Bluepadपन्नाशीतील “वसुंधरा दिन” एका नव्या संक्रमणाची सुरुवात करेल?
Bluepad

पन्नाशीतील “वसुंधरा दिन” एका नव्या संक्रमणाची सुरुवात करेल?

S
Shubham Yadav
22nd Apr, 2020

Shareधुकं... धुकं म्हटलं की समोर येते ती जानेवारी महिन्यातील एखाद्या पहाटे वातावरणात पसरलेली आल्हाददायक अशी दवबिंदूंना आपल्या कवेत घेतलेली पांढरी चादर. या दिवसात सकाळच्या गारव्यात कितीही डोक्यावर चादर घेऊन झोपून राहण्याची इच्छा झाली तरी धुक्याची ही पांढरी चादर अनुभवण्यासाठी आणि झाडांच्या पानांवरून घरंगळणारे दवबिंदू पाहण्यासाठी अनेक लोक बाहेर पडतात. पण ह्या धुक्यात दवबिंदू नाही तर घातक वायू आहे असं म्हटलं तर... धक्का बसला ना? साहजिक आहे. सत्तरच्या दशकात औद्योगीकरणाकडे फार गतीने वाटचाल करणार्‍या अमेरिकेत अशीच अवस्था होती. त्यावेळी उद्योगांच्या झापट्यामुळे वेगाने श्रीमंतीकडे धावणारे अमेरिकन्स ‘व्ही ८ सेडन’ ही वाहने वापरत आणि हयातून शिसेयुक्त वायू बाहेर पडत असे. कारखाने आणि या वाहनांमुळे हवेत विषारी धूर आणि पाण्यात गाळ यांचं प्रमाण भयावह अवस्थेपर्यन्त वाढलं होतं. हे अमेरिकनांच्या लक्षात येत होतं पण त्यांच्यासाठी ऐश्वर्यापुढे पर्यावरण महत्वाचं नव्हतं. ह्या धूराला आरोग्यास अहितकरक न समजता उलट त्यांना “समृद्धीचा सुगंध” म्हणून अमेरिकन्स गौरवाने स्वीकारू लागले होते.
मात्र पृथ्वी आपला तोल सहसा आणि सहज कधीच ढासळू देत नाही. १९६२ मध्येच रेचल कार्सन यांच्या “सायलंट स्प्रिंग” हे सजीव सृष्टी, पर्यावरण, प्रदूषण आणि सार्वजनिक आरोग्य यातील अन्योन्य संबंधांविषयी जनजागृती करणार्‍या पुस्तकाच्या पाच लाखाहून अधिक प्रती तब्बल २४ देशांमध्ये विकल्या गेल्या होत्या. संवेदनशील लोकांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे विचार झिरपू लागले होते.
अमेरिकेच्या विस्कॉन्सिन येथील कनिष्ठ सिनेटचे सदस्य गॅलेर्ड नेल्सन यांना अमेरिकेतील ढासळत्या वातावरणाबद्दल फार काळपासूनच चिंता वाटत होती. जानेवारी १९६९ मध्ये त्यांनी सांता बार्बरामध्ये मोठ्या प्रमाणात तेलाची गळती पाहिली. त्यावेळी व्हिएतनाम युद्धाच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या विद्यार्थ्यांची ऊर्जा त्यांनी पर्यावरणासाठी वापरण्याचा निर्धार केला. त्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅम्पसमध्ये जाऊन तयार करायचं होतं. संवर्धन-विचारसरणीचे रिपब्लिकन कॉंग्रेसचे सदस्य पीट मॅकक्लोस्की यांना त्यांनी सोबत घेतलं. डेनिस हेस या तरूण कार्यकर्त्याची कॅम्पसमध्ये मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नेमणूक केली आणि विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी ईस्टरच्या सुट्ट्यांमध्ये वार्षिक परीक्षा सुरू होण्याच्या आधीचा एक दिवस त्यांनी निवडला आणि तो दिवस होता २२ एप्रिल १९७०.
डेनिस हेस या तरुणाने अमेरिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यापीठे या ठिकाणी या चळवळीची सुरुवात करण्यासाठी आणि इथल्या विद्यार्थ्यांना ह्या चळवळीत बांधण्यासाठी तब्बल ८५ राष्ट्रीय कर्मचार्‍यांची बांधणी केली आणि जागोजागी संबोधन करून लोकांना पर्यावरणाविषयी जागृत केलं. त्याने २२ एप्रिल १९७० या दिवसाला “अर्थ डे” अर्थात “वसुंधरा दिन” असं संबोधायला सुरुवात केली आणि सर्व माध्यमांचं लक्ष आपल्याकडे वेधलं. “अर्थ डे नेटवर्क”च्या माध्यमातून त्याने या कार्यक्रमासाठी जनजागृती सुरू केली. आणि हा दिवस उजाडला तोच समस्त अमेरिकेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या लोकांच्या रस्ते, उद्याने, किनारपट्ट्या, शहरे, गावे यांच्यात झालेल्या रॅली आणि प्रभात फेर्‍यांनी आणि सूर्यास्त झाला तो पर्यावरणासंबंधी जागृतीच्या विविध कार्यक्रमांनी. अमेरिकेतील तब्बल २००० महाविद्यालये आणि विद्यापीठे, १०,००० शाळा आणि शेकडो सामाजिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये जवळपास २० दशलक्ष अमेरिकन्स सहभागी झाले. मागील १५० वर्षात झालेल्या औद्योगिक विकासाने कसा मानवाचाच नाही तर समस्त सजीव सृष्टीचा घास घेतला आहे हे त्यांनी निदर्शने करून सर्व जगाला दाखवून दिलं.
त्या दिवसापासून आजपर्यन्त २२ एप्रिल या दिवशी “जागतिक वसुंधरा दिन” साजरा करत जवळपास १९२ देशात तेल व इतर गळती, प्रदूषण करणारे कारखाने व उर्जा प्रकल्प, सांडपाणी, विषारी वायु आणि पाणी, कीटकनाशके, यामुळे वन्य आणि वाळवंट दोन्हीकडे होणारी हानी याला अटकाव करून पृथ्वीचे संरक्षण आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासंबंधी कार्यक्रम होत असतात.
पहिल्या वसुंधरा दिनाच्या निमित्ताने १९७० च्या अखेरीस युनायटेड स्टेट्स पर्यावरण संरक्षण एजन्सी तयार झाली आणि राष्ट्रीय पर्यावरण शिक्षण अधिनियम, व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य कायदा यासह स्वच्छ पाणी कायदा, कीटकनाशक, बुरशीनाशक आणि कृत्रिम नाशक यांचे कायदे मंजूर केले. या कायद्यांमुळे कोट्यावधी पुरुष, स्त्रिया आणि मुलांना रोग आणि मृत्यूपासून संरक्षण मिळाले आहे आणि शेकडो प्रजाती नष्ट होण्यापासून सुरक्षित आहेत.
पण.... पण एवढं करूनही अमेरिकेतच नाही तर संपूर्ण जगात काय पर्यावरणासाठी जे प्रयत्न मूळापासून व्हायला हवे ते होत नाहीत. त्यामुळेच २००३ साली स्वीडनमध्ये १५ वर्षाची मुलगी ग्रेटा थनबर्गने “जग ग्लोबल वॉर्मिंगमुळे लयास जाणारच आहे तर मग आम्ही मुलांनी शिक्षण कशासाठी घ्यावं?” असा प्रश्न विचारात लाखो मुलांचा पाठिंबा मिळवून शाळेच्या वेळात आंदोलने केली. जगभरातील पर्यावरण तज्ञ ह्या आंदोलंनांनी हलले. पण या सर्वांवर वसुंधरा परिषद, व्हिएन्ना, क्योटो, पॅरिस करार असे अनेक करार होऊनही तापमान वाढ, ओझोनचा स्तर अबाधित राखणे, कोळसा, रेती उत्खनन रोखणे अशा अनेक प्रश्नांवर ठोस काम काहीच होत नाहीये.
पहिल्या वसुंधरा दिनाची पन्नाशी साजरी करताना आज सर्व विश्वाला एका विषाणूने जायबंदी करून टाकलं आहे. पण यामुळेच की काय पर्यावरणाचं संवर्धन आपसूक होत आहे. हा विषाणू माणसाच्या चुकीचं फळ नक्कीच आहे पण तेच फळ आपल्याला पर्यावरणाच्या बाबतीत चिंतन करण्यासाठी मदत करणार आहे. यातून एक नवं निसर्ग विश्व आणि समाजमन निर्माण होईल असं तज्ञ म्हणत आहेत. कदाचित हीच नव्या संक्रमणाची वेळ असेल. या वसुंधरेवर जीवंत राहिलेल्या प्रत्येक सजीव निर्जीवास ते खर्‍या अर्थाने स्वच्छ, नितळ, समृद्ध दिवस दिसो ही आजच्या वसुंधरा दिनी शुभ मनोकामना.

0 

Share


S
Written by
Shubham Yadav

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad