट ही नाही?अंधार का असतो ?
तेव्हा आई म्हणाली
"अरे ते विठू काका आहेत त्यांना ना कोणीच नाही आणि त्यांच्या घरात लाइट आहे पण ते लावत नाहीत म्हणून अंधार असतो"
मग मी विचारलं
त्यांना भिती नाय वाटतं ?
नाही, आईनं उत्तर दिल आणि ती लगेच आत गेली.नंतर राणेवाहिनी आईला काहीतरी सांगताना मी ऐकलं त्या म्हणत होत्या ' विठूकाका म्युनसीपालटीत कामाला होते एकदम साधा माणूस हो,विठू काका व त्यांची बायको रुक्मिणी काकू हे दोघे एकमेकांना खूप जपायचे. काकूचे गेल्यावर्षी निधन झाले होते त्यांना मुलबाळ ही नाही.काकू गेल्यापासून त्यांनी काम ही सोडलं आणि बाहेर पडणं ही , त्या अंधाऱ्या खोलीत ते दिवसभर पडून असतात. राणे वाहिनीनी सांगितलेली माहिती मी पण ऐकली पण वयानुसार जेवढं कळायच तेवढच कळलं.
पण एक मात्र झालं त्या खोलीची भिती थोडी कमी झाली. मी भिती भिती त्या खोलीपर्यंत जावू लागलो. विठू काका काही न करता एकटक कुठेतरी बघत असलेले दिसायचे. कुणीतरी मग कागदात गुंडाळुन चपाती या भाकरी खोलीबाहेर आणून ठेवायचे.
हळूहळू माझी भिती कमी झाली, सातवीतून मी आठवीत आलो. विठू काका मात्र जसे होते तसेच होते.आई वडिलांचे बोलणे ही तेच होते.
एकदा मी हिम्मत केली व विठू काकांच्या घरात गेलो ते असेच एकटक पाहत बसले होते पण मी आल्याचे त्यांना कळले
"काय रे बाबू ?
आयला मला बाबू म्हणतात हे यांना कसं कळलं, का लहान म्हणून बाबू म्हणाले
मी त्याना विचारलं
"माझं नाव तुम्हाला कसं माहित काका"
"मला सगळं माहित आहे पोरा"
"मग तुम्ही असे कसे राहता कधी घराबाहेर पडते नाही घरात लाईट लावत नाही ?
काकांचा आवाज कापरा झाला ते माझ्याकडे बघत म्हणाले
"अरे पोरा म्हणजे बाबू, रुक्मिणी गेल्यावर सगळच संपल, ती माझा आणि मी तिचा आधार होतो, तिला दुखलं तर मला खुपायचं आणि मला दुखलं तर तिला.
मी तर एकटक पाहतच राहिलो जी भाषा आमच्या पुस्तकात होती जी शुद्ध भाषा शाळेत सर, मँँडम बोलायचे तसेच काका बोलत होते
"संपलं सगळं , ती गेली माझा जीवनसाथी गेला ,मंदिरातून रखुमाई गेली आता काय सुना सुना विठ्ठल"
मला त्यावेळी इतकं काही कळलं नाही.
थोडंफार कळलं पण ते शब्द मात्र कायमचे लक्षात राहिले "सुना सुना विठ्ठल , सुना सुना विठ्ठल
प्रदीप महादेव कासुर्डे
नवी मुंबई


17 

Share


pradip kasurde
Written by
pradip kasurde

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad