Bluepad | Bluepad
Bluepad
गुढी उभारावी दारी, भरते आनंदाला येई...
Mridula Shinde
Mridula Shinde
25th Mar, 2020

Share

गुढी पाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी
गेलसालीं गेली आढी
आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा.....


बहिणाबाईंच्या या शब्दांनी खरं तर गुढी पाडव्याचा गोडवाच फुलवला आहे. भारतीय नव्या वर्षाची सुरुवात ही फक्त कॅलेंडर बदलणारी नाही तर वातावरणात होणार्‍या आल्हाददायक बदलांची बांग देणारी असते. शिमग्याची बोंब ठोकून झाली की वसंतोत्सवला म्हणजेच निसर्गाच्या आनंदोत्सवाला सुरुवात होते. शालिवाहन संवत्सराची सुरुवात आणि वसंत ऋतुचं आगमन असं दुहेरी निमित्त ह्या आनंदोत्सवाला लाभलं आहे. २३ मार्चच्या आसपास सूर्य क्रांतीवृत्त (Ecliptic) आणि विषुववृत्त (Equator) ज्या बिंदूत परस्परांस छेदतात त्या (Intersection) संपात बिंदूवर येतो ज्याला ‘वसंतसंपात’ म्हणतात. या दिवसापासून म्हणजेच २३ मार्च पासून पृथ्वीवरील दोन्ही गोलार्धात रात्र आणि दिवस समानपणे सुरू होतात. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. कारण नुकत्याच संपलेल्या शिशिर ऋतूमध्ये झाडांची पाने गळून गेलेली असतात. मात्र वसंतसंपात सुरू झाल्यावर झाडांना नवी पालवी येऊ लागते. वृक्षवल्ली टवटवीत दिसू लागतात. बाळसं धरू लागतात. आणि याच दरम्यान भारतीय कालगणनेनुसार चैत्राच्या पहिल्या महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून नवीन वर्ष सुरू होतं; ज्याला “गुढी पाडवा” म्हणतात. पानगळ झालेल्या झाडांना पालवी फुटू लागलेली असते म्हणून या दिवसाला “चैत्र पालवी” अशा काव्यात्मक नावाने ही ओळखलं जातं.
भारतीय वर्षाला शालिवाहन शक म्हणून ओळखलं जातं. असं मानलं जातं की या दिवशी शक वंशीय सातवाहनांचा राजा शालिवाहनाने इसवी सनानंतर ७८ व्या शतकात राजा विक्रमादित्यावर विजय मिळवला. त्याच्या स्मरणार्थ त्याने शालिवाहन शक संवत्सर सुरू केलं. कॅलेंडरला भारतीय भाषेत पंचांग म्हणतात. हे भारतीय राष्ट्रीय पंचांग शासकीय सरकारी नागरी (सिविल) कैलेंडर आहे. आणि ग्रेगोरियन कैलेंडरच्या सोबतच २२ मार्च १९५७ पासून त्याचा उपयोग प्रत्यक्ष आधुनिक व्यवहारात देखील होऊ लागला.
गुढी पाडव्याची पौराणिक कथाही सांगितली जाते. याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामचंद्राने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केलं. वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे. याच दिवशी प्रभू राम, सीता आणि लक्ष्मणाचा वनवास संपून ते अयोध्येला आले होते.
गुढी पाडव्याच्या या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा तांब्या (गडू) बसवून गुढी साकारली जाते. ही गुढी स्नेहाचं, मांगल्याचं आणि आनंदाचं प्रतिक मानली जाते. या दिवशी खीर, पुरणपोळी, श्रीखंड पुरी असे गोड पदार्थ केले जातातच शिवाय सकाळीच ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. याचं आरोग्यदृष्ट्या खास महत्त्व आहे. हे खाल्यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील किड थांबवणं हे सर्व शक्य होतं. शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळही केली जाते. ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो.
गुढी पाडव्याच्या दिवशी पाणपोई घालावी, पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असाही संकेत रूढ आहे. सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात.
महाराष्ट्रात गुढी उभारण्याची उभारण्याची परंपरा कधी सुरू झाली याचे स्पष्ट संकेत मिळत नाहीत मात्र संतांच्या अभंग ओव्यांमधून त्याचे संदर्भ मिळतात. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६ आणि १४ मध्ये म्हणतात,
"अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥"
"ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥"
"माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥"
संत नामदेव, संत जनाबाई आणि त्यांचेच समकालीन संत चोखामेळा यां सर्वांच्या लेखनांत गुढीचे उल्लेख येतात. संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात, "टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची॥"
गुढी ही नेहमी आकाश गामिनी असते, ती प्रगतीचं, समृद्धीचं आणि विजयाचं प्रतीक आहे. संतांनी केवळ ज्ञातेपणाची, भक्तिपथाची, साम्राज्याची, यशाची, रामराज्याची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची आणि निजधर्माचीच गुढी उभारण्यासाठी प्रेरित केलं नाही तर ‘रणांगणीही गुढी उभारावी,’ असे ते म्हणतात.
भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस 'महापर्व' म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो.
आजच्या स्पर्धेच्या युगात मोठ मोठ्या गुढ्या उभारण्याच्याही स्पर्धा होऊ लागल्या आहेत. पण यात इर्षेपेक्षा उत्सवाचा भाग अधिक असावा. हा दिवस वाईटावर चांगुलपणाने केलेल्या विजयाचा आहे. त्याचं औचित्य राखून आपल्या मनातील विकारांवर विजय मिळवून सामाजिक बांधिलकी जपावी, पर्यावरणाचं संवर्धन करावं. आणि आपल्या सोबत इतरांच्या प्रगतिची गुढी उंचच उंच न्यावी....

0 

Share


Mridula Shinde
Written by
Mridula Shinde

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad