Bluepad | Bluepad
Bluepad
🌸 एक राधा..एक मीरा 🌸
ज्योती (वल्लभा)गोरे
ज्योती (वल्लभा)गोरे
6th Aug, 2022

Share

इक राधा इक मीरा, दोनो ने शाम को चाहा
अंतर क्या दोनो की चाह मे बोलो
इक प्रेम दिवानी, इक दरस दिवानी.. 🌷
हे अतिशय सुंदर भजन श्री रवींद्र जैन यांच्या लेखणीतून उतरलं आणि त्यांनीच संगीतबद्ध केलं.
मीरा वा संत मीराबाई ही राजस्थान मधील एक राजपूत राजकुमारी होती. भक्ती पंथाचे पालन करणारी आणि अनेक भक्ती काव्य रचलेली म्हणून तिची ओळख आहे. ती लहानपणापासूनच कृष्णाची परमभक्त होती. तिच्याकडे एक कृष्णाची मूर्ती होती. त्यालाच ती आपला पती मानत असे. पुढे तिच्या इच्छेविरुद्ध तिचा विवाह केला गेला परंतु ती कृष्णभक्तीतच लीन राहिली, त्यामुळे सासरी तिचा अतोनात छळ झाला. असे म्हटले जाते की तिला प्यायला दिलेला विषाचा प्याला साक्षात श्रीहरीने पचवला. शेवटी मेवाड सोडून ती तीर्थयात्रेला गेली आणि द्वारका व वृंदावन येथे राहिली. तिचे संपूर्ण आयुष्य तिने कृष्णभक्तीतच समर्पित केले. असे म्हटले जाते की शेवटी ती कृष्णाच्या मूर्तीतच विलीन झाली.
याउलट राधा म्हणजे साक्षात कृष्णाची शक्तीच होय.. राधा -कृष्ण म्हणजे शिव- शक्तीचेच स्वरूप. त्यांचे प्रेम भौतिक प्रेम नसून अध्यात्मिक किंवा दैवी प्रेम होते. तिच्या निस्सीम प्रेमाने ती कृष्णाशी जणू एकरूप होती. अशी एक कथा सांगितली जाते की रुक्मिणीने कृष्णाला गरम दूध प्यायला दिले होते तर राधेच्या जिभेवर फोड आले होते. एक प्रकारे त्याची शक्ती असून ती त्याची भक्तही आहे.
हे गीत लिहिताना राधा आणि मीरा या दोघींच्याही कृष्णावर असलेल्या प्रेमाची तुलना करण्याचा प्रयत्न कवी करतात. राधा साक्षात त्याची शक्तीच तर मीरा भूलोकी जन्मलेली कृष्णभक्तीत तहानभूक हरपणारी राजकुमारी! दोघींच्या प्रेमात( अनुरक्ततेत/प्रीतीत ) फरक तरी काय? तर ते म्हणतात एक त्याच्या प्रेमात दिवाणी तर दुसरी (मीरा ) त्याच्या दर्शनासाठी दिवाणी...
राधा ने मधुबन मे ढुंढा, मीराने मनमे पाया
राधा जिसे खो बैठी वो गोविंद मीरा हाथ बिक आया
एक मुरली एक पायल, एक पगली एक घायल,
अंतर क्या दोनों की प्रीत मे बोलो
एक सूरत लुभानी एक मूरत लुभानी!!
राधा त्याला मधुबनात शोधते तर मीरा त्याच्या भक्तीत इतकी डुंबून गेली आहे की तिच्या मनात सदैव त्याचा वास आहे. राधेला बनात शोधूनही सापडत नसलेला कान्हा मीरे च्या भक्तीने तिच्या हातात स्वतःला जणू विकून बसला आहे म्हणजे ईश्वर स्वतःच त्याच्या भक्ताच्या अधीन झाला आहे.
कृष्णाला सर्वात प्रिय असेल तर ती त्याची मुरली( बासरी). राधा साक्षात त्याची मुरली बनून सदैव जणू त्याच्या मुख कमला जवळच आहे तर मीरा सदैव जणू त्याची पायल( पैंजण) बनून त्याच्या चरणांजवळ आहे. राधाकृष्ण प्रेमात पागल झाली आहे तर मीरा त्याच्या प्रेमाने घायाळ झालेल्या प्रेमिकेप्रमाणे आहे. मग त्यांच्या प्रीतीत अंतर तरी कोणते? तर एक राधा कृष्णाच्या सुंदर चेहऱ्यात स्वतःला हरवून बसली आहे तर मीरा त्याच्या सुंदर मूर्तीत गुंतली आहे...
मीरा के प्रभू गिरिधर नागर, राधा के मनमोहन
राधा नीत शृंगार करे और मीरा बन गई जोगन,
एक रानी एक दासी, दोनो हरी प्रेम की प्यासी
अंतर क्या दोनों की तृप्ती मे बोलो,
एक जीत न मानी, एक हार न मानी...
मीरेचे प्रभू श्रीकृष्ण म्हणजे गोवर्धन पर्वत उचलणारे गोवर्धन गिरीधारी तर राधेचा प्राण सखा श्रीकृष्ण म्हणजे तिचा " मनमोहन - तिच्या मनाला मोहून टाकणारा ".. कृष्णा सखी राधा सदैव शृंगार करून राहणारी तर मीरा राजकुमारी असूनही सर्व सुखांचा त्याग करून बनलेली संन्यासी स्त्री (जोगन ).. एक कृष्णाची राणी तर दुसरी जणू त्याच्या पायांची दासी - पण दोघीही हरीच्या प्रेमासाठी तहानलेल्या, आसुसलेल्या!! दोघींच्या प्रेमात मग फरक तरी कुठून शोधायचा? राधेने प्रेमात जिंकूनही ते जिंकणं मानलं नाही तर मीरा प्रेमात हार मानायला तयार नाही..
खऱ्या प्रेमात हार जीत सारखीच.. त्यामुळे प्रेमात जिंकूनही राधा ती जीत मानायला तयार नाही.. तर मीरा कृष्ण भक्तीने एवढी ओथंबून गेली आहे की जोपर्यंत तिचे प्रेम सफल होत नाही तोपर्यंत ती प्रेमात हार मानायला तयारच नाही..
दोघींच्या प्रेमात आणि भक्तीत श्रेष्ठ कोण हे ठरवण्याकरिता तुलना करता करताच कवीने जणू कबुली दिली आहे की एकीचे प्रेम आणि एकीची भक्ती यात श्रेष्ठ कोणतं प्रेम हे ठरवणार तरी कसं?
भक्ताच्या "भक्ती आणि प्रेमाने "ई"श्वर इतका बद्ध झाला की तो जगाचा पालन कर्ता श्रीहरी गोपाळ बनून कधी नंदा घरच्या गाई हाकताना दिसला तर कधी द्रौपदीचा सखा बनून तिच्या मदतीस धावून गेला तर कधी अर्जुनाचा सारथी बनून त्याचा जीवन रथ पार करवून गेला तर कधी शेकडो योद्धे धारातीर्थी पडत असलेल्या रणभूमीच्या मधोमध उभा राहून भगवदगीता देता झाला... 🙏🙏🙏
🌸 एक राधा..एक मीरा 🌸
लेख आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद 🙏🙏🙏

0 

Share


ज्योती (वल्लभा)गोरे
Written by
ज्योती (वल्लभा)गोरे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad