Bluepad | Bluepad
Bluepad
बखर एका अहल्येची
धनश्री अजित जोशी
6th Aug, 2022

Share

बखर एका अहिल्येची (31)
बखर एका अहल्येची
त्या वर्षी आमच्या कडे दिवाळी अशी नव्हती. लोक फराळाचे घेऊन भेटायला येत होते. तशी माझी पहिली दिवाळी 'दिवाळसण '.
वहिनींनी हौसेने मला साडी आणली होती . लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सगळं आवरून तयार होऊन आलो तशी मोठ्या आईंनी वहिंनींना आणि मला जवळ बोलावलं .त्यांच्या पेटीतील चिंचपेटी वहिनींना दिली.कोल्हापुरी साज काढून
माझ्या हातात दिला .
" माझ्याकडून तुम्हा दोघींना दिवाळीची भेट हो. ही चिंचपेटी लग्नातली माझ्या आईनं दिलेली.हा साज 'लक्ष्मीपूजनाचा '.सासुबाईंनी दिलेला. ही आपली माझी आठवण तुम्हाला ."
आम्हाला काय बोलावं तेच कळेना , " आज्जी हे काय केलंस ? तुझे दागिने, असू दे तुझ्याजवळ." दादांनी म्हटलं तशी म्हणाल्या " आता मी काय करू रे या दागिन्यांचे ? मला काय उपयोग? "
" अग असे काय म्हणतेस? "
" हे होते तोपर्यंत सगळी हौस करून घेतली.आता काही नको बघ, अग हे काय हातात धरून उभ्या आहात ? घाला की गळ्यात. "
गळ्यात घालून त्यांना नमस्कार केला तशी म्हणाल्या,"अष्टपुत्रा सौभाग्यवती हो. "
पारंपारिक पद्धतीने लक्ष्मी पूजन पार पडलं . वठारातल्या बायका हळदीकुंकवाला येऊन गेल्या.
पाडव्याला आईने पाठवलेली इरकल नेसून महालक्ष्मी ची भरली. भाऊबीजेला शेजारच्या गावातल्या वन्स, आत्याबाई सगळे आले होते. गप्पा गोष्टी रंगल्या .
दिवाळीचे चार दिवस कसे गेले कळले नाही जोडीने वन्संच्या लग्नाची तयारी चालू होती.
इकडून जाता येता यमूवन्संची थट्टा करणं चालू होतं. बिचार्या अगदी रडकुंडीला आल्या ." गौतमा आता पुरं की , इतकी थट्टा बरी नव्हं " शेवटी मोठ्या आईंनी ह्यांना म्हणाल्या .
मला माझी गेल्या वर्षीची आईकडची दिवाळी आठवली. सगळ्यांनी माझी अशीच थट्टा केली. तेव्हा आज्जी ने मला जवळ घेऊन सगळ्यांना असाच दम भरलान .
आता सगळं काय करत असतील ? मला त्यांची आठवण येते तशी त्यांना माझी आठवण येत असेल ? असे काहीतरी विचार डोक्यात आलेआणि डोळे वहायला लागले. काही कारण नसताना एकदम रडू आले.कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून परसात वृंदावनापाशी गेले..वृंदावनातल्या डोलणार्या तुळशीकडे बघता बघता रडू थांबले .पदराने डोळे पुसून माघारी वळले तो मागे वहिनी.
" काय , असे एकदम रडायला काय झाले ? काही होतंय का? "
" काही नाही हो." हसत हसत मी म्हणाले , " तशी सुख दुखतंय का? " चालायचचं , असं होतं कधीतरी, आईची आठवण येतीय ना? चला आत जाऊया, रडू नका असे म्हणून मला प्रेमाने आत घेऊन गेल्या .
नंतरचे दिवस लग्नाच्या गडबडीतच गेले .लग्न छान पार पडलं .पाहुण्या राऊळ्यांनी भरलेल्या घरात दिवस कसा सरायचा हेच कळायचं नाही.
यमूवन्संच्या लग्नाच्या गडबडीत मनुताईंकडे फारसे लक्षच गेले नाही बिचार्या काकूंच्या हाताखाली सतत कामात असायच्या .हाताला उसंत अशी नव्हतीच.
एक दिवस दुपारी आत्याबाईंनी विषय काढला ." विचारीन विचारीन म्हणते या मनुताई कोण? " सासुबाईंनी सगळे सांगितले तश्या म्हणाल्या , "चांगल्या मिळाल्यात हो कामाला. मी काय म्हणते आमच्या कडे कामाचं खटलं मोठं , आताशा मला उकरत नाही.तर मी घेऊन जाते यांना . "
" अहो काय म्हणताय? त्या काही कामाला ठेवलेल्या नाहीत . दादांच्या मित्राची बहीण आहे. "
" आल्यापासून बघतीये त्यांना कामालाच जुंपलंय."
" आम्ही त्यांना कामं सांगत नाही हो मुद्दामहून , त्या समजून करतात ." सासुबाई म्हणाल्या.
" म्हणूनच मी म्हणते मी जाते घेऊन आमच्या दहा माणसांत आम्हाला जड नाही. कामंही चांगली करतात .मला मदत होईल ."
शेजारीच आम्ही तांदूळ निवडत होतो.मनुताई काकूंच्या शेजारी बसल्या होत्या . एकदम रडायला लागल्या. " मनुताई काय झालं ? रडू नका." काकू त्यांची समजूत घालू लागल्या तशी त्या आणखीनच रडू लागल्या.
" मला नाही जायचं कुठं .मी नाही जायची आत्याबाईंकडे , मला कुठे पाठवू नका." रडता रडता त्या हात जोडून म्हणाल्या .
" काही हो पाठवणार कुठे, रडू नका मनू ताई " सासुबाईंनी त्यांना जवळ घेऊन म्हटलं.
" मिजास केवढी आहे .आहे तर विधवा आश्रित आणि वर रडायला काय झालं .उगाच भरल्या घरात" आत्याबाई ओरडल्या. तशी पदराचा बोळा तोंडात घालून त्या स्फूंदत राहिल्या .
"आता हा विषय बंद करा .आपण उद्या बोलू मी काढते मनुताईंची समजूत येतील हो त्या तुमच्याकडे. "
असे मोठ्या आईंनी म्हणताच आम्ही सगळे आवाक झालो .मनुताईंकडे तर बघवत नव्हते. त्यांच्या रडण्याला खंड नव्हता. "काकूं , तुम्ही त्यांना सांगा ना हो.मला नका पाठवू. मी इथे सगळी कामं करीन .पानात पडेल ते खाईन .मला पाठवू नका .." काकू तिच्या पाठीवरून हात फिरवत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या.
" मनुताई आज नाही जायचं अजून त्या आहेत चार दिवस.काय हरकत आहे त्यांच्या बरोबर जायला , असा हट्ट नाही करू. आणि आता रडणं बंद करा." मोठ्या आईंचा आवाज जरा चढला तशी दादा आत आले ," काय चाललंय? कोण रडतेय ? "
" आत्याबाई मनुताईंना त्यांच्याकडे न्यायचं म्हणतेत, त्या तयार नाहीत ."
सारा मामला दादांच्या लक्षात आला ," हे बघा मनुताई माझ्या मित्राची बहीण आहेत तशी माझीही. त्यांना कामाला आणलेलं नाही. जशी मला यमी तशीच ही, ती इथेच राहिल , कोणाकडेही जाणार नाही . कळलं ? "
" मी काय म्हणतं .."
" यावर कोणीही काही बोलणार नाही.हा विषय बंद . ती कुठेही जाणार नाही. " दादांनी ठामपणे सांगितले.
" थोरला म्हणतोय ना..मग हा विषय बंद ." मोठ्या आई म्हणाल्या तशी आत्याबाईं नाक मुरडून माजघरात गेल्या.
मनुताईंच्या चेहर्यावर हासू आले तसे आम्हाला सगळ्यांनाच बरं वाटलं.
या दिवसांत त्यांनी ही कळतनकत आम्हा सर्वांनाच जीव लावला होता.
" मनुताई जा दादांच्या पाया पडा." काकू म्हणाल्या .
पाया पडणार्या मनुताईंना उठवत दादा म्हणाले ," मनुताई हा भाऊ खंबीरपणे पाठीशी उभा आहे.आता रडायचं नाही." तशी खर्या अर्थाने भाऊबीज साजरी झाल्यासारखं वाटलं.
क्रमश.
सौ.धनश्री अजित जोशी पुणे.
#बखर_एका_अहल्येची
बखर एका अहल्येची

167 

Share


Written by
धनश्री अजित जोशी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad