Bluepadसर्वांगाने भोगी जीवन
Bluepad

सर्वांगाने भोगी जीवन

प्रतिष्ठा सोनटक्के
15th Jun, 2020

Share


प्रतिष्ठा कुलकर्णी - सोनटक्के
7030616622

महाराष्ट्राचं झंझावाती व्यक्तिमत्त्व, साहित्यसम्राट आचार्य प्र. के. अत्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने ही वाहिलेली शब्द पुष्पांजली...
नाटककार, विडंबनकार, विनोदी साहित्यकार, कथालेखक, चित्रपटदिग्दर्शक, पटकथाकार, संवादलेखक, आत्मचरित्रकार, बालवाङ्मयकार, शिक्षणतज्ज्ञ, वैचारिक साहित्यकार, अनुवादक, कवी... अशी अनेक क्षेत्रे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी गाजवली. आपल्या ७० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी साहित्याची अखंड सेवा केली. अत्रे यांचे संपूर्ण जीवनच बहुरंगी आणि बहुढंगी होते. मी कसा झालो या आत्मपर पुस्तकात त्यांनी या सर्व भूमिकांचा मागोवा घेतलेला आहे. त्याविषयी ते स्वतः म्हणतात, हे काही माझे चरित्र नाही. आयुष्यातील आकर्षणाचे संशोधन आहे. जीवनाच्या नागमोडी प्रवाहाचे तेथे प्रदर्शन आहे. तीन तपांच्या उपद्व्याप यांचे हे निवेदन आहे.
जवळजवळ चाळीस वर्षे रंगभूमीची सेवा करणारा यशस्वी नाटककार म्हणून अत्रे यांची ख्याती आहे. रंगभूमीच्या हालाखीच्या काळात त्यांनी मराठी रंगभूमीला नवचैतन्य दिले आणि ही परंपरा त्यांच्या विनोदी आणि गंभीर नाटकांनी जिवंत ठेवली. ते नेहमी म्हणत, वाङ्मयाचा आणि जीवनाचा निकटचा संबंध आहे. जीवनाचे पडसाद वाङ्मयात उमटले पाहिजे अशी लेखकाची भूमिका असली पाहिजे.
आचार्य अत्रे हे आदर्शांची पूजा पाहणारे थोर पत्रकार होते. शिवछत्रपती, लोकमान्य टिळक डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, महर्षी कर्वे, सानेगुरुजी, विनोबा भावे, स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडित नेहरू यांच्यावर त्यांनी नवयुग आणि मराठा मध्ये लिहिलेले लेख, अग्रलेख अजरामर आहेत. मृत्युलेख हे अत्र्यांच्या पत्रकारितेचे मोठे फलित होय. पत्रकारितेच्या माध्यमातून मृत्युलेख या वाङ्मय प्रकाराचा जन्म झाला. ते म्हणतात, वृत्तपत्र व्यवसायात मी माझे हृदय कधीही गमावले नाही.
वाचन आणि विचार या दोन गोष्टींना त्यांच्या आयुष्यात फार मोठे स्थान होते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात लेखणीला धार लावून तिची तलवार बनवली. आपल्या लेखणीच्या जोरावर दैनिक मराठाने महाराष्ट्राला जिंकले. पत्रकारांना समजावताना ते एके ठिकाणी म्हणतात, सज्जनांचा पुरस्कार, अनाथांचा कैवार, दांभिकांचा धिक्कार अशा विचारांच्या नि भावनांच्या विविध क्षेत्रामधून पत्रकाराला विहार करावा लागतो.
स्त्री प्रश्नांबद्दल त्यांनी मांडलेले विचारही त्यांच्या वैचारिक श्रेष्ठत्वाची साक्ष देतात. ते म्हणतात, हिंदू समाजात स्त्री ही सर्वस्वी पराधीन आहे. धर्माच्या दृष्टीने, कायद्याच्या दृष्टीने आणि व्यवहाराच्या दृष्टीने. आर्थिक दृष्ट्या स्त्री स्वावलंबी झाल्यावाचून ती कोणत्याही अर्थाने स्वतंत्र होणार नाही ही गोष्ट सूर्यप्रकाशाप्रमाणे स्वच्छ आहे. आपल्या स्त्रीप्रधान नाटकातूनही त्यांनी हा विषय प्रकर्षाने मांडला. ''निर्मला, करुणा आणि उल्का ही जागृती स्त्रीची तीन उत्क्रांत स्वरूपे मी माझ्या 'घराबाहेर', 'उद्याचा संसार', 'जग काय म्हणेल' या नाट्य त्रिपुटीमधून मराठी नाट्यसृष्टीत मांडण्याचा प्रथम प्रयत्न केला आहे असा माझा दावा आहे असे ते स्वतः निक्षून सांगतात.
एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणच्या गुणवैशिष्ट्यांचे दर्शन झाले की, अत्रे त्याला भरभरून दाद देत. प्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाई चौधरी यांचे सुपुत्र. बहिणाबाईंच्या निधनानंतर त्यांनी गाणी, कविता याचं हस्तलिखित त्यांना सापडलं. ते घेऊन ते अत्रेंकडे आले. एक गाणं वाचून वीज चमकावी तशी ते उठले आणि म्हणाले अहो सोपानराव हे बावनकशी सोनं आहे. महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे... आपल्या प्रदीर्घ प्रस्तावनेसह बहिणाबाईंना ग्रंथरूपात जगासमोर आणले.
डॉ. आंबेडकर व अत्रे यांच्यातील स्नेहभाव वैशिष्ट्यपूर्ण होता. प्रारंभी सावरकर व आंबेडकर यांच्या भूमिका गांधींच्या विरोधात आहेत, देशहिताला बाधक आहेत असे वाटून त्यांनी बाबासाहेबांना विरोध केला होता. पण नंतर त्यांचे मत बदलले. 'घटनासमितीत आंबेडकरांनी अखंड भारताच्या पुरस्काराची जी तेजस्वी घोषणा केली त्यावेळी त्यांच्या प्रखर देशभक्तीचे मला दर्शन झाले, व त्यांच्याबद्दल विलक्षण आदर वाटू लागला', असे अत्रे यांनी लिहून ठेवले आहे. त्यामुळेच आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर चौपाटीवर जमलेल्या अलोट गर्दीसमोर फक्त एकच भाषण झाले. ते अत्रे यांचे होते. त्यानंतर सलग बारा दिवस त्यांनी आंबेडकरांचे विचार व चरित्र सांगणारे अग्रलेख लिहिले, ते 'दलितांचे बाबा' या पुस्तकात समाविष्ट आहेत. पंडित नेहरू यांच्या मृत्यूनंतरही सारे मतभेद बाजूला ठेवून सलग तेरा दिवस अग्रलेख लिहून शब्दांजली अर्पण केली.
त्यांच्यासारखे जीवन म्हणजे माणसाच्या जीवनात किती स्थित्यंतरे होतात याचे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. माणसाच्या जीवनात स्थित्यंतरे तर होणारच पण खेद खंत मानू नये असे ते म्हणत. मला जीवनाबद्दल विलक्षण प्रेम आहे, त्या जीवनाच्या आनंदातूनच मला वाङ्मयाचे वेड लागले. वाङ्मय म्हणजे जीवनातील अनुभवांचा शोध, जीवनाचा साक्षात्कार.' असे म्हणत कृतार्थपणे जगले. जीवनावर समरसून प्रेम केलं आणि एकूणच माणसांवर प्रचंड प्रेम केलं...
१३ जून रोजी हृदय पिळवटून टाकणारे मृत्यूलेख लिहिणाऱ्या साहित्यसम्राटाला लाखो चाहत्यांनी अश्रूंधारांनी आणि पावसाने संततधार धारांनी अखेरचा निरोप दिला. १४ जूनच्या ' मराठा ' मध्ये साहेबांना श्रद्धांजली वाहणारी कविता हवी यासाठी ग.दि. माडगूळकर यांना चार ओळी लिहिण्याची विनंती रात्री १ वाजतां त्यांच्या घरी जाऊन सुधीर नांदगावकरांनी केली. ग.दि.मा. तर स्तब्ध झाले होते. त्यांनी लेखणी उचलली. आणि ओळी कागदावर उमटू लागल्या,
*सर्वांगाने भोगी जीवन
तरीही ज्याच्या उरी विरक्ती
साधुत्वाचा गेला पूजक
खचली, कलली श्री शिवशक्ती ...*


8 

Share


Written by
प्रतिष्ठा सोनटक्के

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad