Bluepadशिक्षण
Bluepad

शिक्षण

तेजल
16th Jun, 2020

Share

'शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे' असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते कारण हे दूध प्यायल्या नंतरची ताकद त्यांनी अनुभवली होती. शिक्षण हे साधन नसून शस्त्र आहे- आयुष्याची लढाई लढण्याचं.. वैयक्तिक आणि सामाजिक प्रगती उंचावण्याचं.. लोकशाहीतील सहभाग वाढवण्याचं.. देशकार्य तेव्हाच प्रभावीपणे चालू शकतं जेव्हा देशातला प्रत्येक नागरिक सुशिक्षित असेल. त्या करताच देशाची शिक्षण व्यवस्था मजबूत असणं गरजेचं आहे. आणि आजही आढळून येणारी विविध स्तरांवरील विषमता मिटवण्यासाठी ह्या शिक्षण व्यवस्थेत पुनर्रचना करणं महत्वाचं आहे. आपल्याला हवे असलेले बदल परिणामकारक शिक्षणा पेक्षा गुणात्मक शिक्षणातूनच घडतील. आपल्यापुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि हया शैक्षणिक डोलारयाच्या बळकटीसाठी भारताने 1 एप्रिल 2010 रोजी 'शिक्षणाचा मुलभूत अधिकार, कायदा 2009' च्या अन्वये सर्वांना दिला. जास्तीत जास्त मुले शाळेत यावी म्हणून 'मिड डे मिल’, 'सर्व शिक्षा अभियान' सारखी उपक्रमे देखील राबविली जात आहेत. तरीही प्रत्येक उद्दिष्टे सफल होत नसल्याचे आपण पाहतो. खाजगी संस्थांच्या हातात गेलेल्या व्यवस्थेमुळे शिक्षणाचं बाजारीकरण झालेल दिसतं आणि आपण सर्वच ह्या बाजारात लुटले जातोय. म्हणून शैक्षणिक व्यवस्थेच्या पुनर्रचनेत ह्या बाबींचा देखील विचार होणे आवश्यक आहे. परीक्षा मूल्य मापनासाठी गरजेच्या असल्या तरी त्यांना देण्यात आलेलं अवाजवी महत्व नव्या पिढीच्या मानसिकतेवर आघात करीत आहे. व्यवहारासाठी अनिवार्य असणाऱ्या विषयांचा जसा गुण मिळवण्यासाठी अभ्यास केला जातो तसा सुंदर आयुष्य घडण्यासाठी गरजेचे असणारे विषय - पर्यावरण, व्यक्तिमत्व विकास इ. ग्रेड पासिंगला ठेवल्या मुळे त्यांच्या कड़े दुर्लक्ष होतांना दिसतं आणि ओघानेच हल्ली जीवनाकडे पाहण्याचा आलेला नकारात्मक दृष्टीकोनही आपल्याला दिसून येतो. व्यवस्थेत जितका वाटा शिक्षकांचा असतो तितकाच फायदा विद्यार्थ्यांनीही स्वयं शिक्षणातून घेतला पाहिजे, आपल्या विचारांना पोलादा सारखी बळकटी आणि सूरी इतकी धार आणली पाहिजे.
शैक्षणिक संस्थांनी नुसतंच शिस्तबद्ध वातावरण तयार करण्या पेक्षा शिक्षणाच्या प्रक्रियेकडे लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थी फक्त स्पर्धेच्या शर्यतीत उतरवण्याऐवजी आजू -बाजूच्या परिस्थितीतून त्यांनी काहीतरी शिकावं अशी पध्दती त्यांना उपलब्ध करून द्यावी लागेल. नुसती गुणांची स्पर्धा त्यांच्यातील कल्पक आणि जिज्ञासू वृत्तीला हानी पोहोचवत असते. शाळा आणि कॉलेज मध्ये ध्वनी प्रदूषण शिकवित असलो तरी वादविवाद स्पर्धा, चर्चा यांचा ध्वनी मात्र घुमलाच पाहिजे. शिस्तीच्या स्मशान शांततेत आणि निकालांच्या स्पर्धेत विद्यार्थ्यां मधले हे सृजन बाधित व्हायला नकोय. जगाच्या प्रत्येक शैक्षणिक संस्थेत तत्वज्ञान, माणुसकी, समाज शास्त्र, साहित्य यांचा आलेख उंचावत असला तर जगातील दुःख कमी होण्यास नक्कीच मदत लाभेल. आपल्या कड़े विकासाच्या धोरणांची कमी नाहीये पण त्यांची अंमलबजावणी झाल्यास नक्कीच जगण्याचे अनेक प्रश्न सुटतील. विषयां सोबत लोकाभ्यासाची पुनर्रचना करण्याचा विचार आपणा सर्वांना विकसित करेल यात शंका नाही.

10 

Share


Written by
तेजल

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad