Bluepad|| दारावरची फिरस्ती - वैदीन मावशी ||
Bluepad

|| दारावरची फिरस्ती - वैदीन मावशी ||

NILESH B WAKCHAURE
NILESH B WAKCHAURE
16th Jun, 2020

Share

|| दारावरची फिरस्ती - वैदीन मावशी ||

तु यायचीस कधी
भर दुपारी
रणरणत्या उन्हात
कधी अनवाणी पायानं
तर कधी पायाला चिंधी
किव्हा कापड गुंडाळुन
तर कधी आंगठा तुटलेली चप्पल
पायानं फरफटत
फक्त पाय पोळु नये म्हणून
कडेवर तान्हुलं तर
हाताच बोट धरून
चाललेलं एखाद लेकरू
कपाळावर तुझं भलं मोठं
रुपया येवढ कुंकु
डोक्यावरचं ओझं पडु नये
म्हणून हातात काठीचा टेकु
नजर तुझी
गावभर शोधत असायची
दोन - चार बायांचा कुठ
दिसतोय का घोळका
अन दिसताच माहेर वाशीण
सासरवाशीण
बायांचा घोळका तर
तू बळच उसनं
अवसान आणुन
बेबीच्या देठापासून
ओरडायचीस मोठ्यानं
वारंवार
सुया घे , पोत घे
वाळ घे , मनगट घे
कुकाची डबी घे ..ओ माई
कंगवा घे,
आरसा घे ,
पावडरचा डबा,
गंध काजल घे ,, ओ बाई
केसांवर फुग , गंगावन
पोरासोरांना मिठाई घे ...ओ ताई

तुझं हे बालपणी मी पाहिलेलं रूप
आजही एखाद्या रंगीत फिल्मी दुनियेसारखे
जस च्या तसं आजही मला आठवलंय
तुझा तो आत आवाज
ऐकला की आम्ही सारी
लहान - थोर पोर तुझ्या भवती
गराडा घालायचो
मग तु अलगद
कुण्या बायामाणसाच्या आधारानं
साथ जन्माचं दारिद्रयाचं ओझं
दूर करण्यासाठी
विचवाचं ओझं पाठीवर असतं
तसं डोक्यावरचं खांद्यावरच
विकायला आणलेलं सामान
कंबरेवरच लेकरू
हळुच अंगणात टेकवायचीस

अन मग सुरु व्हायचा तुझा
शिळ्या पाक्या भात भाजी भाकरीवर
कोरक्यावर लसणाच्या मिरचीवर
दह्या , दुधावर ,ध्यानावर
सुया , पोत, आरसा , कुंकू,मिठाई
मनगट , मणी, गंध ,काजळी,डबी,
देण्याघेण्याच्या अफलातुन
बिगर काट्यामापाचा व्यवहार
अन तवाच भुकावलेली लेकरं
तर केव्हाच
हा व्यवहार होण्याअगोदर
शिळ्या भाजी भाकरीवर
तुटून पडलेली असायची
मग तेव्हा मला कुपोषणाचा
अर्थ व कार्यकारणभाव कळायचा
मग माझ्या पोटात तुट तुटायचं
तुझं दारिद्र्य तुझं काळं ठिक्कुर
पडलेलं अन कळकाटलेलं रापलेलें अंग
उन्हा तान्ह्यात घामात हिंडून हिंडून
घामाजलेला , काळवंडलेला चेहरा
उद्याची ' हे बी दिस जातील '
अशी आशावादी क्षणभंगुर नागडी स्वप्ने
पाहणारी आशाळभूत नजर
लेकरांनी पोटभरून खाल्ल्यावर
भलाथोरला ढेकर देताच
तुझ्या मुखातील आनंद
हे सारं पाहिलं कि
मला गलबलून यायचं ,

मग मी माझ्या आईला
तुझ्याकडून उगाचच
फणी, कंगवा, आरसा,कुंकू,
सुई,दोरा , काजळ, मिठाई,
मणी,पोत, फुल असलं काहीतरी
घायला भाग पाडायचो
मग एक - एक करता
तुझी सामानाची समदी पाटी
माझ्याच अंगणात रीती व्हायची
अन मग तू परतायची
तुझ्या घरा दाराला
अन घरच्या बाया बापुडयांना
चिल्या पिल्याना खाऊ घालायची
पोटभर शिळ्या पाक्या अन्नावर
पुन्हा दोन - चार दिस
गायब व्हायचीस
मुंबईला जायचीस
पुन्हा नव्या आगळ्या वेगळ्या
वस्तुंनी पाटी सजवायचीस
पुन्हा दारोदार फिरस्ती
वैदीन मावशी म्हणून भटकायचीस
समदी पृथ्वी पायाघाली घालून
प्रदक्षिणा घालत घालत पुन्हा
माझ्या अंगणात यायचीस
पुन्हा तेच दृश्य तेच फिल्मी चित्रपटासारखं
दृश्य नजरेसमोर फिरायचं
अगदी माझ्या बालपणापासून

पण हल्ली हल्ली तू
माझ्या नजरेला
पडली नाहीस
म्हणून इचारपूस करत
तुझ्या घराला आलों तर
तुझ्या नातवंडानी संगातलं की
तुम्ही वैदिन मावश्या शहरातल्या
वस्तू चोऱ्या,माऱ्या करून
किव्हा उल्हासनगरच्या चोर बाजारतन
खरेदी करून गावाकडं येऊन ऐकतात
म्हणून पोलिसानी छापा टाकून
तुमची समृद्धी वस्तीच
मुद्देमालासह गजाआड केलीच
फार वाईट वाटलं
अन मन सून झालं
हे शासन गरिबीला
' जगू बी देत नाही अन
मरू बी देत नाही ;
मोठं मोठ्याला ढाक दराडे
घालणाऱ्या अट्टल चोर
गुंड . मवाली लुटारुंना
हफ्ता मिलतूचा म्हणून
बिनबोभाट सोडून देताय
अन काबाडकास्ट करून
जगणाऱ्या फिरस्ती वाल्याना
विचवाचं बिऱ्हाड पाठीवर
आसणाऱ्यांना दिन दुबळ्या भटक्यांना
फासात अडकावतंय
जीहा कुंपणच शेत खाताय
तिथं शेळी बकरीला मारून
काय उपयोग
असं म्हणत मी माझीच समजूत
काडत आतल्या आत
तसाच घुसमटत राहिलो
बरेच दिस अन मास
नंतर तू तुरूंगातून बाहेर आलीस
पण पाही डोक्यावर कायमची
खाली उत्तरवलीस.

हल्ली तू येत नाही म्हणून
माझ्या गल्लीत बाजारपन येत नाय
अंगणात कुणी फिरस्तीला थांबत नाय
अलीकडच्या पोरासोरांना
खेळण्या बायाबापुड्यानां
तुझ्या पाटीत मिळणार
पूर्वीसारखं सामान सुमान
आत्ता मालशिवाय
मिळत नाही
ते पण अव्वाच्या सव्वा
बाजारभावात
पण इथं तुझ्यासारखा
कवडीमोल भाव
आत्ता होत नाय
अन घासाघीस करायला
तसा टाईमपण नाय
कारण
आज प्रत्येकाच्या खिशात
हजार पाचशेच्या नोटा
चिल्लर सारख्या खुळखुळ नाय
डिजिटल इंडिया कॅशलेस च्या
जमान्यात तर अजून काही नाही
बदल घडतात हे तुझ्या
खिजगणतीत पण नसेल
तू अन तुझ्या आयुष्याच्या
स्वप्नाचं कधीच मातेरं झालंय
हे तुला ठाऊक पण नाही नाय
तू कोसो दूर आहे या
सोशल मिडीयाच्या
व्हाट्सअप फेसबुक च्या
आभासी जगापासून /केव्हाच दूर फेकली गेलीय
तुझ्या हक्काच्या जगण्यापासून
जग गेलंय चंद्रावर
अन तू आणि तुझं गाठोडं
पाटी चंबूगबाळं
तुझी जिंदगानी दारिद्य
भूक, उपासमार मागासलेपण
राहिलं जसंच्या तसं पृथ्वीवर
अगदी अनारी अनंत काळापासून
जसेच्या तसं पिढ्यान पिढ्यापासून
आज कुठं तुझं एखादं दुसरं पोरगं
शाळेत जाऊन क,ख,ग ,घ गिरवाया लागलया
बेरीज ,वजाबाकी,आकडेमोड शिकतया
त्याच त्यालाही नाही माहित
आपण काय आणि कशाला
दोन चार बुक शिकतुया
दोन टाईमापैकी एक टाईम
शाळंत खिचडीभात पोटभर
खायला मिळताचा यायचं त्याला
जास्तीचा आनंद मिळतुया
आई मागं गावोन गाव
अन दारोन दार फिरून
अन बापाचं बोट धरून
खान , विहिरी ,चर खोदून
पेट्या डबे सुपल्या करून तरी
कधी एवढं ताज गरमागरम
पोटभर खायला मिळवायचं त्याला
म्हणून त्याला शाळची गोडी
अलीकडं चांगलीच लागलीय माय
पण मास्तर कधी फी तर
कधी जातीचं,दाखला मागणीचा
सारखं दुमक लावतुया
तो आजच उद्या करत ठरत
रोज खोटं काही तरी उत्तर देत
वेळ मारून नेतुया
शाहू फघूले आंबेडकर
यांचं जगणं मरण वागणं कार्य
कर्तृत्व समाजसुधारकांच्या
जयंत्या पुण्य निधीमधून कानांवर
पडू लागल्या पासनं
ते जरा जास्तच साळत रमलंय
शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं
जगायचं म्हणतंय
त्याच्यासारखं समाजासाठी काहीतरी
करून दाखवायचं म्हणतंय
म्हणून या क्रांती विचारांचा कागद पुस्तके
इकडं तिकडं शोधतं नकी
पिढी वाचू लागली लहानवयात
शिका आणि संघटित व्हा
तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार
याचा अर्थ उलगवु लागला त्याला
म्हणून गावकुसा बाहेरचं
जगणं त्याचं त्यालाच नकोसं झालंय.

- निलेश भाऊसाहेब वाकचौरे.
नवलेवाडी, तालुका अकोले,
जिल्हा - अहमदनगर

1 

Share


NILESH B WAKCHAURE
Written by
NILESH B WAKCHAURE

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad